मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

एक मराठा समाजातील तरुण म्हणून...

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्थिती मला तितकीशी माहित नाही. पण विदर्भातील त्यातल्या त्यात अकोला,अमरावती,बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील मराठा समाजात मी वावरत असल्याने त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे जे काही आकलन मला झाले आहे त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने मला जाणवल्या त्या संक्षिप्त इथे मांडाव्या वाटतात....

एक मराठा तरुण म्हणून मराठा समाजा समोरील भविष्य काय आहे?

विदर्भातील बहुतेक मराठा समाज हा कुठल्या तरी फ़ैइल,पुरा किंवा नगरात राहतो उदा. द्यायचे झाले तर अकोट फ़ैइल, कमेटी फ़ैइल, सती फ़ैइल, हमाल पुरा आणि कॉपी राईट मिळवलेले शिवाजी नगर...ई. (मी इथे बहुतेक म्हणतोय) त्यामुळे तसे बघितले तर तो बर्यापैकी एकमेकांच्या संपर्कात असलेला आणि संघटन करून राहिलेला समाज आहे. मग आधीच संघटीत समाजाला प्रचंड मोर्चा काढून आपले संघटन शक्ती दाखवण्याची वेळ का आली?

वरील प्रश्नाचे उत्तर कळण्यासाठी आतापर्यंत काय स्थिती होती हे बघणे गरजेचे होते. मी काही समाज शास्त्रज्ञ नाही का कुठला शास्त्रीय अभ्यास करून निष्कर्ष मांडणारा नाही. या समाजातील एक शिक्षित तरुण म्हणून माझी काही निरीक्षण सांगतोय...

तर या भागातील बहुतेक मराठा तरुण हा अशिक्षित किंवा अर्धशिक्षित होता. आजही आमच्या आधीची पिढी जर बघितली तर मोजके सोडल्यास सगळे अंगमेहनितीचे काम करणारे दिसतात. हमाल म्हणून, कुली म्हणून किंवा एकाद्या किराणा दुकानात काम करणारे म्हणून. विदर्भातील मराठा या लोकांवर हि स्थिती का आली तर त्यांनी मराठवाड्यातून जेंव्हा स्थलांतर(त्याची अनेक कारणे आहेत) केले तेंव्हा आपली शेती आणि घरदार सोडून इकडे आले. इकडे अंग मेहेनत केल्या शिवाय पर्याय नव्हता. खाणारे खूप असल्याने घरातील बायका-मुले सुद्धा कामाला जायची. मागच्या दोन पिढ्यांनी कसे बसे इथे दिवस काढले. अस जगत असतानाही त्यांना परत आपल्या मुळ गावी जावेसे वाटले नाही कारण तिथली परिस्थिती त्यापेक्षाही भयंकर होती.

इथे स्थाईक झाल्यावर काहींनी शेती विकत घेतली आणि काहींनी व्यवसाय निवडला. तरीही शिक्षणाच्या बाबतीत आम्ही मराठे मागास राहिलो. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून दूरच होतो. आमच्या आजच्या पिढीच्या आधीच्या पिढीला शिक्षणाचे महत्व पटायला लागले आणि त्यांनी आपल्या मुला बाळांना शाळेत घालायला सुरुवात केली. आता कुठे शिक्षित मराठा तरून दिसायला लागला. हा तरुण जेंव्हा ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आला तेंव्हा त्याला स्वतावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव व्हायला लागली. त्याची आर्थिक स्थिती ठीक नसतानाही शिक्षणाचा भला मोठा खर्च सहन करावा लागला. पुढे उच्च शिक्षणासाठी खूप अडचणी जाणवायला लागल्या. त्यातून तरुणांमध्ये आरक्षणाची मागणी जोर धरायला लागली कारण त्यांना आर्थिक मागासलेपण पावलोपावली दिसत आले.

आजही जर प्रामाणिक सर्वेक्षण केले तर पंचाहत्तर टक्के मराठा बांधव आर्थिक दृष्ट्या मागासले आहेत. थोडक्या सधन मराठा समुहाचा विचार न करता, तथ्य लक्षात घेतली तर खरोखरच आरक्षणाची किती गरज आहे हे जाणवेल. सध्यस्थितीत जो मोर्चाने जोर धरलाय त्याचा विचार करता मराठी तरुणांनी आरक्षनाच्या मागणीला उचलून धरायला पाहिजे.  

कोपर्डी घटनेच्या आरोपींना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ती होईलच त्यात कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अटरॉसिटी कायदा रद्द करणे हि गोष्ट मला थोडी अशक्य वाटते म्हणून त्यात शक्ती खर्च न करता (आणि त्या कायद्याचा सामाजिक संदर्भातील उपयोगिता लक्षात घेता) त्या कायद्यात योग्य त्या बदलाची मागणी करून आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आलेल्या संधीचा उपयोग घेणेही तेवढेच गरजेचे आहे. कुणाला ठाऊक कि परत एवढा जनसमुदाय एकत्र येईल? मराठा बांधव भावनिक आहेत आणि त्यांच्या याच सद्गुणामुळे  आज ते एवढ्या मोठ्या संख्येने एक झालेत. आज त्यांना त्यांची मुले सुरक्षित वाटत नाहीत म्हणून ते पेटून उठलेत. हि आग शांत होण्या आधी हिचा योग्य वापर केल्या गेला पाहिजे आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी त्यांनी आरक्षणाची मागणी पूर्ण होई पर्यंत असेच एक राहायला हवे.


आज खेड्यापाड्यातील मराठा तरुण शहरात होणार्या मोर्चात हिरहिरीने सहभागी होताना दिसत आहे कारण खेड्यात राहताना, शेती करताना आर्थिक अडचणी कशा जीवघेण्या ठरत आहेत हे आपण सगळे जाणतोच म्हणूनच खेड्यातील तरुण सुद्धा शेतीकडे तोंड फिरवायला लागलेत. आपल्या शेतीवर अतोनात प्रेम करणारा मराठा तरुण, लग्न ठरवते वेळी नोकरी नसली तरी चालेल पण मुलाकडे शेती आहे म्हटले तरी मुलगी द्यायला तयार असतात, एवढे शेतीचे महत्व ज्यांना वाटते तेच शेतीला दुय्यम समजत आहेत आणि नोकरी-व्यवसायाकडे वळत आहेत. याचा अर्थ याच नाही तर या आधीच्या सरकारांकडून शेतीकडे पार दुर्लक्ष झाले आहे. म्हणून मराठा शेतकऱ्याला शांत आणि संयमी ठेवायचे असेल तर शेती धोरणात आमुलाग्र बदल करावा लागणार आहे. जेणे करून त्यांची आर्थिक स्थिती चांगली होईल आणि हा असंतोष नष्ट होईल. शेतीचा विकास अपेक्षित प्रमाणात झाला असता तर कदाचित मराठा समाज जो बहुंशी शेतीवर जगतो तो एवढा असंतुष्ट वाटला नसता. मध्यम वर्ग म्हणावे किमान एवढी जरी मला शेतीतून आवक मिळायला लागली तर मी आजही नोकरीच्या फंदात न पडता शेतीत गुंतलो असतो परंतु माझ्या बापाचे हाल बघितल्यावर मला त्या शेतीचा तिटकारा यायला लागला. मला इथे काही माझ्या आर्थिक परिस्थितीचे भांडवल करून सहानुभूती मिळवायची नाहीय.. माझे म्हणणे सहज आणि सरळ आहे कि आम्हा मराठा तरुणांसामोरील समस्या मोर्च्यातील बांधवांनी समजायला हव्यात आणि त्यानुसार आपल्या मोर्च्याला योग्य ते स्वरूप द्यायला हवे...   

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

पोलीस आणि प्रार्थना : ओ हेनरी यांची अनुवादित कथा



मूळ लेखक: ओ हेनरी 
मराठी अनुवाद: ज्ञानेश्वर गटकर 


सोपी अस्वस्थ होता. तसाच उदास मनाने तो  मेडिसन चौकातील त्याच्या जागेवरून उठला. वातावरणातील बदल स्पष्टपणे सुचवत होते कि हिवाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. 

पक्षी दक्षिण दिशेला उडून जात आहेत,आपल्या नवर्याकडून हिवाळ्यात घालण्यासाठी  नवीन, सुंदर, उबदार आणि तेवढाच महागडा कोट  मिळावा म्हणून बायका लाडात येत आहेत आणि  आपल्या जागेवरून सोपी उठत आहे हि हिवाळा येण्याचे  संकेतच आहेत हे समजदार व्यक्तीला सांगायची गरज नाही.

एक मलूल झालेलं पान सोपिच्या पायाशी येउन पडले. हिवाळा लवकरच सुरु होणार हे सांगणारा हा एक विशेष संदेश होता. तोच नाही तर त्याच्यासारखे अनेक लोक जे मेडिसन चौकात राहतात, ते या अपशकुनाबरोबरच हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी छत शोधायच्या तयारीला लागत.

त्या गळणार्या पानांबरोबरच सोपिला कळून चुकले  कि आता येणाऱ्या हिवाळ्यातील थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी हालचाल करण्याची वेळ आली आहे. या वास्तवाची जाणीव झाल्याबरोबरच तो कामाला लागतो आणि आपल्या जागेवरून उठतो.

हिवाळ्यातील दिवस कसे घालवायचे याबद्ल सोपीच्या खूप जास्त अपेक्षा नव्हत्या. श्रीमंत लोकांसारखे कुठल्या तरी दूर देशीच्या समुद्र प्रवासाला जायचे  किंवा दक्षिणे कडील उबदार वातावरणात जायचे किंवा नेपल्स या टुमदार बेटांवर हिवाळा घालवायचा असला काही तो विचार करत नव्हता. तर ब्लेकवेल या बेटावरील तुरुंगात हिवाळ्यातील तीन महिने व्यतीत करावे हीच त्याची अगदी साधारण इच्छा होती. तीन महिने पुरेसे अन्न, पांघरायला कापड आणि डोक्यावर छत एवढे जरी मिळाले तरी टोचणारी थंड हवा आणि विनाकारण त्रास देणारे पोलीस यांच्यापासून त्याची सुटका होणार होती. सध्याच्या घडीला तुरुंग हाच त्याच्यासाठी उत्कृष्ठ पर्याय होता... ही त्याची छोटीशी इच्छा.

अनेक वर्षापासून ब्लेकवेल तुरुंग  सोपिचे हिवाळ्यातील घर होते. न्यू यॉर्क मधील सधन लोक आपल्या हिवाळी  सुट्या घालवण्यासाठी फ्लोरिडा किंवा भूमध्य समुद्रावरील सागर किनार्यावर  जायचे. त्याचप्रमाणे सोपीने सुद्धा आपल्या सुट्टीसाठी तुरुंग असलेल्या बेटाची निवड केली होती.

आणि  आता सुट्टीच्या दिवसांच्या तयारीला लागायची  वेळ आली होती. तीन मोठमोठाली वर्तमानपत्रे जी चौकातील बगीच्यात झोपताना तो पांघरून किंवा अंथरून म्हणून वापरायचा आता तीसुद्धा थंडीपासून सोपिला वाचवण्यास असमर्थ होती, म्हणून तो बेटावरील तुरुंगाचा विचार गांभीर्याने करायला लागला.

याचा अर्थ असा नव्हता कि न्यू योर्क शहरात सोपिला अन्न आणि निवारा देणाऱ्या ओळखीतील लोकांची वानवा होती. त्याच्या ओळखीतील लोकांकडे आळीपाळीने जाऊन तो आपल्या गरजा भागवू शकला असता परंतु त्याला ब्लकवेलचा तुरुंग  इतर पर्यायांपेक्षा जास्त सोयीस्कर वाटायचा. त्याला असे वाटण्याची काही कारणे होती.

सोपी तसा स्वाभिमानी व्यक्ती होता. जर तो शहरातील आपल्या ओळखीकडे राहायला गेला असता तर तिथे त्याला आपल्या इच्छेविरुद्ध काही कामे करावी लागली असती. ओळखीतील लोकांनी त्याला राहण्यासाठी पैसे मागितले नसते तरी या न त्या प्रकारे त्याच्याकडून राहायचा मोबदला त्यांनी वसूल केला असता, जसे कि त्यांनी सोपिला आंघोळ करायला सांगितली असती, किंवा काय करतोस? कुठे राहतोस? आता काय करायचं ठरवल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली असती किंवा त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल विचारणा सुद्धा केली असती.

अशा गोष्टी करण्यासाठी त्याचे स्वाभिमानी हृद्य त्याला परवानगी देत नव्हते. त्याकारणे तुरुंगात जाणे त्याला सोपे वाटायचे. तुरुंगात राहण्याचे काही नियम जरी असले तरी ते नियम सभ्य व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळा-ढवळ करत नाही हे सोपी पूर्ण जाणून होता.

त्याचा तुरुंगात जाण्याचा निर्णय पक्का झाला आणि त्वरेने तो आपल्या कामाला लागला.

तुरुंगात जाण्याचे अनेक सोपे मार्ग त्याला ठावूक होते. त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला आणि आनंद देणारा मार्ग म्हणजे एखाद्या महाग आणि चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन भरपेट खायचे. खाऊन झाल्यावर बिलाचे पैसे चुकते करायला पैसेच नाहीत म्हणून सांगायचे. तेंव्हा पोलिसांना बोलावण्यात येईल आणि त्याला पकडून नेतील. हे सगळे अगदी शांततेच्या मार्गाने होणार याची त्याला खात्री होती. पोलिसांनी अटक केल्यावर त्याने कलेल्या गुन्ह्यासाठी त्याला न्यायाधीशांसमोर उभे केल्या जाईल. आणि बाकीचे सोपस्कार न्यायाधीश महोदय नंतर स्वतः पार पाडतील.

असा निश्चय करून तो  ब्रोडवे आणि फिप्थ अवेन्यू नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावरील  मेडिसन चौकातील बाकड्यावरून उठला. विस्तीर्ण पसरलेल्या चौकाला पार करून उत्तरेकडील ब्रोडवे रस्त्यावरून तो चालू लागला. थोड्यावेळातच  एका मोठ्या रोषणाई केलेल्या रेस्टॉरंट समोर तो उभा होता.

सोपीला विश्वास होता कि कमरेपर्यंत तो बर्यापैकी सभ्य माणूस वाटत होता कारण चेहरा स्वच्छ धुतलेला होता. चढवलेला कोटहि बऱ्यापैकी धुतलेला होता. रेस्टॉरंटच्या आतील टेबलावर पोचेपर्यंत त्याला कोणी हटकले नाही म्हणजे झाले! आणि  एकदा जेवणाच्या टेबलावर तो बसला म्हणजे त्याचे काम फत्ते झाले कारण टेबलाच्यावर त्याचा शरीराचा जो भाग दिसले तो व्यवस्थित होता. मग तो सांगेल ते जेवण वेटर त्याला आणून देईल याची त्याला खात्री होती.

आपण काय काय खावे यावर तो विचार करायला लागला. रेस्टॉरंट च्या मेनुतील झाडून पुसून सगळे पदार्थ त्याच्या नजरेसमोरून सरकत होते. जेवणाची किंमत खूप काही जास्त नव्हती आणि त्यालाही रेस्टॉरंटच्या लोकांनी बिलाची रक्कम  न दिल्यावर  खूप चिडू नये असेच वाटत होते कारण  पुढील तीन महिन्याच्या सुट्यांची सुरुवात उत्कृष्ट जेवणाने करावी आणि आपण  सुखाने आपल्या हिवाळ्यातील घरी जावे अशी आणि फक्त इतकीच त्याची साधीशी इच्छा होती.... त्यासाठीच हा प्रपंच.

परंतु जसा त्याने आपला  पाय रेस्टॉरंटच्या दारातून आत टाकला तेंव्हाच मुख्य वेटरचे लक्ष त्याच्या फाटलेल्या जोड्याकडे  आणि उसवलेल्या प्यांट कडे गेले. क्षणाचाही विलंब न करता सोपिला तेथून बाहेर हाकलण्यात आले.

सोपी परत ब्रोडवे रस्त्यावर चालू लागला. हा साधा आणि सरळ उपाय निष्फळ ठरला होता. एवढ्या सहजतेणे आणि सुखाने हवे ते  मिळणार नाही असे त्याला वाटले. दुसरा कुठला तरी पर्यायी मार्ग शोधावा लागेल याची जाणीव झाली.

पुढे सिक्स्थ अवेन्यू चौकात पोचल्यावर त्याला कोपर्यातील एक दुकान दिसले. दुकानासमोरील दर्शनी भिंतीवर एक भलीमोठी काचेची खिडकी होती जी जगमगत्या दिव्यांनी लखलखत होती. सोपीने एक दगड घेतला आणि त्या खिडकीच्या दिशेने भिरकावला. काच फुटल्याचा आवाज झाला. लोकांची गर्दी झाली. धावत येणाऱ्या लोकांमध्ये एक पोलीससुद्धा होता. सोपी निश्चल उभा होता आणि पोलिसाकडे बघून हसत होता.

“दगड मारणारा माणूस कुठे आहे?” पोलिसाकडून विचारणा झाली.

“तुम्हाला हा दगड मीच मारला असे वाटत नाही का?” सोपी उत्तरला. सोपी खूपच खुशीत दिसत होता. त्याला जे पाहिजे होते ते स्वतःहून तिथे चालत आले होते आणि आता त्यालाच विचारत होते.

परंतु पोलिसाने सोपिकडे अजिबात लक्ष दिले नाही. पोलिसाच्या मतानुसार जो व्यक्ती दगड मारेल तो उगाच कशाला त्याठिकाणी थांबेल. दगड मारणारे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पळ काढतील. पोलिसाला एक माणूस रस्त्याच्या पलीकडे धावताना दिसला आणि पोलीस त्याला पकडायला म्हणून धावत निघून गेला. आणि सोपी, खजील मनाने व हळू पावलांनी चालायला लागला. त्याला दोनदा अपयश आले होते.

रस्त्याच्या पुढच्या बाजूला आणखी एक रेस्टॉरंट त्याला लागले. हे रेस्टॉरंट ब्रोडवे एवढे श्रीमंत नव्हते. आपल्या फाटक्या कपड्यांनी आणि जोड्यांनी तो बिनदिक्कत इथे जावू शकत होता. जेवायला येणारे लोकही साधारण वाटत होते आणि जेवणहि स्वस्त होते. सोपी आत गेला. त्याने जेवण मागवले. भरपेट जेवल्यावर पैसे चुकते करतेवेळी तो म्हणाला,

 "पैसे! अहो माझे आणि तुम्ही जो शब्द म्हणताय 'पैसे' त्याचे  खूप दिवासंपासुंचे वैर आहे."

वेटरकडे बघत तो पुढे बोलला, 

“तुम्ही लवकर पोलिसांना बोलवा आणि मला त्यांच्या हवाली करा, उगाच माझ्यासारख्या सभ्य माणसाला ताटकळत ठेवू नका.” सोपीने आज्ञा दिली.

“तुमच्यासाठी आम्ही पोलिसाना बोलावण्याचा त्रास घेणार नाही.” तिथला वेटर सोपिकडे खवचट बघत उत्तरला. 

त्याने दुसर्या एका वेटरला बोलावले आणि म्हटले, " तुमच्यासारख्यांचा आम्ही खास पाहुणचार करतो!"

दोन्ही वेटरनि  मिळून, सोपिच्या डाव्या कानाखाली आवाज काढले आणि त्याला बाहेर रस्त्यावर फेकून दिले. रस्त्यावर पडलेला सोपी हळूहळू, शांतपणे उभा झाला. आपले कपड्यांवरची धूळ झटकली. तुरुंगात जाणे तर आता त्याला दिवास्वप्न वाटायला लागले होते... तुरुंग अजूनही फार लांब होता... त्याचा तो अवतार बघून जवळच उभा असलेला पोलीसवाला हसतो आणि निघून जातो.

जवळपास अर्धा मैल  चालत  गेल्यावर सोपीने आणखी एक प्रयत्न करायचा विचार केला. यावेळी आपला प्रयत्न यशस्वी होईल याची त्याला खात्रीच होती. तिथे एका दुकानाच्या खिडकीजवळ सुंदर,सभ्य दिसणारी स्त्री उभी होती. अर्थातच इतक्या सभ्य स्त्रीशी कुण्या अनोळखी पुरुषाने आगाऊ बोलल्यावर ती स्त्री रागावेल. तिची छेड काढत आहे असे समजून नक्कीच ती पोलिसांची मदत मागेल. असे झाल्याबरोबरच पोलिसाचा तो उबदार तळहात सोपिच्या मनगटाला पकडेल ज्या  हव्याहव्याश्या स्पर्शासाठी  सोपि एवढा आटापिटा करत आहे आणि एकदाचा तो आनंदि होईल. मग लवकरच सोपी बेटावरील सुट्यांच्या दिवसांसाठी रवाना होईल.

तो तिच्या जवळ जातो. नजरेच्या कोपऱ्यातून पोलीस आपल्याला बघतोय याची खात्री करतो. ती तरुण स्त्री दोन-चार पावले मागे सरकते. सोपी तिच्या आणखी जवळ जातो आणि अगदी तिला खेटून उभा राहतो. सोपी तिची छेड काढण्यासाठी तिला म्हणतो, “गुड इव्हिनिंग बेडेलीया! माझ्यासोबत खेळायला माझ्याघरी येतेस का?”

त्याच्या या हरकतीकडे पोलीस  बघतच असतो. त्या स्त्रीने पोलिसाला फक्त इशारा करायची देर आणि सोपीचे बेटावरील सुट्यांचे तिकीट पक्के...सोपिला तर आताच थंडीच्या दिवसात तुरुंगातील उब जाणवत होती...पण

ती स्त्री सरळ सोपिकडे चेहरा करत, त्याचा हात नाजूकपणे आपल्या हातात घेत बोलली, “अरे माईक नक्कीच येईल तुझ्याकडे पण माझ्यासाठी खाण्यापिण्याची सोय करशील तरच...आता इथे नको पण लवकरच भेटू  तुझ्या घरी  कारण आता तो पोलीसवाला आपल्याकडे बघतोय.”

तिने त्याचा पकडलेला हात तसाच हातात ठेवला आणि  ते दोघेही पोल्संच्या जवळून निघून गेले. सोपिला आता काळजी वाटायला लागली. तुरुंगात जायचा त्याचा मनसुबा पूर्ण होईल का नाही याबद्दल तोही आता साशंक व्हायला लागला.

पुढच्या चौकात तिच्या हातातून आपली सुटका करून सोपी धूम पळत निघाला.

थोडे अंतर धावत गेल्यावर धाप लागलेला सोपी थांबला. तो जिथे थांबला होता तो रस्त्याचा भाग नाट्यगृहांमुळे गजबजलेला होता. तसेही शहराच्या या भागात रस्त्यावर वेगळीच चमक असायची आणि प्रफुल्लीत चेहेर्यांचे लोक भेटायचे. त्या हिवाळ्यातील रम्य सायंकाळी चेहऱ्यावर प्रसन्न स्मित ठेवून, उंची वस्त्रे घालून श्रीमंत बायका-मानसाची ये-जा सुरु होती.

मात्र सोपिला वेगळ्याच प्रकारची धास्ती होती ती म्हणजे त्याला कुठलाच पोलीस आज अटक करणार नाही याच भीतीने तो अस्वस्थ झाला. त्याला काहीतरी करणे जरुरी होते म्हणून तो एका नाट्यगृहाच्या बाहेर जिथे पोलीस उभा होता त्याच ठिकाणी मुद्दाम गेला. आपण  काहीतरी विचित्र आणि अनपेक्षित केल्याशिवाय आपला मनसुबा पूर्ण होणार नाही याची त्याला आता जाणीव झाली होती.

अचानकच सोपी नरड्याच्या शिरा होतील तेवढ्या ताणून ओरडायला लागला, तो  भेसूर गायला  लागला, नाचायला   लागला... जणू तो  अट्टल बेवडा आहे  आणि या श्रीमंत आणि सभ्य लोकांना त्रास देतोय.

आणि पोलिसाने...सोपिकडे निखालस दुर्लक्ष केले आणि आपल्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला तो पोलीस म्हणाला,
 “हा त्याच कॉलेजमधील मुलगा आहे जे आज सामना जिंकले... त्यामुळे आमच्या वरीष्ठाकडूनच आम्हाला आदेश आहेत कि आजच्या दिवशी या मुलांकडे दुर्लक्ष करावे... कारण ते फक्त ओरडतील परंतु कुणाला इजा करणार नाहीत.”
सोपी ओरडायच थांबला. आज कोणताच पोलीस त्याला अटक करणार नाही का? आता तर बेटावरील तुरुंग त्याला स्वर्गाइतकाच अप्राप्य वाटायला लागला. त्याने अंगावर चढवलेला कोट ठीक केला त्यासरशी त्याला हवेतील वाढता गारवा जाणवला. ‘

नंतर सोपिचे लक्ष दुकानात वर्तमानपत्र घेणाऱ्या एका माणसाकडे गेले. तो माणूस उभा होता आणि त्याचे लक्ष पूर्ण वर्तमानपत्रांकडे होते. बाजूलाच त्या  माणसाने छत्री  ठेवली होती. सोपी सरळ दुकानात गेला. ती छत्री उचलली आणि अगदी बिनधास्तपणे हळू पावले टाकत तो चालू लागला. छत्रीवाला माणूस लगेचच त्याच्या पाठी धावत आला आणि सोपिला म्हणाला,
“हि माझी छत्री आहे.”
त्यावर सोपी बोलला, “अच्छा!! हि तुमची छत्री आहे  तर  मग  मी  चोरली, जा पोलिसांना बोलवा. तो तिकडे एक पोलीस उभाच आहे. त्याला बोलवा आणि सांगा कि मी चोर आहे म्हणून.”

सोपिचे बोलणे एकूण तो माणूस हळू हळू चालायला लागला. सोपिनेही आपल्या पायांची गती आणखी कमी केली. सोपिला त्यावेळी आतून वाटत होते कि त्याचा हा प्रयत्नसुद्धा निष्फळ ठरेल. पोलीस दोघांकडेही शंकेच्या नजरेने बघत होता.

“मी--” छत्रीवर हक्क सांगणारा माणूस चाचरत बोलायला लागला, “—कस आहे! अंSSS तुम्हाला तर माहीतच आहे  कि आजकाल...असुद्या.. जर हि तुमची छत्री असेल तर तुम्ही घ्या.. त्याच काय आज सकाळीच मला हि एका रेस्टॉरंट च्या बाहेर सापडली.. जावू द्या तुमचीच आहे अस म्हणताय तुंम्ही तर तुमचीच असेल न!!! बरय.. येतो.”

“हो!हो! हि माझीच आहे” रागाने फुरफुरत, नाकपुड्या फुगवत सोपी ओरडला.

तो माणूस पटकन तिथून निसटला. पोलीस एका वृद्ध बाईला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत होता आणि सोपी असहाय होऊन पुढे चालायला लागला. निराश होऊन त्याने फेकता येईल तेवढ्या दूर त्या छत्रीला भिरकावले. तो प्रत्येकवेळी असफल होत होता. पोलीस जणू त्याला आज राजा समजत होती जसा कि त्याच्या हातून कुठली चूक घडतच नाहीय.

सोपी शहराच्या पूर्वेकडील एका सुनसान सडकेवरून चालत होता. इथून त्याने त्याच्या घरी म्हणजे मेडिसन चौकातील बागेच्या बाकाकडे जाणाऱ्या मार्गाकडे वळण घेतले. तो चालू लागला पण...

रस्त्याच्या एका शांत कोपर्यावर सोपी अचानक थांबला. त्याला थांबावं वाटल. ते एक खूप खूप जुने चर्च होते. चर्चच्या एका खिडकीच्या रंगीत काचेतून मंद प्रकाश पडत होता. त्याच खिडकीतून सुमधुर संगीताची नाजूक लय सोपिच्या कानावर पडली आणि तो मंत्रमुग्ध झाला. ती एक अतिरम्य वेळ होती. आकाशात चंद्र तरुण होता. सोपी सायंकाळच्या पक्षांची उंच आकाशातील गाणी एकू शकत होता... एव्हढी शांतता.... क्वचितच येणाऱ्या जाणार्यांच्या आवाज व्हायचा...  पण तीथे अतीव शांत आणि प्रसन्न वाटायला लागले होते.

चर्च मधून सोपिला खूप दिवसापासून ठाऊक असलेल्या प्रार्थनेच्या सुरावटी ऐकायला आल्या. त्याला आपल्या जुन्या दिवसाची आठवण झाली.. ते मंतरलेले दिवस जेंव्हा त्याच्या आयुष्यात आई चे प्रेम, प्रेमाचा नाजुकपणा...मित्रांची सोबत,  स्वप्नाची साथ आणि स्वच्छ विचार व स्वच्छ कपडे होते ... त्याला आठवले ते सगळे सुंदर दिवस ...

सोपीचे हृद्य अशाच कुठल्यातरी अनुभवाची वट बघत होते. तो योग्यवेळी या चर्च जवळ पोचला होता. तिथे त्याला वेगळीच अनुभूती होत होती आणि त्याचे अंतकरण त्या शांत जाणीवेने बदलून जात होते. पहिल्यांदा आपल्या भरकटलेल्या आयुष्याबाबत तो गंभीर झाला.. आतापर्यंत वाया घालवलेले मूल्यवान दिवस, फालतू इच्छा, मेलेल्या आशा आणि मनाची कोमेजून गेलेली अवस्था त्याला प्रकर्षाने जाणवत होती.

आणि चर्चच्या या एकट्या शांत कोपऱ्यात सोपीने ठरवले कि आजपासून हे लाचार जगणे सोडायचे... परिस्थितीशी लढायचे व या चिखलात, निराशेत गुरफटलेल्या आयुष्याला बदलून नव्याने जगायला सुरुवात करायची.

तो अजूनही तरुण असल्याने त्याच्याकडे आयुष्य सुंदर करण्याची संधी होती. आपले अधुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागायचा त्याने निश्चय केला. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याला नोकरी द्यायचे वचन दिले होते. आता त्या व्यक्तीला  शोधून ती नोकरी करायची असे सोपीने ठरवले. तो भविष्यात कुणीतरी बनेल असा त्याला विश्वास वाटत होता. त्या शांत संगीताने आणि प्रार्थनेच्या सुरांनी त्याला बदलून टाकले होते. तो आता—

तेव्हड्यात त्याच्या खांद्यावर एक हात येवून आदळला. मोठ्या जबड्याचा न्यू योर्क पोलीस त्याच्याकडे बघत म्हणाला,
“ असल्या भाल्त्यावेळी तू इथे काय करतो  आहेस?”
“काहीच नाही” सोपी उत्तरला.
“तुझ्या या काहीच नाहीवर मी विश्वास ठेवेल असे तुला वाटतय का?” पोलीस म्हणाला.

नव्या उर्जेने आणि अति-उत्साहाने सोपी त्या पोलीसाशी वाद घालायला लागला. पोलिसांशी वाद घालणे कधीही, कुणालाही परवडत नाही.

“माझ्या सोबत चल.” पोलीस त्याला पकडून घेऊन गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच न्यायाधीशांनी सोपिला त्याच्या शुल्लक गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावली, 

“तीन महिन्यासाठी तुला बेटावरील तुरुंगात ठेवण्यात येईल”























शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

त्या डोळ्यांचा रंग कोणता...?


७/१०  विज्ञान कॉलोनी, डॉ. हिणवटकरांचा पाच हजार स्क्वेअर फूट पसरलेला विस्तीर्ण बंगला... रात्री ठीक १०.३०  वाजता, शांत रात्रीच्या पदराखाली घड्याळाचे श्वास टिक-टिक करत होते. तेंव्हा बंगल्याच्या एकलकोंड्या खिडकीजवळ रामराव चुळबुळायला लागला. तो बांगल्याच्या आवारात शिरून, खिडकीजवळ लपून बसला होता. त्याला वाट पाहत  बसल्याला दोन तास झाले. तसा तो मागील दोन दिवसांपासूनच बंगल्यावर नजर ठेवून होता.. आणि त्याचा अपघात होण्याआधी एकदा चोरीचा प्रयत्न याच बंगल्यात केल्याचे त्याला अंधुकसे आठवते .. सहा महिन्यापूर्वी त्याने या बंगल्याची आतासारखीच टेहळणी केली होती .. पण चोरी करण्यापूर्वीच त्याचा अपघात झाला  आणि बंगल्यात चोरी करण्याचा त्याचा मनसुबा अर्धवटच राहिला. आज तर तो मोहीम फत्ते करायच्या हिसेबानेच पूर्ण तयारीनिशी आला होता. घरात शिरण्याची वेळ व्हायची होती म्हणून त्याने परत आजच्या कामगिरीची एकदा उजळणी करून घेतली....
              डॉक्टर हीनवटकर, एक नावाजलेले, अविवाहित वैज्ञानिक... एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटेच राहतात...कुठलाच नौकर नाही कि सोबती नाही...डॉक्टर म्हणजे घड्याळाच्या काट्यावर चालणारा वक्तशीर माणूस. कुठेही वेळेच्या दोन पाच मिनिटे आधीच पोहचतील. त्याचं आयुष्य त्यांनी संपूर्णता विज्ञानाला अर्पण केले. ठीक सकाळी आठ वाजता प्रयोगशाळेत जातात तर थेट सायंकाळी ८ ला बाजारातून रोजची खरेदी करून परत येतात. जेवण वगैरे आटपून रात्री १०.३० वाजता परत प्रयोगशाळेत जातात आणि पाहटे ४ ला  बंगल्यावर हजर. कशी बशी दोन-तीन तासांची झोप घेवून, लवकरच तयार होवून पुन्हा सकाळी ८ ला प्रयोगशाळेसाठी रवाना होतात. मागील एका वर्षापासून त्यांचा हा दिनक्रम ठरलेला... क्वचित कुठे व्याख्यान द्यायला जावे लागले तर तेवढा बदल. सतत काम करणारे, व्यग्र आणि कधीही न थकणारे असे हे व्यक्तिमत्व सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. एकटा माणूस एवढे श्रम न थकता कसा करू शकतो हा प्रश्न सगळ्यांना पडायचा.
              रामराव विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला तो मोटारीच्या आवाजाने. डॉक्टर आपली मोटार घेवून प्रयोगशाळेत निघून गेले. रामराव शांत बसून होता...एकदम आताच आत शिरायचे नाही...त्याने खिडकीतून आतील अंदाज घेतला.. खिडकीच्या काचेतून त्याने बघितले कि आतील दिवा मालवलेला नव्हता... त्यासरशी क्षणभर शंकेने डोके वर काढले... तो थांबला... आधीच मंद घेत असलेला श्वास धरून त्याने किलकिल्या डोळ्यांनी आत बघितले. कसलीच हालचाल नव्हती... मग निश्चिंत झाला. आत जायच्या आधी त्याने एकदा स्वतःजवळील धारदार चाकू चाचपडून बघितला...चाकूचा स्पर्श त्याला हिम्मत देवून गेला. त्याचा हा आवडता चाकू होता. असाच चाकू अपघातापूर्वी त्याच्याकडे होता पण तो अपघातामध्ये  कुठेतरी हरवला होता. कुठे तेच नेमके त्याला आठवत नव्हते. त्याने अपघातानंतर दवाखान्यातून बाहेर पडल्याबरोबर कुठले काम केले असेल तर अपघातापूर्वी हरवलेल्या चाकुसारखाच दुसरा नवीन चाकू विकत घेतला होता. त्याच चमकते धारदार पाते, अनुकुचीदार टोक, त्याच्या राकट हाताला साजेशी मजबूत मुठ त्या चाकुच्या सौंदर्याला खुलवत होती. हातात पकडल्यावर त्या चाकूचे ‘भयानक सौंदर्य’ त्याला आश्वस्त करत असे. 
कसलीच हालचाल नसल्याने आत कोणी नसेल याची खात्री झाली. चुकून दिवा सुरूच राहिला असेल असे त्याला वाटले . काहीवेळातच त्याच्या तरबेज हाताने खिडकीतून आत जाण्यासाठी वाट मोकळी केली. खिडकीचे स्क्रू अगदी शिताफिने काढून टाकले. शरीराला मांजरीसारखे चोरून तो खिडकीतून आत शिरला.. आतील चोपड्या टाईल्सवर त्याचा पाय पडताच त्या थंड स्पर्शाने त्याला शिरशिरी आली...ती शिरशिरी याआधीही अनुभवल्याचे त्याला वाटत होते. आपले दोन्ही पाय घराच्या आत घेतले  आणि ताठ उभा होवून तो मागे वळून पाहतो तर ती खिडकीसुद्धा ओळखीची वाटत होती. याचे त्याला थोडे नवल वाटले, परंतु  त्याचा खिडक्या तोडून चोरी करण्याचा अनुभव एवढा जास्त होता कि जवळपास प्रत्येक प्रकारच्या खिडक्यांना त्याने तोडले होते...म्हणून आपल्याला हे ओळखीचे वाटत आहे. असा विचार येताच तो स्वताशीच हसला... हसल्याबरोबरच त्याच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. त्याचा अपघात झाल्यापासून असला प्रकार नेहमीच व्हायचा म्हणून त्याच्या डोक्यातील झांजेचे त्याला जास्त नवल वाटले नाही. पण तेंव्हाच त्याची नेणीव अचानक चाळवल्या गेली. त्याला काहीतरी आठवल्यासारखे झाले...काय आठवले?... तर खिडकीच्या डाव्या बाजुला एक कपाट आहे आणि त्या कपाटाचे पाय कमीजास्त आहेत... हे भलतच आपल्याला काय आठवत आहे. स्वताच्या स्मरणशक्ती बाबत, तो संभ्रमित  झाला. जे आपल्याला आठवल्या  सारख वाटतय ते खर कि खोट  बघण्यासाठी त्याने कपाटाला हलकासा धक्का दिला तर...तर  कपाट खरोखरच दुडक्या चालीत  डुगडूगायला  लागले. आपल्याला काहीतरी भास होतोय पण या विचीत्र गोष्टीचे त्याला भय सुद्धा वाटायला लागले म्हणून जास्त विचार न करता तो कामाला लागला.

              तो कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वाटले कि कपाट उघडायला खूप प्रयत्न करावे लागतील परंतु काय आश्चर्य अगदी पहिल्याच प्रयत्नात त्याने कपाट सहज उघडले. जणू त्याला ठावूक होते कि या  भल्या मोठ्या कपाटाच्या कुलपाला एवढ्या सहजतेने कसे उघडायचे. त्याचा कपाटात शोध सुरु झाला. त्यात अनेक गोष्टी ठेवल्या होत्या. पण त्याची अनुभवी नजर चोरकप्प्याला शोधत होती. आधीच माहित असल्यासारखा त्याचा हात चोरकप्प्याशी गेला आणि त्यातील नोटांचे बंडल त्याने आपल्या खिशात कोंबले. ते रुपये त्याला पुरेसे वाटले नाहीत म्हणून आणखी शोध घ्यायला लागला. त्याला कपाटाच्या खालच्या खणात एक चाकू दिसला. तो चाकू पाहून रामराव जरा चमकलाच. कारण त्याच्याकडे असलेला चाकू अगदी सारखाच होता. कपाटात चाकू असावा यात जास्त नवल नाही पण मघापासून त्याला जे विचित्र जाणवत होत त्याचा विचार करता कपाटातील चाकू अगदी त्याच्याच जवळील चाकू सारखा निघावा हे जरा विशेष वाटत होते...असो. हे फालतू विचार करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा  जे-जे चोरण्यालायक वाटत होते ते-ते गोळा करू लागला. महागड्या वस्तू, त्याच्या उपयोगाच्या वस्तू वगैरे-वगैरे शोधण्यात एवढा गुंग झाला कि वेळेचे भान राहिलेच नाही....
आपल्याच धुंधीत घरभर वावरत,  पाहिजे  त्या  वस्तू  गोळा  करत, नविन  वस्तू दिसली कि तिची हातात आधी  निवडलेल्या वस्तूशी तुलना करत, आणि कधी ती बदलत तर कधी नवीन वस्तूला नाकारत त्याच काम सुरु होते. या अशी चोरी करायला त्याला खूप आवडे. निवांत विचार करून वस्तूला पारखून नंतरच ती चोरायची. याचसाठी तो रात्री कुणी नसलेल्या घरातच आपला डल्ला टाकायचा. दुकानात गेल्यावर सहसा लोक खरेदी करताना जशी आवड-निवड करतात तशीच तो इथेही वस्तूना पारखून घेत होता, फक्त इथे रामरावला वस्तूंचा मोबदला पैसे म्हणून द्यायची गरज नव्हती....पण आज त्याच दैव वेगळे ठरणार होते. आज त्याला आपल्या याच नाही तर आतापर्यंतच्या सगळ्या चोरींचा मोबदला द्यावा लागणार होता....रुपयांच्या जागी स्वताची ओळख खर्च करून. या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असलेला रामराव चोरीची मझा घेत होता........ आणि अचानक ...
अचानक त्याला समोर डॉक्टर उभे दिसले. त्याला कळलेच नाही डॉक्टर घरात कधी आले? नेमका कितीवेळ झाला? डॉक्टर आले तेंव्हा कसाकाय कुठलाच आवाज आला नाही? डॉक्टर तर बाहेर गेले तेंव्हा मोटार घेवून गेले होते, त्या मोटारीचा सुद्धा आवाज नाही आला?! डॉक्टरांनी झोपायच्या वेळीची कपडे घातली होती  म्हणजे ते  घरात येवून आपल्या समोरून  बेडरूम मध्ये कसे काय गेले?  आणि कधी कपडे बदललेत? मग आपल्याला काहीच कस जाणवल नाही? अशा प्रश्नाच्या भुंग्यांनी त्याच्या डोक्याला परत झिणझिण्या आल्या. डॉक्टरांना समोर बघून रामराव जागीच थिजला होता....पण क्षणभरच.....लगेच स्वताला सावरत त्याचा सराईत  हात चाकुकडे गेला... चाकूवर पकड घट्ट केली  आणि तो वार करण्यासाठी तयार झाला. तोपर्यंत डॉक्टर आपल्याकडे, विशेषता डोळ्यांमध्ये  खोलवर निरखून बघत आहेत हे त्याला जाणवले...त्यांच्या रहस्यमयी नजरेने रामरावच्या अंगावर काटा आला. त्याला प्रचंड असुरक्षित वाटायला लागले. त्याच्या चेहेऱ्यावर राग आणि भीती या दोन्ही भावनांच्या छटा आलटून-पालटून दिसत होता. शरीरातील रक्त डोळ्यांमध्ये आणि हातांमध्ये धावायला लागले. हातची चाकुवरील पकड अजून मजबूत करत तो वार करायला थोडासा जागचा हललाच कि,
“थांब रामराव, तीच चूक पुन्हा करू नकोस.” डॉक्टर आपल्यावरील हल्ला वाचवण्यासाठी थोडे मागे सरकत म्हणाले.
“....म्हणजे!?” रामराव डॉक्टरांच्या वाक्याने चकित होवून, चाकुसह वर उचललेला हात तसाच मधे थांबवत ओठातल्या  ओठात गारठला. आपल्याला डॉक्टर ओळखतात....? नावानिशी ओळखतात....?
“सांगतो.” डॉक्टर रामरावच्या निस्तेज चेहऱ्याकडे बघून बोलायला लागले, “सहा महिन्यापूर्वी तू आला होतास, चोरी करायला, असाच चाकू घेवून...आणि आजच्याच सारखा मी त्यादिवशीही तुझ्या पुढे अचानकच आलो. तू खूप घाबरलास आणि  माझ्यावर चाकूने वार केलेस. तुझ्या त्या चाकूच्या घावांनी मी रक्तबंबाळ होवून खाली कोसळलो आणि मेलो...तू माझा खून केला होतास.”
“ क्काय?” डॉक्टर प्राण वाचवण्यासाठी काहीतरी भलतच बरळत आहेस असे त्याला वाटले.
 “हो रामराव, तू मला ठार केलेस पण तू पळून जायच्या आधीच इथे  माझा मित्र आला. मला रक्ताच्या थारोळ्यात बघून त्याला लगेच सगळा प्रकार लक्षात आला आणि मग त्याने तुला तुझ्याच चाकूने ठार केले... खरतर तुला जीवाने मारायचे नव्हते पण परिस्थिती अशी होती कि माझ्या मित्राकडे दुसरा पर्याय नव्हता.. कारण त्यावेळी तुला आम्हा दोघांच एक खूप मोठ गुपित कळल होते. कदाचित ते गुपित बाहेर गेले असते तर मला कायद्याने खूप मोठी शिक्षा सुद्धा सुनावली असती. म्हणून तुला ठार मारणे अतिशय म्हत्वाचे होते..”
भीती,विस्मय,जिज्ञासा... अशा प्रसंगावेळी असतील नसतील या सगळ्या भावनांच्या छटांचा रंगमंच रामरावच्या चेहऱ्यावर आपला खेळ दाखवू लागला....चेहऱ्यावर आणि विशेषता डोळ्यातही.

“अहो,तुमाले काय येड लागल काय? मी जिता हाय,तुमी जिते हा. दोन दिवसापासून पाहून रायलो तुमाले अन तुमी म्हणता कि म्या तुमाले मारल...तुमी मंग भूत होय का?”
“रामराव, मी सांगेल ते तुला कळेल कि नाही ठावूक नाही पण की सांगतो ते ऐकून घे. मी जीवशास्त्राचा अभ्यासक आहे. मी आता जरी जिवंत आहे पण मी मेलो होतो. आणि तू सुद्धा मेला होतास. तू खोटा रामराव आहेस...एक क्लोन आहेस...खरा रामराव तर माझ्या बंगल्याच्या मागच्या बाजूला मी पुरून टाकलाय.”
रामराव थोडा बुचकळ्यात पडला...त्याला थोड थोड समजायला लागल होत आणि आठवायला सुद्धा...
“तुला ठार मारल्यानंतर तुझ्या प्रेताला माझ्या मित्राने गुपचूप मोटारीत टाकून, लोकांच्या नजरेतून वाचवून   प्रयोगशाळेत नेले. तुला माहित नसेल माणूस मेल्यानंतरही काही  वेळासाठी मेंदूतील पेशी, आम्ही त्याला न्युरोंस म्हणतो, त्या जिवंत राहतात...डोक्यातील त्या पेशींमध्ये आपल्या गत आयुष्यातील आठवणी साठवल्या असतात. आणि आज जैवतंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे कि मेंदूतील त्या सगळ्या चांगल्या-वाईट आठवणी आपल्याला वाचता येतात आणि पाहिजे तर पुसून सुद्धा टाकता येतात. मग  तुझ्या मेंदूतील त्या पेशीमधील सगळी माहिती माझ्या मित्राने एका चुंबकीय चकतीवर काढून घेतली. त्या चकतीला सीलबंद करून प्रयोगशाळेतील लॉकर मध्ये ठेवून दिले कारण पुढच्या कामासाठी ती गोष्ट अतिशय आवश्यक होती. तुझ्या मृत शरिराचा माझ्या मित्राने खूप बारकाईने अभ्यास केला. तेंव्हा उजव्या हातावर तुझे रामराव हे नाव गोंदवलेले दिसले त्यामुळेच मघाशी मी तुला त्या नावाने हाक मारली...” 
रामराव आपल्या उजव्या हाताकडे बघायला लागला--
“आता ते तिथे नसेल कारण गोंदलेली गोष्ट जन्मजात डी.एन.ए. मध्ये नसते...डी.एन.ए. म्हणजे  माणसाचे किंवा कुठल्याही प्राण्याचे शरीर कसे बनवल्या गेले हे त्याच्या डी.एन.ए. वरून समजते. पेशि मधल्या डी.एन.ए. साखळी मुळेच शरीरातील अनेक अवयव कृत्रिमरीत्या पाहिजे तशा बनवल्या जावू शकतात. तुझ्या शरीरातून डी.एन.ए.चा नमुना घेऊन त्यालाही जपून ठेवले. अशाप्रकारे  प्रयोगशाळेतील सर्व काम आटोपल्यावर तुझे प्रेत परत बंगल्यात आणले आणि मागच्या आवारात पुरून टाकले. तुला शंका असेल तर मी तुला ती जागा दाखवतो. तुझी तूच खात्री करुन घे.” एवढे बोलून डॉक्टर रामरावच्या प्रतिक्रियेची वाट बघायला लागले. पण  रामाराव तर  सुन्न झाला होता. त्याला हसावं कि रडावं कळत नव्हते. त्याचा कसानुसा झालेला चेहराच सांगत होता कि हा सगळा प्रकार त्याला भुताटकी वाटतसारखा होता. हतबल होऊन तो पुढे डॉक्टरांचे बोलणे ऐकू लागला...
“... दुसऱ्या दिवसापासून माझ्या मित्राचे खरे काम सुरु झाले ते म्हणजे तुझा क्लोन बनवायला त्याने सुरुवात केली. जवळपास एका आठवड्याच्या आत तुझा लहान बाळा एवढा क्लोन तयार झाला. कृत्रिम गर्भपेटीत तुझे शरीर आकार घेत होते. तुझ्या एका एका अवयवाला पाहिजे तसे बनवायला खूप श्रम पडले. या आठ दिवसातच तुझ्या एवढ्या वयाचा क्लोन तयार करणे गरजेचे होते. परंतु माझ्या मित्रासाठी ती काही खूप मोठी गोष्ट नव्हती. त्याचा अनुभव यावेळी खूप मददगार ठरत होता. त्याला क्लोनचे  वय झपाट्याने वाढवण्याच्या विद्युत-रासायनिक-चुम्म्बकीय पद्धतीचा शोध लागला होता. कृत्रिम गर्भ पेटी अगदी आईच्या गर्भासारखीच असते. त्यात तेच द्रव्य असतात जे आईच्या गर्भात बाळाला वाढवण्यासाठी मदत करतात. आधीच तुझ्या शरीरातून ती हार्मोन्स काढून घेतली होती जी वय वाढायला कारणीभूत ठरतात. ती हार्मोन्स तुझ्या छोट्या क्लोन मध्ये सुई वाटे सोडल्यानंतर जवळपास ३ दिवस ठरलेल्या वेळी  छोट्या क्लोन मधून विद्युत प्रवाह सोडण्यात आला आणि क्लोंनची वाढ झपाट्याने झाली... वाढलेला क्लोन तुझ्या वयाचा जरी होता तरी तसा क्लोन म्हणजे कोरी पाटीच असते...म्हणून चुंबकीय चकतीवर साठवून ठेवलेल्या तुझ्या आठवणी क्लोन च्या मेंदूला परत केल्या. आता तो फक्त शरीराने रामाराव असलेला क्लोन नव्हता तर डोक्याने आणि  विचाराने सुद्धा रामराव झाला होता. हे करत असताना फक्त त्या रात्री माझ्या बंगल्यात जे घडले होते ते तुझ्या आठवणीतून पुसून टाकले. त्या आठवणी पुसणे गरजेच्या होत्या अन्यथा तुझा क्लोन बनवणे निष्फळ ठरले असते. माझ्या मित्राचे गुपित आणि तुझ्या खुनाचा आळ या विवंचनेतून सुटण्याचा तो एकच मार्ग होता. परंतु त्या रात्रीच्या आठवणी तुझ्या मेंदूतून पूर्णत: पुसल्या गेल्या असतील  याबद्दल मला खात्री नाही.”
रामाराव चमकला आणि मघापासून हा बंगला आणि यातील वस्तू आपल्या परिचयाच्या कशा वाटतायत याच उत्तर त्याला मिळाल्यासारख वाटले. मघापासून शांतपणे असलेला रामराव मोठ्या हिमतीने बोलला,
“म्हंजी, म्या इथ दुसऱ्यांदा आलोय..पण त्या अपघाताच काय?”
 “सांगतो, सगळ सांगतो... तुझा पूर्ण विकसित क्लोन तयार झाल्यानंतर नंतर तुला म्हणजे तुझ्या क्लोनला बेशुद्ध असतानाच रात्रीला गुपचूप नजीकच्या सरकारी दवाखान्याजवळ माझ्या मित्राने सोडून दिले. पण त्याआधी मुद्दाम तुझ्या डोक्यावर एक घाव दिला जेणेकरून तुझा अपघात झाला हे पटाव... आणि पुढच सगळ तुझ तुलाच ठावूक आहे..”
 “तुमी सांगता हे पटत नाही मले! पुरावा द्या.”
“पुरावा!!!...ठीक आहे....मला सांग तुझ्या डोळ्यांचा रंग कोणता?”
“कोणता म्हणजे? काळा हाय!”
“तुला पुरावा पाहिजेच ना. तर जरा कपाटाजवळील आरशात बघ!”
रामराव आरशाकडे वळतो आणि हळू हळू पाय टाकत पुढे सरकतो..आजच्या रात्री आणखी काय वाढून ठेवलय म्हणून अगदी डोळ्यांच्या शिरा ताणून स्वताला आरशात बघतो.... त्याला विश्वासच बसत नाही. हि भुताटकी तर नाही,,, हा चेहरा तर आपलाच आहे पण... हे डोळे!!.. हे नक्कीच आपले नाहीत... कारण त्याचे डोळे हिरव्यागर्द पाचुसारखे चमकत होते.. त्या डोळ्यांतून हिरव्या रक्ताचा पारा तरळला...


डॉक्टर त्याला डोळ्यांच्या रंगाच गुपित सांगतात,
“स्वतःला सांभाळ रामराव...  जेंव्हा एखादी भावना आपण अत्युच्च पातळीवर अनुभवत असतो तेंव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाह सुद्धा वाढत असतो तेंव्हा आपल्या डोळ्यातील बुब्बुळावर त्याचा फरक पडतो. आपले डोळे लाल होतात किंवा पाणावतात परंतु माझ्या बनवलेल्या क्लोन चे डोळे अशावेळी हिरवे..आणि तेही हिरव्याजर्द चमकत्या पानसर्पा सारखे होतात... हा माझ्या प्रयोगातील दोष म्हण किंवा गुण....पण एक खरे रामराव कि तू क्लोन आहेस क्लोन!!! आणि--” डॉक्टर पुढे बोलायचे थांबतात कारण...
रामरावच्या अंगाला दरदरून घाम सुटतो...त्याचे डोळे आणखी चमकायला लागतात. तो चवताळतो...त्याला असह्य वाटायला लागते..भांबावल्यागत होतो... चीड,राग,संताप आणि अनावर क्रोध.... आपसूकच हात चाकुवर घट्ट.. डॉक्टरांकडे धाव... छातीवर सपासप वार... किंकाळी... तगमग.. रक्ताच थारोळ...
थोड्यावेळाने भानावर आल्यानंतर त्याला चुकी कळते.  भावनेच्या भरात त्याने काय केले हे खरतर त्यालाच कळले नव्हते... तो स्वताला सावरतच होता, तोच मुख्य दाराजवळ पावलांचा आवाज येतो. रामरावला तिथून निघायचे असते. तो खिडकीकडे लगबगीने जातो. हातातील चाकू आणि स्वताचा तोल सावरत पुढे पाय टाकणार तोच तिथल्या सगळ्या गोंधळामुळे बाजूच्या कपाटाला त्याचा धक्का लागतो.. आणि काही कळायच्या आत ते भलेमोठे कपाट त्याच्या अंगावर कलंडू लागते. स्वताला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण उजवा पाय कपाटाखाली यतो आणि तो विव्हळतो. पाय एवढा फसला असतो कि रामराव जागचा हलु  सुद्धा शकत नाही.  
कपाट पडल्याच्या आवाजाने दारावरील माणूसही सावध झाला असेल. आता आणखी काय-काय घडेल त्याला काहीच सुचत नव्हते... रामरावला खात्री असते कि दारावर आलेला डॉक्टरांचा तोच मित्र असेल.. ज्याचं गुपित आपल्याला माहित पडले होते. आता तो परत आपल्याला ठार करेल कि काय!! दाराच्या कचकच आवाजावरून कळले कि दार अतिशय सावधगिरीने दार उघडल्या गेले... थोड्यावेळाने हळूहळू अंधारातून एक आकृती आकार घ्यायला लागते... अगदी सावध पावलाने समोर आलेली आकृती आपला चेहरा न्याहाळत आहे.. ती आकृती आणखी पुढे येते आणि रामरावच्या हिरव्या डोळ्यांना उजागर होते...आणि काय आश्चर्य ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीच नसून साक्षात डॉक्टरच असतात...हो शंकाच नाही डॉक्टर हीनवटकरच...!! एक नजर रामराव जमिनीकडील डॉक्टरांच्या प्रेताकडे बघतो तर दुसऱ्या नजरेत जिवंत डॉक्टरांना बघतो... त्याला वेड लागेल असे वाटते.. त्याला ग्लानी येते आणी तो बेशुद्ध होण्यापूर्वी जिवंत डॉक्टरांच्या डोळ्यात शोधत असतो... जिवंत डॉक्टर म्हणजे खरे कि खोटे??... त्याच्या डोळ्यांचा रंग  कुठला??... काळा कि हिरवा... हिरवा कि काळा?

लेखक: ज्ञानेश्वर गजानन गटकर
      अमरावती. मोबा. ९०११७७१८११
      ई-मेल : dggatkar@gmail.com

           

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

मला भावलेला शेक्सपिअर-०१


मी काही खूप मोठा समीक्षक नाही. असेलोच काही  तर तुमच्या सारखा साधारण  वाचक आहे,  म्हणून शेक्सपिअर वर लिहिलेला हा लेख संहितेची चिरफाड करून केलेली समीक्षा नाही. अगदी सहज वाचताना आलेले साधारनशे अनुभव तुमच्यासमोर मांडतोय. आवश्यकतेनुसार संदर्भ गोळा करत गेले कि साहित्य कृती मस्त उकलत जाते आणि मजा देत जाते. इथे मी तेच केलेय.

'All the world is a stage.'  अस म्हणणारा हा शेक्सपिअर नावाचा अवलिया त्याच्या सुदैवाने भारतात जन्माला आला नाही. असता तर त्याची ओळख कुठल्यातरी प्राचीन पुस्तकात धूळ खात बसली असती. त्याच्यासाठी सर्व जग एक रंगमंच होते  पण नाटकाच्या रंगमंचावर त्याने सर्व जगाला अवतीर्ण केले होते. त्याने  आपल्या आयुष्यात एकंदरीत 37 नाटके लिहिली आणि जवळपास १२०० च्या वर पात्रे आपल्या कल्पनेने चितारली. त्यातील अनेक पात्रांनी लोकांना भुरळ पाडली... विशेषतः शोकांतीकेतील पात्र हि कल्पनेतील नसून अगदी सच्ची समजून त्यांच्यावर अभ्यास करण्यात आला. त्याच्या काही शोकांतिका वाचताना या पात्रांविषयी मला प्रकर्षाने काहीतरी जाणवत होते. त्याच जाणीवेला मी इथे शब्दबद्ध केले आहे.

हेम्लेट: एक  शापित राजपुत्र 

हेम्लेट हे त्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते. त्याच्या नायकावर भाष्य करण्या आधी थोडक्यात ती  कथा माहिती करून घेवूयात: डेन्मार्कचा राजपुत्र असलेला हेम्लेट. आपल्या पित्याच्या मृत्यूने शोकाकुल आहे.त्याच्या वडिलांचा खून करणारा दुसरा तिसरा कुणीच नसून त्याचा काका क्लोडीअस असतो. क्लोडीअस एकाच महिन्याच्या आत हेम्लेटच्या आईशी लग्न करतो व राजा होतो.. एके रात्री हेम्लेटला त्याच्या बापाचे भूत काकाने केलेल्या कारनाम्याची  हकीकत सांगते आणि हेम्लेटकडून क्लोडीअसचा प्रतिशोध घ्यायचे वचन घेते. परंतू संपूर्ण नाटकभर अनेकदा संधी मिळूनही हेम्लेट काकांचा खून करत नाही. शेवटी त्याच्या या नाकर्तेपणामुळे अनेक लोकांचे प्राण जातात. त्याची आई गर्त्युड,त्याची प्रेयसी ओफेलीया, त्याचे मित्र रोझेन्काझ व गील्देस्तर्ण, ओफेलीयाचे वडील पोलोनिअस व भाऊ लीरेटस हे फक्त हेम्लेट च्या कृतीशुन्यतेमुळेच आपल्या प्राणाला मूकतात..आणि शेवटी   अगदी अटी-तटी च्या वेळी तो काकाला ठार करतो...आणि स्वतः हि  मरतो.

मला वाटत हेम्लेट या पात्रा एवढी चर्चा कोणत्याच नाटकातील  पात्राची झाली नसेल. तुमच्यापैकी अनेकांनी नाटक वाचलेही असू शकते व त्याबद्दल आपापली मते ठरवलीही असतील. आपल्याच आईला छी!थू! करणारा,  तिने केलेल्या व्यभिचारासाठी तिचा तिरस्कार करणारा असा, काकाचा खून करण्यासाठी धडपडत असलेला एक नायक.  नाटकाच्या सुरुवातीला पहिल्या अंकातच त्याला वडिलांच्या खुनाबद्दल माहिती कळते. आईने  केलेला व्यभिचार कळतो. परंतु पुढची चार अंक तो वडिलांच्या खुनाचा बदला न घेता स्वताला निष्कारण त्रास देत वेडेपणाचे नाटक करतो. कुठलाही सुज्ञ नायक जो ज्ञानी आहे,रसिक आहे आणि जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा जाणकार आहे, त्याला कृतीशुण्यतेचे दुर्गुण ठावूक आहेतच आणि कृती केल्यानंतरचे फायदे सुद्धा जाणतो मग तो  कर्तव्यामध्ये इतकी हेळसांड कसा काय करेल? हा प्रश्न मला पडला. त्यावरील  टीकाकारांनी केलेली भाष्य सुद्धा वाचली. पण त्याने बदला घ्यायला का उशीर केला याचे उत्तर मिळत नव्हते. या प्रश्नाने अनेक जणांना वेड लावलंय म्हणे! लावलच असेल. तो शेक्सपिअर आहे...

मग एकदा विदर्भ महाविद्यालयातील इंग्रजी विभागात कार्यरत असलेले माझे सर लोक प्रा. राजेश श्रीखंडे आणि डॉ. जयंत चौधरी यांच्याशी चर्चा करताना फ्राइड च्या एडीपस कॉम्प्लेक्स चा विषय निघाला  आणि खूपच मस्त चर्चा झाली. त्या चर्चेच्या ओघातच हेम्लेटच्या नाकर्तेपणाच्या  प्रश्नाचे उत्तर मिळाल्यासारखे वाटले. फ्राइड च्या थेओरी नुसार(थोडक्यात देतोय. यावर एक स्वतंत्र ब्लॉग लिहील) प्रत्येक मुलामध्ये आपल्या आईबद्दल सुप्त शारीरिक आकर्षण असते. मुलाला जेंव्हा कळायला लागते कि त्याचे वडील आईच्या प्रेमात वाटेकरी आहेत तर तो वडिलांचा  तिरस्कार करायला लागतो आणि वडिलांचा काटा कसा काढता येईल याचा विचार करतो. परंतु वडिलांच्या शक्तीपुढे  आणि समाजातील नैतिक बंधनाच्या भीतीपोटी उत्तर आयुष्यात तो हा विचार आपल्या अंतर्मनात लपवून ठेवतो. यालाच 'एडीपस गंड'(याचीही एक कथा आहे..त्यावरही सविस्तर) म्हणून ओळखल्या जातो. हेम्लेट मध्ये हा गंड होता. त्याला स्वतालाच त्याच्या वडिलांचा खून करावासा वाटत होते. कारण आईच्या प्रेमात त्याच्यासाठी  वडील हे वाटेकरी म्ह्णून होते.  त्याची वडिलांना मारण्याची सुप्त इच्छा त्याच्या काकांनी पूर्ण केली याचे कदाचित त्याला समाधान वाटत असेल म्हणून तो आपल्या काकांना मारायला टाळत होता. एकंदरीत हेम्लेटचा काका म्हणजे त्याच्या अंतर्मनातील इच्छा पूर्ण करणारे साधन होते. हेच ते कारण आहे कि ज्यामुळे त्याला काकाचा बदला घ्यावासा वाटत नव्हता.

हे असे स्पष्टीकरण निघत होते आणि कुठेतरी पोहचल्यासारखे वाटत होते. परंतु हे पोहोचणे  समाधान देत नव्हते. फ्राइड च्या थेओरी नुसार काही प्रश्नांची उकल होत होती तरीही काही प्रश्न घिरट्या घालतच होते.  फ्राइड वाचायला घेतला. काही गोष्टी नव्याने समजायला लागल्या. पण नव्याने समजणाऱ्या गोष्टी प्रश्नाला सोडवत नव्हत्या तर त्याचा गुंता अजून वाढत होता त्यामुळे  हेम्लेटचा  नाकर्तेपणाचा प्रश्न आणखी गहन व्हायला लागला.

मी मानसशास्त्राचा अभ्यासक नाही त्यामुळे मला फ्राइड पूर्णतः  समजला असे  मी म्हणत नाही. (फ्राइडला स्वतः हि हेच वाटेल... तोही त्याला किती कळला असेल?)माझ्या बुद्धीला जेवढे कळले ते म्हणजे कि फ्राइड म्हणतो त्याप्रमाणे माणसाच्या अंतर्मानात त्याने लपवून ठेवलेली भीती किंवा त्याची एखादी इच्छा, जी दुसऱ्यांच्यापुढे उजागर होऊ नये असे त्याला वाटते, ती अप्रत्यक्षपणे  त्याला छळत असते.या दडवून ठेवलेल्या गोष्टी इतक्या सहजी बाहेर येत नाही आणि येतात तेंव्हा त्या रूप बदलून आपल्याला संकेत देत असतात. अशा सुप्त इच्छा जाणून घ्यायच्या असतील तर तिथपर्यंत पोचण्याचे काही छुपे मार्ग आहेत.

१.स्वप्न
२.बोलताना चाचरणे (Slip of the tongue)
3.कृती करताना चाचरणे (Slip of the Acton)
4. संमोहन

आता जर हेम्लेट मध्ये खरोखरच एडीपस गंड असेल म्हणजे आईविषयी असलेली आणि समाजात मान्य नसलेली कामेच्छा, तर ती वरील चारपैकी एकाने तरी नाटकात सूचित करायला हवी.

एकेकाविषयी थोडी चर्चा करूयात. संमोहन  आपल्या उपयोगाचे नाही कारण हेम्लेट हे काल्पनिक पात्र आहे त्यामुळे त्याच्यावर संमोहन काम करणार नाही.  पैकी उरले तीन:

१. स्वप्न: हेम्लेट काल्पनिक पात्र असल्याने त्याची स्वप्ने आपल्याला कळू शकत नसली  तरी त्याच्या अंतर्मनात जाण्याचा आपल्याला एक मार्ग आहे तो  म्हणजे त्याच्या सोल्यूलोकीस (आत्मभाषणे). पूर्ण नाटकामध्ये एकंदरीत ७ वेळा तो  एकटाच आपल्या मनातील विचार प्रगट करतो. जणू त्याचे त्यावेळीचे बोलणे म्हणजे संमोहित झाल्यासारखे किंवा स्वप्नातल्या जगण्यासारखे वाटते. म्हणून त्याची स्वभाषणे एक प्रकारे स्वप्नांसारखीच आहेत. ती  त्याच्या अंतर्मनाचा आरसा म्हणून आपण गृहीत धरू शकतो.

         जर असे असेल तर त्याच्या या आत्म/स्वभाषणातून त्याच्या मनाचा जो तळ आपल्याला दिसतो  त्यात कुठेतरी लपून का होईना एडीपस गंडाचे पडसाद उमटायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. उलट तिथेच त्याची असहायता, वडिलांबद्दलचे प्रेम, आई बद्दल घृणा आणि काकांबद्दल तिरस्कार प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे फ्राइड म्हणतो तसल्या 'एडीपस गंडाच्या' खाना-खुना कुठेच सापडत नाहीत. तो तर प्रत्येकवेळी पूर्ण जाणीवेने आल्या अंतर्मनातील आईच्या व्याभिचारामुळे आलेली हिडीस भावना व्यक्त करतो. तिला अनैतिक समजतो. आपल्या नवर्याशी प्रतारणा करणारी वेश्या समजतो. याचा अर्थ नैतिकतेच्या त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्यात नवरया शिवाय इतरांशी केलेले शारीरिक संबंध त्याला पटत नाहीत. अशी सामाजिक नैतिक मुल्य पाळणारा तो असेल तर आई-मुलगा हे संबध शारीरिक पातळीवर गेलेले त्याच्या नेनिवेला कसे पटणार? किंवा ते त्याला पटतात याचा कुठलाच संकेत मला तरी त्याच्या आत्मभाषणातून मिळालेला नाही.

२. बोलताना चाचरणे: अनेकदा आपण बोलत असताना अडखळतो, चाचरतो. अशा चाचरन्याला मनोवैज्ञानिक खूप गांभीर्याने घेतात. कारण तुम्ही नेमके कुठल्या शब्दांवर चाचरले त्यावरून तुमच्या अंतर्मनाचा ठाव घेतल्या जाऊ शकतो.  यासंदर्भात एक खेळ आपल्याला आठवेल, 'झिंदगी न मिलेगी दोबारा' या चित्रपटात तो खूपच कल्पकतेणे वापरलाय. खेळताना एक व्यक्ती कुठलातरी शब्द समोरच्याला देतो आणि तो शब्द ऐकताच सगळ्यात प्रथम आपल्या डोक्यात जे काही येते ते न हीचकिचता सांगायचे. यात नेमके होते काय आपल्या अंतर्मांत लपवून ठेवलेल्या गोष्टी बाहेर येण्याची वाट बघत असतात त्यांना तिथेच थोपवायला विशेष प्रयत्न करावे लागतात. ते प्रयत्न्न करताना मेंदूला थोडा विचार करावा लागतो आणि त्या गडबडीत आपण बोलताना वेळ लागतो किंवा आपण चाचरतो.

 प्रस्तुत नाटकात हेम्लेट एकदाही अशाप्रकारे  कुठे चाचरतो असे मला आढळून आले नाही. जेणेकरून त्याच्या मनातील आईविषयी असलेली त्याची  कामेच्छा दिसून येईल आणि  आपल्याला ते कळेल. उलट तो न डगमगता सतत बोलत असतो. बोलताना तो कुठेही विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. त्याचे बोलणे नैसर्गिक वाटते आणि ते तेवढ्याच सहज त्याच्या तोंडून बाहेर निघते. एकंदरीत  आपल्याला 'अपेक्षित चाचरणे' हेम्लेटच्या  बोलण्यात कुठेच आढळत नाही.

३.कृती करताना चाचरणे:
गुप्त/सुप्त इच्छा जेंव्हा कुठल्याही रुपात वास्तवात प्रगट होताना जाणवत असेल अशावेळी आपली देहबोली बदलते आणि आपण त्यावेळी कृती करताना गडबडतो. हे गडबडणे म्हणजे एक संकेत असतो आपल्या मनोवास्थेचा. माउस ट्राप सीन मध्ये याचाच  वापर  करून काका च्या मनातील अस्वस्थता पकडल्या जाते.  लपवून ठेवलेल्या मनातील दोषाचे, गुन्ह्याचे, इच्छेचे सादारीकरन जर  गुन्हेगारापुढे होत असेल तर नक्कीच त्याचे हावभाव आणि देहबोली बदलेल   हि गोष्ट शेक्सपिअर ला ठाऊक होती एरव्ही त्याने एवढ्या खुबीने त्याचा वापर आपल्या नाटकात केला नसता. मग जर नाटककाराला वरील गोष्ट  माहित  आहे  आणि हम्लेत च्या मनातील सुप्त इच्छा  हि वडिलांचा खून करणे हीच आहे  तर  त्याने ती  नाटकात निदान शब्दातून नाही  तर  कृतीतून  तरी दर्शवली असती. संपूर्ण नाटकात हम्लेत ची कृती एवढी स्पष्ट आहे कि तो आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतो. त्यांना आदर्श मानतो आणि त्यांना जीवाने मारणे हा  विचार त्याच्या मनात  एकदाही कुठे येत नाही. याचाच अर्थ फ्राइड सांगितलेल्या कुठल्याच गोष्टीचा पुरावा संबंध नाटकात कुठेच आढळत  नाही.

एकंदरीत मनोविश्लेषक जो ठासून दावा करतात कि फ्राइडच्या थेअरी नुसारच  हम्लेतच्या नाकर्तेपणाचे उत्तर मिलते. हे साफ चूक आहे. त्याला एडीपस गंड होता हे सिद्ध होत नाही

अशा प्रकारे मूळ प्रश्न अनुत्तरीतच राहतो कि हम्लेत वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यास उशीर का करतो?

क्रमशः ........



शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

आझाद हिंद एक्स्प्रेस: काही प्रसंग



भारत...हिंन्दुस्थान....इंडिया.... जशी आपल्या देशाला विविध नावे आहेत...म्हणजे नावातच विविधता आहे...हेच वैविध्य आपल्या देशाचा आत्मा आहे...भाषा, वेश...पेहराव ...धर्म...धारणा...बुद्धी....समाज...श्रद्धा आणि अंधश्रद्धा ...सगळ्यांबाबत आपला देश विविधतेने नटलेला आहे... आता तुम्ही म्हणाल कि मी हे तेच ते काय सांगतोय... नव असं काहीच नाही... सांगतो...नवीन असलेल तेही सांगतो..

तर माझ्यासारखा एक मीच या देशात नाही... अनेक आहेत माझे देशबांधव ज्यांच्यात माझ्यासारखेच रईमानी किडे आहेत(हा एक विशिष्ट जातीचा किडा आहे ज्यांना या किडयाबद्दल जिज्ञासा असेल तर त्यांनी वयैक्तिक संपर्क साधावा)... थोडक्यात उचापती... अशीच एक उचापत मला सुचली...माझ्या डोक्यात अशा उचापती कोण घालते मला ठावूक नाही...(कमळाला सुद्धा रईमानी कीड लागते का हो? सहज विचारतोय नाहीतर म्हणाल देशद्रोही) तर मी सांगत होतो कि मला एक उचापत सुचली... मी अमरावतीचा राहणारा... आणि पुण्यातील एका संस्थेमध्ये फ्रेंच भाषा शिकण्याची हुक्की आली... त्यासाठी मला प्रत्येक शनिवार ते रविवार पुण्याहून येणे-जाणे करावे  लागायचे ... अशी सहा महिने मी माझी हि विदेशवारी ( जेंव्हा पासून विदर्भ वेगळा पाहिजे तेंव्हापासून पुणे म्हणजे अत्यंत प्रगत असा परदेस वाटायला लागला आम्हाला ... आमच्याकडील विकासाची भाषा बोलणारे अनेक जनतेचे कैवारी पुण्यातील आवक करणाऱ्या प्रगतिबद्दल आणि विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल टाहो फोडतात..)...शक्यतो नेमाने करतो आहे.. एवढ्या वाऱ्या पंढरीच्या केल्या असत्या तर पांडुरंग माझ्या घरीच येवून राहिले असते पण हि फ्रेंच भाषा अजून मला काह्ही पावली नाही...तर मी सांगत होतो कि मी पुण्याला ज्या ट्रेनने येणे जाने करायचो ती ट्रेन म्हणजे ‘आझाद हिंद एक्स्प्रेस’...

भारतीय रेल्वेची आपली एक ओळख आहे... तिची एक स्वताची संस्कृती आहे... रेल्वे आणि रेल्वेचे अनोखे असे एक विश्व आहे...या गोष्टीची जाणीव आझाद हिंद मध्ये तेही जनरल च्या डब्यात विना तिकीट प्रवास केला तर नक्कीच होते... वर उल्लेखलेली भारतातील विविधतेतील एकता तुम्हाला बघायची असेल तर सांगतो त्याप्रमाणे तुम्ही एकदा रेल्वे प्रवास कराच... तुम्हाला भारत देश काय चीज आहे ते कळल्याशिवाय राहणार नाही...’भारतीय रेल’ खऱ्या भारताचे मूर्तिमंत उदाहरण कि काय म्हणतात ते आहे...


रेल्वे खात्याचे आपले स्वतंत्र असे बजेट आहे... देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांची संख्या साडे तेरा लक्ष आहे आणि जवळपास तेवढीच रेल्वे खात्यात कर्मचारी आहेत. म्हणजे रेल्वे मंत्रालय किती मोठे आणि महत्वाचे आहे याची प्रचीती येईल...एवढ्या मोठ्या मंत्रालयाला चालवण्यासाठी साक्षात ‘प्रभू’च हवे... परंतु या रेल्वे खात्यात एक मेख आहे ज्यावर प्रभूच काय नरेंद्र (इंद्राचे एक नाव या अर्थाने घ्या कि राव!!!) सुद्धा अंकुश ठेवू शकत नाही...


तर माझा दर आठवड्याचा हा प्रवास अमरावती-पुणे-अमरावती म्हणजे जीवन अनुभवांचा आठशे किलोमीटर वाहणारा एक झराच आहे... या झऱ्यातील अनुभवाच्या पाण्याचे काही सामान्य तरीही दुर्लभ अशे घोट मला प्यायला मिळाले... त्यातील काही प्रसंग कुठल्याही तत्त्वज्ञानाच्या चष्म्यातून न पहाता मी थोडक्यात सांगतो... सृजनात्मक लोकांनी त्याला आपले मानवजातीच्या जीवनविषयक मुल्यांची विवेचनात्मक टीप्पणी करण्यासाठी वापर केला तरी या पामराचा काही आक्षेप नसेल... (बापरे!... )



प्रसंग एक


आझाद हिंद एक्स्प्रेस, बोगी न. ११... मी जनरल (मराठीत सामान्य) दर्जाचे तिकीट काढले व रिझर्वेशन च्या बोगीत बसलो. (माझा किडा मुद्दाम काहीतरी उद्दामपणा करण्यासाठी मला उचकावतो सहज मजा म्हनुन् ...).. ओडिशा किंवा प. बंगाल च्या सुज्ञ नागरिकांनी केलेला कचरा बघून मी ‘जेनेरल’ च्या बोगीतच असण्याचा भास मला होत होता. प्रधानसेवकांनी कदाचित तिकडे निवडणुकीत  हरल्यामुळे स्वच्छ भारत अभियान राबवले नसल्याचे मला उगीच वाटले.. तर एका बंगाली प्रवाश्याने हाफ पँट घातली होती (परत तुम्ही नागपूरचा संदर्भ घेता आहात! देशद्रोही कुठले!)  व बंगाली लोकांच्या पापण्यावरील केसांइतुकेच त्यांच्या पायावरील केस सौंदर्यफुल असतात हे दिसावे म्हणून, वेळोवेळी लोकांचे लक्ष जावे म्हणून आपले पाय नखाने खाजवत होता. नखाने ओरबडल्यामुळे सफेद रेषा त्याच्या गर्द केसाळ पायावरील जंगलातून जाणाऱ्या पायवाटेसारखी दिसत होती. तो पाय खाजवत होता. मधेच चैनी घोटत होता. परत खाजवत होता. तोंडात चैनीची गोळी कोंबत होता. पचकन थुंकत होता. बाजुच्याच्या अंगावर काही कंठौष्ठ निघालेले तुषार उडत होते. तोही बिचारा जंगलातील पायवाट बघून, आपल्याच हाताने ते पिवळट दवबिंदू पुसत होता. न राहवून बंगाली हाप पँटवाल्याने  मला विचारले “जेनेराल का टीकोट काटो है.”.. त्याच्या बोलण्याची ढब अशी होती कि जसा काही तो मिलीटरीतील जनरल आहे कि काय? उत्तरादाखल मी नुसती मान हलवली... बंगाली लोकांना बोलताना मान हलवण्याची...हातवारे करण्याची (ओठांचा चंबू करण्याचीही )जास्तच सवय असते... असे मला दीदींचे भाषण ऐकताना वाटले... निदान माझ्या मनाचा तसा कयास होता. खरे खोटे देव जाणे!! आपल्या बंगाली जर्दा खाल्याने पिवळसर झालेले दात विचकत आणि मला बारीकसा डोळा मिचकावत तो बिनधास्त हसला. “डरो मोत हमारे साथ भी दो लोग है. जेनेरल का तिकोटवाले, जोब टीटी आयेगा तोब सोव का नोट दे देना’. त्याने म्हटले त्याप्रमाणे टीटीआल्यावर  मी शंभर रुपये दिले. टीटी काहीही जास्त न  बोलता निघून गेला. मी  आरामात त्याच्याशी गप्पा मारत बसलो. त्याचा एक सोबती होता तो आणि हा एकाच बर्थ वर झोपले आणि मला मनमाड नंतर झोप यायला लागली होती म्हणून त्यांनी वरची बर्थ मला दिली... माणुसकी आणखी काय!!!


प्रसंग २:


आपण स्वार्थासाठी किती दलबदलू होऊ शकतो हे मला व्यक्तिशा या पुणे वारीतच कळले. एकाच दिवशी मी दोन माणसांशी बोललो आणि माझे बोलणे मलाच  एवढे धूर्त वाटायला लागले होते कि माझे आडनाव कोल्हे किंवा पवार असायला पाहिजे होते. बडनेरा ते भुसावळ पर्यंत मला मुज्जमील शेख कि खान कि शहा (हि नावे लक्षातच राहत नाहीत.. तो मुझफरनगरचा होता एवढे आठवते) याच्या बर्थवर अड्जेस्ट व्हायचे होते तेंव्हा त्याच्याशी बोलायला गेलो. इकडले-तिकडले विषय काढल्यावर राजकारणावर बोलणे सुरु केले.(भारतीयांचा आवडता विषय) त्याने जागा द्यावी म्हणून अचानकच मला राहुल गांधी भारताचे आधुनिक शिल्पकार (कि आधुनिक भारताचे शिल्पकार.. माझा हा असा गोंधळ होतो!) वाटायला लागले आणि सोनियाजी गांधीजी असे त्यांच्या नावाला दोनदा ‘जी’ लावत बोलायला लागलो. या नावात काय जादू आहे काय माहित मी बेदिक्कत त्याच्या बर्थ वर भुसावळ पर्यंत आलो. नावाची महिमा अजून काय!


भुसावळला मुज्जमील मला टाटा करून निघून गेला.. तेव्ह्ड्यातच अंकुश पाटील नावाचा माझ्याहून थोडा मोठा असेल दोनेक वर्षाने तो त्याच बर्थवर आला. मी आपल्या निस्वार्थ भावनेने त्याच्याशी बोलायला लागलो (डोळा मिच्कावलाय येथे)आणि बीजेपी निवडून आल्याने कसा देशाचा विकास होतोय असे काही-बाही बोलू लागलो. तो गालातल्या गालात हसत होता. मला वाटल आपल काम झाल. थोड्यावेळाने माझ बोलून झाल्यावर त्याने मला विचारल “मा.म.देशमुख, आ.ह.साळुंखे यांना वाचलंय का?” ... मी क्षणभर थांबलोच आणि स्वताला सावरत धडधड साळून्खेच्या पुस्तकांची पाच-सहा नावे तोफगोळ्या सारखी त्याच्या अंगावर फेकली... मग पुढे काय... आमची चर्चा शिवाजी महाराज कसे राजपूत होते यावर येवून थांबली आणि मला एक मोठी जांभई आली. त्याने त्याच्याच बर्थवर मला अड्जेस्ट केले... माणुसकी आणखी काय!!!


प्रसंग ३:


मनमाड: रेल्वेचे इंजिन बदलायला अजून अवकाश होता. तोपर्यंत डब्यातील सर्व बंगाली ललनांचे चेहेरे बघून झाले होते.. इतरही होते मीनाक्षी डोळे बघणारे ...आणि वक्षी-मीनाक्षी मंदिरे बघणारे . असो. तर मी सांगत होतो अनेक स्वभावाची लोक तुम्हाला रेल्वेच्या एकाच बोगीत भेटत असतात. आता मनमाडला होतो आणि नेहमीसारखेच जेनरल तिकीट पण बसायचं होत रिझर्वेशन मध्ये. मी ११ न. स्लीपर कोच मध्ये घुसलो. आणि फाटकातील पहिल्या काम्पार्तमेंत मध्ये उभा झालो. भूक लागल्यामुळे मी चहा आणि बिस्कीट उभ्यानेच खात होतो. त्यामुळे दोन्ही हात गुंतले होते म्हणून माझी कपड्यांची पिशवी मांड्यांमध्ये पकडली होती. मी जास्त हालचाल करू शकत नव्हतो. तेव्हड्यात आणखी माझ्यासारखीच जेनरल तिकीटवाली तीन-चार मुले तिथेच आली. माझी चहा-बिस्कीट अजून संपली नव्हती तर समोरच्या दारातून काळा कोट दिसला. काळ्या कोटवाल्या टीटीला बघून हि मुले खाली उतरली. काळ्या कोटाने दुरूनच खवचट नजरेने बघितले.. मी चहा-बिस्कीट खात, मांड्यामध्ये पिशवी धरून उतरू शकत नव्हतो म्हणून नाईलाजाने मला तसेच थांबावे लागले. नाहीतर मीही पटकन त्या बोगीतून निसटलो असतो. काळा कोट मला बघून तिथेच थांबला. गाडी सुरु झाली... खाली उतरली मुले परत चढली आणि मला म्हणाली “टीटी गेला ना?” मी त्यांना उत्तर देईल तोच काळा कोट पुढे हजर.. त्याने त्या मुलांकडून तीनशे-तीनशे वसूल केले आणि माझ्याजवळ आला म्हणाला “तुझ्याकडून मी काही घेणार नाही कारण मला बघून तू पळून गेला नाहीस... तुझ्या मनात चोर नव्हता, हि मुले लुच्ची आहेत.. तू प्रामाणिकपणे इथेच थांबला. चाल मी तुला एक रिकामा बर्थ देतो”.... मी म्हणालो ... माणुसकी आणखी काय?


प्रसंग ४:

पुणे रेल्वे स्टेशन, अमरावती कडे जाणारी परतीची आझाद हिंद. मुद्दाम एक तास आधीच आलो होतो  स्टेशनावर, म्हटले आज जाताना जेनेरल नेच जाऊ पण बघतो  तर काय... चिक्कार गर्दी. जवळपास २०० मीटर लांब लाईन लोकांची जेनेरल बोगी साठी. लगेच विचार बदलला. शेवटच्या प्लेटफॉर्म वर ५.२५ची  पुणे-नागपूर लागलेली होती. त्यातल्या जनरल बोगीत बसलो.  गमंत म्हणजे त्यात गर्दी नव्हती(रेल्वे मध्ये गर्दी नाही हि गंमतच कि खंडेराय.) . . तर तिथे एक पहिलवान टाईप तरुण ज्याच्या तोंडात गुटखा होता आणि डोळ्यातून मदिरेचा रंग झळकत होता छान ऐसपैस बसला होता. मी त्याला थोडे सरक म्हटले तर तो म्हणाला 'यहा बैठना है तो पचास रुपये लगेंगे!" मी म्हटल कसे काय "ऐसे हि है याहा पे." तेव्हड्यात दुसरे एक काकाजी आले आणि ते बेधडक पुढच्या बर्थवर बसले. त्या तरुण मुलाने आपल्या गुटखा खालल्या श्रीमुखातून बाहेर एक पिंक टाकत काकांना रुपये मागितले पण काकांनी नकार दिला. दोघांचा वाद सुरु झाला. त्याचा फायदा घेऊन मी वरच्या बर्थ वर पालकंड मांडून बसलो. तो एकदा मला रुपये मागायचा एकदा काकांना. आम्ही दोघेही नाही म्हणत होतो. आणखी प्रवासी येत होते..बसत होते..तो सगळ्यांना जागा जिंकून ठेवल्याचा मोबदला मागत होता. पण त्याचा सगळा जोर आमच्या दोघांवरच होता. त्याचाच एक मित्र बाजूच्या कॅम्पार्तमेंट मध्ये आपली वसुली करत होता. या सगळ्या गोंधळामुळे आधीच सोमरसाने बेधुंद झालेला तरुण चेकाळला आणि त्याने काकांच्या कानशिलात लगावली आणि मला म्हणाला 'तू रुपये देता कि तुझे भी देऊ एक'. मला काही  सुचलच नाही. मी सरळ वरच्या बर्थ चा आधार घेत एक जोरदार लाथ त्याच्या छातीत मारली. गडी पार पलीकडल्या खिडकीला जाऊन धडकला. त्याने त्याच्या मित्रांना आवाज दिला. ते आले. एव्हना त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला होता. त्यांनी त्याला समजावले कि आता तमाशे केले तर लोक खवळतील आणि रेल्वे पोलीस पण येतील. पण आपला गडी जुमानतच नव्हता न भाऊ! त्याने माझे शर्ट ओढले आणि सगळ्या बटन्स तुटल्या. मला तर अब्रू गेल्यासारखेच वाटायला लागले. मी चेकाळलो आणि त्याच्या मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत अगदी डोक्यात चार कि पाच (नक्की आकडा आठवत नाही पण माझा हात झांजरला होता) बुक्क्या हाणल्या. त्याच्या मित्रांनी आम्हाला आवरले. पण तो खूपच भांबावला. त्याला समजावण्यासाठी त्याच्या मित्राने काहीतरी त्याच्या कानात सांगितले. तो माझ्याकडे हसून म्हणाला 'गाडी सुरु झाल्यावर बघतो, खालीच फेकून देतो" यावर माझ्या आणि  त्याच्याकडून खूप आय माय  निघाली. आणि  तो निघून गेला. साला, माझी तर फाटत होती पण सांगणार कोणाला? उसनी हिम्मत थोड्यावेळ सोबत राहिली पण जसा रक्तातील राग थंड होत गेला तसा मी पार गांगरून गेलो. याने खरच खाली फेकले तर...अबबब!!

डब्यातून उतरुन खाली आलो. गार्डला  भेटलो. त्याने रेल्वे पोलीसला बोलावून घेतले. त्याने सगळा प्रकार विचारला. मी सांगितला. तो म्हणाला त्याला ओळखतो मी तू आत बस. मी बघतो. मी शांत होण्याचा प्रयत्न करत बोगीत बसलो. धडधडणारे हृद्य...इंजिनच्या धडधडीत सामील झाले.. गाडी सुटली.....आणि तो बेवडा तरुण रेल्वे पोलीसासोबत मजेत चर्चा आणि गमती जमती करताना मला दिसला... मला आश्चर्य वाटले. बाजूच्या एकाने मला तेंव्हाच म्हटले "पोलिसाला हप्ता मिळतो दादा! त्यांचा धंदा आहे हा! ... व्वा त्याचा धंदा चालावा म्हणून पोलीस त्याला किती मदत करतोय" ... मी काय म्हणालो असेल माहितीय....माणुसकी आणखी काय!?


ज्ञानेश्वर गजानन गटकर
मोब. ९०११७७१८११
अमरावती.


जय जय वैदर्भीवासी अंबे | धावत येई अविलंबे...

जय जय वैदर्भीवासी अंबे | धावत येई अविलंबे...

विदर्भातील सांस्कृतिक, शैक्षणिक  शहर म्हणून ओळख निर्माण केलेले आणि विदर्भाचे 'पुणे' म्हणून नावारूपाला आलेले अमरावती शहर...  संस्कृतातील उदुंबरावती या शब्दाचे प्राकृत रूप उंबरावती असून नंतर अपभ्रंश होवून उमरावती आणि आता अमरावती असे झाले. याप्रकारे प्रवास करत विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अमरावती शहर... आणि या शहराचे दैवत आई अंबा..

कुठल्याही शहराचा इतिहास हा त्या शहरातील पुरातन वास्तूतून आपल्यासमोर उजागर होत असतो. अशी वास्तू  म्हणजे एक मुका इतिहासकारच असते. अमरावतीतील अंबादेवीचे मंदिर अनेक शतकांपूर्वीची कहाणी सांगण्यास सक्षम आहे. अंबादेवी व त्यायोगे अमरावती शहर यांच्या प्राचीन व पौराणिक इतिहासाचा ओझरता आढावा घेणे अगत्याचे ठरेल.

·         पौराणिक काळातील उल्लेख:
इंद्राच्या अमरावतीचे वर्णन महाभारतात आलेले आहे. श्री कृष्णाने गरुडावर आरूढ होवून इंद्राच्या या अमरावती नगरी मधून पारिजातक वृक्ष आणला असे पौराणिक कथेत वर्णन आहे.उत्तरेतील आर्यांच्या यदु वंशातील भोज शाखेतील विदर्भ नावाच्या क्षत्रियाने आपले राज्य येथे स्थापन केले. त्यानेच  वर्धा नदीच्या तीरावर विदर्भनगरी उर्फ कुंडीनपूर हे राजधानीचे शहर उभे केले. विदर्भ राज्याच्या घराण्यातील इंदुमती नावाच्या कन्येचा विवाह प्रभू रामचंद्राचे पितामह अज नृपती यांच्याशी झाला. विशेष म्हणजे अगस्ती ऋषीची पत्नी लोपमुद्रा आणि नळ राजाची पत्नी दमयंती या विदर्भकन्याच होत्या. याच राजघराण्यातील राजा भीष्मक याची कन्या रुख्मिणी म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी होय. रुख्मिणीचे हरण ज्या ठिकाणाहून झाले ते म्हणजे आज अमरावती शहरात असलेले श्री अंबेचे मंदिर होय.
·         इतर उल्लेख:
.. १८७० च्या गझेटीअर फॉर दि हैद्राबाद असाइन डीस्ट्रीक्स यात अंबादेवी मंदिराचा उल्लेख केलेला आहे . सेटलमेंट रेकॉर्ड मध्येही श्री अंबा मातेचे मंदिर हे दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचे आहे असे म्हटले आहे. १९११ व १९६८ मधील उमरावती जिल्ह्याच्या गझेटीअर मधेय्ही असाच उल्लेख आढळतो.  तेराव्या शतकात श्री गोविन्द्प्रभू उमरावातीला आले असता त्यांनी रुख्मिणी हरणाचे स्थान पहिले अशी नोंद आहे. या वरून तेराव्या शतकातही रुख्मिणी हरणाची आख्यायिका प्रचलित होती म्हणजेच हि आख्यायिका अतिशय पुरातन आहे. या संदर्भात अम्बादेविच्या मंदिरातून कृष्णाने रुख्मिणी हरण कसे केले हे पाहणे महत्वाचे ठरेल.
·         रुख्मिणी हरणाची आख्यायिका:
विदर्भ राजा भीष्मक यास पाच पुत्र व एक लावण्यवती कन्या होती. सर्वात मोठा पुत्र रुख्मि (रुक्मि) होता तर कन्येचे नाव रुख्मिणी (रुक्मिणी) होते. ती साक्षात अंबेचा अंश होती. ती लग्नाची झाली तेंव्हा तिच्या भावाच्या आग्रहाखातर तिचा विवाह चेदि देशाचा राजपुत्र शिशुपाल याच्याशी ठरला.
द्वारकेचा राजा श्रीकृष्ण याच्या रूप आणि पराक्रमाचे  गुणगान रुख्मिणी ऐकून होती. त्याच्यावर तिचा जीव बसला. श्रीकृष्णाशीच लग्न करेल असे तिने ठरवले. द्वारकेत कृष्ण सुद्धा तिच्या रूपाच्या आणि सद्गुनाच्या वर्णनाने भारावून गेला होता व त्यानेही तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले.('शिशुपाल नवरा मी न-वरी.. श्रीकृष्ण नवरा मी नवरी')
रुख्मिणीने कृष्णाला निरोप पाठवला. सुदेव नावाच्या ब्राह्मणाने निरोपाची 'रुख्मिणी-पत्रिका' (भागवत- दशमस्कंध: अध्याय ५३) कृष्णाकडे पोचती केली. पत्रात तिने कृष्णाला आव्हान केले कि त्याने तिचे हरण करावे. तिने आपली प्रीती व्यक्त करताना सांगितले कि विदर्भ राज्यांच्या कुलनेमाप्रमाणे लग्नाच्या आदल्या दिवशी नववधू(रुख्मिणी) अंत:पुराबाहेर पडून नगराबाहेरील अंबा देवीच्या दर्शनाला जाईल तेंव्हा त्याने तिचे हरण करावे. कृष्णाने शिशुपाल आणि जरासंध यांना युद्धात हरवून तिच्याशी राक्षस विवाह करावा अशी तिची इच्छा होती.... आणि तिच्या इच्छेप्रमाणे सगळे घडून आले कृष्णाने तिला आई अंबेच्या मंदिरातून हरले व द्वारकेला निघाला.
या सगळ्या वर्णनावरून अंबा मातेच्या मंदिराचे पौराणिक महत्त्व आपल्या लक्षात येते.
·         श्रो अंबामातेची स्वयंभू मूर्ती:
श्रीकृष्णाचे सासर आणि लक्ष्मी स्वरूप रुख्मिणीचे माहेर असलेले हे भारतातील एक शक्तीपीठ आहे. अंबा मातेची मूर्ती स्वयंभू असून ती काळ्या रंगाच्या वालुका पाषाणाची आहे. हि मूर्ती पूर्णाकृती आसनस्थ आहे. अंबेचे दोन्ही हात मांडीवर विसावलेले, डोळे अधोन्मिलीत, शांत, गंभीर व ध्यानस्त अशी मुद्रा धारण केलेली आहे. मूळ मूर्तीला बिंदी, कानातील बाल्या, बुगड्या, नथ, गळ्यात ठुशी व सुवर्णाच्या सऱ्या, कमरपट्टा आणि अनेक दागिन्यांनी अलंकृत करण्यात आले आहे.
·          श्री अंबेच्या मंदिराचा इतिहास:
शहराच्या मध्यभागी असलेले मंदिर हे प्राचीन आहे. बदलत्या काळानुसार त्यात अनेक बदल केलेलं असले तरी मुख्य गाभारा हा मूळचाच असण्याची शक्यता आहे. शक्यता यासाठी कि इ.. १४९९ च्या कालखंडात यवनांनी विदर्भ प्रांतातील असंख्य मंदिराची नासधूस केली तेंव्हा विदर्भातील एवढे प्रसिद्ध मंदिर खचितच सुटले असावे. परंतु मूर्ती आणि गाभारा कसाबसा त्यातून सुरक्षित राहिला असावा... १६६० च्या सुमारास श्री. जनार्धन स्वामी यांनी मंदिराचा जीर्नोधार केला असावा. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराला पूर्वी दगडी भिंती होत्या आणि गाभाऱ्याचे द्वार ठेंगणे होते... १८०६ ते १८२१ या कालखंडात निजामाने अमरावतीच्या संरक्षणासाठी एक मजबूत असा दगडी परकोट बांधला आहे. तो परकोट अजूनही बऱ्यापैकी मजबूत असून आपले अवशेष टिकवून आहे. या परकोटाच्या एका दरवाज्याला 'अंबा दरवाजा' म्हटल्या जाते... १८६३-६४ साली श्री अंबेची मूर्ती फक्त एका चबुतऱ्या वर  होती. त्यावेळी श्री नाना चिमोटे व केवलचंद्रजी या दोन गृहस्थांनी वर्गणी गोळा करून मंदिर बांधले. १८९६ मध्ये मंदिराच्या शिखराचे काम झाले तर १९०६ मध्ये कळसाला सोन्याचा मुलामा देवून नवीन करण्यात आले. आज मंदिराला प्रशस्त सभामंडप आहे.
·          श्री जनार्दन स्वामी यांचे कार्य:
१७ व्या शतकामध्ये १६४० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामी नावाचे सत्पुरुष अंबेचे भक्त होते. तेथेच त्यांनी मंदिरच्या दक्षिणेकडील लागुनच असलेल्या अंबा नदीच्या तीरावर आपली पर्णकुटी उभी केली. रोज देवीचे दर्शन घेतल्याशिवाय ते अन्न ग्रहण करत नसत. एके दिवशी नदीला पूर आल्यामुळे त्यांना दर्शन घेणे शक्य झाले नाही. त्याच दिवशी त्यांना दृष्टांत झाला. अंबा देवीने त्यांना साक्षात दर्शन दिले व आकाशवाणी झाली कि जी विहीर स्वामी वापरात होते त्या विहिरीवरील बाण म्हणजे साक्षात देवीच आहे. त्याचीच प्राण प्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे असे बोलून देवी अदृश झाली. ती देवी म्हणजे एकविरा देवी होय व अंबा नदीच्या दुसऱ्या तीरावर आज तिचे मंदिर आहे. श्री एकविरा देवीची प्राण प्रतिष्ठा १६६० च्या शतकात झाली. आज तिथे भव्य मंदिर आहे. अंबा आणि एकविरा देवी ला जोडणारा पूल बांधण्यात आला असून भाविक एकाचवेळी दोन्ही मातेचे दर्शन घेतात. एकवेरा देवीच्या मंदिरात एक भुयार असून काही लेण्यावाजा खोल्या आहेत. त्यांचा उपयोग यवनांच्या आक्रमणावेळी संरक्षणासाठी झाला असावा.
·          श्री अंबा संस्थान आणि संस्थानाचे समाजपोयोगी कार्य:
श्री अंबा देवी संस्थान हे मंदिराची देखभाल तर करतेच शिवाय अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सुद्धा राबवते. संस्थानातर्फे एक सुसज्ज ग्रंथालय चालवल्या जाते. १९७० साली स्थापण झालेल्या ग्रंथालयाला '' वर्ग प्राप्त झाला असून सुसज्ज असे वाचनालय सुधा आहे. तसेच गेल्या १२ वर्षापासून संस्थान डॉ. जोशी हॉस्पिटल यांच्यासोबत एक सुसज्ज दवाखाना चालविते. अतिशय कमी दरात आणि गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात आतापर्यंत तिचा लाभ हजारो रुग्णांनी घेतला आहे.
जुन्या काळापासून कलाकार आणि अंबा मातेचा एक संबंध आहे. जुन्या काळातील कालावान्तिनी आपली कला मातेच्या सभामंडपात सादर करायच्या. अनेक गणिका, त्यात मुस्लीम गणिकांचा सुधा सहभाग होता, अंबा चरणी आपली भक्ती कलेच्या रूपाने अर्पण करयच्या. अंबादेवीला मिळणाऱ्या दानातील सगळ्यात जास्त वाटा गणिकांचा आहे. आज, नवरात्र मोहोत्सवात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपली कला सादर करतात. श्री अंबा फेस्टिवल म्हणून नवरात्र महोत्सव अमरावती मध्ये साजरा केला जातो ज्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या फेस्टिवल मध्ये अनेक सांस्कृतिक साहित्यिक आणि लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित केल्या जातात.

"परमशक्ती आनंदमय इत्त्युच्चते  ' अशी आई अंबा... ती देशकालमर्यादेच्या पलीकडची आहे...ब्रह्मांडाचे लालन पालन करणारी आदिमाया म्हणजेच अंबिका ...श्री अंबा होय. 



प्रा, ज्ञानेश्वर ग. गटकर 
अमरावती.


अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...