शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

'उपर जाते जा, नीचे आते जा!"



आजोबांच्या गोष्टी......

तशा काही फार दीर्घ आणि तत्त्वज्ञान नाहीय त्यांच्या गोष्टीत... अगदी साध्या-सुध्या आणि मनोरंजक आहेत... त्यांचा हा खजिना मी विसरत चाललो होतो पण आता इथे काही आठवणार्या आणि काही न आठवणार्या गोष्टी सुद्धा पोस्टणार आहे... त्या गोष्टींचे अनेक वर्जन असू शकतात... तुम्हालाही आठवत असतील तर तुम्ही त्या पोस्ट ला मला tag करा....आज पहिली गोष्ट सांगतोय....(आबा वऱ्हाडीत गोष्ट सांगायचे...म्हणून थोडी वऱ्हाडी बोली वापरतोय...)

'उपर जाते जा, नीचे आते जा!"

पोट्ट्या... तुले एक गोष्ट सांगतो  आईक...

एका गावात एक कास्तकार होता . पयले बरा शिरमंत होता पण तिगस्ता त्याच्या भावांन त्याची जिमीन हडपली अन त्याले मजुरीले लावल... दोन-दोन बायका त्याले आन पाच-सहा लेकरयीच लेंढार... मजुरी करून असा कितीक कमवे ...? बायका -पोराहीचे पोट बी भरत नोता..... पोरायचे शिक्शान तर दूरच रायल...

त्याले वाटे जगूच नही....जीव द्याव... मग येका राती गेला न तो आखारातल्या हिरीवर(विहिरीवर) जीव द्याले... हिरीच्या काठावर रायला उभा.... म्हणे आता उडी मारतो हिरीत अन देतो जीव.... तेवढ्यात हिरीतून आवज आला....

त्या  हिरीत येका भूताच बिर्हाड होत... तो भूत त्या हिरीतल्या पाण्याच्या अंदर  येक मोठ पेव करून आपल्या बायको अन पोरासंग रायत जाय...

त्या भूताले पाण्यातून दिसल न कि कोणीतरी जीव द्याले आल आणि आता उडी टाकते... तेवढ्यात भूतान आवाज लगावला....

"थांब रे बावा... काय झाल तुले ... काऊन मरत राजा... तुई अडचण त सांग मले!१"

कास्तकार घबरावला.... त्यान भेत-भेतच सांगितल भूताले कि , 'मायाकडे आता जमीन नाही, मले बरोबर मजुरी भेटत नाही...लेकरा -पोरायले खाऊ घालाचे वांदे होऊन रायले बावा! म्हणून त जीव द्याले आलो...."

भूत त्याची कायनी आयकून लयच दया करत होता...भूतान त्याले म्हणलं , "हे पाय दादा... तू काई जीव देऊ नको... मी तुयासाठी एक काम करू शकतो...पण त्या आंदी मले एक वचन दे...!"

कास्तकार म्हणे "सांगा ब्वा ! काय म्हणन आहे तुम्ह"
भूतान म्हटल मंग त्याले, " पहिली त गोष्ट तू कोणाले सांगू नको कि मी तुयासाठी  काम करतो... आन दुसरी गोष्ट म्हणजे तू म्हणशील ते काम मी करायले तयार आहो पण मले रोज काम सांगत जाय एकाही दिवसाचा खाडा चालणार नाही... ज्या दिवशी तुया मले काम सांगितल नाही त्या दिवशी मी तुया अन तुया लेकरा-बायकोचा जीव घेऊन घेईल.... कबुल अशीन त बोल"

कास्तकार लयच हरकला त्यान भूताच्या अटी कबुल केल्या....मंग काय  विचारता काय झाल.....

रोज भूत रामपायरी कास्ताकाराच्या दारात उभा काम करायले तयार....
कास्तकारण त्याले कोणतहि काम सांगितल  कि भूत  नीरा मिनटातच काम करून चाल्ला जाय....

पाटलाच्या धा एकर वावरातली पर्हाटी येच्याले सांगितली त भूत सकौन गेला अन दुपारी पुरी पर्हाटी येचून आला... पाटलाने कास्तकारले मजुरी देली... मंग त्यावर्षी कास्त्काराने भुताच्या जीवावर वावरातले काम उधळयान घ्याले सुरुवात केली...

रोज काही न काही काम भूताले तो सांगत जाय... आणि भूत काम करून निघून जाय... मजुरीचा सगळा पैसा कास्त्कारले भेटे... तो लय शिरमंत झाला... एका वर्षातच त्यान १० एकर जिमीन विकत घेतली... आता त्याले सुखाचे दिवस भोगायले भेटून रायले होते...

त्याचे पोर शाळेत जात...अभ्यास करत...बायकोच्या अंगावर सोन आल...नवीन घर बांधल....सगळ यवस्थित सुरु होत... पण त्याच्या जिवाले येग्ळाच घोर लागला...

भूताले रोज काम द्या लागे...ज्या दिवशी नाही देल त्या दिवशी भूत त्याले अन त्याच्या घारले मारून टाकणार होता... आता एखांद्यान रोज-रोज कामही कुठून आणावं?????

मोठ्या विवंचनेत होता कास्तकार.....पण  भूत  तर रोज पायटी  त्याच्या उरावर हजर असे.....काम सांग  म्हणे?

मंग कास्त्कारण एका जाणकार म्हतार्याले पकडल... अन त्याले सगळी हकीकत सांगितली.....जाणकार म्हातारा म्हणे मी सांगतो तस कर.....
पहिले तर  बैलगाडीन बाजारातून खंडीभर मवरी (मोहरी) ईकत घे अन येता-येता गावाच्या आंदी जे नदी लागते तिच्यात रेती आहे त्या रेतीत ते मवरी सांडून दे...पसरून टाक...अन  त्याले म्हणा आन येचून?????

कास्तकारन तसचं केलं.... पायटी भूत आला अन त्याले मवरी येच्याले पाठवल.... पण सायचा संध्याकैच भूत हाजीर ...म्हणे, "मालक काम झाल...उद्या येतो सकाऊन...काम तयार ठिवा!!"

कास्तकार डबल जाणकार म्ह्तार्याले भेटायले जाते....म्हतारा त्याले नवीन कलाकारी सांगते कि तुया वावरातल्या हिरीत टन भर मीठ टाक.... रातभरात ते ईरुन जाईन... मंग त्याले ते मीठ काढायले सांग....

पण दोन दिवसातच भूत मीठ पाण्यातून काढून आणते...अन कास्त्कारच्या उरावर  हजर ... म्हणे काम सांग....

भूताले लय येगयेगळ्या परकारचे काम सांगातल्या जातात... पण सगळे काम तो भर-भर करते..... त्याले त आकाशातले तारे मोजायले लावते पण तीन राती जागरण करून एवढे मोठे तारे भूत मोजून काढते.... अजून काय काय करायले लावते पण भूत त जुमानतच नाही न... मंग

कास्त्काराची  उडते घाबरगुंडी... आता काय कराव... गावातल्या शाळेतल्या मास्तरले भेटायाले जाते... त्यालेबी सारी हकीकत सांगते.....

मास्तर थोडस डोक लाऊन कास्त्काराच्या कानात सांगते.....

दुसऱ्या दिवशी भूत पायटी आल्या बरोबर कास्तकार त्याले काम सांगते... कि  हिमालयात जाऊन ततच सगळ्यात मोठ अन उंच झाड तोडून आन पण झाड सरकतीर पायजे... सरळसोट...

संध्याकाई भूत झाड घेऊन हजर.... हे अभायाले टेकिन येवढ उंच झाड आणते तो!

मंग त्याचा छाट काढ्याले सांगते....

मंग त्याच्यावरून रंदा मारून चोपड करायले सांगते....

मंग  म्हणते कि भूता आता या झाडाच्या खोडाले एवढ तेल लाव कि हे चोपड झाल पाहिजे...

भूत त्याले हजार पीप तेल लाऊन चोपड करते....

मंग त्याले त्या खोडाले गावाच्या येशिवर घेऊन जाय आणि तती रोऊन टाक... सरळ सोट.... उंच च्या उंच...

भूत हे काम बातच करते......

आता भूताले कास्तकार शेवटच म्हणते.... कि तुले मी आजपासून एकच काम देतो तेच करत जाय.....कोणत?

या खोडावर रोज वर चढत जाय अन खाली उतरत जाय....चढत जाय अन उतरत जाय...."उपर जाते जा...नीचे आते जा"

भूताले आता रोज एकच काम...

भूत लय दिवस हे करते.... शेवटी भूतही थकून जाते... खंगून जाते..... भुताची बायको कास्त्कारले विनंती करते कि माया नवर्याले सोडून द्या...
कास्त्कारले मंग दया येते अन तो भूताले सोडून देते...
सोडून देल्यावर भूताले विचारते...."कारे बाबू...पायजे का काम! पायजे अशीन तर ये....उपर जाते जा...नीचे आते जा!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...