.
इंग्रजी साहित्यात आम्हाला ‘लेस्बिअन ओड’
नावाचा एक काव्य प्रकार अभ्यासाला होता..तसा तो आजही शिकवल्या जातो.. त्याला
‘होरेशिअन ओड’ सुद्धा म्हटल्या जाते कारण कवितेचा हा प्रकार हॉरास नावाच्या ग्रीक
कवीने निर्माण केला...
जेंव्हा आम्हाला लेस्बिअन ओड शिकवल्या गेले तेंव्हा
‘लेस्बिअन’ या शब्दाला आजच्यासारखा आणि आजच्या इतका तो लैंगिक संदर्भात वापरात नव्हता..... आज मात्र जेंव्हा-केंव्हा
‘लेस्बिअन ओड’ शिक्षक म्हणून वर्गात शिकवायचे असेल तर ‘लेस्बिअन’ शब्द उच्चारायला
पहिल्यांदा चाचरतो... दोनेक सेकंद विद्यार्थ्यांची छुपी प्रतिक्रिया बघतो... कुणी
खट्याळ हसू आवरते घेत असतो तर कुणी कोपरखळी देत असते.. कुणी हळूच सोबत्याला
डोळ्यांनी मिचकावत असते... नाही म्हटले तरी ग्रामीण आणि निमशहरी भागातील
मध्यमवर्गीयांसाठी अजूनही ‘लेस्बिअन’ ‘गे’ हे शब्द सार्वजनिक जीवनात निषिद्ध आहेतच... पण या
शब्दाची खरी कहाणी सांगतली तर विद्यार्थ्यांच्या मनातील शब्दाशी जुळलेले गैरसमज
काही अंशी दूर होतात आणि त्या शब्दाच्या वापराला ते सरावतात....
मध्यंतरी मीना प्रभूंचे ‘ग्रीकांजली’
प्रवासवर्णन वाचण्यात आले. त्यात त्यांनी ‘लेस्बिअन’ या शब्दाबद्दल छान पण थोडीच
माहिती दिली... मग याच शब्दाचा मागोवा घेऊयात आणि ‘लेस्बिअन’ शब्दाची गोष्ट वाचूयात.....
ग्रीक... अनेक नगरराज्यांचा समूह.... अर्गोस,इथका,स्पारटा,
थेब्स, अथेन्स वगैरे ... आणि त्यातील एक ‘लेस्बोस’......
लेस्बोस... मूळ ग्रीक भूमीपासून दूर ईशान्येकडे
एजीयन समुद्रातील एक बेट... ग्रीकांपेक्षा ट्रोयशी जास्त सलगी ठेवणारे बेट....
खरेतर आशिया मायनर मध्येच मोडायला काही हरकत नाही असे....
ग्रीक दंतकथेनुसार, मेकेरस नावाच्या राजाने इथे
सर्वप्रथम आपले राज्य स्थापन केले.. पुढे त्याच्या ‘मेथेमना’ नावाच्या मुलीने ‘लेस्बोस’
नावाच्या देवाशी लग्न केले... आणि अशाप्रकारे ‘लेस्बोस’ त्या राज्याचा
उत्तराधीकारी ठरला... आणि स्वताचे नाव आपल्या
राज्याला दिले.
लेस्बोस राज्यातील प्रत्येक गोष्ट हि ‘लेस्बियन’
म्हणून ओळखल्या जात जसे लेस्बिअन ओड, लेस्बियन वाईन, लेस्बियन भाषा, लेस्बिअन लोक...
इत्यादी.. हे एक सहज वापरले जाणारे विशेषनामापासून बनवलेले नामसाधित विशेषण आहे
इतकेच....पण आज त्याला लैंगिक अभिमुखतेने वापरल्या जात असल्याला एक कारण आहे.... ते कारण म्हणजे ‘सफो’....
सफो.... ई.स.पु. सातव्या शतकातील लेस्बोस
राज्याची रहिवाशी...एक उत्कृष्ट कवी.. होमरशी बरोबरी करणारी... होमरला तेंव्हाचे
लोक ‘द पोएट’ म्हणायचे तर सफोला ‘द पोएटेस’.. तिच्या कवितेची दखल साक्षात
सॉक्रेटिसला घ्यावी लागली.. ती एक उत्कृष्ट परफोर्मर होती तसेच उत्तम शिक्षिका
होती.. तिच्याकडे अनेक मुली काव्याचे आणि संगीताचे शिक्षण घ्यायला यायच्या...
नेहमी तरून मुलींच्या गराड्यात राहायची, त्यांना चालीवर कविता गायला शिकवायची...
तिने लिहिलेल्या अनेक कविता काळाच्या ओघात गहाळ
झाल्यात. सफो आता फक्त ६००-७०० ओळींमधून आपल्यापर्यंत पोहचू शकली..
तिच्या सापडलेल्या कवितासुद्धा अपूर्णच आहेत.
त्यातील दोन कविता खूप महत्वाच्या समजल्या जातात. ‘ओड ऑन अफ्रोडाइट’ आणि ‘सफो-३१’
नावाचा एक तुकडा....
या दोनच कवितेच्या तुकड्यावरून आणि इतर उपलब्ध
ऐतिहासिक पुरवायच्या तर्कावरून सफोबद्दल काही गोष्टी बोलल्या जातात.. त्या म्हणजे ती
समलिंगी होती, तिला स्त्री शरीराचे आकर्षण होते, ती ज्या मुलींना शिकवायची त्यांच्याशी
तिचे शारीरिक जवळीकता होती इत्यादी... सफो-३१
या तुकड्याच्या इंग्रजी अनुवादावरून मराठीत मुक्त अनुवाद करण्याचा प्रयत्न करतोय
जेणेकरून तिच्यासंदर्भातील समज-गैरसमजावर भाष्य करणे सोपे जाईल:
“ तो पुरुष.. जो बसलाय तुझ्या समोर
आणि अगदी जवळून ऐकतोय तुझे मंजुळ बोलणे सोबतच हसतोय आनंदाने
.. तो ईश्वरच आहे
असे वाटेत मला..
त्याचे असे आनंदी असणे मला सहन होत नाही...
माझ्या वक्षस्थळाच्या आतील मनाची तडफड होतीय नुसती...
निमिषभर जेंव्हा बघते तुला मी,
तेंव्हा
निशब्द होवून जाते मी, जणू माझी जिव्हा दुभंगली आहे आणि
माझ्या शरीरभर विखारी आग वाहतेय.. नखशिखांत....
तेंव्हा
मी काहीही बघू शकत नाही माझ्या डोळ्यांनी ..
कानामध्ये फक्त
कर्कशता किरकिरते...
शरीरावर थंड स्वेद आणि थरथर अनुभवते मी,
तृणपात्यापेक्षा निस्तेज होत जाते... जणू आत्मा निघून जाईल
माझ्यातून
मात्र.. मला हे सगळे सहन करावेच लागेल..भोगावेच लागेल... “
या आणि अशा आशयाच्या इतर ओळीमधून सफो हि समलैंगिक होती असा
समज दृढ होत गेला. या कवितेमधून तिची एका स्त्रीसाठीची ओढ, तिच्या शारीरिक
सहवासाची कामना, तिच्या समीप असलेल्या इतर पुरुषांबाबत मत्सर आणि इतर गोष्टी ठळक
नजरेत भरणाऱ्या आहेत...
एका स्त्रीला दुसर्या स्त्रीबद्दल वाटणाऱ्या भावनेची
अभिव्यक्ती करणारी, मुळात समलैंगिक असलेली जगतमान्य पहिली ज्ञात स्त्री म्हणजे ‘सफो’... अशी स्त्री जिच्या हृदयाला कळले
प्रेम नवे !!! म्हणून स्त्री समलैंगिकतेसाठी ‘सफीक’ हा एक प्रतिशब्द तर आहेच पण हि
सफो जिथे राहते ते म्हणजे ‘लेस्बोस’ म्हणून स्त्री-समलैंगिकतेसाठी ‘लेस्बिअन लव्ह’
हा शब्द रूढ झाला...

२ टिप्पण्या:
Well written!!!
Great
टिप्पणी पोस्ट करा