रविवार, ३० जून, २०१९

शब्दांच्या गोष्टी ५

serendipity ... अचानक सापडलेल्या शब्दाची गोष्ट....
शाळेत असतांना, कुठल्यातरी इयत्तेत, हिंदीच्या अभ्यासक्रमात 'वीरासत' नावाची कथा होती.. लेखक कोण,काय आठवत नाही.. पण त्या कथेचा उगम सापडला.. मूळ सापडले... Horace Walpole नावाचा अठराव्या शतकातील एक लेखक.. 'गॉथिक' साहित्य लिहिणारा ... त्याची मूळ कथा बदलून कदाचित खपवण्यात आली असेल आपल्याकडे ...ती हिंदीतील कथा कदाचित तुम्हालाही आठवत असेल...
मूळ कथा 'थ्री प्रिंसेस ऑफ सेरेंडिप'' या नावाची आहे... त्यात सेरेंडिप नावाच्या राज्याचा जाफर आपल्या मुलांना चांगले शिक्षण देतो व नंतर त्यांना राज्याची सूत्रे देऊ करतो, परंतु मुले त्याला नकार देतात. आपले वडीलच हुषार असून तेच राज्य करायला योग्य आहेत असे सांगतात. राजाला त्यांची वागणूक आवडते.
आपल्या प्रजेला मात्र या राजकुमारांच्या बुद्धीवर शंका येऊ नये म्हणून तो त्यांच्यावर रागावतो व त्यांच्या बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी म्हणून त्यांना सेरेंडिप मधून हाकलून लावतो.
राज्यातून बाहेर पडल्यावर एका वाटेवर चालत असतांना ते निरीक्षणातून असा अंदाज काढतात कि, या वाटेवरून एक उंट चालत गेला आहे, तो उंट एका डोळ्याने आंधळा आहे आणि त्याचा एक दात पडला आहे, तो एका पायाने लंगडा आहे…. तसेच त्याच्या पाठीवर एक स्त्री बसली आहे व ती स्त्री गर्भवती आहे, इतकेच नाही तर त्या उंटाच्या एका बाजूला मधाचे तर दुसर्या बाजूला लोण्याचे भांडी बांधले आहेत.
तितक्यात तिथे त्या उंटांचा मालक येतो व त्या तिघांना त्याच्या मार्ग चुकलेल्या/हरवलेल्या उंटाबद्दल विचारतो. ते तिघे सांगतात कि तुझा उंट आम्ही बघितला नाही परंतु तो एका डोळ्याने आंधळा आहे, एक दात पडला आहे, तो एका पायाने लंगडा आहे, गर्भवती स्त्री त्यावर बसली आहे आणि मध व लोणी वाहून नेत आहे.
उंटाच्या मालकाला वाटते कि या तिघांनी त्याचा उंट चोरला. तो त्यांना राजाकडे नेतो व त्यांच्यावर उंट चोरीचा आळ घेतो. राजा तिघांना विचारतो कि, तुम्ही उंट बघितला नाही तरी त्याचे इतके स्पष्ट वर्णन तुम्ही कसे केलेत.
त्यावर तिघे उत्तर देतात कि, पावलांच्या ठशावरून तो उंट होता हे सिद्ध झाले. रस्त्याच्या एका कडचेच गवत खाल्लेले दिसले त्यावरून त्याला एकाच डोळ्याने दिसते. चावलेल्या गववताचे घास रस्त्याने पडलेले दिसले ज्यांचा आकार उंटाच्या दाता सारखा होता यावरून उंटांचा एक दात पडलेला आहे त्यामुळेच गवत चावताना दाताच्या फटींमधून ते गवत पडले.
उंटाच्या तीन पायांचे ठसे स्पष्ट होती पण एक पाय घासत चालल्यासारखा दिसतो यावरून तो एका पायाने लंगडा आहे. उंटाच्या पाठीवर एका बाजूला मध होते कारण त्याचे थेम्ब सांडल्यामुळे मुंग्या जमा झालेल्या दिसल्या तर दुसर्या बाजूने लोण्याच्या थेंबाजवळ माशा घोंगावत होत्या.
तर उंटावर बसलेली व्यक्ती स्त्री आहे कारण एका ठिकाणी उंट बसला असता तिथे पावलाच्या आकाराचे ठसे दिसले व तिथेच लघवी केलेली दिसली. लघवीमधून योनीगंध असल्याचे जाणवले यावरून ती स्त्रीच आहे हे स्पष्ट झाले. तिने उठतांना आपल्या हाताचा उपयोग केला होता हे तिथल्या हाताच्या ठशावरून लक्षात आले म्हणजे ति गर्भवती असल्यामुळे तो आधार घ्यावा लागला.
थोड्याच वेळात, उंट त्याच रस्त्यावर पुढे सापडला अशी बातमी तिथे येते आणि तिघा भावांचा खरेपणा सिद्ध होतो. राजा त्यांच्या बुद्धिमतेवर खुश होतो. त्यांना बक्षीस देऊन आपले सल्लागार म्हणून नियुक्त करतो.
अशी मुख्य कथा असून त्यात अशाचप्रकारच्या सेरेंडिप राजकुमाराच्या आणखी कथा-उपकथा आहेत. त्या सगळ्या कथांचा शेवट मात्र अनपेक्षितपणे गोड होतो.
आता प्रश्न उरतो कि हे 'सेरेंडिप'' म्हणजे कोणता देश किंवा राज्य, तर संस्कृत आणि पाली भाषेमध्ये श्रीलंकेला 'सिंहिली-द्वीप' म्हणजे 'सिंहिली लोकांचे बेट' असे म्हणायचे (सिंहल म्हणजे 'सिंह'. त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावर अजूनही 'सिंह' विराजमान आहे.) संस्कृत किंवा पाली नंतर जुन्या ग्रीक भाषेत श्रीलंकेला ‘सिलेंन दिवा’ म्हणायचे (पुढे याचेच 'सिलोन' झाले आणि आज 'श्रीलंका')तर अरेबिक भाषेत 'सेरेंडिब' आणि पर्शियन भाषेत 'सेरेंडिप' असे म्हणायचे.
यावरून ते तिघे राजकुमार श्रीलंकेचे होते.
मग प्रश्न पडतो कि हे राजकुमार आपले राज्य सोडून गेले तर कोणत्या देशात गेले आणि त्यांनी तो उंट कुठे बघितला. कथेतील एकंदरीत मांडणी बघता श्रीलंका किंवा दक्षिण भारतात उंट हा प्राणी विरळा. मागवो घेत गेलो आणि एक गोष्ट आढळली कि त्यांना चोर म्हणून पकडून ज्या राजासमोर नेले जाते तो राजा असतो 'बहाराम पाचवा'. हा पाचव्या शतकातील पर्शियाचा राजा. तेंव्हाच्या पर्शियन साहित्यावर यांच्या कर्तृत्वाचा प्रभाव होता. आता वरील कथा त्याच्या काळात घडली असे स्पष्ट संकेत आहेत तसेच त्याचे आणि रोमन साम्राज्याचे सामरिक,राजकीय,धार्मिक आणि व्यापारिक संबंध होते. अर्थातच रोम आणि इतर युरोपियन भाषेमध्ये पर्शियन भाषेचा प्रभाव जाणवतो त्यातून इंग्रजी कशी सुटेल?
एकंदरीत, आजचा इंग्रजीतील 'सेरेंडिपिटी' हा शब्द पर्शियन भाषेतून आलाय आणि तोही वर सांगितलेल्या कथेच्या माध्यमातून जी होरॅस वॉलपोल यांनी १८ व्या शतकात लिहिली. याच कथेतील पात्रांसोबत जे घडते तोच अर्थ सेरेंडिपिटी याचा घेतल्या जातो : "अचानकपणे अपेक्षा नसताना चांगली गोष्ट घडणे' .
अनेक वैज्ञानिक शोध हे 'सेरेंडिपिटी' आहेत... १८९५ मधील रॉनटजेन यांनी लावले क्ष-किरणांचा शोध हा त्यापैकी एक.
खरतर Ashutosh दादांच्या पाचेक महिन्यापूर्वीच्या कुठल्यातरी कोकण किनाऱ्यावरील फोटोच्या कॅप्शन मध्ये वाचला हा शब्द तेंव्हापासून फिरतोय डोक्यात.. तो अचानक दिसला हि सुद्धा एक 'सेरेंडिपिटी' आहेच...

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...