रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

मला भावलेला शेक्सपिअर-०१


मी काही खूप मोठा समीक्षक नाही. असेलोच काही  तर तुमच्या सारखा साधारण  वाचक आहे,  म्हणून शेक्सपिअर वर लिहिलेला हा लेख संहितेची चिरफाड करून केलेली समीक्षा नाही. अगदी सहज वाचताना आलेले साधारनशे अनुभव तुमच्यासमोर मांडतोय. आवश्यकतेनुसार संदर्भ गोळा करत गेले कि साहित्य कृती मस्त उकलत जाते आणि मजा देत जाते. इथे मी तेच केलेय.

'All the world is a stage.'  अस म्हणणारा हा शेक्सपिअर नावाचा अवलिया त्याच्या सुदैवाने भारतात जन्माला आला नाही. असता तर त्याची ओळख कुठल्यातरी प्राचीन पुस्तकात धूळ खात बसली असती. त्याच्यासाठी सर्व जग एक रंगमंच होते  पण नाटकाच्या रंगमंचावर त्याने सर्व जगाला अवतीर्ण केले होते. त्याने  आपल्या आयुष्यात एकंदरीत 37 नाटके लिहिली आणि जवळपास १२०० च्या वर पात्रे आपल्या कल्पनेने चितारली. त्यातील अनेक पात्रांनी लोकांना भुरळ पाडली... विशेषतः शोकांतीकेतील पात्र हि कल्पनेतील नसून अगदी सच्ची समजून त्यांच्यावर अभ्यास करण्यात आला. त्याच्या काही शोकांतिका वाचताना या पात्रांविषयी मला प्रकर्षाने काहीतरी जाणवत होते. त्याच जाणीवेला मी इथे शब्दबद्ध केले आहे.

हेम्लेट: एक  शापित राजपुत्र 

हेम्लेट हे त्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते. त्याच्या नायकावर भाष्य करण्या आधी थोडक्यात ती  कथा माहिती करून घेवूयात: डेन्मार्कचा राजपुत्र असलेला हेम्लेट. आपल्या पित्याच्या मृत्यूने शोकाकुल आहे.त्याच्या वडिलांचा खून करणारा दुसरा तिसरा कुणीच नसून त्याचा काका क्लोडीअस असतो. क्लोडीअस एकाच महिन्याच्या आत हेम्लेटच्या आईशी लग्न करतो व राजा होतो.. एके रात्री हेम्लेटला त्याच्या बापाचे भूत काकाने केलेल्या कारनाम्याची  हकीकत सांगते आणि हेम्लेटकडून क्लोडीअसचा प्रतिशोध घ्यायचे वचन घेते. परंतू संपूर्ण नाटकभर अनेकदा संधी मिळूनही हेम्लेट काकांचा खून करत नाही. शेवटी त्याच्या या नाकर्तेपणामुळे अनेक लोकांचे प्राण जातात. त्याची आई गर्त्युड,त्याची प्रेयसी ओफेलीया, त्याचे मित्र रोझेन्काझ व गील्देस्तर्ण, ओफेलीयाचे वडील पोलोनिअस व भाऊ लीरेटस हे फक्त हेम्लेट च्या कृतीशुन्यतेमुळेच आपल्या प्राणाला मूकतात..आणि शेवटी   अगदी अटी-तटी च्या वेळी तो काकाला ठार करतो...आणि स्वतः हि  मरतो.

मला वाटत हेम्लेट या पात्रा एवढी चर्चा कोणत्याच नाटकातील  पात्राची झाली नसेल. तुमच्यापैकी अनेकांनी नाटक वाचलेही असू शकते व त्याबद्दल आपापली मते ठरवलीही असतील. आपल्याच आईला छी!थू! करणारा,  तिने केलेल्या व्यभिचारासाठी तिचा तिरस्कार करणारा असा, काकाचा खून करण्यासाठी धडपडत असलेला एक नायक.  नाटकाच्या सुरुवातीला पहिल्या अंकातच त्याला वडिलांच्या खुनाबद्दल माहिती कळते. आईने  केलेला व्यभिचार कळतो. परंतु पुढची चार अंक तो वडिलांच्या खुनाचा बदला न घेता स्वताला निष्कारण त्रास देत वेडेपणाचे नाटक करतो. कुठलाही सुज्ञ नायक जो ज्ञानी आहे,रसिक आहे आणि जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा जाणकार आहे, त्याला कृतीशुण्यतेचे दुर्गुण ठावूक आहेतच आणि कृती केल्यानंतरचे फायदे सुद्धा जाणतो मग तो  कर्तव्यामध्ये इतकी हेळसांड कसा काय करेल? हा प्रश्न मला पडला. त्यावरील  टीकाकारांनी केलेली भाष्य सुद्धा वाचली. पण त्याने बदला घ्यायला का उशीर केला याचे उत्तर मिळत नव्हते. या प्रश्नाने अनेक जणांना वेड लावलंय म्हणे! लावलच असेल. तो शेक्सपिअर आहे...

मग एकदा विदर्भ महाविद्यालयातील इंग्रजी विभागात कार्यरत असलेले माझे सर लोक प्रा. राजेश श्रीखंडे आणि डॉ. जयंत चौधरी यांच्याशी चर्चा करताना फ्राइड च्या एडीपस कॉम्प्लेक्स चा विषय निघाला  आणि खूपच मस्त चर्चा झाली. त्या चर्चेच्या ओघातच हेम्लेटच्या नाकर्तेपणाच्या  प्रश्नाचे उत्तर मिळाल्यासारखे वाटले. फ्राइड च्या थेओरी नुसार(थोडक्यात देतोय. यावर एक स्वतंत्र ब्लॉग लिहील) प्रत्येक मुलामध्ये आपल्या आईबद्दल सुप्त शारीरिक आकर्षण असते. मुलाला जेंव्हा कळायला लागते कि त्याचे वडील आईच्या प्रेमात वाटेकरी आहेत तर तो वडिलांचा  तिरस्कार करायला लागतो आणि वडिलांचा काटा कसा काढता येईल याचा विचार करतो. परंतु वडिलांच्या शक्तीपुढे  आणि समाजातील नैतिक बंधनाच्या भीतीपोटी उत्तर आयुष्यात तो हा विचार आपल्या अंतर्मनात लपवून ठेवतो. यालाच 'एडीपस गंड'(याचीही एक कथा आहे..त्यावरही सविस्तर) म्हणून ओळखल्या जातो. हेम्लेट मध्ये हा गंड होता. त्याला स्वतालाच त्याच्या वडिलांचा खून करावासा वाटत होते. कारण आईच्या प्रेमात त्याच्यासाठी  वडील हे वाटेकरी म्ह्णून होते.  त्याची वडिलांना मारण्याची सुप्त इच्छा त्याच्या काकांनी पूर्ण केली याचे कदाचित त्याला समाधान वाटत असेल म्हणून तो आपल्या काकांना मारायला टाळत होता. एकंदरीत हेम्लेटचा काका म्हणजे त्याच्या अंतर्मनातील इच्छा पूर्ण करणारे साधन होते. हेच ते कारण आहे कि ज्यामुळे त्याला काकाचा बदला घ्यावासा वाटत नव्हता.

हे असे स्पष्टीकरण निघत होते आणि कुठेतरी पोहचल्यासारखे वाटत होते. परंतु हे पोहोचणे  समाधान देत नव्हते. फ्राइड च्या थेओरी नुसार काही प्रश्नांची उकल होत होती तरीही काही प्रश्न घिरट्या घालतच होते.  फ्राइड वाचायला घेतला. काही गोष्टी नव्याने समजायला लागल्या. पण नव्याने समजणाऱ्या गोष्टी प्रश्नाला सोडवत नव्हत्या तर त्याचा गुंता अजून वाढत होता त्यामुळे  हेम्लेटचा  नाकर्तेपणाचा प्रश्न आणखी गहन व्हायला लागला.

मी मानसशास्त्राचा अभ्यासक नाही त्यामुळे मला फ्राइड पूर्णतः  समजला असे  मी म्हणत नाही. (फ्राइडला स्वतः हि हेच वाटेल... तोही त्याला किती कळला असेल?)माझ्या बुद्धीला जेवढे कळले ते म्हणजे कि फ्राइड म्हणतो त्याप्रमाणे माणसाच्या अंतर्मानात त्याने लपवून ठेवलेली भीती किंवा त्याची एखादी इच्छा, जी दुसऱ्यांच्यापुढे उजागर होऊ नये असे त्याला वाटते, ती अप्रत्यक्षपणे  त्याला छळत असते.या दडवून ठेवलेल्या गोष्टी इतक्या सहजी बाहेर येत नाही आणि येतात तेंव्हा त्या रूप बदलून आपल्याला संकेत देत असतात. अशा सुप्त इच्छा जाणून घ्यायच्या असतील तर तिथपर्यंत पोचण्याचे काही छुपे मार्ग आहेत.

१.स्वप्न
२.बोलताना चाचरणे (Slip of the tongue)
3.कृती करताना चाचरणे (Slip of the Acton)
4. संमोहन

आता जर हेम्लेट मध्ये खरोखरच एडीपस गंड असेल म्हणजे आईविषयी असलेली आणि समाजात मान्य नसलेली कामेच्छा, तर ती वरील चारपैकी एकाने तरी नाटकात सूचित करायला हवी.

एकेकाविषयी थोडी चर्चा करूयात. संमोहन  आपल्या उपयोगाचे नाही कारण हेम्लेट हे काल्पनिक पात्र आहे त्यामुळे त्याच्यावर संमोहन काम करणार नाही.  पैकी उरले तीन:

१. स्वप्न: हेम्लेट काल्पनिक पात्र असल्याने त्याची स्वप्ने आपल्याला कळू शकत नसली  तरी त्याच्या अंतर्मनात जाण्याचा आपल्याला एक मार्ग आहे तो  म्हणजे त्याच्या सोल्यूलोकीस (आत्मभाषणे). पूर्ण नाटकामध्ये एकंदरीत ७ वेळा तो  एकटाच आपल्या मनातील विचार प्रगट करतो. जणू त्याचे त्यावेळीचे बोलणे म्हणजे संमोहित झाल्यासारखे किंवा स्वप्नातल्या जगण्यासारखे वाटते. म्हणून त्याची स्वभाषणे एक प्रकारे स्वप्नांसारखीच आहेत. ती  त्याच्या अंतर्मनाचा आरसा म्हणून आपण गृहीत धरू शकतो.

         जर असे असेल तर त्याच्या या आत्म/स्वभाषणातून त्याच्या मनाचा जो तळ आपल्याला दिसतो  त्यात कुठेतरी लपून का होईना एडीपस गंडाचे पडसाद उमटायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. उलट तिथेच त्याची असहायता, वडिलांबद्दलचे प्रेम, आई बद्दल घृणा आणि काकांबद्दल तिरस्कार प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे फ्राइड म्हणतो तसल्या 'एडीपस गंडाच्या' खाना-खुना कुठेच सापडत नाहीत. तो तर प्रत्येकवेळी पूर्ण जाणीवेने आल्या अंतर्मनातील आईच्या व्याभिचारामुळे आलेली हिडीस भावना व्यक्त करतो. तिला अनैतिक समजतो. आपल्या नवर्याशी प्रतारणा करणारी वेश्या समजतो. याचा अर्थ नैतिकतेच्या त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्यात नवरया शिवाय इतरांशी केलेले शारीरिक संबंध त्याला पटत नाहीत. अशी सामाजिक नैतिक मुल्य पाळणारा तो असेल तर आई-मुलगा हे संबध शारीरिक पातळीवर गेलेले त्याच्या नेनिवेला कसे पटणार? किंवा ते त्याला पटतात याचा कुठलाच संकेत मला तरी त्याच्या आत्मभाषणातून मिळालेला नाही.

२. बोलताना चाचरणे: अनेकदा आपण बोलत असताना अडखळतो, चाचरतो. अशा चाचरन्याला मनोवैज्ञानिक खूप गांभीर्याने घेतात. कारण तुम्ही नेमके कुठल्या शब्दांवर चाचरले त्यावरून तुमच्या अंतर्मनाचा ठाव घेतल्या जाऊ शकतो.  यासंदर्भात एक खेळ आपल्याला आठवेल, 'झिंदगी न मिलेगी दोबारा' या चित्रपटात तो खूपच कल्पकतेणे वापरलाय. खेळताना एक व्यक्ती कुठलातरी शब्द समोरच्याला देतो आणि तो शब्द ऐकताच सगळ्यात प्रथम आपल्या डोक्यात जे काही येते ते न हीचकिचता सांगायचे. यात नेमके होते काय आपल्या अंतर्मांत लपवून ठेवलेल्या गोष्टी बाहेर येण्याची वाट बघत असतात त्यांना तिथेच थोपवायला विशेष प्रयत्न करावे लागतात. ते प्रयत्न्न करताना मेंदूला थोडा विचार करावा लागतो आणि त्या गडबडीत आपण बोलताना वेळ लागतो किंवा आपण चाचरतो.

 प्रस्तुत नाटकात हेम्लेट एकदाही अशाप्रकारे  कुठे चाचरतो असे मला आढळून आले नाही. जेणेकरून त्याच्या मनातील आईविषयी असलेली त्याची  कामेच्छा दिसून येईल आणि  आपल्याला ते कळेल. उलट तो न डगमगता सतत बोलत असतो. बोलताना तो कुठेही विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. त्याचे बोलणे नैसर्गिक वाटते आणि ते तेवढ्याच सहज त्याच्या तोंडून बाहेर निघते. एकंदरीत  आपल्याला 'अपेक्षित चाचरणे' हेम्लेटच्या  बोलण्यात कुठेच आढळत नाही.

३.कृती करताना चाचरणे:
गुप्त/सुप्त इच्छा जेंव्हा कुठल्याही रुपात वास्तवात प्रगट होताना जाणवत असेल अशावेळी आपली देहबोली बदलते आणि आपण त्यावेळी कृती करताना गडबडतो. हे गडबडणे म्हणजे एक संकेत असतो आपल्या मनोवास्थेचा. माउस ट्राप सीन मध्ये याचाच  वापर  करून काका च्या मनातील अस्वस्थता पकडल्या जाते.  लपवून ठेवलेल्या मनातील दोषाचे, गुन्ह्याचे, इच्छेचे सादारीकरन जर  गुन्हेगारापुढे होत असेल तर नक्कीच त्याचे हावभाव आणि देहबोली बदलेल   हि गोष्ट शेक्सपिअर ला ठाऊक होती एरव्ही त्याने एवढ्या खुबीने त्याचा वापर आपल्या नाटकात केला नसता. मग जर नाटककाराला वरील गोष्ट  माहित  आहे  आणि हम्लेत च्या मनातील सुप्त इच्छा  हि वडिलांचा खून करणे हीच आहे  तर  त्याने ती  नाटकात निदान शब्दातून नाही  तर  कृतीतून  तरी दर्शवली असती. संपूर्ण नाटकात हम्लेत ची कृती एवढी स्पष्ट आहे कि तो आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतो. त्यांना आदर्श मानतो आणि त्यांना जीवाने मारणे हा  विचार त्याच्या मनात  एकदाही कुठे येत नाही. याचाच अर्थ फ्राइड सांगितलेल्या कुठल्याच गोष्टीचा पुरावा संबंध नाटकात कुठेच आढळत  नाही.

एकंदरीत मनोविश्लेषक जो ठासून दावा करतात कि फ्राइडच्या थेअरी नुसारच  हम्लेतच्या नाकर्तेपणाचे उत्तर मिलते. हे साफ चूक आहे. त्याला एडीपस गंड होता हे सिद्ध होत नाही

अशा प्रकारे मूळ प्रश्न अनुत्तरीतच राहतो कि हम्लेत वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यास उशीर का करतो?

क्रमशः ........



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...