रविवार, २४ मे, २०२०

Liberty….एका रोमन उत्सवात मिळणारे ‘स्वातंत्र्य’




मानवी इतिहासाला कलाटणी देणारी फ्रेंच राज्यक्रांती. काय नाही दिलय या फ्रेंच राज्यक्रांतीने... आधुनिक ‘लोकशाही’ दिलीय जगाला.. याच क्रांतीतून जन्माला आलीत तीन अपत्ये... ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’... ‘लिबर्टी, एक़्वेलिटी, फ्रेटेरनिटी’.....

म्हणजे त्यापूर्वी लोकशाही नव्हती असे नाही... ‘रोम’ नावच्या साम्राज्यात लोकशाही वाचवण्यासाठी ब्रुटससारख्या तत्ववाद्याला आपल्या मित्राशी दगा करावा लागला..ज्युलिअस सीझरचा वध करावा लागला...तीसुद्धा लोकशाहीच होती...पण ती एक  गुलामांच्या जीवावर जगणारी लोकशाही होती ...समता नसलेली लोकशाही होती .... शोषणावर अवलंबून असलेली लोकशाही असे तिचे स्वरूप होते... खरी लोकशाही दिली ती फ्रेंच राज्यक्रांतीनेच.... खरे स्वातंत्र्य दिले तेही फ्रेंच राज्यक्रांतीनेच... लिबर्टी ....

लायबेर किंवा लीबेरटास (Liber) नावाचा एक रोमन देव आणि देवता .... ग्रीकलोक त्याला डायोनैसीस, बेकस वगैरे म्हणतात.. रोमनांनी ग्रीकांच्या  अनेक देव-देवतांचे रोमनीकरन केले... त्यांची नावे बदलली, पण त्यांच्या मागील ग्रीक मिथकापासून सुटू शकले नाहीत... तर दोन्हीकडे हा देव दारू पिणारा आणि उत्सवप्रिय म्हणून रंगवल्या जातो.

ग्रीकांमध्ये डायोनैसीस हा सुपीकतेचा  व भरभराटीचा ईश्वर समजल्या जातो. डायोनैसीसच्या नावाने एक उत्सव साजरा व्हायचा. शेतातील उत्पन्न आले कि सहसा हा उत्सव होत असे. त्यात लोक यात्रेसारखी गर्दी करायचे, दारू प्यायचे आणि नाचायचे... हा डायोनैसीस फेस्टिवल मानववंशशास्त्रात खूप महत्वाचा मानल्या जातो... या उत्सवात नाटकांच्या स्पर्धा भरवल्या जायच्या ज्यातून आपल्याला अजरामर ग्रीक शोकांतिका मिळाल्या.... तर अशा डायोनैसीसशी समांतर देवता म्हणून रोमन लोक ‘लायबेर’ची पूजा करायला लागले...
लायबेरसुद्धा डायोनैसीससारखाच सुपीकतेचा आणि दारूचा देव होता, परंतु रोमनांनी त्याला वेगळ्या प्रकारे पूजले. त्याच्या नावानेसुद्धा ‘लायबेरालीया’ नावाचा उत्सव रोममध्ये साजरा व्हायचा...

मार्च महिना रोमन इतिहासकारांसाठी महत्वाचा आहे. फक्त  ‘आयडीज ऑफ मार्च’ म्हणजे १५ मार्चला ज्युलिअस सीझरचा वध झाला म्हणून महत्वाचा आहे अस नव्हे तर  लायबेरालीया उत्सवसुद्धा  १७ मार्च ला साजरा केल्या जायचा...
या उत्सवात लायबेर देवाची पूजा व्हायची, बळी दिल्या जायचे आणि त्याच्या स्तुतीपर भजने,गाणी म्हटल्या जायची. मद्यपान आणि नाचसुद्धा व्हायचा. याव्यतिरिक्त याच उत्सवांतर्गत आणखी एक अतिमहत्वाचा संस्कार व्हायचा....

१५ -१६ वयवर्षाची रोमन मुले प्रौढ समजल्या जात असत आणि त्यांना या उत्सवात ‘रोमन नागरिक’ म्हणून मान्यता मिळत असे. . लहानपणी त्यांच्या आयांनी गळ्यात बांधलेले संरक्षक ताबीज या उत्सवावेळी काढून टाकल्या जायचे  आणि ती मुले  पहिल्यांदा आपल्या वाढलेल्या  दाढीवरील कोवळे केस काढून टाकत असत. ते आता आई-वडिलांच्या मर्जीनुसार चालणारे बालक नसून स्वतंत्र विचाराचे पुरुष बनत. त्यांना  आता  प्रोढ पुरुषांचा रोमन पोशाख परिधान करायला मान्यता मिळे. हा पोशाख रोमन लोकांसाठी स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे प्रतिक होता आणि हा पोशाख घालणारा रोमचा नागरिक तेंव्हाच्या व्यवस्थेनुसार मतदान करायला लायक समजल्या जात असे. त्याच्या पौरुषाचे(वीर्याचे) रक्षण करणारा सुपीकतेचा देव ‘लायबेर’ या सगळ्या विधीला साक्ष असायचा...खरतर तोच त्यांच्या माणूस म्हणून मिळणार्या स्वातंत्र्याचे प्रतिक बनला...लायबेरामुळे रोमन नागरिकाला समजात स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून ओळख मिळायची...

तर लिबरटाज नावाची आणखी एक देवता होती... रोमन साम्राज्यात जेंव्हा एखाद्या गुलाम व्यक्तीला स्वातंत्र्य दिल्या जात असे तेंव्हा त्याचे मुंडण करून त्याला एक टोपी घालायला देत किंवा त्याच्या गुलामीतून सुटकेचे प्रतिक म्हणून रॉड देत असत जो दाखवून तो आपले स्वातंत्र्य सिद्ध करू शकत असे. पुढे चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी या देवतेच्या प्रतिमा आपापल्या कल्पनेने रंगवल्या. त्यातील सर्वात प्रसिद्ध शिल्प आजही मोठ्या दिमाखात हातात मशाल घेवून, पायाशी गुलामीच्या ‘जंजीर’ तोडून अमेरिकेतील न्यू यॉर्क  या ठिकाणी, समुद्र किनारी उंच आहे.... हो तोच  ‘स्वातंत्र्य देवतेचा पुतळा.... 

आपल्याला लायबेरा किंवा लिबरटाज या देवतेने फक्त तो जगप्रसिद्ध पुतळाच दिला नसून इंग्रजीतील ‘लिबर्टी’ हा शब्दही त्याच्याच नावावरून आलाय....

शुक्रवार, १५ मे, २०२०

Lesbian …पहिली स्त्री जिच्या हृदयाला कळले प्रेम नवे...


.

इंग्रजी साहित्यात आम्हाला ‘लेस्बिअन ओड’ नावाचा एक काव्य प्रकार अभ्यासाला होता..तसा तो आजही शिकवल्या जातो.. त्याला ‘होरेशिअन ओड’ सुद्धा म्हटल्या जाते कारण कवितेचा हा प्रकार हॉरास नावाच्या ग्रीक कवीने निर्माण केला...
जेंव्हा आम्हाला लेस्बिअन ओड शिकवल्या गेले तेंव्हा ‘लेस्बिअन’ या शब्दाला आजच्यासारखा आणि आजच्या इतका तो लैंगिक संदर्भात  वापरात नव्हता..... आज मात्र जेंव्हा-केंव्हा ‘लेस्बिअन ओड’ शिक्षक म्हणून वर्गात शिकवायचे असेल तर ‘लेस्बिअन’ शब्द उच्चारायला पहिल्यांदा चाचरतो... दोनेक सेकंद विद्यार्थ्यांची छुपी प्रतिक्रिया बघतो... कुणी खट्याळ हसू आवरते घेत असतो तर कुणी कोपरखळी देत असते.. कुणी हळूच सोबत्याला डोळ्यांनी मिचकावत असते... नाही म्हटले तरी ग्रामीण आणि निमशहरी भागातील मध्यमवर्गीयांसाठी अजूनही ‘लेस्बिअन’ ‘गे’ हे शब्द सार्वजनिक जीवनात  निषिद्ध आहेतच... पण या शब्दाची खरी कहाणी सांगतली तर विद्यार्थ्यांच्या मनातील शब्दाशी जुळलेले गैरसमज काही अंशी दूर होतात आणि त्या शब्दाच्या वापराला ते सरावतात....
मध्यंतरी मीना प्रभूंचे ‘ग्रीकांजली’ प्रवासवर्णन वाचण्यात आले. त्यात त्यांनी ‘लेस्बिअन’ या शब्दाबद्दल छान पण थोडीच माहिती दिली... मग याच शब्दाचा मागोवा घेऊयात आणि ‘लेस्बिअन’ शब्दाची गोष्ट वाचूयात.....
ग्रीक... अनेक नगरराज्यांचा समूह.... अर्गोस,इथका,स्पारटा, थेब्स, अथेन्स वगैरे ... आणि त्यातील एक ‘लेस्बोस’......
लेस्बोस... मूळ ग्रीक भूमीपासून दूर ईशान्येकडे एजीयन समुद्रातील एक बेट... ग्रीकांपेक्षा ट्रोयशी जास्त सलगी ठेवणारे बेट.... खरेतर आशिया मायनर मध्येच मोडायला काही हरकत नाही असे....
ग्रीक दंतकथेनुसार, मेकेरस नावाच्या राजाने इथे सर्वप्रथम आपले राज्य स्थापन केले.. पुढे त्याच्या ‘मेथेमना’ नावाच्या  मुलीने  ‘लेस्बोस’ नावाच्या देवाशी लग्न केले... आणि अशाप्रकारे ‘लेस्बोस’ त्या राज्याचा उत्तराधीकारी ठरला... आणि  स्वताचे नाव आपल्या राज्याला दिले.
लेस्बोस राज्यातील प्रत्येक गोष्ट हि ‘लेस्बियन’ म्हणून ओळखल्या जात जसे लेस्बिअन ओड, लेस्बियन वाईन, लेस्बियन भाषा, लेस्बिअन लोक... इत्यादी.. हे एक सहज वापरले जाणारे विशेषनामापासून बनवलेले नामसाधित विशेषण आहे इतकेच....पण आज त्याला लैंगिक अभिमुखतेने वापरल्या  जात असल्याला एक कारण आहे.... ते कारण म्हणजे सफो’....
सफो.... ई.स.पु. सातव्या शतकातील लेस्बोस राज्याची रहिवाशी...एक उत्कृष्ट कवी.. होमरशी बरोबरी करणारी... होमरला तेंव्हाचे लोक ‘द पोएट’ म्हणायचे तर सफोला ‘द पोएटेस’.. तिच्या कवितेची दखल साक्षात सॉक्रेटिसला घ्यावी लागली.. ती एक उत्कृष्ट परफोर्मर होती तसेच उत्तम शिक्षिका होती.. तिच्याकडे अनेक मुली काव्याचे आणि संगीताचे शिक्षण घ्यायला यायच्या... नेहमी तरून मुलींच्या गराड्यात राहायची, त्यांना चालीवर कविता गायला शिकवायची...
तिने लिहिलेल्या अनेक कविता काळाच्या ओघात गहाळ झाल्यात. सफो आता फक्त ६००-७०० ओळींमधून आपल्यापर्यंत पोहचू शकली..
तिच्या सापडलेल्या कवितासुद्धा अपूर्णच आहेत. त्यातील दोन कविता खूप महत्वाच्या समजल्या जातात. ‘ओड ऑन अफ्रोडाइट’ आणि ‘सफो-३१’ नावाचा एक तुकडा....
या दोनच कवितेच्या तुकड्यावरून आणि इतर उपलब्ध ऐतिहासिक पुरवायच्या तर्कावरून सफोबद्दल काही गोष्टी बोलल्या जातात.. त्या म्हणजे ती समलिंगी होती, तिला स्त्री शरीराचे आकर्षण होते, ती ज्या मुलींना शिकवायची त्यांच्याशी तिचे शारीरिक जवळीकता होती इत्यादी...  सफो-३१ या तुकड्याच्या इंग्रजी अनुवादावरून मराठीत मुक्त अनुवाद करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तिच्यासंदर्भातील समज-गैरसमजावर भाष्य करणे सोपे जाईल:


“ तो पुरुष.. जो बसलाय तुझ्या समोर  
आणि अगदी जवळून ऐकतोय तुझे मंजुळ बोलणे सोबतच  हसतोय आनंदाने  
 .. तो ईश्वरच आहे असे वाटेत मला..
त्याचे असे आनंदी असणे मला सहन होत नाही...
माझ्या वक्षस्थळाच्या आतील मनाची तडफड होतीय नुसती...

निमिषभर जेंव्हा बघते तुला मी,
तेंव्हा  
निशब्द होवून जाते मी, जणू माझी जिव्हा दुभंगली आहे आणि
माझ्या शरीरभर विखारी आग वाहतेय.. नखशिखांत....
तेंव्हा
मी काहीही बघू शकत नाही माझ्या डोळ्यांनी ..
कानामध्ये  फक्त कर्कशता किरकिरते...

शरीरावर थंड स्वेद आणि थरथर अनुभवते मी,
तृणपात्यापेक्षा निस्तेज होत जाते... जणू आत्मा निघून जाईल माझ्यातून

मात्र.. मला हे सगळे सहन करावेच लागेल..भोगावेच लागेल... “

या आणि अशा आशयाच्या इतर ओळीमधून सफो हि समलैंगिक होती असा समज दृढ होत गेला. या कवितेमधून तिची एका स्त्रीसाठीची ओढ, तिच्या शारीरिक सहवासाची कामना, तिच्या समीप असलेल्या इतर पुरुषांबाबत मत्सर आणि इतर गोष्टी ठळक नजरेत भरणाऱ्या आहेत...

एका स्त्रीला दुसर्या स्त्रीबद्दल वाटणाऱ्या भावनेची अभिव्यक्ती करणारी, मुळात समलैंगिक असलेली जगतमान्य पहिली ज्ञात स्त्री  म्हणजे ‘सफो’... अशी स्त्री जिच्या हृदयाला कळले प्रेम नवे !!! म्हणून स्त्री समलैंगिकतेसाठी ‘सफीक’ हा एक प्रतिशब्द तर आहेच पण हि सफो जिथे राहते ते म्हणजे ‘लेस्बोस’ म्हणून स्त्री-समलैंगिकतेसाठी ‘लेस्बिअन लव्ह’ हा शब्द रूढ झाला...




मंगळवार, ५ मे, २०२०

Harmony…. एका समर्पित पत्नीची गोष्ट...


कॅडमस ने हार्मोनियाशी लग्न केले, पण त्यापूर्वी...
कॅडमस म्हणजे ज्याने थेब्स राज्याची स्थापना केली....परंतु थेब्स राज्य निर्माण करत असताना तो अरिसदेवाच्या मंदिरातील एका सर्पाला दगडाने ठेचून ठार मारतो व अथेना देवीच्या सांगण्यावरून त्या सर्पाचे दात आपल्या भूमीत पेरतो ज्यातून त्याची जमीन सुपीक होते व त्या पेरलेल्या दातातुंच योद्धे जन्माला येतात जे पुढे थेब्सचे रक्षणकर्ते होतात. अशाप्रकारे कॅडमस थेब्सचा पहिला संस्थापक सम्राट बनतो व अफ्रोडाइटच्या मुलीशी म्हणजे हार्मोनियाशि लग्न करतो... अस म्हणतात कि या दोघांच्या लग्नसमारंभात सर्व ग्रीक देवी-देवता उपस्थित होत्या.... त्यातील हेपेस्थस (अफ्रोडाइटचा नवरा परंतु तिच्या अरीसशी विवाहबाह्य संबधातून हार्मोनिया जन्माला आली ) या देवांच्या लोहाराला आफ्रोडाईटचा प्रचंड राग आलेला असतो त्याचा बदला घ्यावा म्हणून तिच्या मुलीला म्हणजे हार्मोनियाला लग्नाची भेट म्हणून एक शापित कंठाहार (नेकलेस) देतो... या कंठाहाराचे वैशिष्ट्य म्हणजे, हा हार बाळगणाऱ्याच्या नशिबात नेहमी वाईट गोष्टी घडतात... आणि त्याचा विनाश अटळ असतो....अशा कित्येक लोकांना त्या हाराने आधी उध्वस्त केलेलं असते. कुणाचा मुलगा वेडा केलेला असतो किंवा त्यामुळे कुणाचे वडील मरण पावलेले असतात, कुणाची मुलगी मरण पावते तर कुणाचे घर जळते...परंतु या गोष्टीपासून हार्मोनिया अनभिज्ञ असते...
त्या शापित कांठाहाराचा परिणाम असेल म्हणून कॅडमस व हार्मोनियाला थेब्स गमवावं लागते व ते देशोधडीला लागतात...
नंतर ते आपल्या देशापासून दूर इलेरीया या देशात येतात तिथे त्यांचा रानटी जमातीशी सामना होतोपण नंतर त्यांच्याच सहयोगातून ते इलेरीया येथे पुन्हा नवीन साम्राज्य स्थापन करतात. थेब्स सोडल्यापासून इलेरीया स्थापन करेपर्यंत त्यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात...खूप दु:ख भोगावे लागते.. एक शापित जीवन जगावं लागते...
शेवटी कॅडमसला या दुखाचे कारण समजते... ते म्हणजे, अरीस या देवाने दिलेला शाप.... थेब्स राज्य स्थापन करतेवेळी जो सर्प कॅडमसने ठार केला असतो, तो अरीसला खूप प्रिय होता... त्या कृत्याचा बदला म्हणून अरीस कॅडमसला शापित करतो आणि दुख भोगायला लावतो...
.
आपल्या दुखाचे कारण जेंव्हा कॅडमसला कळते तर तो आश्चर्यचकित होतो... तो ईश्वराला म्हणतो कि एक देव जर सर्पाला इतके प्रेम करत असेल तर मलाही मानवी रूप नकोय.. मलासुद्धा सर्प बनायचे आहे... त्याची हि विनंती ईश्वर मान्य करतो व तिथे सगळ्या दरबारसमक्षच हार्मोनियाच्या डोळ्यांदेखत त्याचे परिवर्तन सर्पात व्हायला लागते...
ओविड या कवीने आपल्या मेटामॉरफोसीसया ग्रंथात या प्रसंगाचे सुंदर काव्यात्मक वर्णन केलेले आहे, त्याचा स्वैर अनुवाद देतोय,
खुप वर्ष अपेष्टा आणि हाल सहन करून थकलेला कॅडम, व त्याची संगिनी हार्मोनिया जी कधीही त्याच्यापासून विलग झाली नाही... दोघेही आता इलेरीयाट आपल्या गतवैभव व सुखाच्या स्मरणात रममाण आहेत..एकमेकांशी बोलतायेत... सुख-दुखाचे दिवस आठवतायेत...तो तिला म्हणतो...माझ्या भाल्याने (काही ठिकाणी दगडाने/दगडी भाल्याने ) मी त्या देवांना प्रिय असलेल्या सर्पाला मारले नसते तर त्यांनी आपल्यावर सूड उगवला नसता... देवांना सर्प इतका प्रिय असेल तर मलाही सर्प झालेलं आवडेल...आणि...
त्याने ते शब्द उच्चारताच तो जमिनीवर सरपटायला लागला... त्याच्या शरीरावर काळे-पांढरे चट्टे पडायला लागले... त्याचे दोन्ही पाय एकमेकात गुरफटू लागले आणि ते एकरूप होत-होत शेपटीसारखे दिसायला लागले... मात्र त्याचे हात अजूनही शाबूत होते आणि गालसुद्धा.. त्या मानवी गालांवरून अश्रू ओघळायला लागले...आणि तो आपल्या बायकोला म्हणाला...
ये प्रिये, ये एकदाचा स्पर्श होवू दे तुझा... कारण अजून स्पर्श करण्यासाठी हात तितके शिल्लक आहेत.. मी अजून मी आहे... मी पूर्ण सर्प होण्याआधी.. हे हात नाहीसे व्हायच्या आधी एकदा स्पर्शून घेऊयात..'


त्याला अजून काहीतरी बोलायचे होते पण त्याची जीभ दुभंगली जाते .. बोलायचा प्रयत्न करायचा तर तोंडावाटे सित्कार नुसता...असहाय होवून तो तिच्या वक्षस्थळांवर दंश करतो...
हार्मोनिया त्याला म्हणते कि,
कॅडमस हे तुझे भयानक रूप नकोय...अरेरे... तुझे पाय तर नाहीशे झालेच पण आता, हातसुद्धा नाहीयेत..तुझा रंग, तुझे रूप...सगळ बदललय ... तू असा असतांना मी मानव म्हणून कशी जगू... मलासुद्धा देवाने सर्प बनवले तर बरे होईल...
आणि....सर्प झालेला कॅडमस आपल्या पत्नीच्या गालावरून, मानेवरून, छातीवरून फिरायला लागला..तिला मिठी मारायला लागला... ते दृश्य बघणारे दरबारी घाबरत होते पण ती मात्र त्याला कुरवाळत होती...कुरवाळत- कुरवाळत ती सुद्धा त्याच्याशी मिसळत होती आणि पाहता-पाहता तिथे आता दोन सर्प एकमेकात वेटोळे घालून उजागर होत होते... ते दोन सर्प...शांत होते.. त्यांनी कुणालाही त्रास दिला नाही कि कुणाला दंश केला नाही.....
अशी हि हार्मोनिया... अफ्रोडाइट या सौंदर्याच्या आणि प्रेमाच्या देवतेची मुलगी.. आपल्या नवऱ्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाला समर्पित करणारी हार्मोनिया... त्याच्याशी एकरूप झालेली... त्याच्याशी अतूट बंधनात बांधल्या गेलेली हार्मोनिया... नात्याची एक हार्मनी....
नंतर -नंतर तिची लग्न बंधनात बांधल्या गेलेल्या स्त्री-पुरुषातील आत्मिक, भावनिक व शारीरिक प्रेमाची देवी म्हणून पूजा केल्या जायला लागली... तिने त्या नात्याला हार्मनीदिली... लाग्नावेळी तिचे नाव घेवून एकमेकाला सोबत द्यायची शपथ घेण्याची पद्धत सुरु झाली...म्हणून लग्न दोन जीवांना बांधून ठेवते..ती दोन आत्म्याची जोडणी असते... त्यालाच आपण हार्मनी म्हणतो.. पुढे रोमन लोक हार्मोनियाला कॉन्कॉर्डीया’ (Concordia) म्हणून संबोधू लागले.. आणि गंमत म्हणजे त्याही शब्दाचा अर्थ तोच होतो..जोडणे,बांधणे, एकरूप करणे

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...