रेल्वे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रेल्वे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

आझाद हिंद एक्स्प्रेस: काही प्रसंग



भारत...हिंन्दुस्थान....इंडिया.... जशी आपल्या देशाला विविध नावे आहेत...म्हणजे नावातच विविधता आहे...हेच वैविध्य आपल्या देशाचा आत्मा आहे...भाषा, वेश...पेहराव ...धर्म...धारणा...बुद्धी....समाज...श्रद्धा आणि अंधश्रद्धा ...सगळ्यांबाबत आपला देश विविधतेने नटलेला आहे... आता तुम्ही म्हणाल कि मी हे तेच ते काय सांगतोय... नव असं काहीच नाही... सांगतो...नवीन असलेल तेही सांगतो..

तर माझ्यासारखा एक मीच या देशात नाही... अनेक आहेत माझे देशबांधव ज्यांच्यात माझ्यासारखेच रईमानी किडे आहेत(हा एक विशिष्ट जातीचा किडा आहे ज्यांना या किडयाबद्दल जिज्ञासा असेल तर त्यांनी वयैक्तिक संपर्क साधावा)... थोडक्यात उचापती... अशीच एक उचापत मला सुचली...माझ्या डोक्यात अशा उचापती कोण घालते मला ठावूक नाही...(कमळाला सुद्धा रईमानी कीड लागते का हो? सहज विचारतोय नाहीतर म्हणाल देशद्रोही) तर मी सांगत होतो कि मला एक उचापत सुचली... मी अमरावतीचा राहणारा... आणि पुण्यातील एका संस्थेमध्ये फ्रेंच भाषा शिकण्याची हुक्की आली... त्यासाठी मला प्रत्येक शनिवार ते रविवार पुण्याहून येणे-जाणे करावे  लागायचे ... अशी सहा महिने मी माझी हि विदेशवारी ( जेंव्हा पासून विदर्भ वेगळा पाहिजे तेंव्हापासून पुणे म्हणजे अत्यंत प्रगत असा परदेस वाटायला लागला आम्हाला ... आमच्याकडील विकासाची भाषा बोलणारे अनेक जनतेचे कैवारी पुण्यातील आवक करणाऱ्या प्रगतिबद्दल आणि विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल टाहो फोडतात..)...शक्यतो नेमाने करतो आहे.. एवढ्या वाऱ्या पंढरीच्या केल्या असत्या तर पांडुरंग माझ्या घरीच येवून राहिले असते पण हि फ्रेंच भाषा अजून मला काह्ही पावली नाही...तर मी सांगत होतो कि मी पुण्याला ज्या ट्रेनने येणे जाने करायचो ती ट्रेन म्हणजे ‘आझाद हिंद एक्स्प्रेस’...

भारतीय रेल्वेची आपली एक ओळख आहे... तिची एक स्वताची संस्कृती आहे... रेल्वे आणि रेल्वेचे अनोखे असे एक विश्व आहे...या गोष्टीची जाणीव आझाद हिंद मध्ये तेही जनरल च्या डब्यात विना तिकीट प्रवास केला तर नक्कीच होते... वर उल्लेखलेली भारतातील विविधतेतील एकता तुम्हाला बघायची असेल तर सांगतो त्याप्रमाणे तुम्ही एकदा रेल्वे प्रवास कराच... तुम्हाला भारत देश काय चीज आहे ते कळल्याशिवाय राहणार नाही...’भारतीय रेल’ खऱ्या भारताचे मूर्तिमंत उदाहरण कि काय म्हणतात ते आहे...


रेल्वे खात्याचे आपले स्वतंत्र असे बजेट आहे... देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांची संख्या साडे तेरा लक्ष आहे आणि जवळपास तेवढीच रेल्वे खात्यात कर्मचारी आहेत. म्हणजे रेल्वे मंत्रालय किती मोठे आणि महत्वाचे आहे याची प्रचीती येईल...एवढ्या मोठ्या मंत्रालयाला चालवण्यासाठी साक्षात ‘प्रभू’च हवे... परंतु या रेल्वे खात्यात एक मेख आहे ज्यावर प्रभूच काय नरेंद्र (इंद्राचे एक नाव या अर्थाने घ्या कि राव!!!) सुद्धा अंकुश ठेवू शकत नाही...


तर माझा दर आठवड्याचा हा प्रवास अमरावती-पुणे-अमरावती म्हणजे जीवन अनुभवांचा आठशे किलोमीटर वाहणारा एक झराच आहे... या झऱ्यातील अनुभवाच्या पाण्याचे काही सामान्य तरीही दुर्लभ अशे घोट मला प्यायला मिळाले... त्यातील काही प्रसंग कुठल्याही तत्त्वज्ञानाच्या चष्म्यातून न पहाता मी थोडक्यात सांगतो... सृजनात्मक लोकांनी त्याला आपले मानवजातीच्या जीवनविषयक मुल्यांची विवेचनात्मक टीप्पणी करण्यासाठी वापर केला तरी या पामराचा काही आक्षेप नसेल... (बापरे!... )



प्रसंग एक


आझाद हिंद एक्स्प्रेस, बोगी न. ११... मी जनरल (मराठीत सामान्य) दर्जाचे तिकीट काढले व रिझर्वेशन च्या बोगीत बसलो. (माझा किडा मुद्दाम काहीतरी उद्दामपणा करण्यासाठी मला उचकावतो सहज मजा म्हनुन् ...).. ओडिशा किंवा प. बंगाल च्या सुज्ञ नागरिकांनी केलेला कचरा बघून मी ‘जेनेरल’ च्या बोगीतच असण्याचा भास मला होत होता. प्रधानसेवकांनी कदाचित तिकडे निवडणुकीत  हरल्यामुळे स्वच्छ भारत अभियान राबवले नसल्याचे मला उगीच वाटले.. तर एका बंगाली प्रवाश्याने हाफ पँट घातली होती (परत तुम्ही नागपूरचा संदर्भ घेता आहात! देशद्रोही कुठले!)  व बंगाली लोकांच्या पापण्यावरील केसांइतुकेच त्यांच्या पायावरील केस सौंदर्यफुल असतात हे दिसावे म्हणून, वेळोवेळी लोकांचे लक्ष जावे म्हणून आपले पाय नखाने खाजवत होता. नखाने ओरबडल्यामुळे सफेद रेषा त्याच्या गर्द केसाळ पायावरील जंगलातून जाणाऱ्या पायवाटेसारखी दिसत होती. तो पाय खाजवत होता. मधेच चैनी घोटत होता. परत खाजवत होता. तोंडात चैनीची गोळी कोंबत होता. पचकन थुंकत होता. बाजुच्याच्या अंगावर काही कंठौष्ठ निघालेले तुषार उडत होते. तोही बिचारा जंगलातील पायवाट बघून, आपल्याच हाताने ते पिवळट दवबिंदू पुसत होता. न राहवून बंगाली हाप पँटवाल्याने  मला विचारले “जेनेराल का टीकोट काटो है.”.. त्याच्या बोलण्याची ढब अशी होती कि जसा काही तो मिलीटरीतील जनरल आहे कि काय? उत्तरादाखल मी नुसती मान हलवली... बंगाली लोकांना बोलताना मान हलवण्याची...हातवारे करण्याची (ओठांचा चंबू करण्याचीही )जास्तच सवय असते... असे मला दीदींचे भाषण ऐकताना वाटले... निदान माझ्या मनाचा तसा कयास होता. खरे खोटे देव जाणे!! आपल्या बंगाली जर्दा खाल्याने पिवळसर झालेले दात विचकत आणि मला बारीकसा डोळा मिचकावत तो बिनधास्त हसला. “डरो मोत हमारे साथ भी दो लोग है. जेनेरल का तिकोटवाले, जोब टीटी आयेगा तोब सोव का नोट दे देना’. त्याने म्हटले त्याप्रमाणे टीटीआल्यावर  मी शंभर रुपये दिले. टीटी काहीही जास्त न  बोलता निघून गेला. मी  आरामात त्याच्याशी गप्पा मारत बसलो. त्याचा एक सोबती होता तो आणि हा एकाच बर्थ वर झोपले आणि मला मनमाड नंतर झोप यायला लागली होती म्हणून त्यांनी वरची बर्थ मला दिली... माणुसकी आणखी काय!!!


प्रसंग २:


आपण स्वार्थासाठी किती दलबदलू होऊ शकतो हे मला व्यक्तिशा या पुणे वारीतच कळले. एकाच दिवशी मी दोन माणसांशी बोललो आणि माझे बोलणे मलाच  एवढे धूर्त वाटायला लागले होते कि माझे आडनाव कोल्हे किंवा पवार असायला पाहिजे होते. बडनेरा ते भुसावळ पर्यंत मला मुज्जमील शेख कि खान कि शहा (हि नावे लक्षातच राहत नाहीत.. तो मुझफरनगरचा होता एवढे आठवते) याच्या बर्थवर अड्जेस्ट व्हायचे होते तेंव्हा त्याच्याशी बोलायला गेलो. इकडले-तिकडले विषय काढल्यावर राजकारणावर बोलणे सुरु केले.(भारतीयांचा आवडता विषय) त्याने जागा द्यावी म्हणून अचानकच मला राहुल गांधी भारताचे आधुनिक शिल्पकार (कि आधुनिक भारताचे शिल्पकार.. माझा हा असा गोंधळ होतो!) वाटायला लागले आणि सोनियाजी गांधीजी असे त्यांच्या नावाला दोनदा ‘जी’ लावत बोलायला लागलो. या नावात काय जादू आहे काय माहित मी बेदिक्कत त्याच्या बर्थ वर भुसावळ पर्यंत आलो. नावाची महिमा अजून काय!


भुसावळला मुज्जमील मला टाटा करून निघून गेला.. तेव्ह्ड्यातच अंकुश पाटील नावाचा माझ्याहून थोडा मोठा असेल दोनेक वर्षाने तो त्याच बर्थवर आला. मी आपल्या निस्वार्थ भावनेने त्याच्याशी बोलायला लागलो (डोळा मिच्कावलाय येथे)आणि बीजेपी निवडून आल्याने कसा देशाचा विकास होतोय असे काही-बाही बोलू लागलो. तो गालातल्या गालात हसत होता. मला वाटल आपल काम झाल. थोड्यावेळाने माझ बोलून झाल्यावर त्याने मला विचारल “मा.म.देशमुख, आ.ह.साळुंखे यांना वाचलंय का?” ... मी क्षणभर थांबलोच आणि स्वताला सावरत धडधड साळून्खेच्या पुस्तकांची पाच-सहा नावे तोफगोळ्या सारखी त्याच्या अंगावर फेकली... मग पुढे काय... आमची चर्चा शिवाजी महाराज कसे राजपूत होते यावर येवून थांबली आणि मला एक मोठी जांभई आली. त्याने त्याच्याच बर्थवर मला अड्जेस्ट केले... माणुसकी आणखी काय!!!


प्रसंग ३:


मनमाड: रेल्वेचे इंजिन बदलायला अजून अवकाश होता. तोपर्यंत डब्यातील सर्व बंगाली ललनांचे चेहेरे बघून झाले होते.. इतरही होते मीनाक्षी डोळे बघणारे ...आणि वक्षी-मीनाक्षी मंदिरे बघणारे . असो. तर मी सांगत होतो अनेक स्वभावाची लोक तुम्हाला रेल्वेच्या एकाच बोगीत भेटत असतात. आता मनमाडला होतो आणि नेहमीसारखेच जेनरल तिकीट पण बसायचं होत रिझर्वेशन मध्ये. मी ११ न. स्लीपर कोच मध्ये घुसलो. आणि फाटकातील पहिल्या काम्पार्तमेंत मध्ये उभा झालो. भूक लागल्यामुळे मी चहा आणि बिस्कीट उभ्यानेच खात होतो. त्यामुळे दोन्ही हात गुंतले होते म्हणून माझी कपड्यांची पिशवी मांड्यांमध्ये पकडली होती. मी जास्त हालचाल करू शकत नव्हतो. तेव्हड्यात आणखी माझ्यासारखीच जेनरल तिकीटवाली तीन-चार मुले तिथेच आली. माझी चहा-बिस्कीट अजून संपली नव्हती तर समोरच्या दारातून काळा कोट दिसला. काळ्या कोटवाल्या टीटीला बघून हि मुले खाली उतरली. काळ्या कोटाने दुरूनच खवचट नजरेने बघितले.. मी चहा-बिस्कीट खात, मांड्यामध्ये पिशवी धरून उतरू शकत नव्हतो म्हणून नाईलाजाने मला तसेच थांबावे लागले. नाहीतर मीही पटकन त्या बोगीतून निसटलो असतो. काळा कोट मला बघून तिथेच थांबला. गाडी सुरु झाली... खाली उतरली मुले परत चढली आणि मला म्हणाली “टीटी गेला ना?” मी त्यांना उत्तर देईल तोच काळा कोट पुढे हजर.. त्याने त्या मुलांकडून तीनशे-तीनशे वसूल केले आणि माझ्याजवळ आला म्हणाला “तुझ्याकडून मी काही घेणार नाही कारण मला बघून तू पळून गेला नाहीस... तुझ्या मनात चोर नव्हता, हि मुले लुच्ची आहेत.. तू प्रामाणिकपणे इथेच थांबला. चाल मी तुला एक रिकामा बर्थ देतो”.... मी म्हणालो ... माणुसकी आणखी काय?


प्रसंग ४:

पुणे रेल्वे स्टेशन, अमरावती कडे जाणारी परतीची आझाद हिंद. मुद्दाम एक तास आधीच आलो होतो  स्टेशनावर, म्हटले आज जाताना जेनेरल नेच जाऊ पण बघतो  तर काय... चिक्कार गर्दी. जवळपास २०० मीटर लांब लाईन लोकांची जेनेरल बोगी साठी. लगेच विचार बदलला. शेवटच्या प्लेटफॉर्म वर ५.२५ची  पुणे-नागपूर लागलेली होती. त्यातल्या जनरल बोगीत बसलो.  गमंत म्हणजे त्यात गर्दी नव्हती(रेल्वे मध्ये गर्दी नाही हि गंमतच कि खंडेराय.) . . तर तिथे एक पहिलवान टाईप तरुण ज्याच्या तोंडात गुटखा होता आणि डोळ्यातून मदिरेचा रंग झळकत होता छान ऐसपैस बसला होता. मी त्याला थोडे सरक म्हटले तर तो म्हणाला 'यहा बैठना है तो पचास रुपये लगेंगे!" मी म्हटल कसे काय "ऐसे हि है याहा पे." तेव्हड्यात दुसरे एक काकाजी आले आणि ते बेधडक पुढच्या बर्थवर बसले. त्या तरुण मुलाने आपल्या गुटखा खालल्या श्रीमुखातून बाहेर एक पिंक टाकत काकांना रुपये मागितले पण काकांनी नकार दिला. दोघांचा वाद सुरु झाला. त्याचा फायदा घेऊन मी वरच्या बर्थ वर पालकंड मांडून बसलो. तो एकदा मला रुपये मागायचा एकदा काकांना. आम्ही दोघेही नाही म्हणत होतो. आणखी प्रवासी येत होते..बसत होते..तो सगळ्यांना जागा जिंकून ठेवल्याचा मोबदला मागत होता. पण त्याचा सगळा जोर आमच्या दोघांवरच होता. त्याचाच एक मित्र बाजूच्या कॅम्पार्तमेंट मध्ये आपली वसुली करत होता. या सगळ्या गोंधळामुळे आधीच सोमरसाने बेधुंद झालेला तरुण चेकाळला आणि त्याने काकांच्या कानशिलात लगावली आणि मला म्हणाला 'तू रुपये देता कि तुझे भी देऊ एक'. मला काही  सुचलच नाही. मी सरळ वरच्या बर्थ चा आधार घेत एक जोरदार लाथ त्याच्या छातीत मारली. गडी पार पलीकडल्या खिडकीला जाऊन धडकला. त्याने त्याच्या मित्रांना आवाज दिला. ते आले. एव्हना त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला होता. त्यांनी त्याला समजावले कि आता तमाशे केले तर लोक खवळतील आणि रेल्वे पोलीस पण येतील. पण आपला गडी जुमानतच नव्हता न भाऊ! त्याने माझे शर्ट ओढले आणि सगळ्या बटन्स तुटल्या. मला तर अब्रू गेल्यासारखेच वाटायला लागले. मी चेकाळलो आणि त्याच्या मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत अगदी डोक्यात चार कि पाच (नक्की आकडा आठवत नाही पण माझा हात झांजरला होता) बुक्क्या हाणल्या. त्याच्या मित्रांनी आम्हाला आवरले. पण तो खूपच भांबावला. त्याला समजावण्यासाठी त्याच्या मित्राने काहीतरी त्याच्या कानात सांगितले. तो माझ्याकडे हसून म्हणाला 'गाडी सुरु झाल्यावर बघतो, खालीच फेकून देतो" यावर माझ्या आणि  त्याच्याकडून खूप आय माय  निघाली. आणि  तो निघून गेला. साला, माझी तर फाटत होती पण सांगणार कोणाला? उसनी हिम्मत थोड्यावेळ सोबत राहिली पण जसा रक्तातील राग थंड होत गेला तसा मी पार गांगरून गेलो. याने खरच खाली फेकले तर...अबबब!!

डब्यातून उतरुन खाली आलो. गार्डला  भेटलो. त्याने रेल्वे पोलीसला बोलावून घेतले. त्याने सगळा प्रकार विचारला. मी सांगितला. तो म्हणाला त्याला ओळखतो मी तू आत बस. मी बघतो. मी शांत होण्याचा प्रयत्न करत बोगीत बसलो. धडधडणारे हृद्य...इंजिनच्या धडधडीत सामील झाले.. गाडी सुटली.....आणि तो बेवडा तरुण रेल्वे पोलीसासोबत मजेत चर्चा आणि गमती जमती करताना मला दिसला... मला आश्चर्य वाटले. बाजूच्या एकाने मला तेंव्हाच म्हटले "पोलिसाला हप्ता मिळतो दादा! त्यांचा धंदा आहे हा! ... व्वा त्याचा धंदा चालावा म्हणून पोलीस त्याला किती मदत करतोय" ... मी काय म्हणालो असेल माहितीय....माणुसकी आणखी काय!?


ज्ञानेश्वर गजानन गटकर
मोब. ९०११७७१८११
अमरावती.


अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...