समाजभाषा विज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाजभाषा विज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

Panic आणि मेंढपाळ... व '&' जणू इंग्लिश मधील झपूर्झा...

(०१) Panic आणि मेंढपाळ

"Words, words, words" शेक्सपिअरलिखित Hamlet नाटकाच्या मुख्य-पात्राच्या तोंडी आलेला हा एक डायलॉग आहे. त्याला विचारले जाते कि तू काय वाचतोय तर तो म्हणतो मी वाचतोय 'शब्द, शब्द,शब्द'
Pan: अर्धाशेळी-अर्धामाणूस.
शब्दांची दुनिया वेगळीच आहे. एक मात्र मला कळले कि, आपण या शब्दांशी खेळायला लागलो कि यांच्यासारखे मनोरंजन करणार दुसरे काहीही नाही हे जाणवते...
हा खेळ करतांना सुरुवातीला आपले तर्क लावत जातो.. मग त्या तर्कातून अनेक प्रश्न सापडतात आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी मन आतुर होते... शब्द कोणत्याही भाषेतील असो पण प्रत्येक शब्दाची एक कहाणी असते. कधी-कधी शब्दांच्या कहाण्या इतक्या मस्त असतात कि माणसाच्या गोष्टी फिक्या वाटाव्या..
आज असाच एक ‘शब्द’ शब्दशा डोक्यात गेला... इंग्रजीतील Panic हा शब्द... आणि याने एवढ भंजाळून सोडल कि नेमका हा शब्द तयार कसा झाला याचा शोध घ्यायचे ठरवले...
शब्दांशी खेळतांना पहिली गोष्ट मी कुठली करत असे तर त्या शब्दाला तुकड्यात तोडतो आणि त्यातील सगळ्यात महत्वपूर्ण तुकडा(निदान काहीतरी अर्थ असेल असा तुकडा) हाताशी घेतो. Panic ला तोडले तर pan हा तुकडा महत्वाचा वाटला. मग यावर सुरु झाली तर्काची शृंखला...
pan हा शब्द मला माहित असलेले किती अर्थ सांगून जातो. frying pan मधील pan, चुका काढणे या अर्थाने pan वापरल्या जातो.....असा विचार करत गेले कि अचानक काहीतरी धागा सापडल्यासारखा वाटतो तेंव्हा pain-panic असा सहसंबंध आठवतो. मला व्यक्तिशा pain व panic हे दोन्ही शब्द एकाच कुटुंबातील सावत्र भावू वाटतात... दिसायला सारखे बापामुळे पण आई वेगवेगळी असे दोन सावत्र भावंड....बस इतकाच संदर्भ हाताशी येतो पण तर्क पुढे काही जात नाही... झालेच तर Andrew Marvell च्या 'Garden' नावाच्या कवितेतील Pan नावाच्या देवाचा विचार डोक्यात येतो. त्याच्याशी याचा काही संबध असेल असे वाटत नाही पण खरेतर इथेच मी चुकतो. हे चुकनेही आनंद देणारे आहे. शब्दांशी खेळण्यात एक मजा आहे, आपला तर्क बरोबर आला याचा आनंद तर होतोच पण तो तर्क चुकून काहीतरी दुसरे कळले कि त्याचाही आनंद होतो. Panic या शब्दाचा सर्व संबंध त्या ग्रीक दंतकथेतील Pan नावाचा मेंढपाळाच्या देवाशीच आहे हे संदर्भ चाळल्यावर मला कळते... आणि मग शब्दच्या कहाणीत शिरायला मन आतुर होत गेले....
Panic शब्दाचा मागोवा घेत Pan या ग्रीक देवतेच्या गोष्टीत शिरलो. Pan हा ग्रीक-पुराणकथेनुसार मेंढपाळांचा देव. त्याचे वडील हर्मस आणि आजोबा झेवूस(आपल्याकडील इंद्रासारखा). Pan हा सुपिकतेचा देव म्हणून सुद्धा ओळखला जातो. Pan च्याबाबतीत आणखी एक विशेषतः सांगावीशी वाटते. त्याने आपल्या वडिलांकडून हस्तमैथुन कसे करावे हे शिकून घेतले आणि ती कला इतर मेंढपाळांना तो शिकवत असतो. (हा संदर्भ लक्षात येताच ‘ख्वाडा’ या मराठी सिनेमातील प्रसंग सहज आठवेल.)

तर हा असा Pan नावाचा मेंढपाळांचा देव. एकदा काय झाले कि Gods आणि Titan (आपल्याकडील सूर व असुर युद्धासारखे) यांच्यात युद्ध सुरु होते तेंव्हा Pan वामकुक्षी घेत होता. नेमके तेंव्हाच Titans देवलोकावर हल्ला चढवतात. त्यांच्या आवाजाने Pan खडबडून झोपेतून उठतो... झोपेतून अचानक उठल्यामुळे व Titans च्या आवाजाने स्वतः खूप घाबरतो व जोर-जोराने ओरडायला लागतो. त्याचे ते भीतीने गांगरून मोठमोठ्याने ओरडल्यामुले देवांवर आक्रमण करायला आलेले Titans बिथरतात, त्यांची घाबरगुंडी उडते. त्यांच्या त्या भांबावल्या अवस्थेचा देव फायदा घेतात व Titans वर कुरघोडी करत विजय मिळवतात. नंतर Pan स्वतः सगळ्यांना सांगत फिरतो कि त्याच्या आवाज केल्यामुळेच देवांना विजय मिळवता येवू लागला. एकंदरीत भीतीने सगळ्यात पहिले घाबरगुंडी कुणाची उडाली असेल तर ती Pan या देवाची म्हणून तशा प्रकारच्या मानसिक स्थितीला Panic होणे असे म्हणायला लागले... असा सगळा मामला आहे. आणखी एक तर्क लक्षात येतो कि, Pan जसा कि मेंढपाळचा देव आणि मेंढी,बकऱ्या असले प्राणी भित्रे असतात. यांचा खुपदा शिकार करण्यासाठी 'चारा' (bait) म्हणून वापर केल्या जातो. तेंव्हा त्या भीतीने, मृत्यू भयाने Panic होतात आणि ओरडायला लागतात. सुरुवात शब्दाचा अर्थ शोधण्यापासून जरी झाली असली तरी तो शब्द अनेक कहाण्या,दंतकथा, किस्से उजागर करत असतो आणि सगळ कस सुसूत्रीत वाटायला लागते....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(०२)Cataract....धबधबा ते मोतीबिंदु एक प्रवास....

'...the sounding cataract hunted me like a passion..." वर्डसवर्थ च्या एका बोजड कवितेतील हीच एक ओळ मला आवडली... एक मस्त मिजास आहे आणि मनमौजीपणा आहे या ओळीत... असो..
या ओळीतील cataract शब्द म्हणजे धबधबा या अर्थाने वापरलेला आणि तोच त्याचा मुल अर्थ आहे.. आणि तो उच्चारते वेळी जिभेची होणारी टोकदार हालचाल त्या शब्दाला आठवणीत ठेवून गेली... गंमत म्हणजे या शब्दाचा आणखी एका अर्थाने उपयोग करतो तो म्हणजे ‘मोतीबिंदू' ... विचार केला तर असे वाटते कि त्यांचा एकमेकांशी अर्था-अर्थी काहीही संबंध नाही..!! पण शंका येतेच कि, जर तसा संबंध नसेल तर एकाच शब्दाला इतके भिन्न अर्थ कसे काय मिळाले...?
काही संदर्भ चाळले तर cataract शब्दाची गोष्ट उमगत गेली आणि त्याला भिन्न अर्थ का मिळाले हे कळले...
बेन जोन्सन नावाचा शेक्सपिअरच्याच काळातील एक मोठा नाटककार होवून गेला. त्याची काही नाटक वाचली(सायलेंट वूमन, अल्केमिस्ट इत्यादी. ती वाचल्यावर तो शेक्सपिअरइतकाच कर्तुत्ववान मला वाटला. पण शेक्सपिअरच्या यशामुळे तेंव्हा आणि आताही तो झाकोळल्या गेल्या. नेहमी त्याला दुय्यम दर्जा मिळाला... हे म्हणजे राहुल द्रविड सारखा प्लेअर सचिनसारख्या प्लेअरमुळे उपेक्षित राहिला तसेच झाले...
त्या बेन जॉन्सन ने 'कॉमेडी ऑफ ह्युमर' हा नाटकातील प्रकार आपल्याला दिला आहे. त्याची नाटके त्याच नावाने ओळखल्या जायची. आता यातील 'humour' हा शब्द आपल्या Cataract शब्दाला दोन अर्थ का आहेत याची किल्ली असेल असे मला कधीही वाटले नाही.
पूर्वी असा समज होता कि माणसाच्या शरीरात चार प्रकारची humours असतात. १. Black bile याला choler असेही म्हणतात. २. Yellow bile ३. Blood ४. pelgham
(आपल्याकडील वात,पित्त,कफ वगैर प्रकार असतात तसे.)
आता या ह्युमर्सच्या कमी- जास्त प्रमाणामुळे व्यक्तीच्या स्वभावात/प्रकृतीत फरक पडतो. बेन जॉन्सन च्या नाटकातील पात्र याच थेअरीवर त्याने उभी केली होती. म्हणून त्याच्या सुखांतीकेला Comedy of humours म्हणायचे ....
वरील माहिती लक्षात ठेवून Cataract शब्दाला बघितले तरी काही सापडणार नाही. पण तिथेच सगळे लपून आहे.
Cataract या शब्दाचा खरा अर्थ हा 'धबधबा' असाच होतो पण नंतर तो डोळ्यांच्या एका रोगाशी कसा जोडण्यात आला हेच कोड सोडवायचं आहे... तर..
मोतीबिंदू हा रोग जेंव्हा जुन्या लोकांना कळला तेंव्हा त्यांना वाटले कि त्या चार humours पैकी जो जास्त होतो तो humour डोळ्यावाटे बाहेर येतो/बाहेर पडतो. किंवा ओघळतो.... इतकेच नाही तर अशा रोगाला सुरुवातीला पर्शिअन लोक 'पाणी येणे/ओघळने' या अर्थाचा एक पर्शिअन शब्द वापरायचे.. त्या शब्दाचा प्रभाव आणि humour थेअरी यांचा एकत्रित परिणाम म्हणून डोळ्यातून धबधबनारे पाणी असा एक सुलभ अर्थ घेतल्या जात असेल आणि अशा या डोळ्याच्या रोगाला Cataract म्हणजे धबधबा हाच शब्द रूढला असेल....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(०३) '&' इंग्लिश मधील झपूर्झा...

Beowulf हे इंग्रजीतील पहिले महाकाव्य... या महाकाव्यात and या शब्दासाठी & हे चिन्ह किंवा 7 हा आकडा वापरल्या गेला होता. त्या महाकाव्याच्या हस्तलिखीतात तो तसा वापरल्या गेल्याचा पुरावा आहे. आता & या चिन्हाला and हा अर्थ का आहे....? तशी असण्याची कारणे काय...? त्याची कुठली कहाणी आहे का..? अस डोक खाजवत थोडी शोधा-शोध केली... ती करण्याआधी चार जाणकार लोकांना विचारले... थोडी माहिती मिळाली... आणि हळूहळू गोष्ट समजत गेली...
& याला इंग्रजीतील २७ वे अक्षर म्हणून पूर्वी ओळखायचे. याचा अर्थ 'and' असा घेतात आणि याला Ampersand म्हणून ओळखतात. Ampersand हा शब्द 'and per say and' याचेच लघु-रूप आहे. मराठीत्तील जसा झपूर्झा शब्द 'जा पुढे जा पोरी जा पुढे जा' याला खूप वेगाने वाचले कि तयार होतो.(वाचून बघा) तसाच 'and per say and' याला वाचले कि Ampersand हा शब्द तयार होतो.. मराठीत त्याला '...आणि आणखी पुढे.." असा अर्थ आपण घेवू शकतो.
जसे कि वर म्हटले आहे, पूर्वी याला २७ वे इंग्रजी अक्षर म्हणून ओळखायचे म्हणून यालाही a,b,c,d... सारखे चिन्ह देण्यात आले. हे ‘&’ चिन्ह इतर अक्षरांच्या चीन्हापेक्षा थोडे गुंतागुंन्तीचे होते. असायलाही हवे कारण हे चिन्ह एकाचवेळी अक्षर व शब्द म्हणून वापरल्या जाते. Beowulf या महाकाव्यात याचा सढळ वापर केलेला दिसून येतो फरक फक्त इतकाच आहे तेंव्हाच्या लिपीत या चिन्हाचे स्ट्रोक्स थोडे वेगळे होते. खुपदा तर and या अर्थासाठी & या चिन्हाएवजी इंग्रजीतील '7' हा आकडा सुद्धा वापरलेला दिसून येतो. आता तो '7' चा आकडा आणि & हे चिन्ह यांच्यात काय संबंध असा प्रश्न पडणे साहजिक आहे....
& आणि 7 या आकड्याचा काय संबंध म्हणून सरळ गणिताचे प्राध्यापकानां गाठले. आपली. त्यांच्या बोलण्यातून सहज कळले कि गणितात '/\' अशा स्वरूपाचे चिन्ह 'and' या अर्थाने वापरतात. हाच प्रकार logic मध्ये आहे. कदाचित पूर्वी '/\' याच चिन्हाला '7' असे लिहित असतील असा तर्क काढला. आणि माझ्यापुरता शांत झालो.
(*टाईपतानां आणखी एक जाणवल आणि खूप आनंद झाला. laptop च्या किबोर्डवर & चिन्ह आणि 7 चा आकडा एकाच ठिकाणी आहे... आता हा नक्कीच योगायोग नसेल आणि असलाच तर खूप मजेशीर योगायोग आहे....)
#शब्दांच्या_गोष्टी
#Words_words_words



Top of Form



अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...