७/१० विज्ञान कॉलोनी, डॉ.
हिणवटकरांचा पाच हजार स्क्वेअर फूट पसरलेला विस्तीर्ण बंगला... रात्री ठीक १०.३० वाजता, शांत रात्रीच्या पदराखाली घड्याळाचे
श्वास टिक-टिक करत होते. तेंव्हा बंगल्याच्या एकलकोंड्या खिडकीजवळ रामराव
चुळबुळायला लागला. तो बांगल्याच्या आवारात शिरून, खिडकीजवळ लपून बसला होता. त्याला
वाट पाहत बसल्याला दोन तास झाले. तसा तो
मागील दोन दिवसांपासूनच बंगल्यावर नजर ठेवून होता.. आणि त्याचा अपघात होण्याआधी
एकदा चोरीचा प्रयत्न याच बंगल्यात केल्याचे त्याला अंधुकसे आठवते .. सहा महिन्यापूर्वी
त्याने या बंगल्याची आतासारखीच टेहळणी केली होती .. पण चोरी करण्यापूर्वीच त्याचा
अपघात झाला आणि बंगल्यात चोरी करण्याचा
त्याचा मनसुबा अर्धवटच राहिला. आज तर तो मोहीम फत्ते करायच्या हिसेबानेच पूर्ण
तयारीनिशी आला होता. घरात शिरण्याची वेळ व्हायची होती म्हणून त्याने परत आजच्या
कामगिरीची एकदा उजळणी करून घेतली....
डॉक्टर हीनवटकर,
एक नावाजलेले, अविवाहित वैज्ञानिक... एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटेच
राहतात...कुठलाच नौकर नाही कि सोबती नाही...डॉक्टर म्हणजे घड्याळाच्या काट्यावर
चालणारा वक्तशीर माणूस. कुठेही वेळेच्या दोन पाच मिनिटे आधीच पोहचतील. त्याचं
आयुष्य त्यांनी संपूर्णता विज्ञानाला अर्पण केले. ठीक सकाळी आठ वाजता प्रयोगशाळेत
जातात तर थेट सायंकाळी ८ ला बाजारातून रोजची खरेदी करून परत येतात. जेवण वगैरे
आटपून रात्री १०.३० वाजता परत प्रयोगशाळेत जातात आणि पाहटे ४ ला बंगल्यावर हजर. कशी बशी दोन-तीन तासांची झोप
घेवून, लवकरच तयार होवून पुन्हा सकाळी ८ ला प्रयोगशाळेसाठी रवाना होतात. मागील एका
वर्षापासून त्यांचा हा दिनक्रम ठरलेला... क्वचित कुठे व्याख्यान द्यायला जावे
लागले तर तेवढा बदल. सतत काम करणारे, व्यग्र आणि कधीही न थकणारे असे हे
व्यक्तिमत्व सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. एकटा माणूस एवढे श्रम न थकता कसा करू शकतो
हा प्रश्न सगळ्यांना पडायचा.
रामराव
विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला तो मोटारीच्या आवाजाने. डॉक्टर आपली मोटार घेवून
प्रयोगशाळेत निघून गेले. रामराव शांत बसून होता...एकदम आताच आत शिरायचे
नाही...त्याने खिडकीतून आतील अंदाज घेतला.. खिडकीच्या काचेतून त्याने बघितले कि
आतील दिवा मालवलेला नव्हता... त्यासरशी क्षणभर शंकेने डोके वर काढले... तो थांबला...
आधीच मंद घेत असलेला श्वास धरून त्याने किलकिल्या डोळ्यांनी आत बघितले. कसलीच
हालचाल नव्हती... मग निश्चिंत झाला. आत जायच्या आधी त्याने एकदा स्वतःजवळील धारदार
चाकू चाचपडून बघितला...चाकूचा स्पर्श त्याला हिम्मत देवून गेला. त्याचा हा आवडता
चाकू होता. असाच चाकू अपघातापूर्वी त्याच्याकडे होता पण तो अपघातामध्ये कुठेतरी हरवला होता. कुठे तेच नेमके त्याला
आठवत नव्हते. त्याने अपघातानंतर दवाखान्यातून बाहेर पडल्याबरोबर कुठले काम केले
असेल तर अपघातापूर्वी हरवलेल्या चाकुसारखाच दुसरा नवीन चाकू विकत घेतला होता.
त्याच चमकते धारदार पाते, अनुकुचीदार टोक, त्याच्या राकट हाताला साजेशी मजबूत मुठ
त्या चाकुच्या सौंदर्याला खुलवत होती. हातात पकडल्यावर त्या चाकूचे ‘भयानक
सौंदर्य’ त्याला आश्वस्त करत असे.
कसलीच हालचाल नसल्याने आत कोणी नसेल याची खात्री झाली. चुकून दिवा
सुरूच राहिला असेल असे त्याला वाटले . काहीवेळातच त्याच्या तरबेज हाताने खिडकीतून
आत जाण्यासाठी वाट मोकळी केली. खिडकीचे स्क्रू अगदी शिताफिने काढून टाकले. शरीराला
मांजरीसारखे चोरून तो खिडकीतून आत शिरला.. आतील चोपड्या टाईल्सवर त्याचा पाय पडताच
त्या थंड स्पर्शाने त्याला शिरशिरी आली...ती शिरशिरी याआधीही अनुभवल्याचे त्याला वाटत
होते. आपले दोन्ही पाय घराच्या आत घेतले
आणि ताठ उभा होवून तो मागे वळून पाहतो तर ती खिडकीसुद्धा ओळखीची वाटत होती.
याचे त्याला थोडे नवल वाटले, परंतु त्याचा
खिडक्या तोडून चोरी करण्याचा अनुभव एवढा जास्त होता कि जवळपास प्रत्येक प्रकारच्या
खिडक्यांना त्याने तोडले होते...म्हणून आपल्याला हे ओळखीचे वाटत आहे. असा विचार
येताच तो स्वताशीच हसला... हसल्याबरोबरच त्याच्या डोक्याला झिणझिण्या आल्या.
त्याचा अपघात झाल्यापासून असला प्रकार नेहमीच व्हायचा म्हणून त्याच्या डोक्यातील
झांजेचे त्याला जास्त नवल वाटले नाही. पण तेंव्हाच त्याची नेणीव अचानक चाळवल्या
गेली. त्याला काहीतरी आठवल्यासारखे झाले...काय आठवले?... तर खिडकीच्या डाव्या बाजुला
एक कपाट आहे आणि त्या कपाटाचे पाय कमीजास्त आहेत... हे भलतच आपल्याला काय आठवत
आहे. स्वताच्या स्मरणशक्ती बाबत, तो संभ्रमित
झाला. जे आपल्याला आठवल्या सारख
वाटतय ते खर कि खोट बघण्यासाठी त्याने
कपाटाला हलकासा धक्का दिला तर...तर कपाट
खरोखरच दुडक्या चालीत डुगडूगायला लागले. आपल्याला काहीतरी भास होतोय पण या
विचीत्र गोष्टीचे त्याला भय सुद्धा वाटायला लागले म्हणून जास्त विचार न करता तो
कामाला लागला.
तो कपाट
उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वाटले कि कपाट उघडायला खूप प्रयत्न करावे
लागतील परंतु काय आश्चर्य अगदी पहिल्याच प्रयत्नात त्याने कपाट सहज उघडले. जणू
त्याला ठावूक होते कि या भल्या मोठ्या
कपाटाच्या कुलपाला एवढ्या सहजतेने कसे उघडायचे. त्याचा कपाटात शोध सुरु झाला.
त्यात अनेक गोष्टी ठेवल्या होत्या. पण त्याची अनुभवी नजर चोरकप्प्याला शोधत होती.
आधीच माहित असल्यासारखा त्याचा हात चोरकप्प्याशी गेला आणि त्यातील नोटांचे बंडल
त्याने आपल्या खिशात कोंबले. ते रुपये त्याला पुरेसे वाटले नाहीत म्हणून आणखी शोध
घ्यायला लागला. त्याला कपाटाच्या खालच्या खणात एक चाकू दिसला. तो चाकू पाहून
रामराव जरा चमकलाच. कारण त्याच्याकडे असलेला चाकू अगदी सारखाच होता. कपाटात चाकू
असावा यात जास्त नवल नाही पण मघापासून त्याला जे विचित्र जाणवत होत त्याचा विचार
करता कपाटातील चाकू अगदी त्याच्याच जवळील चाकू सारखा निघावा हे जरा विशेष वाटत
होते...असो. हे फालतू विचार करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा जे-जे चोरण्यालायक वाटत होते ते-ते गोळा करू
लागला. महागड्या वस्तू, त्याच्या उपयोगाच्या वस्तू वगैरे-वगैरे शोधण्यात एवढा गुंग
झाला कि वेळेचे भान राहिलेच नाही....
आपल्याच धुंधीत घरभर वावरत,
पाहिजे त्या वस्तू
गोळा करत, नविन वस्तू दिसली कि तिची हातात आधी निवडलेल्या वस्तूशी तुलना करत, आणि कधी ती बदलत
तर कधी नवीन वस्तूला नाकारत त्याच काम सुरु होते. या अशी चोरी करायला त्याला खूप
आवडे. निवांत विचार करून वस्तूला पारखून नंतरच ती चोरायची. याचसाठी तो रात्री कुणी
नसलेल्या घरातच आपला डल्ला टाकायचा. दुकानात गेल्यावर सहसा लोक खरेदी करताना जशी
आवड-निवड करतात तशीच तो इथेही वस्तूना पारखून घेत होता, फक्त इथे रामरावला
वस्तूंचा मोबदला पैसे म्हणून द्यायची गरज नव्हती....पण आज त्याच दैव वेगळे ठरणार
होते. आज त्याला आपल्या याच नाही तर आतापर्यंतच्या सगळ्या चोरींचा मोबदला द्यावा
लागणार होता....रुपयांच्या जागी स्वताची ओळख खर्च करून. या सगळ्या गोष्टींपासून
अनभिज्ञ असलेला रामराव चोरीची मझा घेत होता........ आणि अचानक ...
अचानक त्याला समोर डॉक्टर उभे दिसले. त्याला कळलेच नाही डॉक्टर घरात
कधी आले? नेमका कितीवेळ झाला? डॉक्टर आले तेंव्हा कसाकाय कुठलाच आवाज आला नाही?
डॉक्टर तर बाहेर गेले तेंव्हा मोटार घेवून गेले होते, त्या मोटारीचा सुद्धा आवाज
नाही आला?! डॉक्टरांनी झोपायच्या वेळीची कपडे घातली होती म्हणजे ते
घरात येवून आपल्या समोरून बेडरूम
मध्ये कसे काय गेले? आणि कधी कपडे बदललेत?
मग आपल्याला काहीच कस जाणवल नाही? अशा प्रश्नाच्या भुंग्यांनी त्याच्या डोक्याला
परत झिणझिण्या आल्या. डॉक्टरांना समोर बघून रामराव जागीच थिजला होता....पण
क्षणभरच.....लगेच स्वताला सावरत त्याचा सराईत
हात चाकुकडे गेला... चाकूवर पकड घट्ट केली
आणि तो वार करण्यासाठी तयार झाला. तोपर्यंत डॉक्टर आपल्याकडे, विशेषता
डोळ्यांमध्ये खोलवर निरखून बघत आहेत हे
त्याला जाणवले...त्यांच्या रहस्यमयी नजरेने रामरावच्या अंगावर काटा आला. त्याला
प्रचंड असुरक्षित वाटायला लागले. त्याच्या चेहेऱ्यावर राग आणि भीती या दोन्ही
भावनांच्या छटा आलटून-पालटून दिसत होता. शरीरातील रक्त डोळ्यांमध्ये आणि
हातांमध्ये धावायला लागले. हातची चाकुवरील पकड अजून मजबूत करत तो वार करायला
थोडासा जागचा हललाच कि,
“थांब रामराव, तीच चूक पुन्हा करू नकोस.” डॉक्टर आपल्यावरील हल्ला
वाचवण्यासाठी थोडे मागे सरकत म्हणाले.
“....म्हणजे!?” रामराव डॉक्टरांच्या वाक्याने चकित होवून, चाकुसह वर
उचललेला हात तसाच मधे थांबवत ओठातल्या
ओठात गारठला. आपल्याला डॉक्टर ओळखतात....? नावानिशी ओळखतात....?
“सांगतो.” डॉक्टर रामरावच्या निस्तेज चेहऱ्याकडे बघून बोलायला लागले,
“सहा महिन्यापूर्वी तू आला होतास, चोरी करायला, असाच चाकू घेवून...आणि आजच्याच
सारखा मी त्यादिवशीही तुझ्या पुढे अचानकच आलो. तू खूप घाबरलास आणि माझ्यावर चाकूने वार केलेस. तुझ्या त्या
चाकूच्या घावांनी मी रक्तबंबाळ होवून खाली कोसळलो आणि मेलो...तू माझा खून केला
होतास.”
“ क्काय?” डॉक्टर प्राण वाचवण्यासाठी काहीतरी भलतच बरळत आहेस असे
त्याला वाटले.
“हो रामराव, तू मला ठार केलेस
पण तू पळून जायच्या आधीच इथे माझा मित्र
आला. मला रक्ताच्या थारोळ्यात बघून त्याला लगेच सगळा प्रकार लक्षात आला आणि मग
त्याने तुला तुझ्याच चाकूने ठार केले... खरतर तुला जीवाने मारायचे नव्हते पण परिस्थिती
अशी होती कि माझ्या मित्राकडे दुसरा पर्याय नव्हता.. कारण त्यावेळी तुला आम्हा
दोघांच एक खूप मोठ गुपित कळल होते. कदाचित ते गुपित बाहेर गेले असते तर मला
कायद्याने खूप मोठी शिक्षा सुद्धा सुनावली असती. म्हणून तुला ठार मारणे अतिशय
म्हत्वाचे होते..”
भीती,विस्मय,जिज्ञासा... अशा प्रसंगावेळी असतील नसतील या सगळ्या
भावनांच्या छटांचा रंगमंच रामरावच्या चेहऱ्यावर आपला खेळ दाखवू लागला....चेहऱ्यावर
आणि विशेषता डोळ्यातही.
“अहो,तुमाले काय येड लागल काय? मी जिता हाय,तुमी जिते हा. दोन
दिवसापासून पाहून रायलो तुमाले अन तुमी म्हणता कि म्या तुमाले मारल...तुमी मंग भूत
होय का?”
“रामराव, मी सांगेल ते तुला कळेल कि नाही ठावूक नाही पण की सांगतो ते
ऐकून घे. मी जीवशास्त्राचा अभ्यासक आहे. मी आता जरी जिवंत आहे पण मी मेलो होतो.
आणि तू सुद्धा मेला होतास. तू खोटा रामराव आहेस...एक क्लोन आहेस...खरा रामराव तर
माझ्या बंगल्याच्या मागच्या बाजूला मी पुरून टाकलाय.”
रामराव थोडा बुचकळ्यात पडला...त्याला थोड थोड समजायला लागल होत आणि
आठवायला सुद्धा...
“तुला ठार मारल्यानंतर तुझ्या प्रेताला माझ्या मित्राने गुपचूप
मोटारीत टाकून, लोकांच्या नजरेतून वाचवून प्रयोगशाळेत नेले. तुला माहित नसेल माणूस
मेल्यानंतरही काही वेळासाठी मेंदूतील
पेशी, आम्ही त्याला न्युरोंस म्हणतो, त्या जिवंत राहतात...डोक्यातील त्या
पेशींमध्ये आपल्या गत आयुष्यातील आठवणी साठवल्या असतात. आणि आज
जैवतंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे कि मेंदूतील त्या सगळ्या चांगल्या-वाईट आठवणी
आपल्याला वाचता येतात आणि पाहिजे तर पुसून सुद्धा टाकता येतात. मग तुझ्या मेंदूतील त्या पेशीमधील सगळी माहिती
माझ्या मित्राने एका चुंबकीय चकतीवर काढून घेतली. त्या चकतीला सीलबंद करून
प्रयोगशाळेतील लॉकर मध्ये ठेवून दिले कारण पुढच्या कामासाठी ती गोष्ट अतिशय आवश्यक
होती. तुझ्या मृत शरिराचा माझ्या मित्राने खूप बारकाईने अभ्यास केला. तेंव्हा
उजव्या हातावर तुझे रामराव हे नाव गोंदवलेले दिसले त्यामुळेच मघाशी मी तुला त्या
नावाने हाक मारली...”
रामराव आपल्या उजव्या हाताकडे बघायला लागला--
“आता ते तिथे नसेल कारण गोंदलेली गोष्ट जन्मजात डी.एन.ए. मध्ये
नसते...डी.एन.ए. म्हणजे माणसाचे किंवा
कुठल्याही प्राण्याचे शरीर कसे बनवल्या गेले हे त्याच्या डी.एन.ए. वरून समजते.
पेशि मधल्या डी.एन.ए. साखळी मुळेच शरीरातील अनेक अवयव कृत्रिमरीत्या पाहिजे तशा
बनवल्या जावू शकतात. तुझ्या शरीरातून डी.एन.ए.चा नमुना घेऊन त्यालाही जपून ठेवले.
अशाप्रकारे प्रयोगशाळेतील सर्व काम
आटोपल्यावर तुझे प्रेत परत बंगल्यात आणले आणि मागच्या आवारात पुरून टाकले. तुला
शंका असेल तर मी तुला ती जागा दाखवतो. तुझी तूच खात्री करुन घे.” एवढे बोलून
डॉक्टर रामरावच्या प्रतिक्रियेची वाट बघायला लागले. पण रामाराव तर
सुन्न झाला होता. त्याला हसावं कि रडावं कळत नव्हते. त्याचा कसानुसा झालेला
चेहराच सांगत होता कि हा सगळा प्रकार त्याला भुताटकी वाटतसारखा होता. हतबल होऊन तो
पुढे डॉक्टरांचे बोलणे ऐकू लागला...
“... दुसऱ्या दिवसापासून माझ्या मित्राचे खरे काम सुरु झाले ते म्हणजे
तुझा क्लोन बनवायला त्याने सुरुवात केली. जवळपास एका आठवड्याच्या आत तुझा लहान
बाळा एवढा क्लोन तयार झाला. कृत्रिम गर्भपेटीत तुझे शरीर आकार घेत होते. तुझ्या
एका एका अवयवाला पाहिजे तसे बनवायला खूप श्रम पडले. या आठ दिवसातच तुझ्या एवढ्या
वयाचा क्लोन तयार करणे गरजेचे होते. परंतु माझ्या मित्रासाठी ती काही खूप मोठी
गोष्ट नव्हती. त्याचा अनुभव यावेळी खूप मददगार ठरत होता. त्याला क्लोनचे वय झपाट्याने वाढवण्याच्या
विद्युत-रासायनिक-चुम्म्बकीय पद्धतीचा शोध लागला होता. कृत्रिम गर्भ पेटी अगदी
आईच्या गर्भासारखीच असते. त्यात तेच द्रव्य असतात जे आईच्या गर्भात बाळाला
वाढवण्यासाठी मदत करतात. आधीच तुझ्या शरीरातून ती हार्मोन्स काढून घेतली होती जी
वय वाढायला कारणीभूत ठरतात. ती हार्मोन्स तुझ्या छोट्या क्लोन मध्ये सुई वाटे
सोडल्यानंतर जवळपास ३ दिवस ठरलेल्या वेळी
छोट्या क्लोन मधून विद्युत प्रवाह सोडण्यात आला आणि क्लोंनची वाढ झपाट्याने
झाली... वाढलेला क्लोन तुझ्या वयाचा जरी होता तरी तसा क्लोन म्हणजे कोरी पाटीच
असते...म्हणून चुंबकीय चकतीवर साठवून ठेवलेल्या तुझ्या आठवणी क्लोन च्या मेंदूला
परत केल्या. आता तो फक्त शरीराने रामाराव असलेला क्लोन नव्हता तर डोक्याने
आणि विचाराने सुद्धा रामराव झाला होता. हे
करत असताना फक्त त्या रात्री माझ्या बंगल्यात जे घडले होते ते तुझ्या आठवणीतून पुसून
टाकले. त्या आठवणी पुसणे गरजेच्या होत्या अन्यथा तुझा क्लोन बनवणे निष्फळ ठरले
असते. माझ्या मित्राचे गुपित आणि तुझ्या खुनाचा आळ या विवंचनेतून सुटण्याचा तो एकच
मार्ग होता. परंतु त्या रात्रीच्या आठवणी तुझ्या मेंदूतून पूर्णत: पुसल्या गेल्या
असतील याबद्दल मला खात्री नाही.”
रामाराव चमकला आणि मघापासून हा बंगला आणि यातील वस्तू आपल्या
परिचयाच्या कशा वाटतायत याच उत्तर त्याला मिळाल्यासारख वाटले. मघापासून शांतपणे
असलेला रामराव मोठ्या हिमतीने बोलला,
“म्हंजी, म्या इथ दुसऱ्यांदा आलोय..पण त्या अपघाताच काय?”
“सांगतो, सगळ सांगतो... तुझा पूर्ण विकसित
क्लोन तयार झाल्यानंतर नंतर तुला म्हणजे तुझ्या क्लोनला बेशुद्ध असतानाच रात्रीला
गुपचूप नजीकच्या सरकारी दवाखान्याजवळ माझ्या मित्राने सोडून दिले. पण त्याआधी
मुद्दाम तुझ्या डोक्यावर एक घाव दिला जेणेकरून तुझा अपघात झाला हे पटाव... आणि
पुढच सगळ तुझ तुलाच ठावूक आहे..”
“तुमी सांगता हे पटत नाही मले! पुरावा
द्या.”
“पुरावा!!!...ठीक आहे....मला सांग तुझ्या डोळ्यांचा रंग कोणता?”
“कोणता म्हणजे? काळा हाय!”
“तुला पुरावा पाहिजेच ना. तर जरा कपाटाजवळील आरशात बघ!”
रामराव आरशाकडे वळतो आणि हळू हळू पाय टाकत पुढे सरकतो..आजच्या रात्री
आणखी काय वाढून ठेवलय म्हणून अगदी डोळ्यांच्या शिरा ताणून स्वताला आरशात बघतो.... त्याला
विश्वासच बसत नाही. हि भुताटकी तर नाही,,, हा चेहरा तर आपलाच आहे पण... हे
डोळे!!.. हे नक्कीच आपले नाहीत... कारण त्याचे डोळे हिरव्यागर्द पाचुसारखे चमकत
होते.. त्या डोळ्यांतून हिरव्या रक्ताचा पारा तरळला...
डॉक्टर त्याला डोळ्यांच्या रंगाच गुपित सांगतात,
“स्वतःला सांभाळ रामराव...
जेंव्हा एखादी भावना आपण अत्युच्च पातळीवर अनुभवत असतो तेंव्हा शरीरातील
रक्ताचा प्रवाह सुद्धा वाढत असतो तेंव्हा आपल्या डोळ्यातील बुब्बुळावर त्याचा फरक
पडतो. आपले डोळे लाल होतात किंवा पाणावतात परंतु माझ्या बनवलेल्या क्लोन चे डोळे
अशावेळी हिरवे..आणि तेही हिरव्याजर्द चमकत्या पानसर्पा सारखे होतात... हा माझ्या
प्रयोगातील दोष म्हण किंवा गुण....पण एक खरे रामराव कि तू क्लोन आहेस क्लोन!!!
आणि--” डॉक्टर पुढे बोलायचे थांबतात कारण...
रामरावच्या अंगाला दरदरून घाम सुटतो...त्याचे डोळे आणखी चमकायला
लागतात. तो चवताळतो...त्याला असह्य वाटायला लागते..भांबावल्यागत होतो...
चीड,राग,संताप आणि अनावर क्रोध.... आपसूकच हात चाकुवर घट्ट..
डॉक्टरांकडे
धाव... छातीवर सपासप वार... किंकाळी... तगमग.. रक्ताच थारोळ...
थोड्यावेळाने भानावर आल्यानंतर त्याला चुकी कळते. भावनेच्या भरात
त्याने काय केले हे खरतर त्यालाच कळले नव्हते... तो स्वताला सावरतच होता, तोच
मुख्य दाराजवळ पावलांचा आवाज येतो. रामरावला तिथून निघायचे असते. तो खिडकीकडे
लगबगीने जातो. हातातील चाकू आणि स्वताचा तोल सावरत पुढे पाय टाकणार तोच तिथल्या
सगळ्या गोंधळामुळे बाजूच्या कपाटाला त्याचा धक्का लागतो.. आणि काही कळायच्या आत ते
भलेमोठे कपाट त्याच्या अंगावर कलंडू लागते. स्वताला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण उजवा
पाय कपाटाखाली यतो आणि तो विव्हळतो. पाय एवढा फसला असतो कि रामराव जागचा हलु सुद्धा शकत नाही.
कपाट पडल्याच्या आवाजाने दारावरील माणूसही सावध झाला असेल. आता आणखी
काय-काय घडेल त्याला काहीच सुचत नव्हते... रामरावला खात्री असते कि दारावर आलेला डॉक्टरांचा
तोच मित्र असेल.. ज्याचं गुपित आपल्याला माहित पडले होते. आता तो परत आपल्याला ठार
करेल कि काय!! दाराच्या कचकच आवाजावरून कळले कि दार अतिशय सावधगिरीने दार
उघडल्या गेले... थोड्यावेळाने हळूहळू अंधारातून एक आकृती आकार घ्यायला लागते...
अगदी सावध पावलाने समोर आलेली आकृती आपला चेहरा न्याहाळत आहे.. ती आकृती आणखी पुढे
येते आणि रामरावच्या हिरव्या डोळ्यांना उजागर होते...आणि काय आश्चर्य ती व्यक्ती
दुसरी तिसरी कुणीच नसून साक्षात डॉक्टरच असतात...हो शंकाच नाही डॉक्टर हीनवटकरच...!!
एक नजर रामराव जमिनीकडील डॉक्टरांच्या प्रेताकडे बघतो तर दुसऱ्या नजरेत जिवंत
डॉक्टरांना बघतो... त्याला वेड लागेल असे वाटते.. त्याला ग्लानी येते आणी तो बेशुद्ध
होण्यापूर्वी जिवंत डॉक्टरांच्या डोळ्यात शोधत असतो... जिवंत डॉक्टर म्हणजे खरे कि
खोटे??... त्याच्या डोळ्यांचा रंग कुठला??...
काळा कि हिरवा... हिरवा कि काळा?
लेखक: ज्ञानेश्वर गजानन गटकर
अमरावती. मोबा. ९०११७७१८११
अमरावती. मोबा. ९०११७७१८११
ई-मेल : dggatkar@gmail.com
३ टिप्पण्या:
So innovative and outstanding sir, it was real pleasure to such an interesting fiction stories.
Outstandingly written
Very interesting......
Full of mystery....
टिप्पणी पोस्ट करा