वर्ष:१९८३ स्थळ: लॉर्डस क्रिकेटचे मैदान
लॉर्डस चे मैदान..... सामना सुरु होता.... प्रतिक आपल्या आसनावरून
विवियन रिचर्डस कडे बघत होता.. विवियन क्षेत्र-रक्षण करतांना त्याला दिसत होता...
विवयन रिचर्डस आपल्या स्वभावाला साजेसा मनमौजी आणि बिंनधास्त वाटत होता... खरतर प्रतीकला
याच बिनधास्तपणाची काळजी वाटत होती...! विवियनने या क्षणाला तरी थोड गंभीर
व्हाव... निदान फलंदाजीला यायच्या आधी प्रतीकने दिलेला चिटोरा तरी बघावा बस..!!
त्या चीटोऱ्यावर त्याची आणि डॉक्टरांची मोहिमेची यशस्विता अवलंबून होती... पण जर
का तो चिटोरा विवियन ने बघितला नाही तर..!!!??? प्रतिक चिंताक्रांत होवून सामना
बघत होता...प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं लॉर्डस चे मैदान... भारताची फलंदाजी.......आणि..
वर्ष: २०१८ स्थळ:भारतीय विज्ञान केंद्र
डॉक्टर चहा घ्यायला कॅन्टीनमध्ये आले.
आपल्या नेहमीच्या खुर्चीवर बसले. तिथे प्रयोगशाळेतील इतर सहकारी होते परंतु सगळे
दूरदर्शनवरती भारताचा क्रिकेटचा सामना बघण्यात मश्गुल होते. डॉक्टरांना क्रिकेट
अजिबात आवडत नव्हते. त्यांच्यामते क्रिकेटमुळे भारतातील अनेक लोक आपला वेळ आणि
शक्ती खर्च करतात. सामना सुरु नसला तर इतरवेळी क्रिकेटच्या गोष्टी, खेळाडू आणि
त्यांची लफडी असल्या फालतू गोष्टीत रमतात. त्यातल्या त्यात डॉक्टरांना तो
इंग्रजांचा खेळ म्हणून त्याबद्दल तिटकाराच....त्यापेक्षा हॉकी खूप सुंदर खेळ अस
त्यांना वाटायचं.. ते हॉकीच्या आकंठ प्रेमात होते.. कर्नल ध्यानचंद त्यांचे
दैवत..परंतु भारताचा राष्ट्रीय खेळ असल्यावरही हॉकी उपेक्षित राहिला याची खंत
त्यांना वाटायची पण त्यासाठी ते काही करुही शकत नव्हते.. हॉकीसाठी त्यांचा जीव
तुटायचा..उधम सिंग,लेस्ली क्लोडीअस,धनराज पिल्ले, बलबीर सिंग सिनिअर यांचे कित्येक
किस्से त्यांच्या जीवनाच्या आनंदाचे एक कारण होते.. धनराज पिल्लेचा खेळ बघायला
त्यांना खुप आवडे. तेंडूलकर एवजी पिल्ले हा भारताचा स्पोर्ट आयकॉन व्हावा अस
त्यांना वाटे.... त्यांची खूप इच्छा होती कि आपल्या जिवंतपणी भारताने एकदा तरी हॉकीचा
विश्वचषक जिंकावा जेणेकरून भारतातील लोक परत हॉकी बघायला सुरुवात करतील आणि हॉकीला
चांगले दिवस येतील... जसे १९८३ चा क्रिकेट-विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचाच बोलबाला झाला आणि आज
क्रिकेटने अक्षरशा लोकानां वेड लावलंय...
ते आपल्याच तंद्रीत असताना तिथे
त्यांचा विद्यार्थी प्रतिक पोचला. त्यांच्या शेजारी बसत प्रतीकने चहा
मागवला व डॉक्टरांशी बोलायला लागला,
“सर, कसला विचार करताय?’
“क्रिकेट!! हा खेळ वाटोळ करेल आपल्या देशाच. त्यात ते स्पोट फिक्सिंग,
म्याच फिक्सिंग... सारी नैतीकताच घालवलिय... भांडवलशाही खेळ आहे...पूर्वी पाच
दिवस, मग एक दिवस आत ते २०-२० ... वर्षभर फक्त क्रिकेट, क्रिकेट क्रिकेटच... अरे
बाकीचेही खेळ आहेत... ज्यात कस लागते..
जास्त शारीरिक तंदुरस्ती लागते... !!!”
त्यांना मधेच थांबवत प्रतिक म्हणाला, “जाऊ द्या हो सर, आपल्या काळजी
केल्यामुळे काही होणार आहे का?”
“हं....!!! होईल...!! नक्की होईल..! माझ्या डोक्यात एक कल्पना आलीय...
सायंकाळी निवांत बोलूयात... तू ये माझ्या बंगल्यावर.. आणि आज कार्यालयातील कामे
तूच सांभाळ.. कुणीही आल तरी मला फोन करू नकोस... चल येतो मी... पण तू सायंकाळी न
चुकता ये.. आपल्याला हे क्रिकेटच भूत उतरवावंच लागेल.”
डॉक्टर खूपच गडबडीत निघून गेले... नेहमी सारखे.. पण आज थोडी वेगळीच
झाक होती त्याच्या डोळ्यात असे प्रतीकला वाटले. संध्याकाळी भेटून नेमक
डॉक्टरांच्या मनात काय सुरु आहे ते कळेल म्हणून तोही चहाचे पैसे देवून निघून
गेला.....
वर्ष:१९८३ स्थळ: लॉर्डस क्रिकेटचे मैदान
प्रतिक विवियन कडे टक लावून बघत होता. जेनेकरुन त्याला तो इशारा करू
शकेल कि तुझ्या खिशातील चिटोरा नक्की बघ... परंतु भारताची फलंदाजी संपली तरी
विवियनची नजर त्याला पकडता आली नाही. शेवटी भारताने ५५ व्या षटकात सर्वबाद १८३
धावा काढल्या आणि सगळे खेळाडू पव्हेलीयनकडे जायला निघाले. नेमका तेंव्हाच विवियनला
प्रतिक दिसला. प्रतीकने त्याला चिटोरा वाच असा इशारा केला. विवियन खिशात हात घालून
चिटोरा बघायला लागला आणि एकाएक जागीच थांबला.....
विवियनने तिथल्याच एका सुरक्षा कर्मचाऱ्याला बोलावले व
प्रतिककडे बोट दाखवत काहीतरी सांगितले.
विवियन पुढे निघून गेला आणि सुरक्षा कर्मचारी प्रतिककडे आला. प्रतीकला विवियनने
ड्रेसिंग रूम मध्ये भेटायला बोलावले असे सांगितले. प्रतिकच्या चेहऱ्यावर समाधान
दिसले. दुसर्यांदा तो ड्रेसिंगरूकडे जात होता...
प्रतिक पव्हेलीयन जवळ पोहचला. त्याचीच वाट बघत थांबलेला विवियन त्याचे
बखोटे पकडून त्याला आपल्या खोलीत जवळ जवळ ओढतच घेवून गेला. दार बंद करुन त्याला
विचारले,
“सामना सुरु
व्हायच्या आधी तू विनवणी करून दिलेला चिटोरा मी आता बघितला. कोण आहेस तू? आणि हि
काय भानगड आहे? या चीटोऱ्यावरील
लिहिलेल्या गोष्टी तुला आधीच कशा ठावूक? .. भारतीय दिसतोस म्हणजे
जादू टोना, भविष्य, काळे जादू तुला येतच
असेल?” वगैरे वगैरे प्रश्नांची सरबत्ती...
त्याला शांतपणे प्रतिक उत्तर
देत म्हणाला,
‘विव, आधी शांत हो आणि माझ काय म्हणन आहे ते ऐकून घे.” विवियन शांत झाला. प्रतिक बोलायला लागला,
“हा जो चिटोरा मी तुला सामना सुरु व्हायच्या आधी दिला होता. तो कागद
एक कम्प्युटरच्या माध्यमातून काढलेली प्रिंट आहे.”
“प्रिंट? म्हणजे कसं?”
“या सगळ्या गोष्टी १९८३ मध्ये लोकांना कळणार नाहीत पण तरी तुला
समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. भविष्यातील २०१७ साली मानवाने विज्ञानात खूप
प्रगती केली आहे. आणि मी त्या प्रगत काळातून प्रवास करून आजच्या दिवशी इथे फक्त
तुला भेटायला आलो आहे.”
“म्हणजे तू काळाचा प्रवास करून आला आहेस”
“हो. एच.जी.वेल्स ने आपल्या कादंबरीत सांगितल्या प्रमाणे २०१७ तील
मानव टाईम ट्रावेल करू शकतो.”
विवियन आश्चर्याने त्याचे म्हणणे ऐकत होता,
“...परंतु त्याचा वापर बेकायदा ठरवल्यामुळे आणि
सोबतच खर्चिक असल्यामुळे फक्त अति-महत्वाच्या संशोधनासाठीच शाशनाकडून असल्या
प्रवासाची परवानगी दिल्या जाते... पण ते जावू दे, महत्वाच हे कि, आता मी तुला भेटायला
आलोय खरा परंतु मी शासनाची परवानगी काढलेली नाही कारण... “
“पण तु भूतकाळात कशासाठी आला आहेस?”
“तुला भेटायला.”
“...म्हणजे?!”, विवियन दचकुनच म्हणाला.
“हा चिटोरा बघ. १९८३ चा हा विश्वचषक भारत
जिंकणार आहे. तुला आधीच दिलेलं भारताच्या फलांदाजीचे स्कोर कार्ड..
विवियन याच गोष्टीमुळे तर अचंबित झाला होता.
सामना सुरु व्हायच्या आधी प्रतीकने विवियनची भेट घेतली आणि त्याची इच्छा नसताना
खूप विनवणी करून हा चिटोरा त्याला दिला होता. परंतु सामना सुरु होण्याच्या गडबडीत त्याने
तो तसाच आपल्या खिशात कोंबला होता. आता बघतो तर काय त्यातील प्रत्येक गोष्ट
तंतोतंत खरी होती.
“विव,हे मी तुला आधीच दिल असल्याने तुला
विश्वास तर बसलाच असेल कि मी जे बोलतो ते सत्य आहे. आणि आता हे बघ वेस्ट इंडिजच्या
फलंदाजीची आकडेवारी जी मी २०१७ मधून आणली आहे... तू ३३ धावांवर बाद होणार आहेस...
आणि पूर्ण वेस्ट इंडीज संघ १४० धावांवर...
या सामन्यात तू ३३ धावांवर बाद होणार
आहेस..आणि तू बाद झाला म्हणजे भारत विश्वचषक जिंकला....तुझा बळी या सामन्यात खूप
मोलाचा ठरणार आहे..”
“.......!!!???” रिचर्डसची वाचाच बंद झाली.
“आता तुझ्या फायद्याची गोष्ट ऐक...मला तू हा
सामना जिंकावा अस वाटत... म्हणूनच मी भूतकाळात येवून तुला भेटतोय. मला तेवढा
तुझ्या बाद होण्याचा क्षण बदलावायचा आहे... तुला फक्त मदनलाल च्या १४ व्या षटकातील—चेंडूवर
स्वताला बाद होण्यापासून वाचवायचं आहे... कारण मदनलालच्या गोलंदाजीवर तुझा झेल
उडेल आणि कपिल देव त्याला झेलेल हे ठरल आहे.. पण जर का तिथे तू बचावलास तर तू
एकहाती सामना वेस्ट इंडीजला जिंकून देशील.....”
विव रिचर्ड सगळ ऐकून
अचंबित झाला. त्याला आपण विज्ञान कथेतील एखादे पात्र असल्या सारखेच वाटले किंवा
स्वप्नात असल्यासारखे.... त्याच्या
हातातील भारताच्या फलंदाजीची आकडेवारी तंतोतंत खरी होती... आणि करेबियन
फलंदाजीचीही आकडेवारी खूप काही सांगत होती.. त्यातील फलंदाजाची उतरंड आधीच ठरवल्यासारखी
होती.. विवियनला आठवले कि त्यांनी कालच्या बैठकीत नेमका हाच फलंदाजी क्रम ठरवला
होता आणि तो क्रम वेस्ट इंडीज संघ वगळता इतरांना माहिती असण्याची शक्यात
नव्हतीच... म्हणजे प्रतीकच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासारख खूप काही होत.
तरी विवियन साशंक होता, “ पण तू भारतीय असून
हा सामना भारताने जिंकू नये अस तुला का वाटत...?
“सांगतो, तेही सांगतो.......” आणि प्रतिक
विवियनला सांगायला लागला...
वर्ष:२०१८ स्थळ: डॉक्टरांच्या बंगल्यावर
ठरल्यावेळी प्रतिक डॉक्टरांच्या बंगल्यावर
पोहचला. त्याचीच वाट बघत असलेले डॉक्टर तो येताच त्याला घेवून आपल्या अभ्यासिकेत
गेले. आतुन दार बंद केले. आणि अगदी लहान बाळासारखे उत्साहित होवून बोलायला लागले.
“प्रतिक, तू कधी काळ-प्रवास केलाय?”
“नाही सर, का?”
“मी केलाय एकदा, पण तेंव्हा मी तरुण होतो.
असला प्रवास खडतर असतो. या प्रवासात तुमच्या शरीराची चांगलीच झीज होते. काही
दिवसांनी ती भरून निघते परंतु प्रवास करयच्या आधी तुमच आरोग्य उत्तम असल तर कधीही
चांगलच.. नाहीतर हा प्रवास जीवघेणा होवू शकतो.”
“सर, हे मला माहिती आहे पण आज हा विषय
माझ्यासोबत बोलताय त्याच कारण...?”
“कारण ... कारण म्हणजे तू तरुण आहेस आणि तुला
चांगल आरोग्य मिळालंय... त्यामुळे तू हा प्रवास करू शकतोस... मी करू शकत नाही.” नेमक डॉक्टरांच्या मनात काय चाललय याचा थांग
प्रतीकला लागत नव्हता. तो निमुटपणे ऐकत उभा होता. डॉक्टर पुढे बोलू लागले,
“प्रतिक, आज कॅन्टीनमध्ये आपल बोलन झाल
तेंव्हा पासुन माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. ती वरकरणी असंभव वाटत असली तरी
ती प्रत्यक्षात आणणे तितकेसे कठीण जाणार नाही.”
“कुठली कल्पना,सर?”
“बघ, बटरफ्लाय इफेक्ट तुला ठावूक आहे...”
“हो... पण त्याच काय?”
“या थेअरीनुसार, भौतिक जगात घडणारी लहानातील
लहान घटना, हालचाल हि महत्वाचि असते म्हणजे ती छोटीशी घटना जगातील भौतिक गोष्टीवर
परिणाम पाडू शकते... आणि मग त्या छोट्याश्या घटनेमुळे बदलांची एक शृंखला निर्माण
होते पुढे हीच शृंखला, छोटे-छोटे बदल भौतिक जगाच रूप पालटतात. उदाहरणार्थ, समजा,
एक मुलगा आहे. त्याला नोकरीच्या मुलाखतीला जायचं आहे. तो रस्त्याने निघालाय आणि
मधेच त्याच्या बुटाची लेस सुटली. आता ती लेस बांधण्यासाठी त्याला वीस सेकंद वेळ
लागला अस समजू. ती कृती करण्यासाठी लागलेले वीस सेकंद त्याच्या पूर्ण आयुष्यावर
परिणाम करणारे ठरू शकतात. म्हणजे बघ तो लेस बांधून पुढे जातो .. लेस बांधल्यामुळे
जो वेळ गेला त्यामुळे त्याला पुढे ट्रफिक सिग्नल वर थांबाव लागल. तो सिग्नल पार
करून जातो तर त्याला रेल्वे स्टेशन साठी जाणारे वाहन उशिरा मिळते आणि कसाबसा
स्टेशनला पोहचतो तर रेल्वे अवघ्या काही क्षण आधी निघून गेली असते. तो आता
मुलाखतीला वेळेवर पोहचू शकत नाही. त्यामुळे त्याला नोकरी मिळत नाही. ती न
मिळाल्यामुळे त्याला दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जाव लागत. तिथे त्याला नवीन लोक
मिळतात...वगैरे वगैरे.....एकंदरीत काय तर त्या वीस सेकांन्दातील त्या छोट्याश्या
कृतीमुळे त्याच्या जीवनाचा प्रवाह बदलला. आता असा विचार केला कि समजा ती बुटाची
लेस सुटली नसती तर....”
““तर... तर
कदाचित त्या मुलाच्या आयुष्यात अनेक गोष्टी वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या.
जस कि तो वेळेवर सिग्नल पार करून गेला आणि त्यामुळे त्याला रेल्वे स्टेशनसाठी वाहन
मिळाले.. तो वेळेवर रेल्वेमध्ये चढू शकला आणि मुलाखतीच्या वेळी हजर झाला. त्याला
ती नोकरी मिळाली आणि तो त्याच शहरात स्थायिक झाला.... ”
“बरोबर, कदाचित तिथून पुढे त्याच्या आयुष्यात
वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या... जर का आपण थोड मागे गेलो आणि ती लेस सुटण्याची
वेळ गाठली आणि तिला सुटू दिले नाही तर....? जगत असतांना अशा खूप गोष्टी आपल्यासोबत
घडलेल्या असतात कि आपण फक्त त्या एका क्षणाला जबाबदार धरत असतो. खुपदा असा विचार
करतो कि तो एक क्षण मी बदलू शकलो तर... एका क्षणाच एवढ महत्व असते.!!!!”
“सर हे खूप अफाट आहे...”
“हं!!! मग या गोष्टीवर मी दुपारपासून विचार
केला आणि आपण दोघे असा प्रयोग करायचा हे ठरवलं... म्हणजे तू सोबत आहेसच अस ग्राह्य
धरलय मी... त्यासाठीच दुपारी घरी येवून संपूर्ण प्लान आखलाय.”
“आणि हा प्रयोग यशस्वी झालेला मला बघायचा आहे
सर! मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे.”
“ऐक तर मग, आजपासून बरोबर ३ महिन्यांनी
म्हणजे २५ जून २०१८ ला भारताला १९८३ चा क्रिकेट
विश्वचषक जिंकून ३५ वर्ष पूर्ण होतील. आपल्याला हीच वेळ साधायची आहे. विज्ञान
भवनातील टाईम मशीनचा उपयोग करून आपण ३५ वर्ष मागे सहज जावू शकतो. परंतु ती मशीन
वापरायची असेल तर शाशानाला सर्व कारणे आणि डीटेल्स द्यावी लागतील. आपण मशीन
कशासाठी वापरणार आहे हे कळल्यावर शाशन आपल्याला मशीन वापरण्याची परवानगी देणार
नाहीच म्हणून आपल्याला ती चोरून वापरावी लागणार आहे....”
“पण आपल्याला ती नेमकी कशासाठी वापरायची
आहे?”
“अरे हो ते सांगायचं राहिलच.... भारताला या
क्रिकेटने वेड लावलय. मला हे बदलायचं आहे. भारतात क्रिकेटचा प्रसार का झाला? यावर
जेंव्हा मी विचार केला तेंव्हा लक्षात आल कि १९८३ चा विश्वचषक भारताने जिंकला आणि
त्यानंतर भारतात क्रिकेट झपाट्याने वाढले. समजा भारत तो विश्वचषक जिंकला नसता
तर... तर आज जिकडे-तिकडे हॉकीसारखा खेळ
खेळल्या गेला असता. मला क्रिकेट पासुन सुटका हवीय. मला हॉकी एक महान खेळ झालेला
बघायचं आहे. त्यासाठी भारताला १९८३ चा विश्वचषकात हारावे लागेल.”
“पण ते कस करायचं...”
“जस कि आपण मघाशी बोललो कि एक छोटीशी घटना
सुद्धा खूप मोठे बदल घडवू शकते आपल्यालाही तेच करायचं. भारताला विश्वचषक जिंकता
आला कारण त्यादिवशी वेस्ट इंडीज चा ख्यातनाम फलंदाज रिचर्डस लवकर बाद झाला. त्याचा
कपिल देवने घेतलेला झेल खूप महत्वाचा होता. आता जर का तो क्षण आपण बदलला तर.
म्हणजे तू भूतकाळात जावून तशी तजवीज केली कि रिचर्डसला तेवढा चेंडू बचावात्मक
खेळायला लावला तर तो झेलबाद होणार नाही आणि एकहाती सामना वेस्ट इंडिजला जिंकुन
देईल.”
“पण सर हे त्याला कस सांगायचं?”
“त्याची काळजी करू नकोस. तुझी आणि त्याची भेट
कशी होईल याची व्यवस्था आपल्याला लावता येईल.”
वर्ष:१९८३ वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरु
व्हायच्या आधी
“...... आणि अशाप्रकारे मी ३५ वर्ष भूतकाळात
येवून तुझ्यापुढे उभा आहे. नशीब २०१७ सारखी सुरक्षा व्यवस्था १९८३ मध्ये नाहीय..
असती तर तुला एवढ्या सहज भेटता आल नसते.”
प्रतीकने विवियनला सारा वृतांत सांगितला.
विवियन ने आपल्या हातातील चीटोऱ्यावर नजर
टाकली. त्याच्या नावापुढे २८ चेंडूत ३३ धावा लिहिलेल्या त्याला दिसल्या आणि
सगळ्यात खाली भारत ४३ धावांनी विजयी असे लिहिलेले दिसले. त्याने एकदा प्रतिकच्या
चेहऱ्याकडे बघितले आणि मंदसे स्मित देत प्रतिकची रजा घेतली.
प्रतिक सामना बघायला आपल्या जाग्यावर येवून
बसला. तिकडे विवियन फलंदाजीसाठी तयार व्हायला निघून गेला.
विवियन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार
होता. तो अधून मधून हातातील कागदावर बघत होता आणि तेवढ्यात वेस्ट इंडिजचा पहिला
गडी ५ धावांवर बाद झाला.. ग्रीनीज... त्याने बारा चेंडूत फक्त एक धाव काढली होती.
विवियनने तेंव्हाच आपल्या हातातील कागदाकडे बघितले आणि.... त्याला आता सगळे कळून
चुकले. त्याने दुरूनच प्रतिकला अंगठा दाखवला. त्याचा अंगठा बघून प्रतीकही समाधानी
झाला....
वर्ष: २६ जून २०१८
प्रतिक झोपेतुन उठला. कितीतरी वर्षाची झोप
घेवून आल्यासारखे त्याला वाटत होते. तो कामावर जायला निघाला. डॉक्टरांचा त्याला
लवकर कामावर ये असा संदेश आला होताच. त्याने लवकरच तयारी केली. आपल्या चारचाकीत
बसला. तेवढ्यात त्याच्या बुटाची लेस सुटलेली दिसली.. ती परत बांधून झाली आणि गाडी
सुरु केली. लेस बांधण्यात वेळ गेल्यामुळे पुढल्या चौकात सिग्नलवर त्याला गाडी
थांबवावी लागली. तो गाडीच्या काचेतून बघत होता, आपल्या उजवीकडे बघितले तर तिथे
त्याला धनराज पिल्ले याचे मोठे पोस्टर लागलेले दिसले. डावीकडे वानखेडे हॉकी
स्टेडीयम सजवल्या जात होते. आज भारत आणि पाकिस्तानचा हॉकी सामना होता. त्याला कळले
कि डॉक्टर आज कामाला दांडी मारून हॉकी सामना बघायला जातील. या हॉकीमुळे साऱ्या
देशाच वाटोळ होईल एक दिवस असेही त्याला वाटले. तिकीट घेण्यासाठी मैदानाबाहेर
लांबलचक रांग दिसत होती त्यामुळे पुढे कदाचित ट्रफिक जाम झालाही असेल अस त्याला
वाटल. तेवढ्यात सिग्नल सुटला... आज सिग्नलमुळे कामावर पोहचायला त्याला वीस सेकंद
उशीर होणार होता...
1 टिप्पणी:
One of the best science stories I ever read
टिप्पणी पोस्ट करा