शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

जेलीफिश


जेलीफिश


मी माझ्या स्वत: च्या डोळ्यांनी पाहिले आहे ते दृश्य,
की सिबिल एका अरुंद गुफेत जावून अडकली आहे,
 आणि जेव्हा लहान मुलांनी तिला विचारले
की, "तुला काय हवे आहे?"
 तेव्हा ती असे म्हणाली
 "मला मृत्यू हवाय."
“मृत्यू”.
                                                            -पेट्रोनियस, सायरिकॉन

      “मी अमृता.... वय वाढत चाललय त्यामुळे कित्येक गोष्टी आठवतील कि नाही ठावूक नाही.... ३०० वर्षाच्या स्त्रीला अस कितीस आठवेल...पण तरीही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.. विज्ञान युगात राहतानाही दैव आणि नशीब या गोष्टी कधीकधी माणसाला इतक अतर्क्य भोगायला लावतात  कि... असो..
       मला दिवस,वर्ष,महिने असल वेळेच विभाजन आठवत नाही किंवा तीनशे वर्ष जगल्याचा परिणाम असेल कदाचित कि सर्व रटाळ आणि तेच ते असल्याने त्यातील फरक जाणवत नाही. त्यामुळे सगळ कस संगतवार तुम्हाला सांगता येणार नाही... तुम्हीच माझ्या कहाणीतील तुटलेल्या कळ्या जोडायच्या आणि अर्थ लावत जायचा...
      खरतर माझ खर नाव अमृता नाहीच... या नावाआधी मला लोक कांचन म्हणून ओळखायचे...त्याच्याही आधी दिती कि अदिती अस काहीस नाव दिल होत त्यांनी मला.. तिकडे काही लोक सिबल म्हणून तर काही लेडी टायरेशिअस म्हणून ओळखायचे... माझी अनेक नाव ठेवल्या गेल्या होती.. माझी नाव सतत बदलली पण मला ओळख बदलता आली नाही... कशी बदलता येईल...माझ्या हातात नव्हतेच ते... आणि जेंव्हा होते तेंव्हा..????
      जवळपास ३०० वर्षा आधी..अंधुकसे आठवते... कि मी तरुण होते...तशी अजूनही आहे... माझे जन्मदाते राहायचे भारतातील एका राज्यात...आता ते राज्य नाही... जगाचा नकाशा पार बदलला... माझ्या नजरेसमोर अनेक गोष्टीची माती होताना बघितली...इमारती कोसळल्या, साम्राज्य नष्ट झालीत, माणसे मेली आणि अनेक प्रकारच्या वनस्पस्ती लयाला गेल्यात.... हि अशी नशिबात मरण लाभलेली प्रत्येक गोष्ट मला खटकते आता... माझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहेत इथल्या निर्जीव वस्तू... दगड सुद्धा ... त्यांनाही रेती होता येते... त्यानाही मरता येते....बघा! झालच शेवटी विषयांतर....मला सांगायचं काय असत आणि मी सांगते काय. कृपा करून मला दोष देवू नका. एखाद्या  पोतडीमध्ये  अनेक गोष्टी कोंबल्या आहेत आणि तुम्हाला त्यातून हवी ती वस्तू काढायची आहे तर ती सापडेपर्यंत आधी इतर अनेक वस्तूच बाहेर येतात... तीनशे वर्षाचे अनुभव कोंबलेले आहेत माझ्या या शरीराच्या पोतडीने.... तर मी सांगत होते...
      मी आतासारखीच तेंव्हाही तरुण होते...माझे बाबा खूप जीव लावायचे मला.. ते खूप मोठे वैज्ञानिक होते...मरीन बायोलोजी त्यांच्या संशोधनाचा विषय...माझी आई मला जन्म देतानाच देवाघरी गेली. ते खचले होते खूप तेंव्हा. आईचा विरह ते फक्त माझ्यामुळे  सहन करू शकले अशे ते सांगायचे... खरय...माझ्यापेक्षा विरहाचे दुख, आपल्या माणसाला गमावण्याचे दुख कोण जाणू शकत... तीनशे वर्षात मी अगणित लोकांना गमावलं आहे... माझ्या तेरा नवर्यांना गमावलं आहे आणि माझी आठ लेकरे मी स्वत: दफन केली किंवा जाळून टाकली आहेत...प्रत्येकवेळी गेलेल्या माणसाचे दुख विसरायला व्हायचं तर नवीन कोणीतरी जवळचा परत या जगातून निघून जायचा... अशावेळी माझ दुख दुप्पट व्हायचं... मेलेल्या माणसाबद्दल मला दया वाटायची आणि त्याचवेळी त्याच्या नशिबावर जळायची सुद्धा.... त्यांना मरताना बघून मी अगतिक व्हायचे... नेमक सांगता येणार नाही मला... तुम्हाला समजेल अस वाटते आणि पुढील गोष्ट सांगते.....

आई गेली आणि मग मीच बाबांच्या काळजीच कारण ठरली.. त्यांना सतत मला काही होईल का याची भीती वाटायची. माझी खूप खूप खूपच जास्त काळजी घ्यायचे. इतकी कि त्यांनी माझ्यासाठी विशिष्ट्य खोली बनवली घरात. तिथली स्वच्छता ते स्वत: बघायचे. मला साधी शिंक जरी आली तरी त्याना झोप येत नसे. माझ्या आईसारखे ते मलाही गमवून बसतील अशी भीती सतत त्यांना वाटायची. माझ लहानपण खूप जपलं त्यांनी. त्यांच्या अतिकाळजीच ओझ वाटायचं तेंव्हा... पण त्यांच्यासाठी मी ते सहन केल.. त्यांच प्रेम मला कळत होत. मीही त्यांच्या वागण्यावर जास्त आक्षेप कधी घेतलाच नाही. मला कळलच नाही कि त्यांच प्रेम तेंव्हा प्रेमाच्या पलीकडे गेल होत. त्यात वेडसरपणा यायला लागला होता... त्याना माझ्या काळजीचा मेनिया झाला होता. माझ्या मरणाची भीती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इतकेच काय तर त्यांच्या संशोधनासाठी त्यांना जगभर फिरावं लागायचं तेंव्हाही ते मला त्यांच्या सोबतच नेत असत. त्यांनी मला भूमध्य समुद्र दाखवला.. प्रशांत महासागर दाखवला इतकच काय पार तिकडे जपानचा समुद्रसुद्धा फिरून आलो आम्ही. मलासुद्धा समुद्र, लाटा, किनाऱ्यावरची वाळू,शंख-शिंपले गोळा करायला आवडायचे. मी असल्या गोष्टी गोळा करायची तर बाबा वेगवेगळ्या जातीची मासे,समुद्री कीटक आणि जेलीफिश गोळा करायचे मग ते आपल्या प्रयोगशाळेत त्यांच्यावर अभ्यास करायचे. त्यांना फक्त मी आणि त्यांच्या अभ्यास याशिवाय काहीही सुचत नसायचे...
 मी मोठी झाले.... वयात आले.. आणि मला ऋतुस्त्राव सुरु झाला. जेंव्हा हि गोष्ट माझ्या वडीलांना कळली तेंव्हा तर त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. त्यानंतर ते जास्त वेळ आपल्या प्रयोगशाळेत घालवायला लागले. पण इतक काम करूनही थकवा त्यांना अजिबात जाणवत नव्हता. घरी यायचे तेंव्हा कालच्यापेक्षा प्रत्येकवेळी प्रफुल्लीत दिसायचे... मला वयात येवून तीन-चार महिने झाले असतील.. आणि मी पोट दुखतेय म्हणून बिछान्यावरच जावून पडली होती... तेंव्हा बाबा जवळ आले आणि त्यांनी मला मंदसे स्मित देवून डोक्यावर हात ठेवत शांत झोपायला सांगितले... त्यांच्या त्या काळजीच्या स्पर्शाने मला बर वाटले आणि मी झोपले.... मग सतत तीन दिवस मी झोपूनच राहिले... चौथ्या दिवशी झोपेतून  उठले तर.....
मी एकटीच होते माझ्या खोलीत ... पिवळसर रंगाचा प्रकाश होता... आणि बिछान्यावर मातीचे बारीकशे कण पडलेले होते.. इतके बारीक कि ते मुंग्यांनी आपल्या वारुळासाठी न्यावेत... मला काही कळेचना.. खोली तर माझीच होती.. वस्तू माझ्याच होत्या... मी मीच होते... मी स्वतःला आरशापुढे नेले व निरखून बघायला लागले. हि मीच होते पण... माझी कांती, माझा रंग, माझ्या चेहऱ्यावरील तजेला इतका जास्त होता कि मी हळदीसारखी पिवळीधम्म दिसत होते... मला खोलीतील पिवळ्या रंगाच्या प्रकाशामुळे अशी दिसतेय अस वाटल म्हणून लगेच पिवळसर दिवा बंद केला आणि पटकन आरशापुढे परत आले... मघाशी जितकी पिवळी चमकत होती तितकी जरी आता वाटत नसली तरी टवटवीतपणा जराही कमी झाला नव्हता. मला आतून फुलल्या सारख वाटत होत. माझ्यात एक नवीनच चैतन्य बहरल्यासारख वाटत होत. कदाचित झोप जास्त  चांगली झाल्यामुळे अस वाटत असेल, म्हणून मी तो विचार तिथेच सोडून दिला... दार उघडून बाबांना शोधायला गेली...
बाबा पोर्चमध्ये कॉफी घेत वर्तमानपत्र चाळत होते. मी त्यांच्या जवळ गेले. ते माझ्याकडे एकटक बघायला लागले. त्यांचे डोळे मला बघताना पाण्याने तरळले... ते खूप समाधानी वाटत होते. त्यांनी मला बसायला सांगितले. आणि माझा हात आपल्या हातात घेतला. माझ्या बोटावरील नखांना बघायला लागले. त्यांनी माझ्या डोक्यावरील केस बघितले..आणि समाधानाचा सुस्कारा सोडला......
माझ्या नखात, केसांत असे काय बघतायेत म्हणून मीसुद्धा माझी नख, केस बगितली तर.... माझी नखे जरा जास्तच लांब झाली होती... म्हणजे एक-दोन दिवसात जेव्हढी वाढायला पाहिजे त्यापेक्षा जास्तच ती वाढली... आणि केसांचीही कहाणी जास्त वेगळी नव्हती... ती सुद्धा एक-दोन दिवसात वाढायला पाहिजे त्यापेक्षा जास्तच लांब वाढल्यासारखे मला वाटायला लागले. बाबांना मी म्हटले कि आज उठली तेंव्हापासून मला सगळ कस विचित्र वाटतय.. माझ्या बिछान्यावरील तो बारीक मातीचा भुगा कि बारीक रेती, माझ्या कांतीतील फरक, मला आतून वाटणार चैतन्य आणि आता हे नखे आणि केस.... त्यावर ते फक्त हसले... आणि सांगेल तुला नंतर म्हणून आपल्या कामाला लागले....
तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे.... मी तशीच दिसते....मला शारीरिक थकवा आजही जाणवत नाही... माझी बुद्धी बर्यापैकी तल्लख आहे. पण आठवणी इतक्या जास्त गोळा झाल्यात डोक्यात कि गोंधळ होतो कधी-कधी... मला स्पष्ट दिसते,ऐकायला येते, सर्व दात अक्कल दाढेसह शाबूत आहेत...पण त्तरी मला जगावस वाटत नाही...कंटाळा, कंटाळा आणि फक्त कंटाळा आलाय जगण्याचा.... म्हणजे कंटाळ्याचासुद्धा कंटाळा आलाय आता...
तेंव्हाची गोष्ट अशीच एक-दिवस मी स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असताना मला खरचटलं... माझ्या मनगटाच्या खाली... कुणी चाकूने रेष ओढावी अशी रक्ताची लकेर उमटली होती..लालचुटूक.... मला वाटल कि आता खूप रक्त निघेल पण नाही.... तर ती लकेर अशी मोठी होता-होता थांबली...आणि मग आकुंचन पावल्यासारखी कमी होत गेली व नाहीशीसुद्धा झाली... मी भांबावलेच.. बाबांना जाऊन सांगितले तर ते ऐकून खुश झाले... मला अजब वाटल... त्यानंतर तर माझ्या शरीरासोबत असे विचित्र प्रकार होतच गेले...मलाही त्याची सवय होत गेली... मला काही लागल तरी ते लवकर बर व्हायचं... आजारी तर पडतच नव्हते... माझ्या हात-पायांना थकवा असा ठावूक नव्हताच.. खरतर मला झोपही नको असायची..पण  रात्री दुसर करण्यासारख नसल्याने मी पडून राहायचे... तेंव्हा कळत गेल कि आपण वेगळे आहोत.. प्रश्नसुद्धा पडायचा आपण का वेगळे आहोत त्याचा... बाबांना खुपदा विचारल तर त्यांनी स्पष्ट सांगितल कि हे  कुणाजवळ बोलायचं नाही.. वेळ आली कि सगळ कळेल.
बाबा आता पूर्वीसारखे माझी काळजी करेनात.. मी मोठी होत गेली आणि आता लग्नाला तयार होते.. बाबांचाच एक विद्यार्थी जो मलाही आवडायचा त्याच्याशी लग्न ठरले.. काही दिवसांनी लग्न झाले... मुल झाली...संसार सुरु झाला..सगळ सुरळीत होत..आता  बाबा म्हातारे होत होते...तोपर्यंत माझ्या नवऱ्याला कळून चुकले होते कि माझ्यातील जे वेगळेपण आहे ते विशेष आहे. तो सतत त्याच्याबद्दल मला विचारयाचा.... आणि हे सांगायचा कि तू कुणालाच कळू देवू नकोस... बाबांचा विद्यार्थी असल्याने तो बाबासारखाच बोलायचा.. खरतर तो बाबांची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचा... त्याला खूप मोठे वैज्ञानिक व्हायचे होते... बाबांच्या हाताखालीच तो डॉक्टर झाला होता. .. त्याचा एकंदरीत स्वभाव आणि हुशारी बघून बाबांनी माझ लग्न त्याच्याशी लावून दिले... माझ्याशी तो चांगला वागायचा... म्हणून मलाही आवडायचा...
मात्र नंतर नंतर त्याच्यात आणि बाबांत खटके उडायला लागले.. त्यांच्यात वाद सुरु होता पण वादाचा मुद्दा मला कळू देत नव्हते.. मी जवळ येतांना दिसले कि ते वाद थांबवायचे आणि विषयांतर करायचे. पण मला थोड-थोड जाणवायला लागल होत कि माझा नवरा बाबांकडे काहीतरी मागतोय आणि बाबा त्याला नकार देत आहेत. माझ्या नवऱ्याचा हट्ट दिवसेंदिवस वाढतच जात होता आणि बाबा त्याला निक्षून नकार देत होते. पण अस काय मागतोय माझा नवरा. मी खरे काय ते शोधायचा निश्चय केला. मी माझ्या बाबाला आणि नवऱ्याला पुरती ओळखून होती. लग्नानंतर मला नवरा कळत गेला. अधाशी, हावरट आणि लोभी होता तो. पण त्याच्या या दुर्गुणाचा मला तसा त्रास म्हणून कधी झालाच नाही. राहून राहून शंका मात्र यायची कि हा इतका लोभी आहे हे आपल्याला लग्नानंतर कळल ..पण लग्न करतांना याने नेमका कोणता फायदा बघितला. कारण लोभी माणसे प्रयेत्क गोष्ट त्यांची फायद्याची आहे का हे आधी बघतात आणि  नंतरच तशी कृती करतात. माझ्या नवर्याला नेमका कोणता फायदा होणार होता माझ्याशी लग्न करून...
बघा, तुम्हाला सांगितल होत न कि माझ्या बोलण्यात सुसूत्रता कि काय म्हणतात ते तुम्हाला दिसणार नाही. खंडीभर गोष्टी फिरत असतात एक बोलायला गेली तर. नुसते भुंगे हो नुसते आठवणींचे भुंगे. तर तुम्हाला सांगत होती कि माझ्या लोभी नवर्याने माझ्याशी लग्न का केले. तसे बोलून चालून सगळे माणस स्वार्थीच असतात पण  त्याला काही मर्यादा असते. स्वार्थासाठी दुसऱ्याला मारून टाकणे योग्य असते का? माझ्या नवर्याने तेच केले त्याने माझ्या बाबांना मारून टाकले.. खून  केला त्यांचा. म्हणजे त्याला खून म्हणावा कि नाही हाही प्रश्न आहे. दोघांमध्ये खूप भांडण झाले त्यादिवशी. आणि त्या भांडणात माझ्या नवऱ्याने बाबांना काहीतरी फेकून मारले. माझे म्हातारे बाबा जाग्यावरच कोसळले. स्वयंपाक करता-करता मी धावत आले तर सगळ मला दिसल. मलासुद्धा खूप राग आला नवऱ्याचा आणि कांदा चिरत होते तोच चाकू खुपसून टाकला नवऱ्याच्या पोटात.... मग  काय... पोलीस आले.. मला पकडल.. माझ्यावर खटला चालला.. आणि देहदंडाची शिक्षा झाली. विषारी इंजेक्शन देवून मृत्यूदंड देण्याची पद्धत होती तेंव्हा. मला खुर्चीवर बसवले आणि माझ्या मानेच्या खाली, मणक्यात इंजेक्शनवाटे विष टोचले. त्या विषाने मला मरणाच्या यातना होत होत्या. नेमक मला शब्दात सांगता येणार नाही.. ते विष जस-जसे चढत होते तस तसे माझ्या शरीरातील कण अन कण ठिसूळ होवून फुटल्यासारखा जाणवत होता. मी बेशुद्ध झाली असेल... काही वेळाने मी जागी झाली तेंव्हा तिथेच होती. सगळे पोलीस,तिथे हजर असलेले डॉक्टर तोंडात बोट घालून माझ्याकडे बघत होते. मलासुद्धा कळत नव्हते कि हे अस काय झाल.
आज मला सगळ समजल, मी विशेष का आहे. बघा, ते विष सुद्धा मला मारू शकले नाही... आणि मृत्यूदंड मिळाल्यावर आणि मी ती शिक्षा भोगल्यावरहि जर मेली नाही तर कायद्याने परत मला शिक्षा होत नाही. अशाप्रकारे कायद्याने मला सोडले. मी माझी शिक्षा भोगली. या बाबतीत मी नशीबवान ठरली... खरतर माझ नशीब लिहिणारा कुठला देव नव्हता, आणि ज्याने मला असे बनवले त्यालाच जर देव म्हणायचे असेल तर मग माझे बाबाच माझे देव.
माझा पहिला नवरा इतका हावरट होता कि त्याने त्याच्या स्वार्थासाठी माझ्या वडिलांचा जीव घेतला. त्याला माझ्या वडिलांकडून काय हव होत माहिती आहे. ..? मला माझ्या वडिलांनी दिलेली भेट... ती काय होती माहितीय...?
सांगते... पण मला जिवंत राहण्याचा कंटाळा आलाय हो. ३०० वर्ष झालीत... आणि आणखी किती वर्ष मी जिवंत राहणार ठावूक नाही. खुपदा मरण्याचा प्रयत्न केलाय पण जमलं नाही. तुम्ही विचार करू शकाल का कि ३००  वर्ष आयुष्य लाभलेल्या व्यक्तीला किंवा मरणाची भीती नसणाऱ्याला काय वाटत असेल...  आयुष्य शाप आहे माझ्यासाठी... अश्वत्थामा डोक्यावर भळभळती जखम घेवून जगतोय आणि मी डोक्यात दुखाचे झरे.. आम्ही दोघेही शापित... अमरत्व शाप आहे...मृत्यू या दुखातून मोक्ष देतो....खरय ते... नशीबवान आहेत जे मरू शकतात... पण मी मात्र तशी नाही... मी आहे एक जेलीफिश....
            जेंव्हा मी माझ्या पहिल्या नवऱ्याला ठार केले आणि धावत बाबंकडे गेले तेंव्हा बाबांनी मला एक शेवटी का होईना ते रहस्य सांगितल होत.. तेच आज तुम्हाला सांगतीय..


 माझे बाबा मरीन बायोलोजीतील तज्ञ.. तेंव्हा आम्ही जपान वरून नुकतेच आलो होतो..बाबांनी खूप वेगवेगळ्या जातीची मासे आणि जेलीफिश आपल्या प्रयोगशाळेसाठी आणल्या होत्या.. त्यातील एक जेलीफिशची जात खूप विशिष्ट होती. ती म्हणजे ‘टरीट्रोपसीस डोह्र्नीय.. सोप्या शब्दात ‘अमर जेलीफिश म्हणा हव तर... तिचा अभ्यास करतांना बाबाना लक्षात आले की हिच्या पेशीमध्ये अशी रचना आहे कि जिच्यामुळे हि जेलीफिश सतत नवीन पेशिना निर्माण करत असते. त्यांना प्रयोगांती लक्षात आले कि हिला वातावरणातील बदल,उपासमार झाली तर हि स्वत:मध्ये बदल करते . इतकेच नाही हिला काही लागले किंवा कापल्या गेली तर हि भरभर नवीन पेशींची निर्मिती करून पूर्ववत होते. याला माझे बाबा ‘ट्रान्स-डीफरेनशीएशन’ म्हणायचे. तेंव्हाच्या अनेक वैद्न्यानिकानी या ज्ञानाचा  उपयोग करून मानवी ‘स्टेम पेशी’ बनवण्याचा प्रयत्न केला होता. माझे बाबासुद्धा तेच करत होते. .. पण ते करत असतांना त्यांनी माझा विचार करून एक पाउल आणखी पुढे टाकले. त्यांनी त्या जेलीफिश मधून मुळातला डी.एन.ए. वेगळा काढला जो नवीन पेशींना निर्माण करत होता... आणि त्या रात्री जेंव्हा माझा ऋतूस्त्राव संपला त्यांनी इंजेक्शनवाटे मला दिला... अजूनही तो माझ्या पेशीत मिसळला आहे... त्याने मला कितीदा तरी मरणातून वाचवले आहे... ते  विषारी इंजेक्शनसुद्धा काही करू शकले नाही.. साध्या खरचटण्याचा व्रण नाही कुठेही.. अजूनही तशीच आहे... सतेज..कांतिमान... तरून...हो...तरुण... पण...पण....
            मी मनाने थकली आहे...जगण्याने थकली आहे... शरीर भोगायला तयार असले तरी इच्छा होत नाही... असे आणखी किती वर्ष जगणार...अरे कि मरणारच नाहीय मी..! अस कस होईल... काय करू मी अनंत दुखे कवटाळून..आणखी किती सहन करू... म्हणून, मी मृत्यू मागतेय... मृत्यू... मृत्यू जो सगळ्यांचा अधिकार आहे... मृत्यू जो दुखाचा अंत आहे... मृत्यू जो खरोखरच मोक्ष आहे... मला मृत्यू हवाय...मृत्यू!

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...