कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ७ जुलै, २०१८

लिटील रेड स्पॉट.




ज्ञानेश्वर गटकर,
अमरावती.(महा.)
मोबाईल:९०११७७१८११
-मेल: dggatkar@gmail.com
(तुमच्या सूचना आणि अभिप्राय कळवण्यासाठी सबस्क्राईब करा.)




अंकित,माधवी,मनोज आणि प्रसेनजीत... विमानतळाच्या बाहेर आले. त्यांना घ्यायला विशेष सरकारी वाहन वाट बघत होते.मागील सहा महिन्यांपासून चौघेही सोबतच होते. त्यांची आयुष्य एकमेकात एवढी गुंतल्या गेलीत कि त्याचं जगणे एकच झाले होते...आणि... आणि कदाचित मरणेही....
माधवी’... नावासारखीच गोड छोकरी. करिअरच्या अनेक वाटा खुल्या असतानांही तिने मानसोपचारतज्ञ होण्याचे जेंव्हा ठरवले, तेंव्हा तिच्या परिचितांनी तिला मुर्खातच काढले होते. मात्र आई-वडील तिच्या या निर्णयात नेहमीप्रमाणे सोबत होते. तिच्या आयुष्यासंबंधीचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य फक्त तिलाच आहे या मताचे ते होते. स्वताच्या इच्छा त्यांनी कधीही तिच्या निर्णयाच्या आड येवू दिल्या नाहीत. म्हणूनच माधवी स्वतंत्र विचाराची मुलगी होवू शकली.
मानोपचारतज्ञ म्हणून जेंव्हा तिची जागतिक कीर्तीच्या आणि प्रतिष्ठीत अशा भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो)मध्ये  निवड झाली तेंव्हा तिला पूर्वी मुर्खात काढणारे आता तिच्या यशाने भारावून गेले. इस्रो मध्ये तिला अंतराळवीरांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करायचे होते. अवकाशयानातील प्रवास तसा खडतर. शारीरिक आणि मानसिक थकवा आणणारा. त्यामुळे शरीरासोबतच मानसिकरीत्या अंतराळवीराला तयार राहणे गरजेचे असते.  अंतराळवीरांचे  आप-आपसातील  भावनिक बंध खूप महत्वाचे असतात. अंतराळ प्रवासातमाणूस म्हणून भावनांची अनेक आंदोलने कशी असतात? आणि त्यावर नियंत्रण कसे  मिळवायचे? या आणि अशा अनेक गोष्टी तिच्या अभ्यासाचा भाग होत्या. एवढेच नाही तर इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांना मानसिकरीत्या सक्षम ठेवण्याची व यात्रेदरम्यान सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी काय करयाचे, सोबतच्या अंतराळविरासोबत मतभेद झाल्यास स्वत:ला कसे सांभाळायचे? इत्यादीसारख्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण देण्यासाठी एक तज्ञ म्हणून तिच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. लवकरच हि मोहीम सुरु होणार होती. त्यासाठीच आवश्यक नवीन गोष्टी शिकायलानासासंस्थेमार्फत सहा महिन्याचे प्रशिक्षणासाठी तिला पाठवण्यात आले होते.  तिच्यासोबत आणखी  दोन अंतराळवीर आणि एक खगोलशास्त्रज्ञसुद्धा प्रशिक्षणासाठी गेले होते. हि चौघे ईस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमेचा महत्वाचा हिस्सा होती. आज तेच प्रशिक्षण संपवून ते मायदेशी परत आले. ‘नासातील या सहा महिन्याच्या पूर्वीची माधवी आणि प्रशिक्षण संपवून आलेली माधवी... किती बदल झाला होता तिच्यात... त्या बदलाचे कारणही तेवढेच मधुर होते म्हणा!!!... ‘प्रसेनजीत’.
प्रसेनजीत..नासातील प्रशिक्षणासाठी माधवीसोबत गेलेला एक अंतराळवीर...अतिशय देखणा आणि महात्वाकांक्षी तरुण आणि तेवढाच कर्तुत्ववानसुद्धा !!... चैतन्याने काठोकाठ भरलेला. माधवीचे आरस्पानी सौंदर्य  आणि प्रसेनजीतचे देखणे व्यक्तिमत्व एकमेकाकडे आकर्षित न होतील तरच नवल... प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसातच दोघांची मैत्री झाली आणि पुढे अगदी नैसर्गिकपणे प्रेमात बदलली. प्रशिक्षणासाठी गेलेले अंकित आणि मनोज हे सुद्धा तिचे चांगले मित्र झाले होतेच. पण तिचा जीव जडला प्रसेनजीतवर... इतरांशी मात्र ती निखळ मैत्री ठेवून होती..पण त्या मैत्रीत एक छुपी खोच होती... ती म्हणजे अंकित’.....

अंकित.... अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचा खगोलशास्त्रज्ञ... उत्कृष्ट निरीक्षण क्षमता आणि चाणाक्ष बुद्दीमत्ता लाभलेला. मनातील कुणाकडे जास्त बोलणार नाही. सतत विचारात असलेला. लहानपणापासून एकलकोंडाच म्हणून राहिलेला. न कुणाशी जास्त मिसळत होता न बोलत होता. स्वतावर नियंत्रण ठेवू शकायचा पण यदाकदाचित भावनांचा स्पोट झालाच तर स्वतःला आवरू शकत नसे.......असा अंकित माधवीवर एकतर्फी प्रेम करायला लागला होता. त्याने हि गोष्ट आपल्याच मनात लपवून ठेवली. तरी माधवीला त्याच्या वागण्या,बोलण्यातून ते जाणवत होत... जाणवणार का नाही? ती मानसशास्त्राची अभ्यासक. तिला त्याच्या मनातील भावना समजायला जास्त वेळ लागला नाही पण तिला सगळ समजल हे तिने कधीच दाखवले नाही. तिला तसे करण्याची कधी गरजही वाटली नाही. त्याच्या मनात येणाऱ्या भावना या नैसर्गिक तर आहेतच शिवाय तिला किंवा आणखी कोणाला त्याच्या वैयक्तिक भावनांचा त्रासहि नव्हता. उगाच अंकितशी या विषयावर बोलून आपण प्रकरण चिघळवू असे तिला वाटले... आणि नेमक इथेच ती चुकली.







इस्रोचे मिशन बृहस्पती-०१...... मनोज आणि प्रसेनजीत यांची या मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून निवड झाली. ‘मनोज तसा अंतराळ प्रवासात अनुभवी होता. यापूर्वी सुद्धा त्याने चांद्रयान-०३आणि मंगळ यान -०२मोहिमांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मनोजसोबत या मोहिमेसाठी प्रसेनजीतची निवड झाली आणि प्रसेनजीतला आकाश ठेंगणे झाले. मनोज आणि प्रसेनजीत या दोघांच्या भावनिक बंधाची काळजी माधवी घेत होती. ती त्यांना मानसिकरीत्या सक्षम बनवत होती. त्यांचे प्रशिक्षण वर्ग घ्यायची त्यामुळे या तिघांचे मैत्रीचे धागे घट्ट विणल्या जात होते. तिकडे मात्र  अंकितला आपण एकटे पडल्यासारखे वाटत होते. त्याच्या कामाचे स्वरूपच वेगळे असल्याने तो त्यांच्यासोबत जास्त वेळ राहू शकत नव्हता. तो आणखी एकलकोंडा झाला आणि या सगळ्यांपासून दुरावत गेला. तो एकटा असले कि त्याच्या नजरेसमोर लगट करणारे प्रसेनजीत आणि माधीवीची छबी त्याला दिसायची. त्याचा जळफळाट व्हायचा. ते सोबत दिसले कि याच्या छातीत उबदार सुरी खुपसल्यासारख्या वेदना व्हायच्या... तसे तो स्वत:ला भावनिकरित्या सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. त्याने स्वताला कामात गुंतवून घेतले. गुरु ग्रहावरच्या या मोहिमेसाठी आवश्यक सर्व खगोलशास्त्रीय माहितीची जबाबदारी अंकितवर आली होती. अंकित सतत आपल्या कामातच असायचा. याचा अर्थ त्याला काम खूप आवडायचं अस नाही तर ते त्याला माधवीच्या विचारातून सुटका मिळवण्यासाठी मदत करायचे... 
...पण जेंव्हा केंव्हा तो निवांत असायचा तेंव्हा फक्त माधवीच्या विचारांनी वेडापिसा व्हायचा... माधवी आपल्याला का मिळाली नाही? आपण कुठे कमी पडतो...? तिला मिळवण्यासाठी काय करावे लागेल?... या प्रश्नांची उत्तर शोधत असतांना त्याच्या मनात फक्त असूया आणि नैराश्य घर करुन असायचे. काहीतरी गमावल्याची भावना त्याला सतत डाचत राहायची. यावर उतारा काय? खूप कामात व्यग्र करून घ्यायचे..!!! पण तो तात्पुरता मार्ग होता. या सगळ्यांचा शेवट केला पाहिजे असे त्याने मनोमन ठरवले.










असाच एका शांत रात्री दुर्बीणतून निरीक्षण करून झाल्यावर तो माधवीचा विचार करत वेधशाळेत बसला होता. त्याच्या कार्यालयातील भिंतीवर सजावट म्हणून चितारलेले  सूर्यमालेचे भलेमोठे चित्र होते. त्याची नजर त्या चित्रावर गेली. त्याला आठवले बृहस्पती-.. गुरु ग्रहावरील मोहीम..सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरुजणू इतर ग्रहांचा राजा शोभावा असा दिमाखात चमकत होता... त्या चित्रातील गुरु ग्रहाभोवती अंकित एकटक बघत विचारात गढून गेला... त्याची नजर इतकी खोल आणि शून्य होत गेली कि थोड्याच वेळात गुरु च्या गोल आकारात त्याला प्रसेनजीतचा प्रसन्न चेहरा दिसायला लागला. त्याच्या मनाने आपोआप तुलना करायला सुरुवात केली..... गुरु, सगळ्यां ग्रहांचा राजा म्हणजे प्रसेनजीत...तर तो तिकडे सतेज शुक्र म्हणजे विनस सौंदर्याच्या देवीच्या गळ्यातील तेजस्वी माणिक इतकी तेजस्वी फक्त माधवीच आहे.... या शुक्रताऱ्याला आपलस करणारा.. आपल्या प्रचंड व्यक्तिमत्वाने सगळ्यांना जिंकून घेणारा गुरु’...नाही प्रसेनजीत... किती सहज त्याला जग जिंकता येते... जर प्रसेनजीत गुरुअसेल आणि माधवी शुक्रतर या सूर्यमालेत आपल स्थान कुठल...?... तो स्वतःला शोधत शोधत सूर्यमालेच्या पार कोपर्यापर्यंत पोहचला... तिथे त्याला तो गवसला...’हो तोच मीअसे त्याला वाटले...प्लुटो, अंधारात अस्तित्व हरवलेला, सगळ्यांपासून तुटलेला...दुर्लक्षित असा...मृत्यूचा देव....तो म्हणजे...तो म्हणजे आपण स्वतः अंकित.

प्लुटोशी आपण साधर्म्य ठेवून आहोत आणि प्रसेनजीत गुरु ग्रहाशी..... त्याच्या मनाला असह्य कळ आली आणि शुक्र ते गुरु यातील अंतरावर त्याची नजर खिळून बसली. पाणावल्या डोळ्यांनी तो गुरु ग्रहाला रोखून बघत होता. तेंव्हाच त्याच्या मनातील खलनायक जागा होवून त्याला उकसवत होता कि तू काही केले नाहीस तर तुझ अस्तित्व शून्यवत राहील... काय करावे म्हणून अंकित विचार करतच.. मंद आणि उष्ण पाझरणाऱ्या डोळ्यावर तरलता पसरली आणि गुरु ग्रह या पाण्यात विरघळून का जात नाही असे त्याला वाटले तितक्यात त्याला गुरु ग्रहावरील एक  लालसर ठिपका दिसला... त्या ठीपक्याकडे बघत असतनाच त्याचा चेहर्यावरील सुर्कुत्यांमध्ये बदल होत होता... डोळ्यातील ओलावा जणू कोणत्यातरी प्रखरतेमुळे बाष्प होत होता.. त्याचे डोळे लगेच कोरडे झाले.. अश्रू थांबले..ते लाल झाले गुरु ग्रहावरील त्या ठिपक्यापेक्षाही लाल... शेवटी त्या ठिपक्याजवळ जात.. त्या ठिपक्यावरून  हात फिरवत अंकित खुश होवून आसुरी हसायला लागला....

तो भला मोठा लाल ठिपका... तो ठिपका गुरु ग्रहावर न जाणो कित्येक वर्षापासून आहे. ३०० वर्षाआधी तो मानवाला दिसला. तो ठिपका म्हणजे दुसर-तिसर काहीच नसून गुरु ग्रहावरील एक महाप्रचंड वादळ आहे. तब्बल  तीन पृथ्वी सामावतील एवढे प्रचंड मोठे. गुरु ग्रहावरील  मोहिमेत हा रेड स्पॉट एक डोखेदुखी ठरणार होता. गुरु ग्रह एक gas जाएंट असल्याने त्याच्यावर यान उतरवणे अशक्य होते म्हणून  बृहस्पती-०१ मोहिमेतील यान गुरु ग्रहाच्या भोवती घिरट्या घालून शक्य तितकी माहिती पृथ्वीवर पाठवणार होती. यान गुरु ग्रहाच्या खूप जवळ जाणार असल्याने या महावादळाचा धोका होताच. तो टाळण्यासाठीच अंकितने दिलेली खगोलशास्त्रीय माहिती खूप गरजेची होती. जेंव्हा यान गुरु ग्रहाच्या भोवती फिरेल तेंव्हा या वादळाचे स्थान टाळावे लागणार होते. हे वादळ ताशी ३६० किलोमीटरच्या वेगाने वाहत असल्याने त्याला टाळणे खूप जिकरीचे काम होते. मात्र  अंकित सारख्या हुशार खगोलशास्त्रज्ञाने अनेक क्लिष्ट गणिते करून त्यातून मार्ग काढला होता... त्यासाठीच अंकित सतत गुरु ग्रहाचे निरीक्षण करत असायचा. आज जरा उसंत मिळाली म्हणून तो निवांत माधवीचा विचार करत होता तर भावनिक झाला. माधवीला मिळवण्यासाठी तो कोणत्याही स्तराला जायला तयार होता.. सूर्यमालेतील चित्राकडे बघितल्यावर तर त्याला तो मार्गच मिळाला....
दोन रात्रीपूर्वी गुरु ग्रहाचे निरीक्षण करत असतांना अंकितला या मोठ्या ठीपक्यासोबतच एक नवीन ठिपका दिसला होता. नवीन ठिपका खूप काही मोठा नव्हता. मोठ्या ठीपक्याच्या मानाने तो क्षुल्लकच. नवीन ठिपकासुद्धा मोठ्या ठिपक्यासारखेच वादळ असण्याची शक्यता अंकीतला वाटत होती. त्याची पूर्ण शहनिशा केल्यावरच हि नवीन ठिपक्याची बातमी जाहीर करण्याचे त्याने ठरवले होते.
सूर्यमालेच्या चित्रापासून दूर होत तो झटकन आपल्या संगणकाच्या जवळ गेला. भरभर.. झपाटल्यासारखी आतापर्यंतच्या निरीक्षणाची आणि रेडीओ दुर्बिणीद्वारे मिळालेली माहिती चाळायला लागला. जसजशी त्याची माहिती वाचून होत होती तसतशी त्याच्या चेहऱ्यावरील भावदर्शक लकेरी बहरत होत्या. शेवटी त्याला त्याच्या प्रेमातील अडसर दूर करण्याचा मार्ग मिळाला होता...!!तो खुश होता...अगदी मनापासून हसत त्याने टेबलावरील पेपरवेट उचलून पूर्ण ताकतीनिशी सूर्यमालेच्या चित्रातील गुरु ग्रहाकडे भिरकावला. त्यामुळे चित्रातील गुरुग्रहावर असलेल्या मोठ्या ठिपक्या शेजारी  एक छोटीशी खोच पडली... एक छोटासा ठिपका उमटला...द लिटील रेड स्पॉट!!!!.. अगदी त्याला नव्याने सापडलेल्या वादळा इतकाच तो नवीन ठिपका... हो ते एक वादळच होते... उध्वस्त करणारे वादळ... खूप काही उध्वस्त करणारे वादळ!!!!
नवीन,कुणाचेही लक्ष जाणार नाही इतके छोटेसे वादळ गुरु ग्रहावर घोंगावत होते. त्याचे ठिकाण,त्याचा वेग, त्याची विध्वंसकता अंकितलाच फक्त ठावूक होती आणि मोहिमेसाठी हे वादळ घातक होते हे सुद्धा तो जाणून होता. त्याच्या वेगाचा विचार करता हे वादळ नेमके यान जिथे घिरट्या घालणार आहे तिथेच पोहचणार याची त्याला खात्री होती त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्या यानात दुर्दैवी मनोजसोबत  दुष्ट,गर्विष्ठ प्रसेनजीत असणार होता...नवीन वादळाचे गुपित अंकित  कुणालाच सांगणार नव्हता... त्याच्या काचेसारख्या नाजूक प्रेमावर चढलेली काजळी पुसण्यासाठी तो वादळाचा वापर करणार होता... इतका निग्रही अंकित...



------------------------------------                    -------------------------------            --                             ---------------------------

इस्रोचे यान आकाशात झेपावले आणि ठरल्यावेळी गुरुग्रहाच्या कक्षेत पोचले सुद्धा. ते गुरुग्रहाच्या भोवती फिरून गुरुग्रहाभोवती घिरट्या घालायला लागले. गुरु आपले काम चांगल्या प्रकारे बजावत आहे असा संदेश मिळाला. सगळ ठीक सुरु होते. मोहिमेला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळत होते. तिथून पाठवण्यात येणाऱ्या माहितीचा खजिना अभ्यासण्यात इस्रोतील सर्व शास्त्रज्ञ मग्न होते.. पण दुर्दैव!!! अचानक गुरुग्रहावरील यानातून येणारे संदेश एकाएकी बंद पडले.
----------------                -----------------------              -------------------------------
मागच्या आठ दिवसापासून बृहस्पती यानाकडून कुठलाच संदेश मिळत नव्हता. अचानक सगळे संपर्क तुटले होते... कुणालाच कारण कळत नव्हत.... सगळे अनभिज्ञ होते... मात्र एकाला सगळ माहित होत... चेहऱ्यावर खोटा दुखवटा आणून आत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्या फक्त एकाच व्यक्तीच्या मनात...अंकित......
इस्रोचे सगळे लोक चिंतेत दिसत होते. खूप मोठ्या संकटाला ते सामोरे जात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रो ची खूपच नालस्ती झाली होती. अद्यावत तंत्रज्ञान, हुशार शास्त्रज्ञ, उत्कृष्ट यान, सक्षम अंतराळवीर आणि खोगोलशास्त्राचे इतम्भूत ज्ञान  असल्यावरही बृहस्पती मोहीम अपयशी झाल्यासारखी वाटत होती. अचानक संपर्क तुटल्यामुळे तिथे नेमके काय घडले हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता.
माधवी सगळ्यात जास्त चिंतातूर दिसत होती. तिचा प्रसेनजीत...कसा असेल तो? परग्रहावर... ??? काय झाल असेल...? जिवंत तरी असेल न...? आठ दिवसापासून काहीच पत्ता लागत नसल्याने सगळ्यांनी ते जिवंत असण्याची आशा जवळपास सोडलीच होती. अंतराळविरांच्याच चुकीमुळे अपघात झाला असेल आणि त्यात यानासहित त्यांचाही अंत झाला असेल असा तर्क काढण्यात आला. प्रसेनजीत आणि मनोज दोन्हीही अंतराळवीर आता परत येणार नव्हते.
अंकितसाठी तर अवघी आकाशगंगाच उजळून निघाली होती. त्याने चेहऱ्यावरील आनंदाचे भाव लपवण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यात तो यशस्वीही झाला होता. आता बस काही दिवसानंतर तो माधवीला लग्नासाठी मागणी घालणार आणि माधवी नेहमीसाठी त्याला मिळणार हि भावना त्याला दुखी आणि स्वथ बसूच देत नव्हती. तो पूर्वीपेक्षा जास्तच चैतन्याने वावरत होता.... तशी त्याच्यावर कुणालाही शंका आली नाही, फक्त माधवीला त्याच्या वागण्यातील बदल खटकत होता.





माधवी... मनातील गोष्टी चेहऱ्यावरून वाचणारी मानसोपचारतज्ञ.. तिच्या नजरेतून अंकितमधील बदल सुटला नाही. एका-एकी  झालेला हा बदल तिच्या विचारी मनाला खटकत होता. कारण व्यक्तीच्या स्वभावात बदल पडायला खूप वेळ लागतो आणि तो लवकर पडलाच तर त्याला तसे कारणही असते हे तिला माणसशास्त्राने शिकवले होते. अंकितमधील  बदलाच एक कारण ती समजू शकत होती ते म्हणजे प्रसेनजीत नसल्याने आता तो तिच्यासोबत बिनधास्त बोलू शकायचा, भेटू शकायचा म्हणून कदाचित तो पूर्वीपेक्षा आनंदाने राहू शकत असेल. पण तरीही एवढ्यात त्याच्या बोलण्यातून एक श्रेष्ठत्वाची मिजास दिसत होती. कुठल्यातरी नकारात्मक गंडातून बाहेर पडल्यानंतर किंवा स्वताला सिध्द केल्यानंतर जो वागण्या बोल्यात एकप्रकारचा अहंयेतो दिसत होता. ती विचार करायला लागली कि त्याने अस कुठल कृत्य केल कि ज्याचा त्याला गर्व वाटत आहे. उलट बृहस्पती मोहीम अपयशी झाली त्यात तोही असल्याने त्यानेही इतरांसारखं खजील व्हायला पाहिजे.

सहा महिने निघून गेले. माधवी प्रसेनजीतच्या धक्क्यातून थोडी सावरली. इस्रोचे काम पूर्ववत चालू झाले. अंकितहि वाट बघून कंटाळला होता. त्याने शेवटी माधवीजवळ प्रेम व्यक्त करायचे ठरवले. सायंकाळी जेवायला जायचे  निमित्त करून तिची भेट घेतली.... त्याच्या मनातील प्रेम बोलून दाखवले.. पण प्रसेनजीतच्या आठवणी अजून पुसल्या न गेल्यामुळे माधवीने त्याला स्पष्ट नकार दिला. अंकितने हजार तऱ्हेने तिला आपले प्रेम व्यक्त केले तरी माधवी निश्चल होती. अंकित हताश होवून परतला.

अंकितला जिंकूनही हरल्यासारखे वाटायला लागले. त्याने तिच्या आई-वडिलांजवळ सुद्धा विषय काढून बघितला. त्यांनी माधवीच्या इच्छेशिवाय आम्ही तिच्या आयुष्याचा कोणताही निर्णय घेत नाही असे स्पष्टपणे त्याला सांगितले. शेवटी त्याने पूर्ण माघार घेतली.... परंतु आता त्याच्या माघार घेण्याने गोष्ट थांबणार नव्हती...गुरुग्रहावरील तो छोटासा ठिपका त्याच्या नशिबाच्या रेषेवर तीळ म्हणून उतरत होता...












माधवीला जिंकायचं असेल तर आपण काहीतरी भरीव काम कराव. प्रसिद्ध व्हाव, मान-सन्मान मिळवावा अस त्याला वाटायचं. या गोष्टीने थोड तरी तीच प्रेम मिळेल म्हणून गुरुमोहिमेच्यावेळी सापडलेल्या त्या छोट्याश्या ठिपक्याची आता त्याला मदत घ्यायची होती. तो ठिपका त्याला आताच सापडला अस भासवायचं होत आणि गुरुयान याच ठिपक्यामुळे नष्ट झाले हे सिध्द करून नाव कमवायचं होत. पण त्यासाठी त्या ठिपक्याबद्दल साठवून ठेवलेली पूर्वीची माहिती त्याला नष्ट करणे गरजेचे होते. तो चोरून आपल्या कार्यालयतील कागदपत्रे नष्ट करायच्या कामी लागला. आणि त्याचवेळी आपण गुरुयानाच्या संबंधी संशोधन करतोय असे सांगायला लागला.




माधवीला प्रसेनजीतचे असे निघून जाणे असह्य वाटत होते. तिला अजूनही वाटायचे कि तो परत येईल. सत्य मात्र तिच्या या कल्पनेला दुजोरा देत नव्हते. तिला वाटायचं अस अधांतरी राहिल्यापेक्षा  प्रसेनजीत नक्कीच जिवंत नाही याचा पुरावा मिळाला तर.. तिच्या मनाची घालमेल जरा कमी होईल. अंकित गुरुयानासंबधी संशोधन करतोय असे माहित पडल्यावर ती त्याला भेटायला गेली. त्याच्या संशोधनात मदत करून नेमके प्रसेनजीतसोबत काय घडले हे तिला जाणून घ्यायचे होते.

माधवी संशोधनात मदत करायच्या कारणाने का  होईना पण आपल्या सोबत असेल आणि त्यामुळे तिच प्रेम जिंकण्याची एक संधी आपल्याला मिळेल म्हणून त्यानेही तिच्या मदतीला आनंदाने होकार दिला. दोघे मिळून संशोधन करायला लागले. अंकित तर फक्त संशोधन कार्याचा दिखावा करत होता. त्याचा बहुतेक वेळ तिची स्तुती करण्यात, तिला निरखण्यात आणि तीच प्रेम जिंकण्याच्या प्रयत्नातच  जात होता.

असेच एक दिवस अंकीतला वेधशाळेत यायला वेळ लागल्याने माधवी एकटीच गुरु ग्रहाचे निरीक्षण करत होती. जरी ती मानसशास्त्राची असली तरी सतत अनेक खगोलशास्त्रज्ञांसोबत तिने काम केले असल्याने तिला ग्रहांचे निरीक्षण कसे करायचे, मिळणार्या माहितीचा लेखा-जोखा कसा करायचा हे समजत होते. वेधशाळेतील आपल्या याच कामात ती गुंतली होती आणि मिळालेल्या माहितीचे पृत्थकरण करता-करता तिला जाणवल कि गुरुग्रहावरील मोठ्या रेड स्पॉट शेजारी एक छोटासा आणखी ठिपका दिसतोय. ती त्या ठिपक्याचे निरीक्षण करायला लागली आणि तिला आपल्या ज्ञानाने प्रभावित करण्यासाठी म्हणून अंकितनेच शिकवलेले काही गणिते मांडून बघू लागली.  जशी जशी ती गणिते सोडवायला लागली, आपल्या निरीक्षणाशी पडताळून बघायला लागली तासतसे तिला सत्य सापडत गेले. तरीही तिचा अजून विश्वास बसत नव्हता. अंकित अस काही करेल असे वाटत नव्हते.. तिने अंकितच्या कार्यालयात जावून झडती घेतली तर तिला सत्य सांगणारे काही कागदपतत्रे मिळाली. परत वेधशाळेत येवून सर्व घटनाक्रमावर सुरुवातीपासून विचार करायला लागली. तिचे डोके सुन्न पडायला लागली. खुर्चीवर मान टेकवून शून्य नजरेने बघायला लागली. प्रसेनजीतची प्रचंड आठवण आली... कसा होता माझा प्रसेनजीत अगदी या भिंतीवरील चित्रातील गुरुग्रहासारखा... भारदस्त... तिचे डोळे पाणावले... डोळ्यांवर हळूच उष्ण अश्रू तरळला.. त्या अश्रूत गुरुग्रह वितळत जातो कि काय असे तिला जाणवले... आणि जाणवले गुरुग्रहावरील मोठ्या वाढलाजवळ आपोआप उमटलेले छोटेशे वादळ... ज्याने तिच्या प्रसेनजीतला हिरावून घेतले... पण ते तिथे आले कसे..झपाट्याने उठली...सूर्यमालेच्या चित्राजवळ गेली..तिने निरखून बघितले कि ते कुणी चितारलेले नाहीय तर गुरुग्रहाला एक खोल खोच लागली आहे. ती खोच नक्कीच काहीतरी फेकून मारल्याने लागली असेल. पण इतक्या उंचावर आणि नेमक्या गुरु ग्रहालाच कोण काही फेकून मारेल....? या सगळ्यांचे उत्तर तिला हवे होते...तिला अंकितला जाब विचारायचा होता.. पण तो इतक्या सहज कबूल करणार नाही हे तिला ठावूक होते...शेवटी तिचे मानसशास्त्राचे ज्ञान ती वापरणार होती.. तिने त्या लाल ठिपक्या पेक्षाही भडक झालेल्या डोळ्यांना पुसले.. आणि अंकितची वाट बघायला लागली...



ती वाट बघतच होती कि थोड्यावेळातच अंकित तिथे आला. तो आल्याबरोबर आपल्या चेहऱ्यावरील भाव तिने मुद्दाम बदलले..माधवीने त्याला खूप आपलेपणाने चौकशी केली. तिच्या आवाजातील आपलेपणा आणि तो गोडवा अंकितला खूप छान वाटला. हि अचानक अशी का वागत आहे अशी शंका त्याला क्षणभर आली पण माधवीच्या आवाजातील मार्दव इतके भुरळ पाडणारे होते कि त्या शंकेला जागच्या जागीच त्याने पुरून टाकले. हि जर खरच इतकी आपलेपणाने वागत असेल तर आपण हिला जिंकू शकतो, आपली करू शकतो असे त्याला वाटायला लागले. तो आपल्या खुर्चीत  जावून बसला, मात्र माधवीच्या चेहर्यावरून त्याची नजर हटत नव्हती. माधवीसुद्धा अगदी त्याच्या खुर्चीच्या हातावर बसली. मुद्दाम त्याला नजरेत पकडत बोलू लागली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ते सगळ अंकितसाठी नवीन होते. तो मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्या प्रत्येक गोष्टीत होकार भरत होता. त्याला स्वर्गात असल्यासारखे वाटत होते. तो जणू हवेवर तरंगत होता. तो हलका-हलका झाला होता. आकाशाच्या निर्वात पोकळीत वाटते तसे त्याला वाटत होते...शून्य गुरुत्वाकर्षण... भान हरपून तिचे बोलणे ऐकत राहावे.. तिच्या डोळ्यात असेच बघत राहावे...एकटक... तिच्याशी ती म्हणते त्याप्रमाणे प्रामाणिक प्रेम करावे..सगळे खरे-खरे तिला सांगावे...ती विचारते त्याचे उत्तर द्यावीत... बस तिचा फक्त हुकुम ऐकत मनापासून तिच्यासाठी काहीही करावे.. त्याला आता माधवी शिवाय कसलाही आवाज ऐकू येत नव्हता... स्वतःच्या श्वासांची लय सुद्धा ऐकू येत नव्हती... तो पूर्ण तिचा झाला



होता... माधवी-माधवी.... माधवी जे विचारेल त्याची खर-खर उत्तरे देत होता...तो फक्त तिचा झाला होता... आणि अचानक!!!!.... सगळ बोलून झाल्यावर... माधवीने त्याला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिल्यावर... त्याच्या उजव्या छातीच्या फसलीजवळ खूप अनुकुचीदार काही टोचल्यासारख जाणवले...  खूप रुतले त्याला... खोल-खोल रुतले... दुखत होते पण ते दुखणे जाणवत नव्हते...स्वप्नातल्या सारखे.... खरच पडलेल्या स्वप्नातल्यासारखे...  ती टोचलेली वस्तू माधवीच्या हातात होती...तिच्या हातात काहीतरी होते... काय ते माहित नाही..पण अनुकुचीदार असे.. आणि त्याला जाणवले कि आपल्या छातीजवळ ओलसर काहीतरी वाहतय... थंडगार काहीतरी... माधवीच्या डोळ्यातील थंडगार अश्रूतर नाही...? पण जस-जसा क्षण जात होता तसतसा अंकितच्या शर्टावर एक लालसर ठिपका उमटत होता.....एक छोटासा लाल ठिपका... गुरुग्रहावर होता तसा एक लिटील रेड स्पॉट....’


------------------------------समाप्त---------------------------------
      



अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...