मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

शब्दांच्या गोष्टी (४ व ५ )

४) Echo...choo!!!...cho!!..cho!

Panic शब्दाने मौन सोडले आणि आपला अर्थ सांगितला. परंतु मागोमाग Echo शब्दाचे प्रतिध्वनी पिच्छा काही सोडत नव्हते. Echo शब्दाची सुद्धा एक मस्त कहाणी आहे. ती कहाणीच सांगेलकि  Echo शब्दाला कसा अर्थ मिळाला.
ज्युपिटर(झेवूस म्हणून सुद्धा याला ओळखतात) म्हणजे आपल्याकडील इंद्र.. दोघेही सारखेच लंपट मला वाटतात.
 तर या ज्युपिटर ची बायको म्हणजे ज्युनो किंवा हेरा हिला आपल्या नवर्याच्या बाहेरख्यालीपणा अजिबात आवडत नव्हता... कोणत्या बायकोला आवडेल म्हणा... पण तो मात्र जुमानतच नव्हता...
ती सतत त्याच्यावर लक्ष ठेवून असायची....पण शेवटी देव जरी असला तरी पुरुषच तो. त्यात त्याला दिव्य-बिव्य शक्ती मिळालेल्या... शक्तींचा पूर्ण इस्ते'माल' कारायचा तो इतर बायकांवर भुरळ पाडण्यासाठी... किंवा एखादीने  त्याला नकार दिलाच तर तिच्यावर 'अतिप्रसंग' करायलासुद्धा मागे-पुढे बघत नव्हता...
 तो आपल्या बायकोची नजर चुकवून प्रेयसिला (अनेक होत्या, त्याबद्दल नंतर कधीतरी) भेटायला जायचाच. त्याच्या अनेक प्रेयसीपैकी एक होती Echo नावाची जलपरी....

ज्युपिटर तिला एकदा बायकोच्या नकळत भेटायला गेला. त्यांचे प्रेम रंगात आले तेंव्हाच त्यांना कळले कि ज्युपिटरची बायको ज्युनोला माहिती पोचलीय कि त्या दोघांची रासलीला सुरु आहे ते... मग  ती आपल्या नवऱ्याला रंगे-हात पकडायला येत आहे. .. ती येणार हे त्याला दिव्य शक्तीमुळे कळते आणि तो तो कावरा-बावरा होतो... देव असला तरी बायकोला घाबरतो बर हापण... तिच्या हाती पकडल्या जाऊ नये म्हणून कदाचित!? मागच्या दाराने जायला निघाला..... जाण्याआधी Echo ला सांगून ठेवतो कि मी बाहेर पडेपर्यंत तू ज्युनोला पुढल्या दारावर गोष्टीत गुंतवून ठेव... 
इकडे Echo ने ज्युनोला गोष्टी करण्यात गुंतवून ठेवले जेणेकरून ज्युपिटरला तिथून निसटण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.ज्युनोच्या सगळ लक्षात येत होते शेवटी ज्युपिटरसारख्याची बायको ती... तिने Echo ला वाट सोडायला सांगितली... दम दिला... पण Echo ने काही तिला तिथून जावू दिले नाही.. 
या सगळ्याप्रकारामुळे ज्युनो जाम भडकली आणि तिने Echo ला शाप दिला कि, तू मला शब्दांमध्ये गुंतवून ठेवलेस, जा यापुढे तू बोलूच शकणार नाहीस आणि तुझ्या समोर जी व्यक्ती बोलत असेल त्याचे फक्त शेवटचे शब्दच तू उच्चारू शकशील.... तेंव्हापासून echo हि समोरच्याचे शेवटचे शब्दच उच्चारू शकते. म्हणून प्रतीध्वनी साठी तिचेच नाव आपण वापरतो... Echo...Echo...Echo....
विशेष बाब म्हणजे हि echo नंतर नार्सिससच्या प्रेमात पडली पण ती कधी त्याला प्रेम व्यक्त करू शकली नाही. नार्सिसीसने स्वप्रेमात प्राण सोडल्यनंतर echo चे सुद्धा दगडामध्ये रुपांतर झाले... म्हणून दगडाला आदळून जो प्रतीध्वनी उमटतो तो म्हणजे आपल्या बोलण्याला Echo ने दिलेला echo आहे....गंमतच आहे...!!!!


५) alma mater

संकृतवर प्रेम असणार्यांना इंग्रजीतील हा शब्द आवडेल. कारण यातील mater म्हणजे आजचा इंग्रजीतील mother. mater हा मातृ/माता या संस्कृत शब्दातून इंडो-युरोपिअन भाषेत गेला....
alma mater या संयुक्त शब्दाचा अर्थ जेंव्हा मला पहिल्यादा माहिती झाला तेंव्हा मला आठवली 'धाराऊ'.. 
हो तीच माय माउली धाराऊ जिने सईबाईच्या आजारपणात राजे संभाजीना आपला पान्हा दिला. 
नंतर आठवली 'यशोदा' जिन्हे कृष्णाचे संगोपन केले आणि .....आठवली हि वसुंधरा जी आपले संगोपन करते.

एकंदरीत alma mater चा अर्थ आता थोडा आपल्यासाठी खुलला असेल. दुधमाय, संगोपन करणारी आई, लहानाचे मोठे करतांना संस्कारित, शिक्षित करणारी आई... अशा विविध छटा आहेत या शब्दाला.
पण आज हा शब्द जरा अडगळीत पडलाय. सहसा कुणी वापरत नाही. एका गोष्टीसाठी मात्र या शब्दाचा योग्य वापर केला जातोय ते म्हणजे 'ज्या शाळेत किंवा कॉलेजात आपले मुळ शिक्षण झाले त्या शाळा/कॉलेज/विद्यापीठाला आपण आपले alma mater म्हणू शकतो. कारण तिने आपले बौद्धिक संगोपन केलेलं असते...
माझी alma mater आहे विदर्भ महाविद्यालय, अमरावती....


1 टिप्पणी:

Priyanka Nanavare म्हणाले...

Very interesting! Keep posting शब्दांच्या गोष्टी

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...