रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

मला भावलेला शेक्सपिअर-०१


मी काही खूप मोठा समीक्षक नाही. असेलोच काही  तर तुमच्या सारखा साधारण  वाचक आहे,  म्हणून शेक्सपिअर वर लिहिलेला हा लेख संहितेची चिरफाड करून केलेली समीक्षा नाही. अगदी सहज वाचताना आलेले साधारनशे अनुभव तुमच्यासमोर मांडतोय. आवश्यकतेनुसार संदर्भ गोळा करत गेले कि साहित्य कृती मस्त उकलत जाते आणि मजा देत जाते. इथे मी तेच केलेय.

'All the world is a stage.'  अस म्हणणारा हा शेक्सपिअर नावाचा अवलिया त्याच्या सुदैवाने भारतात जन्माला आला नाही. असता तर त्याची ओळख कुठल्यातरी प्राचीन पुस्तकात धूळ खात बसली असती. त्याच्यासाठी सर्व जग एक रंगमंच होते  पण नाटकाच्या रंगमंचावर त्याने सर्व जगाला अवतीर्ण केले होते. त्याने  आपल्या आयुष्यात एकंदरीत 37 नाटके लिहिली आणि जवळपास १२०० च्या वर पात्रे आपल्या कल्पनेने चितारली. त्यातील अनेक पात्रांनी लोकांना भुरळ पाडली... विशेषतः शोकांतीकेतील पात्र हि कल्पनेतील नसून अगदी सच्ची समजून त्यांच्यावर अभ्यास करण्यात आला. त्याच्या काही शोकांतिका वाचताना या पात्रांविषयी मला प्रकर्षाने काहीतरी जाणवत होते. त्याच जाणीवेला मी इथे शब्दबद्ध केले आहे.

हेम्लेट: एक  शापित राजपुत्र 

हेम्लेट हे त्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते. त्याच्या नायकावर भाष्य करण्या आधी थोडक्यात ती  कथा माहिती करून घेवूयात: डेन्मार्कचा राजपुत्र असलेला हेम्लेट. आपल्या पित्याच्या मृत्यूने शोकाकुल आहे.त्याच्या वडिलांचा खून करणारा दुसरा तिसरा कुणीच नसून त्याचा काका क्लोडीअस असतो. क्लोडीअस एकाच महिन्याच्या आत हेम्लेटच्या आईशी लग्न करतो व राजा होतो.. एके रात्री हेम्लेटला त्याच्या बापाचे भूत काकाने केलेल्या कारनाम्याची  हकीकत सांगते आणि हेम्लेटकडून क्लोडीअसचा प्रतिशोध घ्यायचे वचन घेते. परंतू संपूर्ण नाटकभर अनेकदा संधी मिळूनही हेम्लेट काकांचा खून करत नाही. शेवटी त्याच्या या नाकर्तेपणामुळे अनेक लोकांचे प्राण जातात. त्याची आई गर्त्युड,त्याची प्रेयसी ओफेलीया, त्याचे मित्र रोझेन्काझ व गील्देस्तर्ण, ओफेलीयाचे वडील पोलोनिअस व भाऊ लीरेटस हे फक्त हेम्लेट च्या कृतीशुन्यतेमुळेच आपल्या प्राणाला मूकतात..आणि शेवटी   अगदी अटी-तटी च्या वेळी तो काकाला ठार करतो...आणि स्वतः हि  मरतो.

मला वाटत हेम्लेट या पात्रा एवढी चर्चा कोणत्याच नाटकातील  पात्राची झाली नसेल. तुमच्यापैकी अनेकांनी नाटक वाचलेही असू शकते व त्याबद्दल आपापली मते ठरवलीही असतील. आपल्याच आईला छी!थू! करणारा,  तिने केलेल्या व्यभिचारासाठी तिचा तिरस्कार करणारा असा, काकाचा खून करण्यासाठी धडपडत असलेला एक नायक.  नाटकाच्या सुरुवातीला पहिल्या अंकातच त्याला वडिलांच्या खुनाबद्दल माहिती कळते. आईने  केलेला व्यभिचार कळतो. परंतु पुढची चार अंक तो वडिलांच्या खुनाचा बदला न घेता स्वताला निष्कारण त्रास देत वेडेपणाचे नाटक करतो. कुठलाही सुज्ञ नायक जो ज्ञानी आहे,रसिक आहे आणि जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा जाणकार आहे, त्याला कृतीशुण्यतेचे दुर्गुण ठावूक आहेतच आणि कृती केल्यानंतरचे फायदे सुद्धा जाणतो मग तो  कर्तव्यामध्ये इतकी हेळसांड कसा काय करेल? हा प्रश्न मला पडला. त्यावरील  टीकाकारांनी केलेली भाष्य सुद्धा वाचली. पण त्याने बदला घ्यायला का उशीर केला याचे उत्तर मिळत नव्हते. या प्रश्नाने अनेक जणांना वेड लावलंय म्हणे! लावलच असेल. तो शेक्सपिअर आहे...

मग एकदा विदर्भ महाविद्यालयातील इंग्रजी विभागात कार्यरत असलेले माझे सर लोक प्रा. राजेश श्रीखंडे आणि डॉ. जयंत चौधरी यांच्याशी चर्चा करताना फ्राइड च्या एडीपस कॉम्प्लेक्स चा विषय निघाला  आणि खूपच मस्त चर्चा झाली. त्या चर्चेच्या ओघातच हेम्लेटच्या नाकर्तेपणाच्या  प्रश्नाचे उत्तर मिळाल्यासारखे वाटले. फ्राइड च्या थेओरी नुसार(थोडक्यात देतोय. यावर एक स्वतंत्र ब्लॉग लिहील) प्रत्येक मुलामध्ये आपल्या आईबद्दल सुप्त शारीरिक आकर्षण असते. मुलाला जेंव्हा कळायला लागते कि त्याचे वडील आईच्या प्रेमात वाटेकरी आहेत तर तो वडिलांचा  तिरस्कार करायला लागतो आणि वडिलांचा काटा कसा काढता येईल याचा विचार करतो. परंतु वडिलांच्या शक्तीपुढे  आणि समाजातील नैतिक बंधनाच्या भीतीपोटी उत्तर आयुष्यात तो हा विचार आपल्या अंतर्मनात लपवून ठेवतो. यालाच 'एडीपस गंड'(याचीही एक कथा आहे..त्यावरही सविस्तर) म्हणून ओळखल्या जातो. हेम्लेट मध्ये हा गंड होता. त्याला स्वतालाच त्याच्या वडिलांचा खून करावासा वाटत होते. कारण आईच्या प्रेमात त्याच्यासाठी  वडील हे वाटेकरी म्ह्णून होते.  त्याची वडिलांना मारण्याची सुप्त इच्छा त्याच्या काकांनी पूर्ण केली याचे कदाचित त्याला समाधान वाटत असेल म्हणून तो आपल्या काकांना मारायला टाळत होता. एकंदरीत हेम्लेटचा काका म्हणजे त्याच्या अंतर्मनातील इच्छा पूर्ण करणारे साधन होते. हेच ते कारण आहे कि ज्यामुळे त्याला काकाचा बदला घ्यावासा वाटत नव्हता.

हे असे स्पष्टीकरण निघत होते आणि कुठेतरी पोहचल्यासारखे वाटत होते. परंतु हे पोहोचणे  समाधान देत नव्हते. फ्राइड च्या थेओरी नुसार काही प्रश्नांची उकल होत होती तरीही काही प्रश्न घिरट्या घालतच होते.  फ्राइड वाचायला घेतला. काही गोष्टी नव्याने समजायला लागल्या. पण नव्याने समजणाऱ्या गोष्टी प्रश्नाला सोडवत नव्हत्या तर त्याचा गुंता अजून वाढत होता त्यामुळे  हेम्लेटचा  नाकर्तेपणाचा प्रश्न आणखी गहन व्हायला लागला.

मी मानसशास्त्राचा अभ्यासक नाही त्यामुळे मला फ्राइड पूर्णतः  समजला असे  मी म्हणत नाही. (फ्राइडला स्वतः हि हेच वाटेल... तोही त्याला किती कळला असेल?)माझ्या बुद्धीला जेवढे कळले ते म्हणजे कि फ्राइड म्हणतो त्याप्रमाणे माणसाच्या अंतर्मानात त्याने लपवून ठेवलेली भीती किंवा त्याची एखादी इच्छा, जी दुसऱ्यांच्यापुढे उजागर होऊ नये असे त्याला वाटते, ती अप्रत्यक्षपणे  त्याला छळत असते.या दडवून ठेवलेल्या गोष्टी इतक्या सहजी बाहेर येत नाही आणि येतात तेंव्हा त्या रूप बदलून आपल्याला संकेत देत असतात. अशा सुप्त इच्छा जाणून घ्यायच्या असतील तर तिथपर्यंत पोचण्याचे काही छुपे मार्ग आहेत.

१.स्वप्न
२.बोलताना चाचरणे (Slip of the tongue)
3.कृती करताना चाचरणे (Slip of the Acton)
4. संमोहन

आता जर हेम्लेट मध्ये खरोखरच एडीपस गंड असेल म्हणजे आईविषयी असलेली आणि समाजात मान्य नसलेली कामेच्छा, तर ती वरील चारपैकी एकाने तरी नाटकात सूचित करायला हवी.

एकेकाविषयी थोडी चर्चा करूयात. संमोहन  आपल्या उपयोगाचे नाही कारण हेम्लेट हे काल्पनिक पात्र आहे त्यामुळे त्याच्यावर संमोहन काम करणार नाही.  पैकी उरले तीन:

१. स्वप्न: हेम्लेट काल्पनिक पात्र असल्याने त्याची स्वप्ने आपल्याला कळू शकत नसली  तरी त्याच्या अंतर्मनात जाण्याचा आपल्याला एक मार्ग आहे तो  म्हणजे त्याच्या सोल्यूलोकीस (आत्मभाषणे). पूर्ण नाटकामध्ये एकंदरीत ७ वेळा तो  एकटाच आपल्या मनातील विचार प्रगट करतो. जणू त्याचे त्यावेळीचे बोलणे म्हणजे संमोहित झाल्यासारखे किंवा स्वप्नातल्या जगण्यासारखे वाटते. म्हणून त्याची स्वभाषणे एक प्रकारे स्वप्नांसारखीच आहेत. ती  त्याच्या अंतर्मनाचा आरसा म्हणून आपण गृहीत धरू शकतो.

         जर असे असेल तर त्याच्या या आत्म/स्वभाषणातून त्याच्या मनाचा जो तळ आपल्याला दिसतो  त्यात कुठेतरी लपून का होईना एडीपस गंडाचे पडसाद उमटायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. उलट तिथेच त्याची असहायता, वडिलांबद्दलचे प्रेम, आई बद्दल घृणा आणि काकांबद्दल तिरस्कार प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे फ्राइड म्हणतो तसल्या 'एडीपस गंडाच्या' खाना-खुना कुठेच सापडत नाहीत. तो तर प्रत्येकवेळी पूर्ण जाणीवेने आल्या अंतर्मनातील आईच्या व्याभिचारामुळे आलेली हिडीस भावना व्यक्त करतो. तिला अनैतिक समजतो. आपल्या नवर्याशी प्रतारणा करणारी वेश्या समजतो. याचा अर्थ नैतिकतेच्या त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्यात नवरया शिवाय इतरांशी केलेले शारीरिक संबंध त्याला पटत नाहीत. अशी सामाजिक नैतिक मुल्य पाळणारा तो असेल तर आई-मुलगा हे संबध शारीरिक पातळीवर गेलेले त्याच्या नेनिवेला कसे पटणार? किंवा ते त्याला पटतात याचा कुठलाच संकेत मला तरी त्याच्या आत्मभाषणातून मिळालेला नाही.

२. बोलताना चाचरणे: अनेकदा आपण बोलत असताना अडखळतो, चाचरतो. अशा चाचरन्याला मनोवैज्ञानिक खूप गांभीर्याने घेतात. कारण तुम्ही नेमके कुठल्या शब्दांवर चाचरले त्यावरून तुमच्या अंतर्मनाचा ठाव घेतल्या जाऊ शकतो.  यासंदर्भात एक खेळ आपल्याला आठवेल, 'झिंदगी न मिलेगी दोबारा' या चित्रपटात तो खूपच कल्पकतेणे वापरलाय. खेळताना एक व्यक्ती कुठलातरी शब्द समोरच्याला देतो आणि तो शब्द ऐकताच सगळ्यात प्रथम आपल्या डोक्यात जे काही येते ते न हीचकिचता सांगायचे. यात नेमके होते काय आपल्या अंतर्मांत लपवून ठेवलेल्या गोष्टी बाहेर येण्याची वाट बघत असतात त्यांना तिथेच थोपवायला विशेष प्रयत्न करावे लागतात. ते प्रयत्न्न करताना मेंदूला थोडा विचार करावा लागतो आणि त्या गडबडीत आपण बोलताना वेळ लागतो किंवा आपण चाचरतो.

 प्रस्तुत नाटकात हेम्लेट एकदाही अशाप्रकारे  कुठे चाचरतो असे मला आढळून आले नाही. जेणेकरून त्याच्या मनातील आईविषयी असलेली त्याची  कामेच्छा दिसून येईल आणि  आपल्याला ते कळेल. उलट तो न डगमगता सतत बोलत असतो. बोलताना तो कुठेही विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. त्याचे बोलणे नैसर्गिक वाटते आणि ते तेवढ्याच सहज त्याच्या तोंडून बाहेर निघते. एकंदरीत  आपल्याला 'अपेक्षित चाचरणे' हेम्लेटच्या  बोलण्यात कुठेच आढळत नाही.

३.कृती करताना चाचरणे:
गुप्त/सुप्त इच्छा जेंव्हा कुठल्याही रुपात वास्तवात प्रगट होताना जाणवत असेल अशावेळी आपली देहबोली बदलते आणि आपण त्यावेळी कृती करताना गडबडतो. हे गडबडणे म्हणजे एक संकेत असतो आपल्या मनोवास्थेचा. माउस ट्राप सीन मध्ये याचाच  वापर  करून काका च्या मनातील अस्वस्थता पकडल्या जाते.  लपवून ठेवलेल्या मनातील दोषाचे, गुन्ह्याचे, इच्छेचे सादारीकरन जर  गुन्हेगारापुढे होत असेल तर नक्कीच त्याचे हावभाव आणि देहबोली बदलेल   हि गोष्ट शेक्सपिअर ला ठाऊक होती एरव्ही त्याने एवढ्या खुबीने त्याचा वापर आपल्या नाटकात केला नसता. मग जर नाटककाराला वरील गोष्ट  माहित  आहे  आणि हम्लेत च्या मनातील सुप्त इच्छा  हि वडिलांचा खून करणे हीच आहे  तर  त्याने ती  नाटकात निदान शब्दातून नाही  तर  कृतीतून  तरी दर्शवली असती. संपूर्ण नाटकात हम्लेत ची कृती एवढी स्पष्ट आहे कि तो आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतो. त्यांना आदर्श मानतो आणि त्यांना जीवाने मारणे हा  विचार त्याच्या मनात  एकदाही कुठे येत नाही. याचाच अर्थ फ्राइड सांगितलेल्या कुठल्याच गोष्टीचा पुरावा संबंध नाटकात कुठेच आढळत  नाही.

एकंदरीत मनोविश्लेषक जो ठासून दावा करतात कि फ्राइडच्या थेअरी नुसारच  हम्लेतच्या नाकर्तेपणाचे उत्तर मिलते. हे साफ चूक आहे. त्याला एडीपस गंड होता हे सिद्ध होत नाही

अशा प्रकारे मूळ प्रश्न अनुत्तरीतच राहतो कि हम्लेत वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यास उशीर का करतो?

क्रमशः ........



शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

आझाद हिंद एक्स्प्रेस: काही प्रसंग



भारत...हिंन्दुस्थान....इंडिया.... जशी आपल्या देशाला विविध नावे आहेत...म्हणजे नावातच विविधता आहे...हेच वैविध्य आपल्या देशाचा आत्मा आहे...भाषा, वेश...पेहराव ...धर्म...धारणा...बुद्धी....समाज...श्रद्धा आणि अंधश्रद्धा ...सगळ्यांबाबत आपला देश विविधतेने नटलेला आहे... आता तुम्ही म्हणाल कि मी हे तेच ते काय सांगतोय... नव असं काहीच नाही... सांगतो...नवीन असलेल तेही सांगतो..

तर माझ्यासारखा एक मीच या देशात नाही... अनेक आहेत माझे देशबांधव ज्यांच्यात माझ्यासारखेच रईमानी किडे आहेत(हा एक विशिष्ट जातीचा किडा आहे ज्यांना या किडयाबद्दल जिज्ञासा असेल तर त्यांनी वयैक्तिक संपर्क साधावा)... थोडक्यात उचापती... अशीच एक उचापत मला सुचली...माझ्या डोक्यात अशा उचापती कोण घालते मला ठावूक नाही...(कमळाला सुद्धा रईमानी कीड लागते का हो? सहज विचारतोय नाहीतर म्हणाल देशद्रोही) तर मी सांगत होतो कि मला एक उचापत सुचली... मी अमरावतीचा राहणारा... आणि पुण्यातील एका संस्थेमध्ये फ्रेंच भाषा शिकण्याची हुक्की आली... त्यासाठी मला प्रत्येक शनिवार ते रविवार पुण्याहून येणे-जाणे करावे  लागायचे ... अशी सहा महिने मी माझी हि विदेशवारी ( जेंव्हा पासून विदर्भ वेगळा पाहिजे तेंव्हापासून पुणे म्हणजे अत्यंत प्रगत असा परदेस वाटायला लागला आम्हाला ... आमच्याकडील विकासाची भाषा बोलणारे अनेक जनतेचे कैवारी पुण्यातील आवक करणाऱ्या प्रगतिबद्दल आणि विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल टाहो फोडतात..)...शक्यतो नेमाने करतो आहे.. एवढ्या वाऱ्या पंढरीच्या केल्या असत्या तर पांडुरंग माझ्या घरीच येवून राहिले असते पण हि फ्रेंच भाषा अजून मला काह्ही पावली नाही...तर मी सांगत होतो कि मी पुण्याला ज्या ट्रेनने येणे जाने करायचो ती ट्रेन म्हणजे ‘आझाद हिंद एक्स्प्रेस’...

भारतीय रेल्वेची आपली एक ओळख आहे... तिची एक स्वताची संस्कृती आहे... रेल्वे आणि रेल्वेचे अनोखे असे एक विश्व आहे...या गोष्टीची जाणीव आझाद हिंद मध्ये तेही जनरल च्या डब्यात विना तिकीट प्रवास केला तर नक्कीच होते... वर उल्लेखलेली भारतातील विविधतेतील एकता तुम्हाला बघायची असेल तर सांगतो त्याप्रमाणे तुम्ही एकदा रेल्वे प्रवास कराच... तुम्हाला भारत देश काय चीज आहे ते कळल्याशिवाय राहणार नाही...’भारतीय रेल’ खऱ्या भारताचे मूर्तिमंत उदाहरण कि काय म्हणतात ते आहे...


रेल्वे खात्याचे आपले स्वतंत्र असे बजेट आहे... देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांची संख्या साडे तेरा लक्ष आहे आणि जवळपास तेवढीच रेल्वे खात्यात कर्मचारी आहेत. म्हणजे रेल्वे मंत्रालय किती मोठे आणि महत्वाचे आहे याची प्रचीती येईल...एवढ्या मोठ्या मंत्रालयाला चालवण्यासाठी साक्षात ‘प्रभू’च हवे... परंतु या रेल्वे खात्यात एक मेख आहे ज्यावर प्रभूच काय नरेंद्र (इंद्राचे एक नाव या अर्थाने घ्या कि राव!!!) सुद्धा अंकुश ठेवू शकत नाही...


तर माझा दर आठवड्याचा हा प्रवास अमरावती-पुणे-अमरावती म्हणजे जीवन अनुभवांचा आठशे किलोमीटर वाहणारा एक झराच आहे... या झऱ्यातील अनुभवाच्या पाण्याचे काही सामान्य तरीही दुर्लभ अशे घोट मला प्यायला मिळाले... त्यातील काही प्रसंग कुठल्याही तत्त्वज्ञानाच्या चष्म्यातून न पहाता मी थोडक्यात सांगतो... सृजनात्मक लोकांनी त्याला आपले मानवजातीच्या जीवनविषयक मुल्यांची विवेचनात्मक टीप्पणी करण्यासाठी वापर केला तरी या पामराचा काही आक्षेप नसेल... (बापरे!... )



प्रसंग एक


आझाद हिंद एक्स्प्रेस, बोगी न. ११... मी जनरल (मराठीत सामान्य) दर्जाचे तिकीट काढले व रिझर्वेशन च्या बोगीत बसलो. (माझा किडा मुद्दाम काहीतरी उद्दामपणा करण्यासाठी मला उचकावतो सहज मजा म्हनुन् ...).. ओडिशा किंवा प. बंगाल च्या सुज्ञ नागरिकांनी केलेला कचरा बघून मी ‘जेनेरल’ च्या बोगीतच असण्याचा भास मला होत होता. प्रधानसेवकांनी कदाचित तिकडे निवडणुकीत  हरल्यामुळे स्वच्छ भारत अभियान राबवले नसल्याचे मला उगीच वाटले.. तर एका बंगाली प्रवाश्याने हाफ पँट घातली होती (परत तुम्ही नागपूरचा संदर्भ घेता आहात! देशद्रोही कुठले!)  व बंगाली लोकांच्या पापण्यावरील केसांइतुकेच त्यांच्या पायावरील केस सौंदर्यफुल असतात हे दिसावे म्हणून, वेळोवेळी लोकांचे लक्ष जावे म्हणून आपले पाय नखाने खाजवत होता. नखाने ओरबडल्यामुळे सफेद रेषा त्याच्या गर्द केसाळ पायावरील जंगलातून जाणाऱ्या पायवाटेसारखी दिसत होती. तो पाय खाजवत होता. मधेच चैनी घोटत होता. परत खाजवत होता. तोंडात चैनीची गोळी कोंबत होता. पचकन थुंकत होता. बाजुच्याच्या अंगावर काही कंठौष्ठ निघालेले तुषार उडत होते. तोही बिचारा जंगलातील पायवाट बघून, आपल्याच हाताने ते पिवळट दवबिंदू पुसत होता. न राहवून बंगाली हाप पँटवाल्याने  मला विचारले “जेनेराल का टीकोट काटो है.”.. त्याच्या बोलण्याची ढब अशी होती कि जसा काही तो मिलीटरीतील जनरल आहे कि काय? उत्तरादाखल मी नुसती मान हलवली... बंगाली लोकांना बोलताना मान हलवण्याची...हातवारे करण्याची (ओठांचा चंबू करण्याचीही )जास्तच सवय असते... असे मला दीदींचे भाषण ऐकताना वाटले... निदान माझ्या मनाचा तसा कयास होता. खरे खोटे देव जाणे!! आपल्या बंगाली जर्दा खाल्याने पिवळसर झालेले दात विचकत आणि मला बारीकसा डोळा मिचकावत तो बिनधास्त हसला. “डरो मोत हमारे साथ भी दो लोग है. जेनेरल का तिकोटवाले, जोब टीटी आयेगा तोब सोव का नोट दे देना’. त्याने म्हटले त्याप्रमाणे टीटीआल्यावर  मी शंभर रुपये दिले. टीटी काहीही जास्त न  बोलता निघून गेला. मी  आरामात त्याच्याशी गप्पा मारत बसलो. त्याचा एक सोबती होता तो आणि हा एकाच बर्थ वर झोपले आणि मला मनमाड नंतर झोप यायला लागली होती म्हणून त्यांनी वरची बर्थ मला दिली... माणुसकी आणखी काय!!!


प्रसंग २:


आपण स्वार्थासाठी किती दलबदलू होऊ शकतो हे मला व्यक्तिशा या पुणे वारीतच कळले. एकाच दिवशी मी दोन माणसांशी बोललो आणि माझे बोलणे मलाच  एवढे धूर्त वाटायला लागले होते कि माझे आडनाव कोल्हे किंवा पवार असायला पाहिजे होते. बडनेरा ते भुसावळ पर्यंत मला मुज्जमील शेख कि खान कि शहा (हि नावे लक्षातच राहत नाहीत.. तो मुझफरनगरचा होता एवढे आठवते) याच्या बर्थवर अड्जेस्ट व्हायचे होते तेंव्हा त्याच्याशी बोलायला गेलो. इकडले-तिकडले विषय काढल्यावर राजकारणावर बोलणे सुरु केले.(भारतीयांचा आवडता विषय) त्याने जागा द्यावी म्हणून अचानकच मला राहुल गांधी भारताचे आधुनिक शिल्पकार (कि आधुनिक भारताचे शिल्पकार.. माझा हा असा गोंधळ होतो!) वाटायला लागले आणि सोनियाजी गांधीजी असे त्यांच्या नावाला दोनदा ‘जी’ लावत बोलायला लागलो. या नावात काय जादू आहे काय माहित मी बेदिक्कत त्याच्या बर्थ वर भुसावळ पर्यंत आलो. नावाची महिमा अजून काय!


भुसावळला मुज्जमील मला टाटा करून निघून गेला.. तेव्ह्ड्यातच अंकुश पाटील नावाचा माझ्याहून थोडा मोठा असेल दोनेक वर्षाने तो त्याच बर्थवर आला. मी आपल्या निस्वार्थ भावनेने त्याच्याशी बोलायला लागलो (डोळा मिच्कावलाय येथे)आणि बीजेपी निवडून आल्याने कसा देशाचा विकास होतोय असे काही-बाही बोलू लागलो. तो गालातल्या गालात हसत होता. मला वाटल आपल काम झाल. थोड्यावेळाने माझ बोलून झाल्यावर त्याने मला विचारल “मा.म.देशमुख, आ.ह.साळुंखे यांना वाचलंय का?” ... मी क्षणभर थांबलोच आणि स्वताला सावरत धडधड साळून्खेच्या पुस्तकांची पाच-सहा नावे तोफगोळ्या सारखी त्याच्या अंगावर फेकली... मग पुढे काय... आमची चर्चा शिवाजी महाराज कसे राजपूत होते यावर येवून थांबली आणि मला एक मोठी जांभई आली. त्याने त्याच्याच बर्थवर मला अड्जेस्ट केले... माणुसकी आणखी काय!!!


प्रसंग ३:


मनमाड: रेल्वेचे इंजिन बदलायला अजून अवकाश होता. तोपर्यंत डब्यातील सर्व बंगाली ललनांचे चेहेरे बघून झाले होते.. इतरही होते मीनाक्षी डोळे बघणारे ...आणि वक्षी-मीनाक्षी मंदिरे बघणारे . असो. तर मी सांगत होतो अनेक स्वभावाची लोक तुम्हाला रेल्वेच्या एकाच बोगीत भेटत असतात. आता मनमाडला होतो आणि नेहमीसारखेच जेनरल तिकीट पण बसायचं होत रिझर्वेशन मध्ये. मी ११ न. स्लीपर कोच मध्ये घुसलो. आणि फाटकातील पहिल्या काम्पार्तमेंत मध्ये उभा झालो. भूक लागल्यामुळे मी चहा आणि बिस्कीट उभ्यानेच खात होतो. त्यामुळे दोन्ही हात गुंतले होते म्हणून माझी कपड्यांची पिशवी मांड्यांमध्ये पकडली होती. मी जास्त हालचाल करू शकत नव्हतो. तेव्हड्यात आणखी माझ्यासारखीच जेनरल तिकीटवाली तीन-चार मुले तिथेच आली. माझी चहा-बिस्कीट अजून संपली नव्हती तर समोरच्या दारातून काळा कोट दिसला. काळ्या कोटवाल्या टीटीला बघून हि मुले खाली उतरली. काळ्या कोटाने दुरूनच खवचट नजरेने बघितले.. मी चहा-बिस्कीट खात, मांड्यामध्ये पिशवी धरून उतरू शकत नव्हतो म्हणून नाईलाजाने मला तसेच थांबावे लागले. नाहीतर मीही पटकन त्या बोगीतून निसटलो असतो. काळा कोट मला बघून तिथेच थांबला. गाडी सुरु झाली... खाली उतरली मुले परत चढली आणि मला म्हणाली “टीटी गेला ना?” मी त्यांना उत्तर देईल तोच काळा कोट पुढे हजर.. त्याने त्या मुलांकडून तीनशे-तीनशे वसूल केले आणि माझ्याजवळ आला म्हणाला “तुझ्याकडून मी काही घेणार नाही कारण मला बघून तू पळून गेला नाहीस... तुझ्या मनात चोर नव्हता, हि मुले लुच्ची आहेत.. तू प्रामाणिकपणे इथेच थांबला. चाल मी तुला एक रिकामा बर्थ देतो”.... मी म्हणालो ... माणुसकी आणखी काय?


प्रसंग ४:

पुणे रेल्वे स्टेशन, अमरावती कडे जाणारी परतीची आझाद हिंद. मुद्दाम एक तास आधीच आलो होतो  स्टेशनावर, म्हटले आज जाताना जेनेरल नेच जाऊ पण बघतो  तर काय... चिक्कार गर्दी. जवळपास २०० मीटर लांब लाईन लोकांची जेनेरल बोगी साठी. लगेच विचार बदलला. शेवटच्या प्लेटफॉर्म वर ५.२५ची  पुणे-नागपूर लागलेली होती. त्यातल्या जनरल बोगीत बसलो.  गमंत म्हणजे त्यात गर्दी नव्हती(रेल्वे मध्ये गर्दी नाही हि गंमतच कि खंडेराय.) . . तर तिथे एक पहिलवान टाईप तरुण ज्याच्या तोंडात गुटखा होता आणि डोळ्यातून मदिरेचा रंग झळकत होता छान ऐसपैस बसला होता. मी त्याला थोडे सरक म्हटले तर तो म्हणाला 'यहा बैठना है तो पचास रुपये लगेंगे!" मी म्हटल कसे काय "ऐसे हि है याहा पे." तेव्हड्यात दुसरे एक काकाजी आले आणि ते बेधडक पुढच्या बर्थवर बसले. त्या तरुण मुलाने आपल्या गुटखा खालल्या श्रीमुखातून बाहेर एक पिंक टाकत काकांना रुपये मागितले पण काकांनी नकार दिला. दोघांचा वाद सुरु झाला. त्याचा फायदा घेऊन मी वरच्या बर्थ वर पालकंड मांडून बसलो. तो एकदा मला रुपये मागायचा एकदा काकांना. आम्ही दोघेही नाही म्हणत होतो. आणखी प्रवासी येत होते..बसत होते..तो सगळ्यांना जागा जिंकून ठेवल्याचा मोबदला मागत होता. पण त्याचा सगळा जोर आमच्या दोघांवरच होता. त्याचाच एक मित्र बाजूच्या कॅम्पार्तमेंट मध्ये आपली वसुली करत होता. या सगळ्या गोंधळामुळे आधीच सोमरसाने बेधुंद झालेला तरुण चेकाळला आणि त्याने काकांच्या कानशिलात लगावली आणि मला म्हणाला 'तू रुपये देता कि तुझे भी देऊ एक'. मला काही  सुचलच नाही. मी सरळ वरच्या बर्थ चा आधार घेत एक जोरदार लाथ त्याच्या छातीत मारली. गडी पार पलीकडल्या खिडकीला जाऊन धडकला. त्याने त्याच्या मित्रांना आवाज दिला. ते आले. एव्हना त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला होता. त्यांनी त्याला समजावले कि आता तमाशे केले तर लोक खवळतील आणि रेल्वे पोलीस पण येतील. पण आपला गडी जुमानतच नव्हता न भाऊ! त्याने माझे शर्ट ओढले आणि सगळ्या बटन्स तुटल्या. मला तर अब्रू गेल्यासारखेच वाटायला लागले. मी चेकाळलो आणि त्याच्या मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत अगदी डोक्यात चार कि पाच (नक्की आकडा आठवत नाही पण माझा हात झांजरला होता) बुक्क्या हाणल्या. त्याच्या मित्रांनी आम्हाला आवरले. पण तो खूपच भांबावला. त्याला समजावण्यासाठी त्याच्या मित्राने काहीतरी त्याच्या कानात सांगितले. तो माझ्याकडे हसून म्हणाला 'गाडी सुरु झाल्यावर बघतो, खालीच फेकून देतो" यावर माझ्या आणि  त्याच्याकडून खूप आय माय  निघाली. आणि  तो निघून गेला. साला, माझी तर फाटत होती पण सांगणार कोणाला? उसनी हिम्मत थोड्यावेळ सोबत राहिली पण जसा रक्तातील राग थंड होत गेला तसा मी पार गांगरून गेलो. याने खरच खाली फेकले तर...अबबब!!

डब्यातून उतरुन खाली आलो. गार्डला  भेटलो. त्याने रेल्वे पोलीसला बोलावून घेतले. त्याने सगळा प्रकार विचारला. मी सांगितला. तो म्हणाला त्याला ओळखतो मी तू आत बस. मी बघतो. मी शांत होण्याचा प्रयत्न करत बोगीत बसलो. धडधडणारे हृद्य...इंजिनच्या धडधडीत सामील झाले.. गाडी सुटली.....आणि तो बेवडा तरुण रेल्वे पोलीसासोबत मजेत चर्चा आणि गमती जमती करताना मला दिसला... मला आश्चर्य वाटले. बाजूच्या एकाने मला तेंव्हाच म्हटले "पोलिसाला हप्ता मिळतो दादा! त्यांचा धंदा आहे हा! ... व्वा त्याचा धंदा चालावा म्हणून पोलीस त्याला किती मदत करतोय" ... मी काय म्हणालो असेल माहितीय....माणुसकी आणखी काय!?


ज्ञानेश्वर गजानन गटकर
मोब. ९०११७७१८११
अमरावती.


जय जय वैदर्भीवासी अंबे | धावत येई अविलंबे...

जय जय वैदर्भीवासी अंबे | धावत येई अविलंबे...

विदर्भातील सांस्कृतिक, शैक्षणिक  शहर म्हणून ओळख निर्माण केलेले आणि विदर्भाचे 'पुणे' म्हणून नावारूपाला आलेले अमरावती शहर...  संस्कृतातील उदुंबरावती या शब्दाचे प्राकृत रूप उंबरावती असून नंतर अपभ्रंश होवून उमरावती आणि आता अमरावती असे झाले. याप्रकारे प्रवास करत विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अमरावती शहर... आणि या शहराचे दैवत आई अंबा..

कुठल्याही शहराचा इतिहास हा त्या शहरातील पुरातन वास्तूतून आपल्यासमोर उजागर होत असतो. अशी वास्तू  म्हणजे एक मुका इतिहासकारच असते. अमरावतीतील अंबादेवीचे मंदिर अनेक शतकांपूर्वीची कहाणी सांगण्यास सक्षम आहे. अंबादेवी व त्यायोगे अमरावती शहर यांच्या प्राचीन व पौराणिक इतिहासाचा ओझरता आढावा घेणे अगत्याचे ठरेल.

·         पौराणिक काळातील उल्लेख:
इंद्राच्या अमरावतीचे वर्णन महाभारतात आलेले आहे. श्री कृष्णाने गरुडावर आरूढ होवून इंद्राच्या या अमरावती नगरी मधून पारिजातक वृक्ष आणला असे पौराणिक कथेत वर्णन आहे.उत्तरेतील आर्यांच्या यदु वंशातील भोज शाखेतील विदर्भ नावाच्या क्षत्रियाने आपले राज्य येथे स्थापन केले. त्यानेच  वर्धा नदीच्या तीरावर विदर्भनगरी उर्फ कुंडीनपूर हे राजधानीचे शहर उभे केले. विदर्भ राज्याच्या घराण्यातील इंदुमती नावाच्या कन्येचा विवाह प्रभू रामचंद्राचे पितामह अज नृपती यांच्याशी झाला. विशेष म्हणजे अगस्ती ऋषीची पत्नी लोपमुद्रा आणि नळ राजाची पत्नी दमयंती या विदर्भकन्याच होत्या. याच राजघराण्यातील राजा भीष्मक याची कन्या रुख्मिणी म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी होय. रुख्मिणीचे हरण ज्या ठिकाणाहून झाले ते म्हणजे आज अमरावती शहरात असलेले श्री अंबेचे मंदिर होय.
·         इतर उल्लेख:
.. १८७० च्या गझेटीअर फॉर दि हैद्राबाद असाइन डीस्ट्रीक्स यात अंबादेवी मंदिराचा उल्लेख केलेला आहे . सेटलमेंट रेकॉर्ड मध्येही श्री अंबा मातेचे मंदिर हे दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचे आहे असे म्हटले आहे. १९११ व १९६८ मधील उमरावती जिल्ह्याच्या गझेटीअर मधेय्ही असाच उल्लेख आढळतो.  तेराव्या शतकात श्री गोविन्द्प्रभू उमरावातीला आले असता त्यांनी रुख्मिणी हरणाचे स्थान पहिले अशी नोंद आहे. या वरून तेराव्या शतकातही रुख्मिणी हरणाची आख्यायिका प्रचलित होती म्हणजेच हि आख्यायिका अतिशय पुरातन आहे. या संदर्भात अम्बादेविच्या मंदिरातून कृष्णाने रुख्मिणी हरण कसे केले हे पाहणे महत्वाचे ठरेल.
·         रुख्मिणी हरणाची आख्यायिका:
विदर्भ राजा भीष्मक यास पाच पुत्र व एक लावण्यवती कन्या होती. सर्वात मोठा पुत्र रुख्मि (रुक्मि) होता तर कन्येचे नाव रुख्मिणी (रुक्मिणी) होते. ती साक्षात अंबेचा अंश होती. ती लग्नाची झाली तेंव्हा तिच्या भावाच्या आग्रहाखातर तिचा विवाह चेदि देशाचा राजपुत्र शिशुपाल याच्याशी ठरला.
द्वारकेचा राजा श्रीकृष्ण याच्या रूप आणि पराक्रमाचे  गुणगान रुख्मिणी ऐकून होती. त्याच्यावर तिचा जीव बसला. श्रीकृष्णाशीच लग्न करेल असे तिने ठरवले. द्वारकेत कृष्ण सुद्धा तिच्या रूपाच्या आणि सद्गुनाच्या वर्णनाने भारावून गेला होता व त्यानेही तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले.('शिशुपाल नवरा मी न-वरी.. श्रीकृष्ण नवरा मी नवरी')
रुख्मिणीने कृष्णाला निरोप पाठवला. सुदेव नावाच्या ब्राह्मणाने निरोपाची 'रुख्मिणी-पत्रिका' (भागवत- दशमस्कंध: अध्याय ५३) कृष्णाकडे पोचती केली. पत्रात तिने कृष्णाला आव्हान केले कि त्याने तिचे हरण करावे. तिने आपली प्रीती व्यक्त करताना सांगितले कि विदर्भ राज्यांच्या कुलनेमाप्रमाणे लग्नाच्या आदल्या दिवशी नववधू(रुख्मिणी) अंत:पुराबाहेर पडून नगराबाहेरील अंबा देवीच्या दर्शनाला जाईल तेंव्हा त्याने तिचे हरण करावे. कृष्णाने शिशुपाल आणि जरासंध यांना युद्धात हरवून तिच्याशी राक्षस विवाह करावा अशी तिची इच्छा होती.... आणि तिच्या इच्छेप्रमाणे सगळे घडून आले कृष्णाने तिला आई अंबेच्या मंदिरातून हरले व द्वारकेला निघाला.
या सगळ्या वर्णनावरून अंबा मातेच्या मंदिराचे पौराणिक महत्त्व आपल्या लक्षात येते.
·         श्रो अंबामातेची स्वयंभू मूर्ती:
श्रीकृष्णाचे सासर आणि लक्ष्मी स्वरूप रुख्मिणीचे माहेर असलेले हे भारतातील एक शक्तीपीठ आहे. अंबा मातेची मूर्ती स्वयंभू असून ती काळ्या रंगाच्या वालुका पाषाणाची आहे. हि मूर्ती पूर्णाकृती आसनस्थ आहे. अंबेचे दोन्ही हात मांडीवर विसावलेले, डोळे अधोन्मिलीत, शांत, गंभीर व ध्यानस्त अशी मुद्रा धारण केलेली आहे. मूळ मूर्तीला बिंदी, कानातील बाल्या, बुगड्या, नथ, गळ्यात ठुशी व सुवर्णाच्या सऱ्या, कमरपट्टा आणि अनेक दागिन्यांनी अलंकृत करण्यात आले आहे.
·          श्री अंबेच्या मंदिराचा इतिहास:
शहराच्या मध्यभागी असलेले मंदिर हे प्राचीन आहे. बदलत्या काळानुसार त्यात अनेक बदल केलेलं असले तरी मुख्य गाभारा हा मूळचाच असण्याची शक्यता आहे. शक्यता यासाठी कि इ.. १४९९ च्या कालखंडात यवनांनी विदर्भ प्रांतातील असंख्य मंदिराची नासधूस केली तेंव्हा विदर्भातील एवढे प्रसिद्ध मंदिर खचितच सुटले असावे. परंतु मूर्ती आणि गाभारा कसाबसा त्यातून सुरक्षित राहिला असावा... १६६० च्या सुमारास श्री. जनार्धन स्वामी यांनी मंदिराचा जीर्नोधार केला असावा. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराला पूर्वी दगडी भिंती होत्या आणि गाभाऱ्याचे द्वार ठेंगणे होते... १८०६ ते १८२१ या कालखंडात निजामाने अमरावतीच्या संरक्षणासाठी एक मजबूत असा दगडी परकोट बांधला आहे. तो परकोट अजूनही बऱ्यापैकी मजबूत असून आपले अवशेष टिकवून आहे. या परकोटाच्या एका दरवाज्याला 'अंबा दरवाजा' म्हटल्या जाते... १८६३-६४ साली श्री अंबेची मूर्ती फक्त एका चबुतऱ्या वर  होती. त्यावेळी श्री नाना चिमोटे व केवलचंद्रजी या दोन गृहस्थांनी वर्गणी गोळा करून मंदिर बांधले. १८९६ मध्ये मंदिराच्या शिखराचे काम झाले तर १९०६ मध्ये कळसाला सोन्याचा मुलामा देवून नवीन करण्यात आले. आज मंदिराला प्रशस्त सभामंडप आहे.
·          श्री जनार्दन स्वामी यांचे कार्य:
१७ व्या शतकामध्ये १६४० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामी नावाचे सत्पुरुष अंबेचे भक्त होते. तेथेच त्यांनी मंदिरच्या दक्षिणेकडील लागुनच असलेल्या अंबा नदीच्या तीरावर आपली पर्णकुटी उभी केली. रोज देवीचे दर्शन घेतल्याशिवाय ते अन्न ग्रहण करत नसत. एके दिवशी नदीला पूर आल्यामुळे त्यांना दर्शन घेणे शक्य झाले नाही. त्याच दिवशी त्यांना दृष्टांत झाला. अंबा देवीने त्यांना साक्षात दर्शन दिले व आकाशवाणी झाली कि जी विहीर स्वामी वापरात होते त्या विहिरीवरील बाण म्हणजे साक्षात देवीच आहे. त्याचीच प्राण प्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे असे बोलून देवी अदृश झाली. ती देवी म्हणजे एकविरा देवी होय व अंबा नदीच्या दुसऱ्या तीरावर आज तिचे मंदिर आहे. श्री एकविरा देवीची प्राण प्रतिष्ठा १६६० च्या शतकात झाली. आज तिथे भव्य मंदिर आहे. अंबा आणि एकविरा देवी ला जोडणारा पूल बांधण्यात आला असून भाविक एकाचवेळी दोन्ही मातेचे दर्शन घेतात. एकवेरा देवीच्या मंदिरात एक भुयार असून काही लेण्यावाजा खोल्या आहेत. त्यांचा उपयोग यवनांच्या आक्रमणावेळी संरक्षणासाठी झाला असावा.
·          श्री अंबा संस्थान आणि संस्थानाचे समाजपोयोगी कार्य:
श्री अंबा देवी संस्थान हे मंदिराची देखभाल तर करतेच शिवाय अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सुद्धा राबवते. संस्थानातर्फे एक सुसज्ज ग्रंथालय चालवल्या जाते. १९७० साली स्थापण झालेल्या ग्रंथालयाला '' वर्ग प्राप्त झाला असून सुसज्ज असे वाचनालय सुधा आहे. तसेच गेल्या १२ वर्षापासून संस्थान डॉ. जोशी हॉस्पिटल यांच्यासोबत एक सुसज्ज दवाखाना चालविते. अतिशय कमी दरात आणि गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात आतापर्यंत तिचा लाभ हजारो रुग्णांनी घेतला आहे.
जुन्या काळापासून कलाकार आणि अंबा मातेचा एक संबंध आहे. जुन्या काळातील कालावान्तिनी आपली कला मातेच्या सभामंडपात सादर करायच्या. अनेक गणिका, त्यात मुस्लीम गणिकांचा सुधा सहभाग होता, अंबा चरणी आपली भक्ती कलेच्या रूपाने अर्पण करयच्या. अंबादेवीला मिळणाऱ्या दानातील सगळ्यात जास्त वाटा गणिकांचा आहे. आज, नवरात्र मोहोत्सवात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपली कला सादर करतात. श्री अंबा फेस्टिवल म्हणून नवरात्र महोत्सव अमरावती मध्ये साजरा केला जातो ज्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या फेस्टिवल मध्ये अनेक सांस्कृतिक साहित्यिक आणि लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित केल्या जातात.

"परमशक्ती आनंदमय इत्त्युच्चते  ' अशी आई अंबा... ती देशकालमर्यादेच्या पलीकडची आहे...ब्रह्मांडाचे लालन पालन करणारी आदिमाया म्हणजेच अंबिका ...श्री अंबा होय. 



प्रा, ज्ञानेश्वर ग. गटकर 
अमरावती.


अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...