शुक्रवार, ६ मार्च, २०२०

आठ तुकडे ... आणि कॉफी




पहिला तुकडा:
मी आणि व्हिनस प्रेम करून थकलो होतो ... ती बेडवर घामेजली होऊन आराम करत होती आणि दीर्घ श्वास घेऊन शरीर शांत करत होती... मी उठून किचनमधील फ्रिजकडे गेलो. पाणी भरलेली बॉटल आणली आणि तिला दिली. तीने नजरेनेच धन्यवाद दिले... तिला आता खायला काहीतरी लागेल, म्हणून स्वयंपाकघरात शिरून तिच्यासाठी काही बनवायला पाहिजे याचा विचार करत होतो. एकवार पाणी पिऊन शांत झोपलेल्या व्हिनसकडे बघितले व स्वयंपाक घरात जाईल तोच दारावरची बेल कुणीतरी वाजवली... 

              मला माहीत होत दारावर कोण असेल.. ! म्हणजे काय, रात्रीचे आठ वाजलेत .. डॉक्टर बेन्ट शिवाय कोण असेल... ! 

'डॉक्टर बेन्ट... खूप हुशार माणूस... आज त्याच्यामुळेच मी जिवंत आहे... तो नसता तर माझं अस्तित्वच नसते.. तो दारावर ताटकळत बसलाय.. खरतर त्याने आता यावेळी घरी यायला नको होत, असं मला मनापासून वाटायचं.. पण रोज तो यायचाच.. त्याच्या येण्याला मी थांबवू शकत नव्हतो.. शेवटी हे त्याचेच तर घर होते... मी त्याच्याच घरात मागल्या तीन महिन्यांपासून राहतोय... त्याला कस म्हणू कि तू तुझ्याच घरी नको यायला..'

    तो आत आला... मी त्याला नेहमीसारखे नाटकी स्मित दिले .. त्याने मला नजरेने टाळले.. असो.. हे इतक्यात नेहमीच होतंय.. तो आता माझ्याशी पूर्वीसारखा बोलत नव्हता.. मला पूर्वीसारखे काम सांगत नव्हता.. त्याला मी आता नको असेल ... त्याची कारणेही मला ठाऊक होती म्हणा...

   त्याने बूट काढले आणि मोजे उतरवताना विचारले "व्हिनस कुठे आहे?"..  मी नेहमीप्रमाणे बेडरूमकडे बोट दाखवले... तो गळ्यातील टाय सैल करत बेडरूमकडे गेला... दारातूनच उघडीनिवळून शांत झालेल्या घामाच्या ओलसरपणामुळे चमकणारी व्हीनस बघितली.. ती दीर्घ श्वास घेत झोपी गेली होती.. तसाच तो मागे फिरला... माझ्याकडे खूप रागाने बघितले.. आणि वॉशरूमकडे निघून गेला...

   त्याला लागते तशी कडवट कॉफी मला बनवायची होती..  हे नेहमीचेच असल्याने मी कॉफी बनवायला घेतली.. व्हीनस अजूनही झोपलीच होती मात्र ती उठल्यावर तिला काहीतरी खायला लागेलच.. तेव्हड्यात मागून आवाज आला, " तू ... तू....आणि तूच जबाबदार आहेस या सगळ्याला...." बेन्ट माझ्याकडे मारक्या म्हशीसारखा बघत होता.. मला त्याचे काहीच वाटले नाही.. आणि त्याच्या अशा रागवण्याने मला काहीही फरक पडणार नव्हता.. कारण माझ्यासोबत.. व्हीनस होती... हो व्हीनस .... तो मात्र  असा विचित्र अडकला होता कि त्याला काहीही करता येऊ शकले नसते...

"डॉक्टर बेन्टजरा हळू बोला व्हीनस उठेल आणि मग तुमचीच पंचाईत होईल..."

"तू काय जादू केलीयेस या बाईवर नेमकी..?" बेन्ट म्हणाला.

"जादू!.. मी कसली जादू करू शकतो .. खरे जादूगार तर तुम्ही... बघा माझ्याकडे... मी प्रत्यक्ष उदाहरण आहे तुमच्या जादूगिरीचे..."

"नीच..हलकट माणसा.. का भस्मासुर होऊन बसलाय माझ्या आयुष्यावर..."

"डॉक्टरतो विचार तुम्ही आधी करायला हवा होता..." मी तितक्याच शांतपणे..

"मी आताही खूप काही करू शकतो... संपवू शकतो तुला... कळलं?"

"संपवा.. नक्कीच संपवा मला.. पण मग व्हीनसचे काय... ती नाही संपणार...?"

हीच हतबलता बघतोय मी कित्येक दिवसापासून बेन्टच्या चेहर्यावर....बिचारा बेन्ट!....


दुसरा तुकडा:

मी चिडचिडत दिवाणखाण्यातील सोफयावर येऊन बसलो.. पाठोपाठ त्याने मला कॉफी आणून दिली.. नेहमीपेक्षा जास्तच कडवट लागणाऱ्या कॉफीला अर्धवट पिऊन डोळे बंद करून मान मागे टाकली... डोळे बंद होईपर्यंत सहा महिन्यापूर्वीच ते सगळं आठवायला झालं...
  ती...व्हीनसच होती.. देखणी...तरुण... मी तिच्याकडे गेलो... आणि तिला सरळ विचारून टाकलं... माझ्याशी लग्न करशील का?...  ती चपापली... बरोबरच आहे... चाळीस वर्षांचा तरुण-म्हातारा एका पंचविशीतील थरारत्या रक्ताच्या तरुणीला मागणी घातल्यावर कोणतीही तरुणी बावचाळणारच... तशी ती गोंधळली..
".. खरं सांगू बेन्टहा विचार मलासुद्धा आला यापूर्वी.. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाशी नातं ठेवावं.. किती एक्सआयटींग वाटतंय.. पण तू त्याला हो म्हणशील असं वाटलं नव्हतं .. आणि आता तूच मागणी घालतोयेस म्हटल्यावर थोडी गोंधळीच मी..."

"का...मी नाही आवडणार तुला.. वय सोडलं तर बाकी मी तुझ्यासाठी सुटेबल आहे...  वैज्ञानिक म्हणून नावाजलेला आहेहुशार आहे.. बर्यापैकी पैसा कमावला आहेकमावत आहे. तू आवडतेसप्रेम तर करतोच आणि तुझ्या मर्जीसारखी मनमौजी वागण्याचं स्वातंत्र्यसुद्धा तुला देऊ शकतो..जनरेशन गॅप वगैरे बोलशील तर तो फालतूपणा वाटतो.. मलासुद्धा तुमच्या पिढीतल्यासारख्या नवीन गोष्टी करायला आवडतात..आणि आज-काल कोणी बघत नाही ग वय-बीय... बघ विचार कर... "

ती थोडी सावरत बोलली, " आपण एक करू... लग्नाआधी लिव्ह -इन मध्ये राहायचं का?.. म्हणजे कळेल आपल्याला, पुढे नात्याचं काय होऊ शकत... बघू तर तू किती जिकंतोस मला..."

"विचार तसा वाईट नाहीय... आणि तुला जिंकायचं म्हणजे काय... तूला खुश ठेण्यासाठीतुझया इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काहीही करेल...बघ तू..."

... आणि आम्ही लिव्ह-इन मध्ये सोबत राहायला लागलो... पहिले काही दिवस स्वप्नातल्यासारखे होते.. फिरायला जायचो..पब... पार्टी आणि प्रवास... तिच्यासोबत मलासुद्धा पंचविशीतील झाल्यासारखे वाटायला लागले... पण.... बेडरूममध्ये......थोडं तिच्याशी जुळायला त्रासच होत होता.... तीच चैतन्य झेपावत नव्हतं कधीकधी.... तिच्यासमोर मी सुस्तावला वाटायचो... ती कशी सिझलिंग आणि चुटपुट.... पण खूप मस्त वाटायची मला... तिचा सहवास मला शोषून घ्यायचा.. तिचा स्पर्श ज्वाला पेटवायचा.. हो ती मला हवीच होती.. नेहमीसाठी... प्रेमापलीकडे जाऊन तिची सवय होत होती मला...तिच्या सहवासाचे  व्यसन लागलंय  मला... ती आहे तर प्राण आहेत..  आवड मग प्रेम आणि नंतर व्यसन व शेवटी पागलपण अशी चढती रेष आमच्या नात्यात अनुभवत होतो मी... फक्त अडचण होती ती हीच कि हिला पाहिजे तस शरीरसुख मी देऊ शकतो का...ती कधी बोलून दाखवत नव्हती पण बेडवर थोडी अतृप्तच वाटत होती... मीच ठरवलं नंतर कि थोडं नवीन काहीतरी करत राहायचं... शरीरसुखाला आणखी एक्स्प्लोर करायचं.. तिच्यासाठी....

  मित्रांच्या चावट गोष्टींमधून मला कळत गेलं कि तरुणांना नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात.. त्यांच्या काही सेक्स फँटसी असतात... व्हिनसची असली काही फँटसी असेल कातिला विचारायला हवं.. थोडं आणखी ओपन व्हायला हवं...

त्यारात्री.. तिला विचारलंच...
"व्हिनसतुला नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात... "
"हं!"
"मग मला सांग तुझी एखादी फँटसी असेल न... म्हणजे सेक्स फँटसी..पूर्ण न झालेली"
"हो...आहे...खूप आहेत....त्यातल्या तुझ्याशी काही पूर्ण केल्यात... "
"..पण अजूनही एखादी जी पूर्ण झाली नाही अशी..?"
"......थ्रीसम... पण ती कशी पूर्ण होणार बेन्ट.. तुझं माझ्याबद्दलच पागलपण बघून दुसऱ्या पुरुषाने मला हात लावलेलं तुला आवडेल असं वाटत नाही... त्यामुळे चल झोप आता.. " आणि ती विन्मुख होऊन झोपी गेली...

तिसरा तुकडा:

मी झोपेतून उठली आणि बघितलं तर बेन्ट बिछान्यात नव्हता... मागल्या काही दिवसापासून बेन्ट पहाटेलाच उठून कामावर जायचा.. त्याला विचारलं तर सांगे प्रयोगशाळेत  एक प्रोजेक्टवर काम करतोय. तसा तो माझ्याशी खोटं बोलत नाही.. पण त्याला विचारलं कि कसला प्रोजेक्ट आहे तर म्हणायचा.. "तुला सरप्राईझ आहे..बस इतकेच लक्षात ठेव.." ..  मला कळत नव्हतं कि यांच्या प्रोजेक्टचा आणि माझा काय संबंध.. हा एक जीवशास्त्रज्ञ.. याचे प्रोजेक्ट म्हणजे काय तर ते पेशी आणि त्यातील जनुकंत्या स्टेमसेल आणि कृत्रिम गर्भतो क्लोन आणि डी. एन.ए. आणि काय नि काय.... यातून कुठलं सरप्राईझ देणार हा मला...

पण त्याने दिलेलं सरप्राईझ अनाकलनीय होत.. अनपेक्षित होत... अचंबित करणार होत...

बेन्ट एक दिवस रात्री उशिरा परत आला...त्याला इतक्यात यायला उशीर व्हायचाच.. त्याच्याशी लिव्ह-इन मध्ये राहायला आल्यापासून त्याच्यात होणारे बदल मला कळत होते. सुरुवातीला छान राहायचा... हसत-खेळत... पण नंतर थोडा अबोल होत गेला... तरी त्याचे माझ्यावरील  प्रेम कमी झाले नाही... उलट तो जास्तच माझ्यात गुंतत होता. माझ्याशिवाय तो राहू शकेल असं वाटत नव्हतं.. खरं सांगूमला त्याच्यासोबत लिव्ह-इन मध्ये राहायला आधी आवडलं.. आमचं 'चिनी-कमवाली लव्ह स्टोरी होईल अशा रोमँटिक जगात वावरत होती.. खरतर आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाबद्दल मला प्रचंड आकर्षण वाटायचं.. अशा माणसाची समजत्याची शांत वृत्ती आणि आपल्या तारुण्याने त्याला मोहित करूंन त्याच्यावर अधिकार गाजवण्यामागील एकसाईटमेन्ट ...माझी छुपी फँटसी होती हि...बेन्ट त्यात फिट्ट बसत होता... सुरुवातीला सगळं छान वाटलं... पण त्याच्या आणि माझ्या वयातील फरकामुळे आमच्यातील नातं हवं तस विणल्या जात नव्हते.. तो थोडा संथ आणि कमी उत्साही..  मला नवीन गोष्टी करून बघायची हौस पण त्याचा उत्साह कमी पडायचा..  खूपदा मी अतृप्तच राहायची.. वाटायचं बरे झाले यांच्याशी सरळ लग्न केले नाही ते... लिव्ह-इन मधून सुटू तरी शकते...पण समजा लग्न केलं असते तर...??

माझी तगमग आणि अतृप्ती बेन्टच्या लक्षात येत होती... किंवा तशी ती यावी आणि त्याने मला या नात्यातून मोकळं करावं असं मनोमन वाटत होत... पण तो तर अगदीच प्रेमात वेडा होत होता. त्याचे मन मारून मला निघून जावेसे वाटतही नव्हते. अशातच त्यानेही माझ्यासाठी नव्या गोष्टी करायला सुरुवात केली.. तो थोडा सेक्सबद्दल ओपन झाला.. मोकळा बोलायला लागला... मला विचारायला लागला... माझ्या फँटसी समजून घ्यायला लागला... मी त्याला अनेक फँटसि सांगितल्या.. तो त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा... त्यातील काही फँटसि पूर्ण करणे त्याला शक्य नव्हत्या... म्हणजे कि मला नेहमी वाटायचे कि मला एकाचवेळी दोन पुरुषांनी उपभोगाव.. पण बेन्ट त्यासाठी तयार होईल असं वाटलं नव्हतं....तस त्याबद्दल एकदा आमचे बोलणेही झाले. पण बस बोलणेच... त्यानंतर त्याने कधी तो विषय काढलासुद्धा नाही....

चौथा तुकडा:

'तू इथेच दारावर थांब... मी आत जातो... मी आवाज दिल्यावरच आत ये..." मी त्याला सांगितले.
"हो,बेन्ट" आपली टाय व्यवस्थित करत तो म्हणाला.
रात्र थोडी जास्तच झाली असल्याने व्हिनस झोपली असेल... मी माझ्या जवळच्या किल्लीने दार उघडून घरात शिरलो. व्हीनस शांत डोळे मिटून विचार करत होती.. तिच्याजवळ जात तिला म्हटले,
"कशी आहेसकसला विचार करतेस?"
ती डोळे उघडत म्हणाली "तुझाच"
"अरे वाकाय विचार तो..?
"हेच कि तू माझ्याशिवाय राहू शकशील का?"
"का?, तू मला सोडून जाणारेस का?"
"समजा... गेलीमग?"
"असं नको न बोलूसव्हीनस...... मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय"
"मग...आता?"
"तुझ्यावर मला माझा हक्क सांगावासा वाटतो... म्हणजे बघतुझ्यासारखी स्त्री  माझी आहे हे मिरवण्यातच किती वेगळी फिलिंग आहे.. आणि मी माझी स्त्री गमावणार नाही... कुठल्या नराला वाटेल कि त्याची मादी दुसऱ्या नराची व्हावी..?"
ती फक्त गालातल्या गालात हसत होती..." काहसायला काय झालं?"
"तेच... मीही तोच विचार करत होती.. कि तू मला विचारलंस माझी फॅन्टसी कायमी सांगितलं होत कि मला थ्रीसम करायला आवडेल.. पण तुला ते चालणार नाही... तुला दुसऱ्या पुरुषाने माझ्याशी प्रेम केलेलं .."
तिला मध्येच थांबवत मी म्हणालो, "थांब... तुला दुसर्या पुरुषाने स्पर्श न करतातुझी हि फॅन्टसी मी पूर्ण केली तर...?"
"ते कस शक्य आहे बेन्टतिसरा पुरुष तर लागणारच न त्यासाठी..."
"तेच तर सरप्राईझ आहे ..तुझ्यासाठी"
माझ्या या वाक्यावर तिच्या चेहरा विचित्र बदलला होता. नक्कीचमी काय बोलतोय हे तिला कळणार नव्हते.. आणि त्यातच माझ्या सरप्राईझची गम्मत होती. मी जे केलं त्यातून तिला कळेल कि तिच्यासाठी मी काहीही करू शकतोती फक्त माझी आणि माझीच बनून राहावी यासाठी मी किती धाडस केलं याची जाणीव तिला होईल...

तिला तस म्हणून मी दारावरील त्याला आवाज दिला.. आणि तो आत आला...

पाचवा तुकडा:

बेन्ट मला दाराशी उभा करून आत निघून गेला. त्याने आवाज देईपर्यंत मी आत शिरायचे नाही अशी ताकीद दिली त्याने. त्याचा हुकूम मला ऐकावाच लागणार होता. तो मालक होता माझा.. मी निमूट्पणे त्याच्या बोलावण्याची वाट बघत होतो. मला खरतर त्याचा गुलाम बनून राहावं असं वाटत नव्हते.. पण पर्याय नव्हता. माझ्यात विचार त्याचे होते पण समज स्वतंत्र होती.. निर्माण त्याने केले तरी मी स्वतंत्र राहू शकलो असतो..त्याच्या मदती शिवाय...मीसुद्धा एक हाड मासाचा आणि जिवंत माणूसच होतो त्याच्यासारखा...

... आणि त्याने मला आवाज दिला. मी दार उघडून आत शिरलो. समोर बेन्ट आणि त्याची बायको व्हीनस.. मला बघून तिला घेरीच आली... मला थोडं हसायलासुद्धा आलं तिची अवस्था बघून... ती भांबावल्या नजरेने  कधी मला बघत होती तर कधी बेन्टला.. तिच्या नजरेत आश्चर्य होते आणि प्रश्नसुद्धा... तिने बेन्टला विचारले,
"बेन्ट!!! हे काय आहे नेमके?"
"सरप्राईझ!!"
"...?"
"व्हीनसबघ... तुझ्यासाठी आणखी एक पुरुष आणलाय... तुझी फॅन्टसी पूर्ण करायला"
"पण ..पण हा अगदी तुझ्यासारखाच दिसतोय...?"
"तेच तर... तुला तुझी इच्छा पूर्ण करायची होती...त्यासाठी दुसरा पुरुष हवा होता.. परक्या पुरुषाने तुला स्पर्श करावा हे मला चाललं नसत..कारण तू फक्त माझी आहेस... मग कायमी मलाच आणलं.. हा म्हणजे  मीच...माझंच प्रतिबिंब... तुझाच बेन्ट...हा आहे माझा क्लोन.. दुसरा बेन्ट... तुझी फँटसि पूर्ण करायला मी तयार केलाय... चोरूनसगळ्यांच्या चोरून माझ्या प्रयोगशाळेत.. रोज पहाटे लवकर उठून याच कामगिरीवर जायचो... आता मी आणि हा असे दोन पुरुष तुला एकाचवेळी उपभोगता येतील.. तुझी फँटसि पूर्ण होईल... आता तर पटलं तुला, कि  तुझ्याप्रेमाखातर मी काहीही करू शकतो.. तुला मिळवण्यासाठी.. जिंकण्यासाठी ... "

बेन्ट अर्धा तास तिच्याशी असाच बडबडत होता.. क्लोन कसा तयार केलातिच्यावर त्याचे किती प्रेम आहेतिची इच्छा,फँटसी आणि असेच काहीबाही... त्याच्या त्या बड्बडीचा मला खरेतर कंटाळा आला होता.. पण काय करू.. त्याच ऐकावेच लागेल मला.. तो  माझा मालक... हो मालक... नाहीपण हे असं किती दिवस ऐकू मी त्याच... यावर काहीतरी करायला हवं... पण काय?

सहावा तुकडा:

बेन्टने बनवलेला क्लोन... आणि बेन्ट... या दोघांमध्ये खरतर काहीच फरक नव्हता... पण मला मात्र जाणवायचा.. बेन्टच्या स्पर्शात प्रेम होते... तर त्याच्या स्पर्शात शरीरसुख.. बेन्ट गोंजारायचा तर तो कुचकारायचा... मला दोन्ही हवे होते... तो अनुभव वेगळा होता... प्रचंड तृप्तीच्या किनाऱ्यावर पोचवणारा... रोज रात्री त्या लाटांमध्ये मी चिंब होऊन किनाऱ्याला पोचायची... थकायची पण तो थकवा खडीसाखर विरघळण्याइतका गोड वाटायचा..  कधीकधी तर बेन्टपेक्षा त्याचा सहवास जास्त प्रिय वाटायचा... बेन्ट तसाही दिवसभर बाहेर प्रयोगशाळेत किंवा इतर कामात गर्क असायचा... हा मात्र दिवसभर माझ्या सोबत. मला हवं-नको ते बघत .. वाटेल तेंव्हा प्रेम करायला तयार..  मी बेन्टपेक्षा याच्यातच गुंतत जात आहे असं वाटायचं... त्याच्या पूर्वीच्या राकट स्पर्शात आता थोडं प्रेम पाझरायला लागलाय हे सुद्धा जाणवायचं.. मी त्याच्याही प्रेमात पडत जात होते... पण हे योग्य नव्हतं.. तो बेन्ट नव्हता... पण बेन्टच तर होता...!काही सुचत नव्हते  मला.. जस सुरु आहे तस सुरु राहू द्यावं...नाही,नको एकदिवस याचा शेवट तर करावाच... पण .... बेन्टलासुद्धा आता कळत असेल कि त्याची व्हीनस दूर जातीय म्हणून.. त्याच्या क्लोनमध्येच अडकून बसलीय म्हणून...

सातवा तुकडा:

माझी व्हीनस.. आता तिला माझी कशी म्हणून.. माझ्यातल्याच एक अंशापासून तयार झालेल्या त्या राक्षसाने तिला आपलेसे केलंय.. बघातोय मी तिला ती कशी झोपली आहे  ते... घामाने भिजलेल्या अंगाने. याला घरी आणले ती चूकच झाली. बाहेर असतांना डोक्यात या दोघांच्या विचाराने वेड व्हायला होत.. सतत हा व्हीनसजवळ असेल, तिच्या बाहुपाशात.. तीसुद्धा तितकीच मुलायम होवून, आपले विस्मरण करून विरघळत असेल.. आताही बघतोय, मला पाहिजे तशी कडवट कॉफी बनवून हा तिच्यासाठी काहीतरी खायला बनवायला म्हणून किचनमध्ये गेलाय..  आणि याच्याच प्रेमात आहे ती.. ती झोपली आहे तोपर्यंत याला मारून टाकवे..हो आज रात्री मी त्याला संपवणारच. त्याला मारले म्हणजे मी कुठे काही जेलमध्ये थोडीच जाणार आहे.. त्याच अस्तित्व फक्त माझ्या घराच्या आत आहे.. तो आहे हे कुणाला माहीतही नाही.. मारून बंगल्यातल्या आवारात दफन केले तरी कुणाला कळणार नाहीच.. कारण तो मीच आहे.. तो मेला तरी मी जिवंत राहणारच... हो मी त्याला आज ठार मारेलच... तो तिकडे माझ्यासाठी कॉफी बनवून गेलाय...त्याच्या पाठीमागे उभा राहून सरळ अख्खे पिस्तुल रिकामे करतो.. संपवतो एकदाचे..  हो, माझ्या ड्रॉवरमधील पिस्तूल काढून एका फटक्यात याला संपवतो आज...

आठवा तुकडा:

मी दार लावून आत आलो. मातीने माझे कपडे मळले होते. तसाच वॉशरूममध्ये गेलो. जाताना सोफ्यावरील पिस्तूल उचलले, ते न चालवलेले होते.. तसेच  ड्रावरमध्ये ठेवून दिले...  मी केलेल्या कामाची कुणालाही खबरबात नाही.. प्रेताला दफन करताना त्याच्याशी जुळलेल्या सगळ्या वस्तूसुद्धा  दफन करून आलो.. त्याला दफन करतांना अस वाटत होत कि मी मलाच दफन करतोय.. किती सारखे दिसायचो आम्ही...असो... आता तो संपलाय, मीच भोगणार व्हीनसला नेहमीसाठी...ती अजूनही झोपलीच आहे, ती  उठल्यावर तिला  सगळं सांगावं का हा विचार मनात घोळत होतो.. तीन तासापासून झोपली आहे.. इथे काय महाभारत घडले याचा तिला पत्तासुद्धा नाहीय..  मग तिला मुद्दाम  आवाज दिला.... ती डोळे चोळत बाहेर आली...  तिने मला आळसावली मिठी दिली . तिचे सैलसर हात खांद्यावरून बाजूला करत,ती मिठी सोडवत बाजूला झालो... तिला सोफ्यावर  बसवून तिला  कॉफीसाठी विचारले..तिने हो म्हणताच कॉफी बनवायला किचनमध्ये  निघून गेलो... माझ्या व्हीनससाठी आता पुन्हा कॉफी बनवायची होती..फक्त तिच्यासाठी मी फक्कड गोड कॉफी बनवणार आहे... कडवट नको...नकोच कडवट...!!!!









सोमवार, २ सप्टेंबर, २०१९

Assassin ...आणि चरसाच्या नशेत असलेले हत्यारे...




मार्को पोलो.. एक व्यापारी आणि प्रवासी... सिल्क रोड पार करून कुब्लाई खानाच्या मंगोलियात अडकून पडतो.. मंगोलियन आणि चीनी लोकांच्या संस्कृतीवर प्रवासवर्णन लिहितो...आणि जगाला सदैव भीती वाटावी  असा शब्द निर्माण करतो... assassin..

                एकंदरीत मुस्लीम आणि त्यांचे अंतर्गत हेवे-दावे, पंथ,उप पंथ, श्रेयवाद आणि त्यातून उद्भवणारी भांडण-बखेडे अस बरच काही गुंतागुंतीच आहे... पण तसे असण्याची एक सकारात्मक बाजूसुद्धा आहे ती म्हणजे या गोष्टीमुळे मुस्लीम  धर्मात  प्रवाहीपणा असल्याचे जाणवते . मुस्लीम धर्माइतका प्रवाही धर्म दुसरा नाही, तरी तो इतका कट्टर आणि सनातनी का राहिलाय हे एक आश्चर्यच आहे..असो...

 ‘शिया’ मुस्लिमातील इस्माईल-इब्न-जफर या इमामाला अनुसरणारे ‘इस्माईली’ पंथीय म्हणून ओळखल्या जातात. या पंथाचा इतिहास मोठाच आहे... या पंथातील ‘निझारी’ या व्यक्तीची जेंव्हा ‘खलिफा’ म्हणून नियुक्ती केली जाते तेंव्हा त्याला अंतर्गत विरोध होतो. तो शत्रूपासुन वाचण्यासाठी आणि आपल्या इस्माईली विचारांचा प्रचार करण्यासाठी इजिप्तमध्ये जातो. .. तिथे त्याला लोकांचा पाठींबा मिळतो आणि ‘निझारी’ इस्माईली म्हणून नवीन पंथ तयार होतो. या पंथाच्या मुख्य इमामाला ‘आगा खान’ म्हणून ओळखल्या जाते. आज ‘चौथा आगा खान’ या पंथाचा इमाम असून त्यांचे धार्मिक केंद्र पोर्तुगालमध्ये आहे...  

 निझारी पंथ खूप लढवय्या समजल्या जात असे. त्या पंथातील लोक आपल्या इमामाला अल्लाहचा ‘नूर’ (दैवी प्रकाश) मिळालेला व्यक्ती समजत असत. या इमामासाठी लढायला तयार असणाऱ्यांना ‘फिदाई’ म्हटल्या जात असे. हे फिदाई प्रसंगी स्वतालाही मारायला मागे पुढे बघत नसत. आपल्या पंथाच्या उत्थानासाठी आणि संरक्षणासाठी ते तत्पर असत. त्यांच्याकडे पुरेसे सैन्य नव्हते त्यामुळे मोजक्याच फिदाईच्या भरवशावर सर्व निभावून न्यावे लागायचे. त्यासाठी मोजक्याच फिदाईनां  युद्धात, गुप्तहेरी करण्यात आणि नियोजनबद्ध कट रचून आपल्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी प्रशिक्षित केल्या जात असे. ते उच्च पदस्थ शत्रूलाच सहसा संपवत असत.  रशीद अद-दिन सिन्न हा त्यांचा म्होरक्या आणि प्रशिक्षक होता.युरोप, मध्य आणि मध्य-पूर्व आशिया पासून पार तिकडे मंगोलिया-चीन पर्यंत या ‘फिदाई’ मारेकऱ्यांचा दरारा होता. तशा अनेक कथा, दंतकथा आणि साहित्य उपलब्ध आहे.

मार्को पोलोने ‘फिदाई मारेकऱ्यांना’ पश्चिमी जगात कुप्रसिद्ध केले. मार्को पोलोनुसार  रशीद अल-दिन सिन्न  (हा ‘ओल्ड म्यान ऑफ द मौंटन’ म्हणूनसुद्धा  ओळखल्या जातो ) हा आपल्या फिदाई अनुयायांना ‘चरस’ नावाचे अमली पदार्थ देवून त्यांच्या निर्णय क्षमतेवर नियंत्रण ठेवतो व त्यानंतर त्यांना आपल्या हिशेबाने प्रशिक्षित करून मारेकरी म्हणून पाठवतो.  त्यांच्या नीडरतेचे कारण ‘चरस’ हा अमलीपदार्थ आहे असे मार्को पोलो मानतो.

आता  ‘चरस’ याला ‘हशीश’ किंवा ‘हश’ (Ḥash) असे म्हणतात म्हणून या फिदाई मारेकर्यांना मार्को पोलो ‘हशिशीन’(Hashishi) म्हणजे हशीश सेवन करणारे म्हणायला लागला. याचाच उच्चार अरेबिक भाषेत अनेकवचनात Assasiyeen करण्यात आला... ज्याचे  पुढे इंग्रजीत assassin झाले...  assasin म्हणजे ‘व्यावसायिक हत्यारे’ असा अर्थ प्राप्त होण्याची हि  एक मनोवेधक गोष्ट... (या हशीशी लोकांच्या मस्त दंतकथा आहेत... त्याबद्दल नंतर कधी...)
#शब्दांच्या_गोष्टी
#Words_words_Words

रविवार, ३० जून, २०१९

शब्दांच्या गोष्टी ५

serendipity ... अचानक सापडलेल्या शब्दाची गोष्ट....
शाळेत असतांना, कुठल्यातरी इयत्तेत, हिंदीच्या अभ्यासक्रमात 'वीरासत' नावाची कथा होती.. लेखक कोण,काय आठवत नाही.. पण त्या कथेचा उगम सापडला.. मूळ सापडले... Horace Walpole नावाचा अठराव्या शतकातील एक लेखक.. 'गॉथिक' साहित्य लिहिणारा ... त्याची मूळ कथा बदलून कदाचित खपवण्यात आली असेल आपल्याकडे ...ती हिंदीतील कथा कदाचित तुम्हालाही आठवत असेल...
मूळ कथा 'थ्री प्रिंसेस ऑफ सेरेंडिप'' या नावाची आहे... त्यात सेरेंडिप नावाच्या राज्याचा जाफर आपल्या मुलांना चांगले शिक्षण देतो व नंतर त्यांना राज्याची सूत्रे देऊ करतो, परंतु मुले त्याला नकार देतात. आपले वडीलच हुषार असून तेच राज्य करायला योग्य आहेत असे सांगतात. राजाला त्यांची वागणूक आवडते.
आपल्या प्रजेला मात्र या राजकुमारांच्या बुद्धीवर शंका येऊ नये म्हणून तो त्यांच्यावर रागावतो व त्यांच्या बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी म्हणून त्यांना सेरेंडिप मधून हाकलून लावतो.
राज्यातून बाहेर पडल्यावर एका वाटेवर चालत असतांना ते निरीक्षणातून असा अंदाज काढतात कि, या वाटेवरून एक उंट चालत गेला आहे, तो उंट एका डोळ्याने आंधळा आहे आणि त्याचा एक दात पडला आहे, तो एका पायाने लंगडा आहे…. तसेच त्याच्या पाठीवर एक स्त्री बसली आहे व ती स्त्री गर्भवती आहे, इतकेच नाही तर त्या उंटाच्या एका बाजूला मधाचे तर दुसर्या बाजूला लोण्याचे भांडी बांधले आहेत.
तितक्यात तिथे त्या उंटांचा मालक येतो व त्या तिघांना त्याच्या मार्ग चुकलेल्या/हरवलेल्या उंटाबद्दल विचारतो. ते तिघे सांगतात कि तुझा उंट आम्ही बघितला नाही परंतु तो एका डोळ्याने आंधळा आहे, एक दात पडला आहे, तो एका पायाने लंगडा आहे, गर्भवती स्त्री त्यावर बसली आहे आणि मध व लोणी वाहून नेत आहे.
उंटाच्या मालकाला वाटते कि या तिघांनी त्याचा उंट चोरला. तो त्यांना राजाकडे नेतो व त्यांच्यावर उंट चोरीचा आळ घेतो. राजा तिघांना विचारतो कि, तुम्ही उंट बघितला नाही तरी त्याचे इतके स्पष्ट वर्णन तुम्ही कसे केलेत.
त्यावर तिघे उत्तर देतात कि, पावलांच्या ठशावरून तो उंट होता हे सिद्ध झाले. रस्त्याच्या एका कडचेच गवत खाल्लेले दिसले त्यावरून त्याला एकाच डोळ्याने दिसते. चावलेल्या गववताचे घास रस्त्याने पडलेले दिसले ज्यांचा आकार उंटाच्या दाता सारखा होता यावरून उंटांचा एक दात पडलेला आहे त्यामुळेच गवत चावताना दाताच्या फटींमधून ते गवत पडले.
उंटाच्या तीन पायांचे ठसे स्पष्ट होती पण एक पाय घासत चालल्यासारखा दिसतो यावरून तो एका पायाने लंगडा आहे. उंटाच्या पाठीवर एका बाजूला मध होते कारण त्याचे थेम्ब सांडल्यामुळे मुंग्या जमा झालेल्या दिसल्या तर दुसर्या बाजूने लोण्याच्या थेंबाजवळ माशा घोंगावत होत्या.
तर उंटावर बसलेली व्यक्ती स्त्री आहे कारण एका ठिकाणी उंट बसला असता तिथे पावलाच्या आकाराचे ठसे दिसले व तिथेच लघवी केलेली दिसली. लघवीमधून योनीगंध असल्याचे जाणवले यावरून ती स्त्रीच आहे हे स्पष्ट झाले. तिने उठतांना आपल्या हाताचा उपयोग केला होता हे तिथल्या हाताच्या ठशावरून लक्षात आले म्हणजे ति गर्भवती असल्यामुळे तो आधार घ्यावा लागला.
थोड्याच वेळात, उंट त्याच रस्त्यावर पुढे सापडला अशी बातमी तिथे येते आणि तिघा भावांचा खरेपणा सिद्ध होतो. राजा त्यांच्या बुद्धिमतेवर खुश होतो. त्यांना बक्षीस देऊन आपले सल्लागार म्हणून नियुक्त करतो.
अशी मुख्य कथा असून त्यात अशाचप्रकारच्या सेरेंडिप राजकुमाराच्या आणखी कथा-उपकथा आहेत. त्या सगळ्या कथांचा शेवट मात्र अनपेक्षितपणे गोड होतो.
आता प्रश्न उरतो कि हे 'सेरेंडिप'' म्हणजे कोणता देश किंवा राज्य, तर संस्कृत आणि पाली भाषेमध्ये श्रीलंकेला 'सिंहिली-द्वीप' म्हणजे 'सिंहिली लोकांचे बेट' असे म्हणायचे (सिंहल म्हणजे 'सिंह'. त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावर अजूनही 'सिंह' विराजमान आहे.) संस्कृत किंवा पाली नंतर जुन्या ग्रीक भाषेत श्रीलंकेला ‘सिलेंन दिवा’ म्हणायचे (पुढे याचेच 'सिलोन' झाले आणि आज 'श्रीलंका')तर अरेबिक भाषेत 'सेरेंडिब' आणि पर्शियन भाषेत 'सेरेंडिप' असे म्हणायचे.
यावरून ते तिघे राजकुमार श्रीलंकेचे होते.
मग प्रश्न पडतो कि हे राजकुमार आपले राज्य सोडून गेले तर कोणत्या देशात गेले आणि त्यांनी तो उंट कुठे बघितला. कथेतील एकंदरीत मांडणी बघता श्रीलंका किंवा दक्षिण भारतात उंट हा प्राणी विरळा. मागवो घेत गेलो आणि एक गोष्ट आढळली कि त्यांना चोर म्हणून पकडून ज्या राजासमोर नेले जाते तो राजा असतो 'बहाराम पाचवा'. हा पाचव्या शतकातील पर्शियाचा राजा. तेंव्हाच्या पर्शियन साहित्यावर यांच्या कर्तृत्वाचा प्रभाव होता. आता वरील कथा त्याच्या काळात घडली असे स्पष्ट संकेत आहेत तसेच त्याचे आणि रोमन साम्राज्याचे सामरिक,राजकीय,धार्मिक आणि व्यापारिक संबंध होते. अर्थातच रोम आणि इतर युरोपियन भाषेमध्ये पर्शियन भाषेचा प्रभाव जाणवतो त्यातून इंग्रजी कशी सुटेल?
एकंदरीत, आजचा इंग्रजीतील 'सेरेंडिपिटी' हा शब्द पर्शियन भाषेतून आलाय आणि तोही वर सांगितलेल्या कथेच्या माध्यमातून जी होरॅस वॉलपोल यांनी १८ व्या शतकात लिहिली. याच कथेतील पात्रांसोबत जे घडते तोच अर्थ सेरेंडिपिटी याचा घेतल्या जातो : "अचानकपणे अपेक्षा नसताना चांगली गोष्ट घडणे' .
अनेक वैज्ञानिक शोध हे 'सेरेंडिपिटी' आहेत... १८९५ मधील रॉनटजेन यांनी लावले क्ष-किरणांचा शोध हा त्यापैकी एक.
खरतर Ashutosh दादांच्या पाचेक महिन्यापूर्वीच्या कुठल्यातरी कोकण किनाऱ्यावरील फोटोच्या कॅप्शन मध्ये वाचला हा शब्द तेंव्हापासून फिरतोय डोक्यात.. तो अचानक दिसला हि सुद्धा एक 'सेरेंडिपिटी' आहेच...

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

जेलीफिश


जेलीफिश


मी माझ्या स्वत: च्या डोळ्यांनी पाहिले आहे ते दृश्य,
की सिबिल एका अरुंद गुफेत जावून अडकली आहे,
 आणि जेव्हा लहान मुलांनी तिला विचारले
की, "तुला काय हवे आहे?"
 तेव्हा ती असे म्हणाली
 "मला मृत्यू हवाय."
“मृत्यू”.
                                                            -पेट्रोनियस, सायरिकॉन

      “मी अमृता.... वय वाढत चाललय त्यामुळे कित्येक गोष्टी आठवतील कि नाही ठावूक नाही.... ३०० वर्षाच्या स्त्रीला अस कितीस आठवेल...पण तरीही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.. विज्ञान युगात राहतानाही दैव आणि नशीब या गोष्टी कधीकधी माणसाला इतक अतर्क्य भोगायला लावतात  कि... असो..
       मला दिवस,वर्ष,महिने असल वेळेच विभाजन आठवत नाही किंवा तीनशे वर्ष जगल्याचा परिणाम असेल कदाचित कि सर्व रटाळ आणि तेच ते असल्याने त्यातील फरक जाणवत नाही. त्यामुळे सगळ कस संगतवार तुम्हाला सांगता येणार नाही... तुम्हीच माझ्या कहाणीतील तुटलेल्या कळ्या जोडायच्या आणि अर्थ लावत जायचा...
      खरतर माझ खर नाव अमृता नाहीच... या नावाआधी मला लोक कांचन म्हणून ओळखायचे...त्याच्याही आधी दिती कि अदिती अस काहीस नाव दिल होत त्यांनी मला.. तिकडे काही लोक सिबल म्हणून तर काही लेडी टायरेशिअस म्हणून ओळखायचे... माझी अनेक नाव ठेवल्या गेल्या होती.. माझी नाव सतत बदलली पण मला ओळख बदलता आली नाही... कशी बदलता येईल...माझ्या हातात नव्हतेच ते... आणि जेंव्हा होते तेंव्हा..????
      जवळपास ३०० वर्षा आधी..अंधुकसे आठवते... कि मी तरुण होते...तशी अजूनही आहे... माझे जन्मदाते राहायचे भारतातील एका राज्यात...आता ते राज्य नाही... जगाचा नकाशा पार बदलला... माझ्या नजरेसमोर अनेक गोष्टीची माती होताना बघितली...इमारती कोसळल्या, साम्राज्य नष्ट झालीत, माणसे मेली आणि अनेक प्रकारच्या वनस्पस्ती लयाला गेल्यात.... हि अशी नशिबात मरण लाभलेली प्रत्येक गोष्ट मला खटकते आता... माझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहेत इथल्या निर्जीव वस्तू... दगड सुद्धा ... त्यांनाही रेती होता येते... त्यानाही मरता येते....बघा! झालच शेवटी विषयांतर....मला सांगायचं काय असत आणि मी सांगते काय. कृपा करून मला दोष देवू नका. एखाद्या  पोतडीमध्ये  अनेक गोष्टी कोंबल्या आहेत आणि तुम्हाला त्यातून हवी ती वस्तू काढायची आहे तर ती सापडेपर्यंत आधी इतर अनेक वस्तूच बाहेर येतात... तीनशे वर्षाचे अनुभव कोंबलेले आहेत माझ्या या शरीराच्या पोतडीने.... तर मी सांगत होते...
      मी आतासारखीच तेंव्हाही तरुण होते...माझे बाबा खूप जीव लावायचे मला.. ते खूप मोठे वैज्ञानिक होते...मरीन बायोलोजी त्यांच्या संशोधनाचा विषय...माझी आई मला जन्म देतानाच देवाघरी गेली. ते खचले होते खूप तेंव्हा. आईचा विरह ते फक्त माझ्यामुळे  सहन करू शकले अशे ते सांगायचे... खरय...माझ्यापेक्षा विरहाचे दुख, आपल्या माणसाला गमावण्याचे दुख कोण जाणू शकत... तीनशे वर्षात मी अगणित लोकांना गमावलं आहे... माझ्या तेरा नवर्यांना गमावलं आहे आणि माझी आठ लेकरे मी स्वत: दफन केली किंवा जाळून टाकली आहेत...प्रत्येकवेळी गेलेल्या माणसाचे दुख विसरायला व्हायचं तर नवीन कोणीतरी जवळचा परत या जगातून निघून जायचा... अशावेळी माझ दुख दुप्पट व्हायचं... मेलेल्या माणसाबद्दल मला दया वाटायची आणि त्याचवेळी त्याच्या नशिबावर जळायची सुद्धा.... त्यांना मरताना बघून मी अगतिक व्हायचे... नेमक सांगता येणार नाही मला... तुम्हाला समजेल अस वाटते आणि पुढील गोष्ट सांगते.....

आई गेली आणि मग मीच बाबांच्या काळजीच कारण ठरली.. त्यांना सतत मला काही होईल का याची भीती वाटायची. माझी खूप खूप खूपच जास्त काळजी घ्यायचे. इतकी कि त्यांनी माझ्यासाठी विशिष्ट्य खोली बनवली घरात. तिथली स्वच्छता ते स्वत: बघायचे. मला साधी शिंक जरी आली तरी त्याना झोप येत नसे. माझ्या आईसारखे ते मलाही गमवून बसतील अशी भीती सतत त्यांना वाटायची. माझ लहानपण खूप जपलं त्यांनी. त्यांच्या अतिकाळजीच ओझ वाटायचं तेंव्हा... पण त्यांच्यासाठी मी ते सहन केल.. त्यांच प्रेम मला कळत होत. मीही त्यांच्या वागण्यावर जास्त आक्षेप कधी घेतलाच नाही. मला कळलच नाही कि त्यांच प्रेम तेंव्हा प्रेमाच्या पलीकडे गेल होत. त्यात वेडसरपणा यायला लागला होता... त्याना माझ्या काळजीचा मेनिया झाला होता. माझ्या मरणाची भीती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इतकेच काय तर त्यांच्या संशोधनासाठी त्यांना जगभर फिरावं लागायचं तेंव्हाही ते मला त्यांच्या सोबतच नेत असत. त्यांनी मला भूमध्य समुद्र दाखवला.. प्रशांत महासागर दाखवला इतकच काय पार तिकडे जपानचा समुद्रसुद्धा फिरून आलो आम्ही. मलासुद्धा समुद्र, लाटा, किनाऱ्यावरची वाळू,शंख-शिंपले गोळा करायला आवडायचे. मी असल्या गोष्टी गोळा करायची तर बाबा वेगवेगळ्या जातीची मासे,समुद्री कीटक आणि जेलीफिश गोळा करायचे मग ते आपल्या प्रयोगशाळेत त्यांच्यावर अभ्यास करायचे. त्यांना फक्त मी आणि त्यांच्या अभ्यास याशिवाय काहीही सुचत नसायचे...
 मी मोठी झाले.... वयात आले.. आणि मला ऋतुस्त्राव सुरु झाला. जेंव्हा हि गोष्ट माझ्या वडीलांना कळली तेंव्हा तर त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. त्यानंतर ते जास्त वेळ आपल्या प्रयोगशाळेत घालवायला लागले. पण इतक काम करूनही थकवा त्यांना अजिबात जाणवत नव्हता. घरी यायचे तेंव्हा कालच्यापेक्षा प्रत्येकवेळी प्रफुल्लीत दिसायचे... मला वयात येवून तीन-चार महिने झाले असतील.. आणि मी पोट दुखतेय म्हणून बिछान्यावरच जावून पडली होती... तेंव्हा बाबा जवळ आले आणि त्यांनी मला मंदसे स्मित देवून डोक्यावर हात ठेवत शांत झोपायला सांगितले... त्यांच्या त्या काळजीच्या स्पर्शाने मला बर वाटले आणि मी झोपले.... मग सतत तीन दिवस मी झोपूनच राहिले... चौथ्या दिवशी झोपेतून  उठले तर.....
मी एकटीच होते माझ्या खोलीत ... पिवळसर रंगाचा प्रकाश होता... आणि बिछान्यावर मातीचे बारीकशे कण पडलेले होते.. इतके बारीक कि ते मुंग्यांनी आपल्या वारुळासाठी न्यावेत... मला काही कळेचना.. खोली तर माझीच होती.. वस्तू माझ्याच होत्या... मी मीच होते... मी स्वतःला आरशापुढे नेले व निरखून बघायला लागले. हि मीच होते पण... माझी कांती, माझा रंग, माझ्या चेहऱ्यावरील तजेला इतका जास्त होता कि मी हळदीसारखी पिवळीधम्म दिसत होते... मला खोलीतील पिवळ्या रंगाच्या प्रकाशामुळे अशी दिसतेय अस वाटल म्हणून लगेच पिवळसर दिवा बंद केला आणि पटकन आरशापुढे परत आले... मघाशी जितकी पिवळी चमकत होती तितकी जरी आता वाटत नसली तरी टवटवीतपणा जराही कमी झाला नव्हता. मला आतून फुलल्या सारख वाटत होत. माझ्यात एक नवीनच चैतन्य बहरल्यासारख वाटत होत. कदाचित झोप जास्त  चांगली झाल्यामुळे अस वाटत असेल, म्हणून मी तो विचार तिथेच सोडून दिला... दार उघडून बाबांना शोधायला गेली...
बाबा पोर्चमध्ये कॉफी घेत वर्तमानपत्र चाळत होते. मी त्यांच्या जवळ गेले. ते माझ्याकडे एकटक बघायला लागले. त्यांचे डोळे मला बघताना पाण्याने तरळले... ते खूप समाधानी वाटत होते. त्यांनी मला बसायला सांगितले. आणि माझा हात आपल्या हातात घेतला. माझ्या बोटावरील नखांना बघायला लागले. त्यांनी माझ्या डोक्यावरील केस बघितले..आणि समाधानाचा सुस्कारा सोडला......
माझ्या नखात, केसांत असे काय बघतायेत म्हणून मीसुद्धा माझी नख, केस बगितली तर.... माझी नखे जरा जास्तच लांब झाली होती... म्हणजे एक-दोन दिवसात जेव्हढी वाढायला पाहिजे त्यापेक्षा जास्तच ती वाढली... आणि केसांचीही कहाणी जास्त वेगळी नव्हती... ती सुद्धा एक-दोन दिवसात वाढायला पाहिजे त्यापेक्षा जास्तच लांब वाढल्यासारखे मला वाटायला लागले. बाबांना मी म्हटले कि आज उठली तेंव्हापासून मला सगळ कस विचित्र वाटतय.. माझ्या बिछान्यावरील तो बारीक मातीचा भुगा कि बारीक रेती, माझ्या कांतीतील फरक, मला आतून वाटणार चैतन्य आणि आता हे नखे आणि केस.... त्यावर ते फक्त हसले... आणि सांगेल तुला नंतर म्हणून आपल्या कामाला लागले....
तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे.... मी तशीच दिसते....मला शारीरिक थकवा आजही जाणवत नाही... माझी बुद्धी बर्यापैकी तल्लख आहे. पण आठवणी इतक्या जास्त गोळा झाल्यात डोक्यात कि गोंधळ होतो कधी-कधी... मला स्पष्ट दिसते,ऐकायला येते, सर्व दात अक्कल दाढेसह शाबूत आहेत...पण त्तरी मला जगावस वाटत नाही...कंटाळा, कंटाळा आणि फक्त कंटाळा आलाय जगण्याचा.... म्हणजे कंटाळ्याचासुद्धा कंटाळा आलाय आता...
तेंव्हाची गोष्ट अशीच एक-दिवस मी स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असताना मला खरचटलं... माझ्या मनगटाच्या खाली... कुणी चाकूने रेष ओढावी अशी रक्ताची लकेर उमटली होती..लालचुटूक.... मला वाटल कि आता खूप रक्त निघेल पण नाही.... तर ती लकेर अशी मोठी होता-होता थांबली...आणि मग आकुंचन पावल्यासारखी कमी होत गेली व नाहीशीसुद्धा झाली... मी भांबावलेच.. बाबांना जाऊन सांगितले तर ते ऐकून खुश झाले... मला अजब वाटल... त्यानंतर तर माझ्या शरीरासोबत असे विचित्र प्रकार होतच गेले...मलाही त्याची सवय होत गेली... मला काही लागल तरी ते लवकर बर व्हायचं... आजारी तर पडतच नव्हते... माझ्या हात-पायांना थकवा असा ठावूक नव्हताच.. खरतर मला झोपही नको असायची..पण  रात्री दुसर करण्यासारख नसल्याने मी पडून राहायचे... तेंव्हा कळत गेल कि आपण वेगळे आहोत.. प्रश्नसुद्धा पडायचा आपण का वेगळे आहोत त्याचा... बाबांना खुपदा विचारल तर त्यांनी स्पष्ट सांगितल कि हे  कुणाजवळ बोलायचं नाही.. वेळ आली कि सगळ कळेल.
बाबा आता पूर्वीसारखे माझी काळजी करेनात.. मी मोठी होत गेली आणि आता लग्नाला तयार होते.. बाबांचाच एक विद्यार्थी जो मलाही आवडायचा त्याच्याशी लग्न ठरले.. काही दिवसांनी लग्न झाले... मुल झाली...संसार सुरु झाला..सगळ सुरळीत होत..आता  बाबा म्हातारे होत होते...तोपर्यंत माझ्या नवऱ्याला कळून चुकले होते कि माझ्यातील जे वेगळेपण आहे ते विशेष आहे. तो सतत त्याच्याबद्दल मला विचारयाचा.... आणि हे सांगायचा कि तू कुणालाच कळू देवू नकोस... बाबांचा विद्यार्थी असल्याने तो बाबासारखाच बोलायचा.. खरतर तो बाबांची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचा... त्याला खूप मोठे वैज्ञानिक व्हायचे होते... बाबांच्या हाताखालीच तो डॉक्टर झाला होता. .. त्याचा एकंदरीत स्वभाव आणि हुशारी बघून बाबांनी माझ लग्न त्याच्याशी लावून दिले... माझ्याशी तो चांगला वागायचा... म्हणून मलाही आवडायचा...
मात्र नंतर नंतर त्याच्यात आणि बाबांत खटके उडायला लागले.. त्यांच्यात वाद सुरु होता पण वादाचा मुद्दा मला कळू देत नव्हते.. मी जवळ येतांना दिसले कि ते वाद थांबवायचे आणि विषयांतर करायचे. पण मला थोड-थोड जाणवायला लागल होत कि माझा नवरा बाबांकडे काहीतरी मागतोय आणि बाबा त्याला नकार देत आहेत. माझ्या नवऱ्याचा हट्ट दिवसेंदिवस वाढतच जात होता आणि बाबा त्याला निक्षून नकार देत होते. पण अस काय मागतोय माझा नवरा. मी खरे काय ते शोधायचा निश्चय केला. मी माझ्या बाबाला आणि नवऱ्याला पुरती ओळखून होती. लग्नानंतर मला नवरा कळत गेला. अधाशी, हावरट आणि लोभी होता तो. पण त्याच्या या दुर्गुणाचा मला तसा त्रास म्हणून कधी झालाच नाही. राहून राहून शंका मात्र यायची कि हा इतका लोभी आहे हे आपल्याला लग्नानंतर कळल ..पण लग्न करतांना याने नेमका कोणता फायदा बघितला. कारण लोभी माणसे प्रयेत्क गोष्ट त्यांची फायद्याची आहे का हे आधी बघतात आणि  नंतरच तशी कृती करतात. माझ्या नवर्याला नेमका कोणता फायदा होणार होता माझ्याशी लग्न करून...
बघा, तुम्हाला सांगितल होत न कि माझ्या बोलण्यात सुसूत्रता कि काय म्हणतात ते तुम्हाला दिसणार नाही. खंडीभर गोष्टी फिरत असतात एक बोलायला गेली तर. नुसते भुंगे हो नुसते आठवणींचे भुंगे. तर तुम्हाला सांगत होती कि माझ्या लोभी नवर्याने माझ्याशी लग्न का केले. तसे बोलून चालून सगळे माणस स्वार्थीच असतात पण  त्याला काही मर्यादा असते. स्वार्थासाठी दुसऱ्याला मारून टाकणे योग्य असते का? माझ्या नवर्याने तेच केले त्याने माझ्या बाबांना मारून टाकले.. खून  केला त्यांचा. म्हणजे त्याला खून म्हणावा कि नाही हाही प्रश्न आहे. दोघांमध्ये खूप भांडण झाले त्यादिवशी. आणि त्या भांडणात माझ्या नवऱ्याने बाबांना काहीतरी फेकून मारले. माझे म्हातारे बाबा जाग्यावरच कोसळले. स्वयंपाक करता-करता मी धावत आले तर सगळ मला दिसल. मलासुद्धा खूप राग आला नवऱ्याचा आणि कांदा चिरत होते तोच चाकू खुपसून टाकला नवऱ्याच्या पोटात.... मग  काय... पोलीस आले.. मला पकडल.. माझ्यावर खटला चालला.. आणि देहदंडाची शिक्षा झाली. विषारी इंजेक्शन देवून मृत्यूदंड देण्याची पद्धत होती तेंव्हा. मला खुर्चीवर बसवले आणि माझ्या मानेच्या खाली, मणक्यात इंजेक्शनवाटे विष टोचले. त्या विषाने मला मरणाच्या यातना होत होत्या. नेमक मला शब्दात सांगता येणार नाही.. ते विष जस-जसे चढत होते तस तसे माझ्या शरीरातील कण अन कण ठिसूळ होवून फुटल्यासारखा जाणवत होता. मी बेशुद्ध झाली असेल... काही वेळाने मी जागी झाली तेंव्हा तिथेच होती. सगळे पोलीस,तिथे हजर असलेले डॉक्टर तोंडात बोट घालून माझ्याकडे बघत होते. मलासुद्धा कळत नव्हते कि हे अस काय झाल.
आज मला सगळ समजल, मी विशेष का आहे. बघा, ते विष सुद्धा मला मारू शकले नाही... आणि मृत्यूदंड मिळाल्यावर आणि मी ती शिक्षा भोगल्यावरहि जर मेली नाही तर कायद्याने परत मला शिक्षा होत नाही. अशाप्रकारे कायद्याने मला सोडले. मी माझी शिक्षा भोगली. या बाबतीत मी नशीबवान ठरली... खरतर माझ नशीब लिहिणारा कुठला देव नव्हता, आणि ज्याने मला असे बनवले त्यालाच जर देव म्हणायचे असेल तर मग माझे बाबाच माझे देव.
माझा पहिला नवरा इतका हावरट होता कि त्याने त्याच्या स्वार्थासाठी माझ्या वडिलांचा जीव घेतला. त्याला माझ्या वडिलांकडून काय हव होत माहिती आहे. ..? मला माझ्या वडिलांनी दिलेली भेट... ती काय होती माहितीय...?
सांगते... पण मला जिवंत राहण्याचा कंटाळा आलाय हो. ३०० वर्ष झालीत... आणि आणखी किती वर्ष मी जिवंत राहणार ठावूक नाही. खुपदा मरण्याचा प्रयत्न केलाय पण जमलं नाही. तुम्ही विचार करू शकाल का कि ३००  वर्ष आयुष्य लाभलेल्या व्यक्तीला किंवा मरणाची भीती नसणाऱ्याला काय वाटत असेल...  आयुष्य शाप आहे माझ्यासाठी... अश्वत्थामा डोक्यावर भळभळती जखम घेवून जगतोय आणि मी डोक्यात दुखाचे झरे.. आम्ही दोघेही शापित... अमरत्व शाप आहे...मृत्यू या दुखातून मोक्ष देतो....खरय ते... नशीबवान आहेत जे मरू शकतात... पण मी मात्र तशी नाही... मी आहे एक जेलीफिश....
            जेंव्हा मी माझ्या पहिल्या नवऱ्याला ठार केले आणि धावत बाबंकडे गेले तेंव्हा बाबांनी मला एक शेवटी का होईना ते रहस्य सांगितल होत.. तेच आज तुम्हाला सांगतीय..


 माझे बाबा मरीन बायोलोजीतील तज्ञ.. तेंव्हा आम्ही जपान वरून नुकतेच आलो होतो..बाबांनी खूप वेगवेगळ्या जातीची मासे आणि जेलीफिश आपल्या प्रयोगशाळेसाठी आणल्या होत्या.. त्यातील एक जेलीफिशची जात खूप विशिष्ट होती. ती म्हणजे ‘टरीट्रोपसीस डोह्र्नीय.. सोप्या शब्दात ‘अमर जेलीफिश म्हणा हव तर... तिचा अभ्यास करतांना बाबाना लक्षात आले की हिच्या पेशीमध्ये अशी रचना आहे कि जिच्यामुळे हि जेलीफिश सतत नवीन पेशिना निर्माण करत असते. त्यांना प्रयोगांती लक्षात आले कि हिला वातावरणातील बदल,उपासमार झाली तर हि स्वत:मध्ये बदल करते . इतकेच नाही हिला काही लागले किंवा कापल्या गेली तर हि भरभर नवीन पेशींची निर्मिती करून पूर्ववत होते. याला माझे बाबा ‘ट्रान्स-डीफरेनशीएशन’ म्हणायचे. तेंव्हाच्या अनेक वैद्न्यानिकानी या ज्ञानाचा  उपयोग करून मानवी ‘स्टेम पेशी’ बनवण्याचा प्रयत्न केला होता. माझे बाबासुद्धा तेच करत होते. .. पण ते करत असतांना त्यांनी माझा विचार करून एक पाउल आणखी पुढे टाकले. त्यांनी त्या जेलीफिश मधून मुळातला डी.एन.ए. वेगळा काढला जो नवीन पेशींना निर्माण करत होता... आणि त्या रात्री जेंव्हा माझा ऋतूस्त्राव संपला त्यांनी इंजेक्शनवाटे मला दिला... अजूनही तो माझ्या पेशीत मिसळला आहे... त्याने मला कितीदा तरी मरणातून वाचवले आहे... ते  विषारी इंजेक्शनसुद्धा काही करू शकले नाही.. साध्या खरचटण्याचा व्रण नाही कुठेही.. अजूनही तशीच आहे... सतेज..कांतिमान... तरून...हो...तरुण... पण...पण....
            मी मनाने थकली आहे...जगण्याने थकली आहे... शरीर भोगायला तयार असले तरी इच्छा होत नाही... असे आणखी किती वर्ष जगणार...अरे कि मरणारच नाहीय मी..! अस कस होईल... काय करू मी अनंत दुखे कवटाळून..आणखी किती सहन करू... म्हणून, मी मृत्यू मागतेय... मृत्यू... मृत्यू जो सगळ्यांचा अधिकार आहे... मृत्यू जो दुखाचा अंत आहे... मृत्यू जो खरोखरच मोक्ष आहे... मला मृत्यू हवाय...मृत्यू!

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

शब्दांच्या गोष्टी (४ व ५ )

४) Echo...choo!!!...cho!!..cho!

Panic शब्दाने मौन सोडले आणि आपला अर्थ सांगितला. परंतु मागोमाग Echo शब्दाचे प्रतिध्वनी पिच्छा काही सोडत नव्हते. Echo शब्दाची सुद्धा एक मस्त कहाणी आहे. ती कहाणीच सांगेलकि  Echo शब्दाला कसा अर्थ मिळाला.
ज्युपिटर(झेवूस म्हणून सुद्धा याला ओळखतात) म्हणजे आपल्याकडील इंद्र.. दोघेही सारखेच लंपट मला वाटतात.
 तर या ज्युपिटर ची बायको म्हणजे ज्युनो किंवा हेरा हिला आपल्या नवर्याच्या बाहेरख्यालीपणा अजिबात आवडत नव्हता... कोणत्या बायकोला आवडेल म्हणा... पण तो मात्र जुमानतच नव्हता...
ती सतत त्याच्यावर लक्ष ठेवून असायची....पण शेवटी देव जरी असला तरी पुरुषच तो. त्यात त्याला दिव्य-बिव्य शक्ती मिळालेल्या... शक्तींचा पूर्ण इस्ते'माल' कारायचा तो इतर बायकांवर भुरळ पाडण्यासाठी... किंवा एखादीने  त्याला नकार दिलाच तर तिच्यावर 'अतिप्रसंग' करायलासुद्धा मागे-पुढे बघत नव्हता...
 तो आपल्या बायकोची नजर चुकवून प्रेयसिला (अनेक होत्या, त्याबद्दल नंतर कधीतरी) भेटायला जायचाच. त्याच्या अनेक प्रेयसीपैकी एक होती Echo नावाची जलपरी....

ज्युपिटर तिला एकदा बायकोच्या नकळत भेटायला गेला. त्यांचे प्रेम रंगात आले तेंव्हाच त्यांना कळले कि ज्युपिटरची बायको ज्युनोला माहिती पोचलीय कि त्या दोघांची रासलीला सुरु आहे ते... मग  ती आपल्या नवऱ्याला रंगे-हात पकडायला येत आहे. .. ती येणार हे त्याला दिव्य शक्तीमुळे कळते आणि तो तो कावरा-बावरा होतो... देव असला तरी बायकोला घाबरतो बर हापण... तिच्या हाती पकडल्या जाऊ नये म्हणून कदाचित!? मागच्या दाराने जायला निघाला..... जाण्याआधी Echo ला सांगून ठेवतो कि मी बाहेर पडेपर्यंत तू ज्युनोला पुढल्या दारावर गोष्टीत गुंतवून ठेव... 
इकडे Echo ने ज्युनोला गोष्टी करण्यात गुंतवून ठेवले जेणेकरून ज्युपिटरला तिथून निसटण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.ज्युनोच्या सगळ लक्षात येत होते शेवटी ज्युपिटरसारख्याची बायको ती... तिने Echo ला वाट सोडायला सांगितली... दम दिला... पण Echo ने काही तिला तिथून जावू दिले नाही.. 
या सगळ्याप्रकारामुळे ज्युनो जाम भडकली आणि तिने Echo ला शाप दिला कि, तू मला शब्दांमध्ये गुंतवून ठेवलेस, जा यापुढे तू बोलूच शकणार नाहीस आणि तुझ्या समोर जी व्यक्ती बोलत असेल त्याचे फक्त शेवटचे शब्दच तू उच्चारू शकशील.... तेंव्हापासून echo हि समोरच्याचे शेवटचे शब्दच उच्चारू शकते. म्हणून प्रतीध्वनी साठी तिचेच नाव आपण वापरतो... Echo...Echo...Echo....
विशेष बाब म्हणजे हि echo नंतर नार्सिससच्या प्रेमात पडली पण ती कधी त्याला प्रेम व्यक्त करू शकली नाही. नार्सिसीसने स्वप्रेमात प्राण सोडल्यनंतर echo चे सुद्धा दगडामध्ये रुपांतर झाले... म्हणून दगडाला आदळून जो प्रतीध्वनी उमटतो तो म्हणजे आपल्या बोलण्याला Echo ने दिलेला echo आहे....गंमतच आहे...!!!!


५) alma mater

संकृतवर प्रेम असणार्यांना इंग्रजीतील हा शब्द आवडेल. कारण यातील mater म्हणजे आजचा इंग्रजीतील mother. mater हा मातृ/माता या संस्कृत शब्दातून इंडो-युरोपिअन भाषेत गेला....
alma mater या संयुक्त शब्दाचा अर्थ जेंव्हा मला पहिल्यादा माहिती झाला तेंव्हा मला आठवली 'धाराऊ'.. 
हो तीच माय माउली धाराऊ जिने सईबाईच्या आजारपणात राजे संभाजीना आपला पान्हा दिला. 
नंतर आठवली 'यशोदा' जिन्हे कृष्णाचे संगोपन केले आणि .....आठवली हि वसुंधरा जी आपले संगोपन करते.

एकंदरीत alma mater चा अर्थ आता थोडा आपल्यासाठी खुलला असेल. दुधमाय, संगोपन करणारी आई, लहानाचे मोठे करतांना संस्कारित, शिक्षित करणारी आई... अशा विविध छटा आहेत या शब्दाला.
पण आज हा शब्द जरा अडगळीत पडलाय. सहसा कुणी वापरत नाही. एका गोष्टीसाठी मात्र या शब्दाचा योग्य वापर केला जातोय ते म्हणजे 'ज्या शाळेत किंवा कॉलेजात आपले मुळ शिक्षण झाले त्या शाळा/कॉलेज/विद्यापीठाला आपण आपले alma mater म्हणू शकतो. कारण तिने आपले बौद्धिक संगोपन केलेलं असते...
माझी alma mater आहे विदर्भ महाविद्यालय, अमरावती....


मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

Panic आणि मेंढपाळ... व '&' जणू इंग्लिश मधील झपूर्झा...

(०१) Panic आणि मेंढपाळ

"Words, words, words" शेक्सपिअरलिखित Hamlet नाटकाच्या मुख्य-पात्राच्या तोंडी आलेला हा एक डायलॉग आहे. त्याला विचारले जाते कि तू काय वाचतोय तर तो म्हणतो मी वाचतोय 'शब्द, शब्द,शब्द'
Pan: अर्धाशेळी-अर्धामाणूस.
शब्दांची दुनिया वेगळीच आहे. एक मात्र मला कळले कि, आपण या शब्दांशी खेळायला लागलो कि यांच्यासारखे मनोरंजन करणार दुसरे काहीही नाही हे जाणवते...
हा खेळ करतांना सुरुवातीला आपले तर्क लावत जातो.. मग त्या तर्कातून अनेक प्रश्न सापडतात आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी मन आतुर होते... शब्द कोणत्याही भाषेतील असो पण प्रत्येक शब्दाची एक कहाणी असते. कधी-कधी शब्दांच्या कहाण्या इतक्या मस्त असतात कि माणसाच्या गोष्टी फिक्या वाटाव्या..
आज असाच एक ‘शब्द’ शब्दशा डोक्यात गेला... इंग्रजीतील Panic हा शब्द... आणि याने एवढ भंजाळून सोडल कि नेमका हा शब्द तयार कसा झाला याचा शोध घ्यायचे ठरवले...
शब्दांशी खेळतांना पहिली गोष्ट मी कुठली करत असे तर त्या शब्दाला तुकड्यात तोडतो आणि त्यातील सगळ्यात महत्वपूर्ण तुकडा(निदान काहीतरी अर्थ असेल असा तुकडा) हाताशी घेतो. Panic ला तोडले तर pan हा तुकडा महत्वाचा वाटला. मग यावर सुरु झाली तर्काची शृंखला...
pan हा शब्द मला माहित असलेले किती अर्थ सांगून जातो. frying pan मधील pan, चुका काढणे या अर्थाने pan वापरल्या जातो.....असा विचार करत गेले कि अचानक काहीतरी धागा सापडल्यासारखा वाटतो तेंव्हा pain-panic असा सहसंबंध आठवतो. मला व्यक्तिशा pain व panic हे दोन्ही शब्द एकाच कुटुंबातील सावत्र भावू वाटतात... दिसायला सारखे बापामुळे पण आई वेगवेगळी असे दोन सावत्र भावंड....बस इतकाच संदर्भ हाताशी येतो पण तर्क पुढे काही जात नाही... झालेच तर Andrew Marvell च्या 'Garden' नावाच्या कवितेतील Pan नावाच्या देवाचा विचार डोक्यात येतो. त्याच्याशी याचा काही संबध असेल असे वाटत नाही पण खरेतर इथेच मी चुकतो. हे चुकनेही आनंद देणारे आहे. शब्दांशी खेळण्यात एक मजा आहे, आपला तर्क बरोबर आला याचा आनंद तर होतोच पण तो तर्क चुकून काहीतरी दुसरे कळले कि त्याचाही आनंद होतो. Panic या शब्दाचा सर्व संबंध त्या ग्रीक दंतकथेतील Pan नावाचा मेंढपाळाच्या देवाशीच आहे हे संदर्भ चाळल्यावर मला कळते... आणि मग शब्दच्या कहाणीत शिरायला मन आतुर होत गेले....
Panic शब्दाचा मागोवा घेत Pan या ग्रीक देवतेच्या गोष्टीत शिरलो. Pan हा ग्रीक-पुराणकथेनुसार मेंढपाळांचा देव. त्याचे वडील हर्मस आणि आजोबा झेवूस(आपल्याकडील इंद्रासारखा). Pan हा सुपिकतेचा देव म्हणून सुद्धा ओळखला जातो. Pan च्याबाबतीत आणखी एक विशेषतः सांगावीशी वाटते. त्याने आपल्या वडिलांकडून हस्तमैथुन कसे करावे हे शिकून घेतले आणि ती कला इतर मेंढपाळांना तो शिकवत असतो. (हा संदर्भ लक्षात येताच ‘ख्वाडा’ या मराठी सिनेमातील प्रसंग सहज आठवेल.)

तर हा असा Pan नावाचा मेंढपाळांचा देव. एकदा काय झाले कि Gods आणि Titan (आपल्याकडील सूर व असुर युद्धासारखे) यांच्यात युद्ध सुरु होते तेंव्हा Pan वामकुक्षी घेत होता. नेमके तेंव्हाच Titans देवलोकावर हल्ला चढवतात. त्यांच्या आवाजाने Pan खडबडून झोपेतून उठतो... झोपेतून अचानक उठल्यामुळे व Titans च्या आवाजाने स्वतः खूप घाबरतो व जोर-जोराने ओरडायला लागतो. त्याचे ते भीतीने गांगरून मोठमोठ्याने ओरडल्यामुले देवांवर आक्रमण करायला आलेले Titans बिथरतात, त्यांची घाबरगुंडी उडते. त्यांच्या त्या भांबावल्या अवस्थेचा देव फायदा घेतात व Titans वर कुरघोडी करत विजय मिळवतात. नंतर Pan स्वतः सगळ्यांना सांगत फिरतो कि त्याच्या आवाज केल्यामुळेच देवांना विजय मिळवता येवू लागला. एकंदरीत भीतीने सगळ्यात पहिले घाबरगुंडी कुणाची उडाली असेल तर ती Pan या देवाची म्हणून तशा प्रकारच्या मानसिक स्थितीला Panic होणे असे म्हणायला लागले... असा सगळा मामला आहे. आणखी एक तर्क लक्षात येतो कि, Pan जसा कि मेंढपाळचा देव आणि मेंढी,बकऱ्या असले प्राणी भित्रे असतात. यांचा खुपदा शिकार करण्यासाठी 'चारा' (bait) म्हणून वापर केल्या जातो. तेंव्हा त्या भीतीने, मृत्यू भयाने Panic होतात आणि ओरडायला लागतात. सुरुवात शब्दाचा अर्थ शोधण्यापासून जरी झाली असली तरी तो शब्द अनेक कहाण्या,दंतकथा, किस्से उजागर करत असतो आणि सगळ कस सुसूत्रीत वाटायला लागते....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(०२)Cataract....धबधबा ते मोतीबिंदु एक प्रवास....

'...the sounding cataract hunted me like a passion..." वर्डसवर्थ च्या एका बोजड कवितेतील हीच एक ओळ मला आवडली... एक मस्त मिजास आहे आणि मनमौजीपणा आहे या ओळीत... असो..
या ओळीतील cataract शब्द म्हणजे धबधबा या अर्थाने वापरलेला आणि तोच त्याचा मुल अर्थ आहे.. आणि तो उच्चारते वेळी जिभेची होणारी टोकदार हालचाल त्या शब्दाला आठवणीत ठेवून गेली... गंमत म्हणजे या शब्दाचा आणखी एका अर्थाने उपयोग करतो तो म्हणजे ‘मोतीबिंदू' ... विचार केला तर असे वाटते कि त्यांचा एकमेकांशी अर्था-अर्थी काहीही संबंध नाही..!! पण शंका येतेच कि, जर तसा संबंध नसेल तर एकाच शब्दाला इतके भिन्न अर्थ कसे काय मिळाले...?
काही संदर्भ चाळले तर cataract शब्दाची गोष्ट उमगत गेली आणि त्याला भिन्न अर्थ का मिळाले हे कळले...
बेन जोन्सन नावाचा शेक्सपिअरच्याच काळातील एक मोठा नाटककार होवून गेला. त्याची काही नाटक वाचली(सायलेंट वूमन, अल्केमिस्ट इत्यादी. ती वाचल्यावर तो शेक्सपिअरइतकाच कर्तुत्ववान मला वाटला. पण शेक्सपिअरच्या यशामुळे तेंव्हा आणि आताही तो झाकोळल्या गेल्या. नेहमी त्याला दुय्यम दर्जा मिळाला... हे म्हणजे राहुल द्रविड सारखा प्लेअर सचिनसारख्या प्लेअरमुळे उपेक्षित राहिला तसेच झाले...
त्या बेन जॉन्सन ने 'कॉमेडी ऑफ ह्युमर' हा नाटकातील प्रकार आपल्याला दिला आहे. त्याची नाटके त्याच नावाने ओळखल्या जायची. आता यातील 'humour' हा शब्द आपल्या Cataract शब्दाला दोन अर्थ का आहेत याची किल्ली असेल असे मला कधीही वाटले नाही.
पूर्वी असा समज होता कि माणसाच्या शरीरात चार प्रकारची humours असतात. १. Black bile याला choler असेही म्हणतात. २. Yellow bile ३. Blood ४. pelgham
(आपल्याकडील वात,पित्त,कफ वगैर प्रकार असतात तसे.)
आता या ह्युमर्सच्या कमी- जास्त प्रमाणामुळे व्यक्तीच्या स्वभावात/प्रकृतीत फरक पडतो. बेन जॉन्सन च्या नाटकातील पात्र याच थेअरीवर त्याने उभी केली होती. म्हणून त्याच्या सुखांतीकेला Comedy of humours म्हणायचे ....
वरील माहिती लक्षात ठेवून Cataract शब्दाला बघितले तरी काही सापडणार नाही. पण तिथेच सगळे लपून आहे.
Cataract या शब्दाचा खरा अर्थ हा 'धबधबा' असाच होतो पण नंतर तो डोळ्यांच्या एका रोगाशी कसा जोडण्यात आला हेच कोड सोडवायचं आहे... तर..
मोतीबिंदू हा रोग जेंव्हा जुन्या लोकांना कळला तेंव्हा त्यांना वाटले कि त्या चार humours पैकी जो जास्त होतो तो humour डोळ्यावाटे बाहेर येतो/बाहेर पडतो. किंवा ओघळतो.... इतकेच नाही तर अशा रोगाला सुरुवातीला पर्शिअन लोक 'पाणी येणे/ओघळने' या अर्थाचा एक पर्शिअन शब्द वापरायचे.. त्या शब्दाचा प्रभाव आणि humour थेअरी यांचा एकत्रित परिणाम म्हणून डोळ्यातून धबधबनारे पाणी असा एक सुलभ अर्थ घेतल्या जात असेल आणि अशा या डोळ्याच्या रोगाला Cataract म्हणजे धबधबा हाच शब्द रूढला असेल....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(०३) '&' इंग्लिश मधील झपूर्झा...

Beowulf हे इंग्रजीतील पहिले महाकाव्य... या महाकाव्यात and या शब्दासाठी & हे चिन्ह किंवा 7 हा आकडा वापरल्या गेला होता. त्या महाकाव्याच्या हस्तलिखीतात तो तसा वापरल्या गेल्याचा पुरावा आहे. आता & या चिन्हाला and हा अर्थ का आहे....? तशी असण्याची कारणे काय...? त्याची कुठली कहाणी आहे का..? अस डोक खाजवत थोडी शोधा-शोध केली... ती करण्याआधी चार जाणकार लोकांना विचारले... थोडी माहिती मिळाली... आणि हळूहळू गोष्ट समजत गेली...
& याला इंग्रजीतील २७ वे अक्षर म्हणून पूर्वी ओळखायचे. याचा अर्थ 'and' असा घेतात आणि याला Ampersand म्हणून ओळखतात. Ampersand हा शब्द 'and per say and' याचेच लघु-रूप आहे. मराठीत्तील जसा झपूर्झा शब्द 'जा पुढे जा पोरी जा पुढे जा' याला खूप वेगाने वाचले कि तयार होतो.(वाचून बघा) तसाच 'and per say and' याला वाचले कि Ampersand हा शब्द तयार होतो.. मराठीत त्याला '...आणि आणखी पुढे.." असा अर्थ आपण घेवू शकतो.
जसे कि वर म्हटले आहे, पूर्वी याला २७ वे इंग्रजी अक्षर म्हणून ओळखायचे म्हणून यालाही a,b,c,d... सारखे चिन्ह देण्यात आले. हे ‘&’ चिन्ह इतर अक्षरांच्या चीन्हापेक्षा थोडे गुंतागुंन्तीचे होते. असायलाही हवे कारण हे चिन्ह एकाचवेळी अक्षर व शब्द म्हणून वापरल्या जाते. Beowulf या महाकाव्यात याचा सढळ वापर केलेला दिसून येतो फरक फक्त इतकाच आहे तेंव्हाच्या लिपीत या चिन्हाचे स्ट्रोक्स थोडे वेगळे होते. खुपदा तर and या अर्थासाठी & या चिन्हाएवजी इंग्रजीतील '7' हा आकडा सुद्धा वापरलेला दिसून येतो. आता तो '7' चा आकडा आणि & हे चिन्ह यांच्यात काय संबंध असा प्रश्न पडणे साहजिक आहे....
& आणि 7 या आकड्याचा काय संबंध म्हणून सरळ गणिताचे प्राध्यापकानां गाठले. आपली. त्यांच्या बोलण्यातून सहज कळले कि गणितात '/\' अशा स्वरूपाचे चिन्ह 'and' या अर्थाने वापरतात. हाच प्रकार logic मध्ये आहे. कदाचित पूर्वी '/\' याच चिन्हाला '7' असे लिहित असतील असा तर्क काढला. आणि माझ्यापुरता शांत झालो.
(*टाईपतानां आणखी एक जाणवल आणि खूप आनंद झाला. laptop च्या किबोर्डवर & चिन्ह आणि 7 चा आकडा एकाच ठिकाणी आहे... आता हा नक्कीच योगायोग नसेल आणि असलाच तर खूप मजेशीर योगायोग आहे....)
#शब्दांच्या_गोष्टी
#Words_words_words



Top of Form



अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...