जय जय वैदर्भीवासी अंबे | धावत येई अविलंबे...
विदर्भातील सांस्कृतिक, शैक्षणिक शहर म्हणून ओळख निर्माण केलेले आणि
विदर्भाचे 'पुणे' म्हणून नावारूपाला आलेले अमरावती शहर... संस्कृतातील उदुंबरावती या शब्दाचे
प्राकृत रूप उंबरावती असून नंतर अपभ्रंश होवून उमरावती आणि आता अमरावती असे झाले. याप्रकारे
प्रवास करत विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अमरावती शहर... आणि या शहराचे
दैवत आई अंबा..
कुठल्याही शहराचा इतिहास हा त्या शहरातील
पुरातन वास्तूतून आपल्यासमोर उजागर होत असतो. अशी वास्तू म्हणजे एक मुका इतिहासकारच असते. अमरावतीतील अंबादेवीचे मंदिर अनेक शतकांपूर्वीची कहाणी सांगण्यास सक्षम
आहे. अंबादेवी व त्यायोगे अमरावती शहर यांच्या प्राचीन व
पौराणिक इतिहासाचा ओझरता आढावा घेणे अगत्याचे ठरेल.
·
पौराणिक काळातील उल्लेख:
इंद्राच्या
अमरावतीचे वर्णन महाभारतात आलेले आहे. श्री कृष्णाने गरुडावर आरूढ होवून
इंद्राच्या या अमरावती नगरी मधून पारिजातक वृक्ष आणला असे पौराणिक कथेत वर्णन आहे.उत्तरेतील आर्यांच्या यदु वंशातील भोज शाखेतील विदर्भ नावाच्या
क्षत्रियाने आपले राज्य येथे स्थापन केले. त्यानेच वर्धा नदीच्या तीरावर विदर्भनगरी उर्फ
कुंडीनपूर हे राजधानीचे शहर उभे केले. विदर्भ राज्याच्या
घराण्यातील इंदुमती नावाच्या कन्येचा विवाह प्रभू रामचंद्राचे पितामह अज नृपती
यांच्याशी झाला. विशेष म्हणजे अगस्ती ऋषीची पत्नी लोपमुद्रा
आणि नळ राजाची पत्नी दमयंती या विदर्भकन्याच होत्या. याच
राजघराण्यातील राजा भीष्मक याची कन्या रुख्मिणी म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी होय. रुख्मिणीचे हरण ज्या ठिकाणाहून झाले ते म्हणजे आज अमरावती शहरात असलेले
श्री अंबेचे मंदिर होय.
·
इतर उल्लेख:
इ.स. १८७० च्या गझेटीअर फॉर दि हैद्राबाद असाइन डीस्ट्रीक्स यात अंबादेवी
मंदिराचा उल्लेख केलेला आहे . सेटलमेंट रेकॉर्ड मध्येही श्री अंबा मातेचे मंदिर हे
दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचे आहे असे म्हटले आहे. १९११ व १९६८ मधील उमरावती
जिल्ह्याच्या गझेटीअर मधेय्ही असाच उल्लेख आढळतो. तेराव्या शतकात श्री गोविन्द्प्रभू उमरावातीला
आले असता त्यांनी रुख्मिणी हरणाचे स्थान पहिले अशी नोंद आहे.
या वरून तेराव्या शतकातही रुख्मिणी हरणाची आख्यायिका प्रचलित होती म्हणजेच हि
आख्यायिका अतिशय पुरातन आहे. या संदर्भात अम्बादेविच्या
मंदिरातून कृष्णाने रुख्मिणी हरण कसे केले हे पाहणे महत्वाचे ठरेल.
·
रुख्मिणी हरणाची आख्यायिका:
विदर्भ
राजा भीष्मक यास पाच पुत्र व एक लावण्यवती कन्या होती. सर्वात
मोठा पुत्र रुख्मि (रुक्मि) होता तर कन्येचे नाव रुख्मिणी (रुक्मिणी) होते. ती साक्षात अंबेचा अंश होती. ती लग्नाची झाली तेंव्हा तिच्या भावाच्या आग्रहाखातर तिचा विवाह चेदि
देशाचा राजपुत्र शिशुपाल याच्याशी ठरला.
द्वारकेचा
राजा श्रीकृष्ण याच्या रूप आणि पराक्रमाचे
गुणगान रुख्मिणी ऐकून होती. त्याच्यावर तिचा जीव बसला. श्रीकृष्णाशीच लग्न करेल असे तिने ठरवले. द्वारकेत कृष्ण
सुद्धा तिच्या रूपाच्या आणि सद्गुनाच्या वर्णनाने भारावून गेला होता व त्यानेही
तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले.('शिशुपाल नवरा मी न-वरी.. श्रीकृष्ण
नवरा मी नवरी')
रुख्मिणीने
कृष्णाला निरोप पाठवला. सुदेव नावाच्या ब्राह्मणाने निरोपाची 'रुख्मिणी-पत्रिका' (भागवत- दशमस्कंध:
अध्याय ५३) कृष्णाकडे पोचती केली. पत्रात तिने कृष्णाला
आव्हान केले कि त्याने तिचे हरण करावे. तिने आपली प्रीती
व्यक्त करताना सांगितले कि विदर्भ राज्यांच्या कुलनेमाप्रमाणे लग्नाच्या आदल्या
दिवशी नववधू(रुख्मिणी) अंत:पुराबाहेर
पडून नगराबाहेरील अंबा देवीच्या दर्शनाला जाईल तेंव्हा त्याने तिचे हरण करावे. कृष्णाने शिशुपाल आणि जरासंध यांना युद्धात हरवून तिच्याशी राक्षस विवाह
करावा अशी तिची इच्छा होती.... आणि तिच्या इच्छेप्रमाणे सगळे
घडून आले कृष्णाने तिला आई अंबेच्या मंदिरातून हरले व द्वारकेला निघाला.
या
सगळ्या वर्णनावरून अंबा मातेच्या मंदिराचे पौराणिक महत्त्व आपल्या लक्षात येते.
·
श्रो अंबामातेची स्वयंभू मूर्ती:
श्रीकृष्णाचे
सासर आणि लक्ष्मी स्वरूप रुख्मिणीचे माहेर असलेले हे भारतातील एक शक्तीपीठ आहे. अंबा
मातेची मूर्ती स्वयंभू असून ती काळ्या रंगाच्या वालुका पाषाणाची आहे. हि मूर्ती पूर्णाकृती आसनस्थ आहे. अंबेचे दोन्ही
हात मांडीवर विसावलेले, डोळे अधोन्मिलीत, शांत, गंभीर व ध्यानस्त अशी मुद्रा धारण केलेली आहे. मूळ मूर्तीला बिंदी, कानातील बाल्या, बुगड्या, नथ, गळ्यात ठुशी व
सुवर्णाच्या सऱ्या, कमरपट्टा आणि अनेक दागिन्यांनी अलंकृत
करण्यात आले आहे.
·
श्री
अंबेच्या मंदिराचा इतिहास:
शहराच्या
मध्यभागी असलेले मंदिर हे प्राचीन आहे. बदलत्या काळानुसार त्यात अनेक बदल
केलेलं असले तरी मुख्य गाभारा हा मूळचाच असण्याची शक्यता आहे. शक्यता यासाठी कि इ.स. १४९९ च्या कालखंडात यवनांनी विदर्भ प्रांतातील
असंख्य मंदिराची नासधूस केली तेंव्हा विदर्भातील एवढे प्रसिद्ध मंदिर खचितच सुटले
असावे. परंतु मूर्ती आणि गाभारा कसाबसा त्यातून सुरक्षित
राहिला असावा. इ.स. १६६० च्या सुमारास श्री. जनार्धन स्वामी यांनी
मंदिराचा जीर्नोधार केला असावा. मंदिर पूर्वाभिमुख आहे.
मंदिराला पूर्वी दगडी भिंती होत्या आणि गाभाऱ्याचे द्वार ठेंगणे होते. इ.स. १८०६ ते १८२१ या
कालखंडात निजामाने अमरावतीच्या संरक्षणासाठी एक मजबूत असा दगडी परकोट बांधला आहे. तो परकोट अजूनही बऱ्यापैकी मजबूत असून आपले अवशेष टिकवून आहे. या परकोटाच्या एका दरवाज्याला 'अंबा दरवाजा'
म्हटल्या जाते. इ.स. १८६३-६४ साली श्री अंबेची मूर्ती फक्त एका चबुतऱ्या
वर होती. त्यावेळी
श्री नाना चिमोटे व केवलचंद्रजी या दोन गृहस्थांनी वर्गणी गोळा करून मंदिर बांधले. १८९६ मध्ये मंदिराच्या शिखराचे काम झाले तर १९०६ मध्ये कळसाला सोन्याचा
मुलामा देवून नवीन करण्यात आले. आज मंदिराला प्रशस्त सभामंडप
आहे.
·
श्री
जनार्दन स्वामी यांचे कार्य:
१७
व्या शतकामध्ये १६४० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामी नावाचे सत्पुरुष अंबेचे
भक्त होते. तेथेच त्यांनी मंदिरच्या दक्षिणेकडील लागुनच असलेल्या अंबा नदीच्या
तीरावर आपली पर्णकुटी उभी केली. रोज देवीचे दर्शन
घेतल्याशिवाय ते अन्न ग्रहण करत नसत. एके दिवशी नदीला पूर
आल्यामुळे त्यांना दर्शन घेणे शक्य झाले नाही. त्याच दिवशी
त्यांना दृष्टांत झाला. अंबा देवीने त्यांना साक्षात दर्शन
दिले व आकाशवाणी झाली कि जी विहीर स्वामी वापरात होते त्या विहिरीवरील बाण म्हणजे
साक्षात देवीच आहे. त्याचीच प्राण प्रतिष्ठा करून दर्शन
घ्यावे असे बोलून देवी अदृश झाली. ती देवी म्हणजे एकविरा
देवी होय व अंबा नदीच्या दुसऱ्या तीरावर आज तिचे मंदिर आहे.
श्री एकविरा देवीची प्राण प्रतिष्ठा १६६० च्या शतकात झाली.
आज तिथे भव्य मंदिर आहे. अंबा आणि एकविरा देवी ला जोडणारा पूल बांधण्यात आला असून
भाविक एकाचवेळी दोन्ही मातेचे दर्शन घेतात. एकवेरा देवीच्या
मंदिरात एक भुयार असून काही लेण्यावाजा खोल्या आहेत. त्यांचा
उपयोग यवनांच्या आक्रमणावेळी संरक्षणासाठी झाला असावा.
·
श्री अंबा
संस्थान आणि संस्थानाचे समाजपोयोगी कार्य:
श्री अंबा देवी संस्थान हे मंदिराची देखभाल तर करतेच शिवाय अनेक समाज उपयोगी कार्यक्रम
सुद्धा राबवते. संस्थानातर्फे एक सुसज्ज ग्रंथालय चालवल्या जाते.
१९७० साली स्थापण झालेल्या ग्रंथालयाला 'अ ' वर्ग प्राप्त झाला असून सुसज्ज असे वाचनालय सुधा आहे. तसेच गेल्या १२ वर्षापासून संस्थान डॉ. जोशी
हॉस्पिटल यांच्यासोबत एक सुसज्ज दवाखाना चालविते. अतिशय कमी
दरात आणि गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात आतापर्यंत तिचा लाभ
हजारो रुग्णांनी घेतला आहे.
जुन्या
काळापासून कलाकार आणि अंबा मातेचा एक संबंध आहे. जुन्या काळातील
कालावान्तिनी आपली कला मातेच्या सभामंडपात सादर करायच्या.
अनेक गणिका, त्यात मुस्लीम गणिकांचा सुधा सहभाग होता, अंबा चरणी आपली भक्ती कलेच्या रूपाने अर्पण करयच्या. अंबादेवीला
मिळणाऱ्या दानातील सगळ्यात जास्त वाटा गणिकांचा आहे. आज,
नवरात्र मोहोत्सवात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे
कलाकार आपली कला सादर करतात. श्री अंबा फेस्टिवल म्हणून
नवरात्र महोत्सव अमरावती मध्ये साजरा केला जातो ज्याचे उद्घाटन तत्कालीन
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या
फेस्टिवल मध्ये अनेक सांस्कृतिक साहित्यिक आणि लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित केल्या
जातात.
"परमशक्ती
आनंदमय इत्त्युच्चते ' अशी आई
अंबा... ती देशकालमर्यादेच्या पलीकडची आहे...ब्रह्मांडाचे
लालन पालन करणारी आदिमाया म्हणजेच अंबिका ...श्री अंबा होय.
प्रा,
ज्ञानेश्वर ग. गटकर
अमरावती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा