रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

मनी प्लांट भाग:१ (कथा)


मी आळसावालो  होतो. शेरलोक्स होल्म्सच्या घराच्या बाबतीत हे नेहमीचच . जर तुम्ही काही करत नसाल तर तुम्हाला येथे हमखास आळस आल्याशिवाय राहत नाही  म्हणूनच कदाचित शेरलोक्स सतत काहीतरी करत असतो. आताही तो कुठल्यातरी त्यानेच शोधलेल्या वात्रट आणि त्याच्याच नुसार गुणकारी असलेल्या यंत्रासोबत कसलेतरी निष्फळ चाळे करत होता. मला एक कळत नाही या माणसाला एवढा वेळ मिळतो कसा? मी आपल्या विचारांच्या धुंदीत होतो. बेकर्स स्ट्रीट वरील या शेरलोक्सच्या घरच्या खिडकीतून बाहेर मला एव्हढ्यात  शहरात दिसणारे  नेहमीचे दृश्य दिसत होते. ‘वृक्षारोपण’ असल्या गोंडस नावाने चालणारा आणिसरकारी खर्च करून, पैसेखाऊ राजकारण्यासाठी हमखास राखीव कुरण म्हणून ओळखल्या जाणारा प्रकार सुरु होता. तीन सरकारी कर्मचारी त्या इवल्याश्या रोपट्याला खूपच नजाकतीने पकडून त्याचे रोपण करत होते. तेवढ्यात स्टडी रूम मधील फोन खणाणला. शेरलोक्स यंत्राच्या गुंतावाळ्यात असल्याने नाईलाजाने मलाच फोन घ्यावा लागला. तिकडून स्कॉटलंडयार्ड पोलिसचे इन्स्पेक्टर लीस्तार्द बोलत होते.
“मि. होल्म्स् आहेत?”
“हो आहेत,... पण ते अतिशय महत्वाच्या कामात व्यस्त असल्याने तुम्ही मला निरोप सांगू शकता, मी त्यांना आपला निरोप त्वरित कळवू शकतो.” मी शेरलॉक कडे बघून डोळा मिचकावला.
“त्यांना सांगा सर आयझक यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. त्यांची इथे नितांत गरज आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांना इकडे निघून यायला सांगा.” मी त्याला हो म्हणून फोन ठेवला तोच शेरलॉक प्रश्नांकित नजरेने माझ्याकडे बघत होता. माझ्या चेहऱ्यावरील फरक त्याच्या तीक्ष्ण नजरेने अचूक टिपला असेलच याची मला खात्री होती.
मी जेंव्हा त्याला आत्महत्येची वार्ता दिली तेंव्हा तो गूढ हसत म्हणाला,
“मला असल काही होईल याची कल्पना होतीच”.
 मी त्याच्या बोलण्यामुळे भांबावलो. माझी जिज्ञासा चाळवली गेली. मी त्याला म्हणालो,
“तू भविष्यवेत्ता झालास कि काय? मान्य सर आयझक एक प्रसिद्ध आणि समाजशील राजकारणी आहे त्यांच्या जीवनातील बहुतेक गोष्टी सार्वजनिक होतात . पण त्यांची बायको आत्महत्या करेल हे तुला आधीच कसे ठावूक?”
“वाटसन, काही गोष्टींचे भाकीत करण्यासाठी भविष्यवेत्ता होण्याची गरज नाही. तुम्ही थोडे चौकस असाल आणि विचार करू शकत असाल तर तुम्ही शंभर टक्के खरे ठरणारे अंदाज वर्तवू शकता…”
मी त्याचे तत्वज्ञान ऐकण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हतो.मूळ मुद्द्याला धरून त्याला प्रश्न विचारला:
“ते जावू दे, तू सांग कि तुला कसे कळले की सर आयझकची  बायको आत्महत्या करेल म्हणून?”
“अगदी त्यांची बायको आत्महत्या करेल असे काही नव्हते, पण सर आयझकच्या  बाबतीत कुठली तरी घटना घडेल आणि ती खूप विचित्र असेल म्हणजे लोकांना धक्कादायक वगैरे...”
“हो पण तुला असे का वाटले?”
“मागच्या महिन्यातले काही वर्तमान पत्र चाळशील आणि मी जसा विचार करतो तसा तुही करशील तर तुलाहि कळेल!”
मी वर्तमान पत्रातील आयझक यांच्या बाबतीतील बातम्यांची कात्रणे भर-भर काढायला लागलो. त्यातील तीन कात्रणे दखल घेण्याजोगे होती. पहिली बातमी मार्च महिन्यातील अकरा  तारखेची,

संसदेतील सर आयझक यांच्या विज्ञान विरोधी भाषणाने राष्ट्रीय विज्ञान संशोधन केंद्राला मिळणाऱ्या अनुदानावर तात्पुरती स्थगीती: सर आयझक यांचा विज्ञान विरोध आज पुन्हा संसदेत दिसून आला... आपल्या दीड तासांच्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी विज्ञान संशोधनावर होणाऱ्या अवास्तव खर्चाला कात्री लावण्याची मागणी रेटून धरली... देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना आणि मुलभूत सेवा व  सुविधेसाठी निधी अपूर्ण पडत असताना देशाच्या होवू घातलेल्या अर्थ संकल्पात विज्ञान केंद्राला संमत झालेला निधी हा अवाढव्य असून निरोपयोगी संशोधनावर खर्च होणारा आहे... फुटकळ विषयावरील संशोधनावर एवढा खर्च करण्यापेक्षा तो निधी आवश्यक सोयी सुविधांसाठी उपयोगात आणावा असे प्रतिपादन त्यांनी केले... त्यांच्या पक्षाने त्यांच्या मागणीला पाठींबा दिला... त्यांच्या या बिनतोड तर्कापुढे सरकारला नमते घ्यावे लागले... विज्ञान अनुदानावर सरकारने तात्पुरती स्थगिती आणली...’

 दुसरी बातमी मार्च महिन्यातील अठरा तारखेची,

            “सर आयझक यांचा विज्ञान विरोध मावळला: या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर आयझक यांच्या विज्ञान विरोध कळीचा मुद्दा होऊन बसला होता... परंतु सरकार आणि विरोधी पक्षातील झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला असून... सर आयझक यांनी आपला विरोध मागे घेतला...  विज्ञान केंद्राला मिळणाऱ्या अनुदानाला आपला पाठींबा जाहीर केला...’

तिसरी बातमी दोन दिवसा आधीची म्हणजे बारा एप्रिल ची होती,
राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याच्या अध्यक्षांनी घेतली विरोधी पक्षनेते सर आयझक यांची भेट: सर आयझक आणि रिचर्ड निकोल यांची गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. कॉलेजपासूनचे मित्र असलेले रिचर्ड निकोल आणि आयझक यांची मैत्री विख्यात आहे. येत्या निवडणूकीचा विचार करता या दोघातील मैत्री आणि वरचे वर होनाऱ्या भेटीगाठी महत्वाच्या समजल्या जातात.”

“ शेरलोक्स, या बातम्यांच्या तुकड्यातून मला तर काहीच उलगडा होत नाही. कुठलीच बातमी नोंद घ्यावी एवढी महत्वाची अर्थातच मिसेस आयझक यांच्या आत्म्हत्तेसंबंधी वाटत नाही.”
“ वाटसन, तुला पहिल्या आणि दुसऱ्या बातम्यामधील विरोधाभास दिसत नाही का?”
“हो, पण या दोन बातम्यांचा आणि मिसेस आयझक च्या आत्महत्येचा काय संबंध?”
“तोच तर आपल्याला शोधायचा आहे. सगळ्या घटना एकापाठोपाठ घडल्यात आणि त्याही एकाच व्यक्तीच्या आयुष्यात म्हणजे त्यात नेमका कुठेतरी एक दुवा असणार...ती कळी आपल्याला सापडली कि आत्महत्येचे खरे कारण कळेल...”
                              ---
काहिवेळातच आम्ही घटनास्थळी पोहचलो. लीस्तार्द आमची वाट बघत होता. त्याने आम्हाला मिसेस आयझकच्या मृतदेहाजवळ नेले आणि तो तिथली परिस्थिती सांगू लागला“शेर्लोकस, आज सकाळी मिसेस आय्झाक आपल्या बेडरूमचे दार उघडत नव्हत्या म्हणून नोकराने सर आय्झाक यांना टेलीफोन करून आपल्या ऑफिसमधून बोलावून घेतले. सर आय्झाक काल रात्रभर ऑफिसलाच मुक्कामी होते आणि ते खरोखरच तिथे होते. मी शहानिशा केली आहे. त्यानंतर सर आय्झाक्नी आपल्या जवळील किल्ली ने मिसेस च्या बेडरूमचे लॉक उघडले बघतो तर काय मिसेस मरून पडलेल्या. आणि त्यांच्या हातात एक पत्र होते.” लीस्तार्दने ते पत्र शेरलोक्स ला दीले. त्या पत्रातील मजकूर तो वाचू लागला. “मी स्वखुशीने माझ्या जीवनाला संपवत आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जब्बाबदार नाही.” पत्र वाचुन झाल्यावर शेरलोक्स ने मिसेस आयझक च्या हस्ताक्षराची शहनिशा केली. ते मिसेस आयझक चेच हस्ताक्षर होते याची खात्री पटली. शेरलोक्स ने लीस्तार्डला विचारले घटनास्थळावरील मिसेस च्या मृत शरीराव्यतिरिक आणखी काही पुरावा सापडला का? लीस्तार्द म्हणाला कि मिसेसचे मृत शरीर सोडले तर कुठल्याही वस्तूला हात लावण्यात आला नाही. ती खोली जशीच्या तसीच आहे. मग शेर्लोक्स आपल्या चौकस नजरेने सगळीकडे निरीक्षण करत होता... तेवढ्यात त्याला दरातील फटीमध्ये मातीचे छोटेशे ढेकूळ दिसले. त्याने ते अलगद काळजीपूर्वक उचलले. आपल्या बोटाच्या चिमटीत पकडून त्या मातीचा रंग तो बघत होता. त्याचा वास घेत होता. त्या ढेकळाला जणू तो प्रश्न करत होता कि रहस्य तुझ्यात तर दडलेलं नसेल?
            त्याने सहज मिसेसच्या बेडरूममध्ये नजर मारली. त्याला उजव्या कोपऱ्यात  खिडकीजवळ काहीतरी आढळले. तो तीथे गेला. आपल्या खिशातील त्याचा आवडता स्पायग्लास काढून तो खिडकीखालील जागा न्याहाळू लागला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याने स्पाय ग्लास माझ्याकडे दिला. मला तिथे मातीचे बरीकशे कण दिसले. मला त्याचा अर्थ कळला नाही पण मला खात्री होती कि माझ्या विचित्र आणि वेडपट मित्राला महाभारत का घडले याच्या खणा खुणा सापडल्या..त्याचा अर्थ फक्त तोच लावू शकतो. शेर्लोक्सने लीस्तार्द कडे मृत शरीराच्या पंचनाम्यावळी काढलेल्या फोटोग्राफ्स ची मागणी केली. लीस्तार्द्ने आपल्या खिशातील पाकीट त्याच्या हाती दिले. शेर्लोक्स पाकिटातील फोटो बघत होता. एक फोटो बघताना त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमधील बदल मला जाणवला. त्या बदलाचा अर्थ मी त्याचा जवळचा मित्र असल्याने मला कळला . फोटो बघून झाल्यानंतर लीस्तार्द चा निरोप घेताना तो शांतपणे फक्त एवढेच म्हणाला कि,
“ इन्स्पेक्टर लीस्तार्द, उद्या सायंकाळपर्यंत आपली भेट होणार नाही, आणि जेंव्हा होईल तेंव्हा तुम्हाला एक धाडसी काम कराव लागेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. उद्या भेटू.”
तिथून बाहेर जात असताना तो म्हनला “आजचा दिवस आपल्याला दमवणारा असेल असे वाटते. चल, आपल्याला मिसेस  आयझकच्या  वडिलांकडे जाव लागेल. ”
“ मिसेस आयझक च्या वडिलांकडे!... पण ते का? तिने तर आत्महत्या आयझक यांच्या घरी केली!”
“ हो पण कधी कधी वर्तमान भूतकाळात गेल्यावरच जास्त चांगला कळतो.”
                        ----
मी आणि शेरलोक्स मिसेस आयझकच्या वडिलांकडे बसलो होतो. ते आम्हाला मिसेस आयझक बद्दल सांगत होते कि ती खरतर खूपच मनमिळावू आणि सहनशील स्त्री होती. ती एक उच्च नैतीक मूल्यांना महत्त्व देत असे व त्या मूल्यांशी प्रामाणिक होती. जीवन जगण्याच्या तिच्या आपल्या काही संकल्पना होत्या. आदर्शवाद आणि सच्चे देशप्रेम या गोष्टी तिच्या आत्मा होत्या. त्यासाठी ती वाट्टेल ते करू शकत होती.
जेंव्हा शेरलोक्सने मिस्टर आणि मिसेस आयझकच्या वैवाहिक जीवनाबद्दल त्यांना विचारले तेंव्हा त्यांचा चेहरा थोडा फिका पडला आणि ते म्हणाले “खरतर आमच्यासारख्या घरंदाज कुटुंबातील गोष्टीची वाच्यता मी कुठे करायला नको पण जे घडल त्याचा विचार करता मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटतय कि माझ्या मुलीचे आणि सर आयझकचे काही तात्त्विक वाद होते. दोघांचेही विचार टोकाचे त्यामुळे दोघांमध्ये कधी मतैक्य व्हायचे नाही. सर आयझक एक संधिसाधू माणूस म्हणून नावाजलेले आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या हिताचे काय एवढाच त्यांचा विचार असतो. उलट माझी मुलगी आदर्शवादी तिला आपल्या नवऱ्याचा संधिसाधुपणा अजिबात आवडत नसे. हि एक गोष्टच त्यांच्या नात्यातील दुखती नस होती. पण या सगळ्यांचा माझ्या मुलीच्या आत्महत्येशी काही संबध असेल असे मला वाटत नाही.”
“संबंध आहे किंवा नाही हे कळण्यासाठी तुम्ही दिलेली माहिती मात्र फार उपयोगाची पडेल हे नक्की.” शेरलोक्सने त्यांचे धन्यवाद मानले आणि आम्ही तिथून निघालो.
मिसेस आयझक बाबतीत बहुपयोगी माहिती आमच्या हाती आली होती असे शेरलोक्सला वाटत होते. आम्ही आता सरळ सर आयझकच्या घरी जाणार होतो. शेरलोक्सची काम करण्याची तऱ्हाच वेगळी आहे. आधी जिथे घटना घडली तिथे न जाता हा भलतीकडेच आपले डोके लावतो. परंतु सुरुवातीला त्याची काम करण्याची पद्धत कितीही अतार्किक वाटत असली तरी शेवटी तोच बरोबर असतो. त्याचा सरळ साधा तर्क आहे कि चार लोक जो विचार करतात आणि त्या विचारातून मार्ग निघत नसेल तर पाचव्याने केलेला विचार कितीही मुर्खासारखा वाटत असला तरी तो बरोबरच असतो. या वाक्यात नेमका त्याला कुठला विचार सांगायचा आहे तो मूर्ख शेर्लोक्सच जाणे.
                        ----
दुसरया दिवसी मी सकाळपासून शेर्लोक्स्च्या घरी एकटाच होतो. आता संध्याकाळ होत आली होती. तो भल्या पहाटे, मी झोपेतच असताना बाहेर निघून गेला. रात्री सुद्धा तो उशिरापर्यंत जागा होता. त्याच्या त्या विचित्र ओबड-धोबड वाटणाऱ्या माशिनशी चाळा करीत... मी सकाळी उठलो तर माझ्यासाठी टी टेबल वर एक चिट्ठी होती... त्याने नोरोप लिहून ठेवला किसायंकाळी ठीक ६ वाजता सर आयझक च्या घरी पोहोच. मला कळले कि याला सर्व प्रकार समजला आहे. त्या चिट्ठीत पुढे लिहिलेलेला मजकूर तर अनपेक्षित होता. त्याने लिहिले “ तुला हे कळल्यावर हसू येईल कि तू ज्या मशीनला नेहमी शिव्या घालायचास तेच मशीन आपल्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. माझी मागील सहा महिन्याची मेहनत माझ्या कामात आली... कशी ते माहिती करून घ्यायचे असेल तर सांगितल्याप्रमाणे वेळेवर पोच.” मला कुठलीतरी रहस्यकथा वाचल्यासारखे वाटयला लागले. मी अजूनही माझ्या तर्काशी झगडत होतो तर शेर्लोक्स निष्कर्शापर्यंत पोचला होता.
      मशीन... जी मला आतापर्यंत वायफळ वाटत होती ती एकदम शेर्लोक्स च्या सृजनात्मक उपलब्धी वाटायला लागली. मी उत्सुकतेने तिच्या जवळ गेलो. त्या माशिनला न्याहाळू  लागलो. तिच्यात काय दडलाय ते बघत होतो... अचानक माझा पाय एका छोट्याश्या रोपट्याला लागला. माझ्या मित्राचे हे नेहमीचेच ..सगळे घर असेच वस्तूंनी पसरलेले असते. कुठलीही वस्तू आपल्या योग्य जागेवर नसते. आता हे रोपटं इथे काय करतंय म्हणून मी त्याला उचलले व ते दुसरीकडे ठेवण्यासाठी निघालो तेवढ्यात ... माशिनवरील हिरवा दिवा लुकलुकताना मला दिसला. मी रोपटे पोर्चमध्ये आणून ठेवले व त्वरेने माशिनिकडे परत गेलो. तर तोपर्यंत हिरवा दिवा बंद झाला. हा काय प्रकार मला कळत नव्हते. मला थोडी घेरी आल्यासारखे सुद्धा वाटले. रोपट्याला थोडीशी ठोकर लागल्याने घेरी येऊ शकते... कि या मशीनची हि काही करामत आहे.. पण मला आपल्याच विचारावर हसू आले. मी परत माशिनमध्ये गुंतून गेलो. ती एक साधीशीच मशीन होती. तिच्या आत एक चुंबक होते. त्यावर वर्तुळाकार चकती बसवली होती. तिला वीज पूरवठा करण्यासाठी एक बटन सुद्धा होते. ते बटन  सुरूच असल्याने मघाशी हिरवा दिवा लागला असेल असे मला वाटले. शेवटी मला त्यातील काही कळत नव्हते म्हणून कंटाळून त्या मशिनचा नाद मी सोडून दिला.. उत्सुकतेने ६ वाजण्याची वाट बघण्याशिवाय मी काही करूही शकत नव्तो.
                              ----
उर्वरित पुढील भागात....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...