मूळ लेखक: ओ हेनरी
मराठी अनुवाद: ज्ञानेश्वर गटकर
सोपी अस्वस्थ होता. तसाच उदास मनाने तो मेडिसन चौकातील त्याच्या जागेवरून उठला.
वातावरणातील बदल स्पष्टपणे सुचवत होते कि हिवाळ्याचे दिवस जवळ आले आहेत.
पक्षी
दक्षिण दिशेला उडून जात आहेत,आपल्या नवर्याकडून हिवाळ्यात घालण्यासाठी नवीन, सुंदर, उबदार आणि तेवढाच महागडा कोट मिळावा म्हणून बायका लाडात येत आहेत आणि
आपल्या जागेवरून सोपी उठत आहे हि हिवाळा येण्याचे संकेतच आहेत हे
समजदार व्यक्तीला सांगायची गरज नाही.
एक मलूल झालेलं पान
सोपिच्या पायाशी येउन पडले. हिवाळा लवकरच सुरु होणार हे सांगणारा हा एक विशेष संदेश होता. तोच नाही तर त्याच्यासारखे अनेक लोक जे मेडिसन चौकात राहतात, ते या अपशकुनाबरोबरच हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी छत शोधायच्या तयारीला लागत.
त्या गळणार्या पानांबरोबरच
सोपिला कळून चुकले कि आता येणाऱ्या हिवाळ्यातील थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी
काहीतरी हालचाल करण्याची वेळ आली आहे. या वास्तवाची जाणीव झाल्याबरोबरच तो कामाला
लागतो आणि आपल्या जागेवरून उठतो.
हिवाळ्यातील दिवस कसे
घालवायचे याबद्ल सोपीच्या खूप जास्त अपेक्षा नव्हत्या. श्रीमंत लोकांसारखे कुठल्या तरी दूर देशीच्या समुद्र प्रवासाला
जायचे किंवा दक्षिणे कडील उबदार वातावरणात जायचे किंवा नेपल्स या टुमदार बेटांवर हिवाळा घालवायचा असला काही तो विचार करत नव्हता. तर ब्लेकवेल या बेटावरील तुरुंगात हिवाळ्यातील तीन महिने व्यतीत
करावे हीच त्याची अगदी साधारण इच्छा होती. तीन महिने पुरेसे अन्न, पांघरायला कापड आणि
डोक्यावर छत एवढे जरी मिळाले तरी टोचणारी थंड हवा आणि विनाकारण त्रास देणारे पोलीस यांच्यापासून
त्याची सुटका होणार होती. सध्याच्या घडीला तुरुंग हाच त्याच्यासाठी उत्कृष्ठ
पर्याय होता... ही त्याची छोटीशी इच्छा.
अनेक वर्षापासून ब्लेकवेल तुरुंग सोपिचे हिवाळ्यातील घर होते. न्यू यॉर्क मधील सधन लोक आपल्या हिवाळी
सुट्या घालवण्यासाठी फ्लोरिडा किंवा भूमध्य समुद्रावरील सागर किनार्यावर जायचे. त्याचप्रमाणे सोपीने सुद्धा आपल्या सुट्टीसाठी तुरुंग असलेल्या बेटाची निवड
केली होती.
आणि आता सुट्टीच्या दिवसांच्या तयारीला लागायची वेळ आली
होती. तीन मोठमोठाली वर्तमानपत्रे जी चौकातील बगीच्यात झोपताना तो पांघरून किंवा अंथरून म्हणून वापरायचा आता तीसुद्धा थंडीपासून सोपिला वाचवण्यास असमर्थ होती, म्हणून तो बेटावरील तुरुंगाचा विचार गांभीर्याने करायला लागला.
याचा अर्थ असा नव्हता कि न्यू योर्क शहरात सोपिला अन्न आणि निवारा देणाऱ्या ओळखीतील लोकांची वानवा होती. त्याच्या ओळखीतील लोकांकडे
आळीपाळीने जाऊन तो आपल्या गरजा भागवू शकला असता परंतु त्याला ब्लकवेलचा तुरुंग इतर पर्यायांपेक्षा जास्त सोयीस्कर वाटायचा. त्याला असे वाटण्याची काही कारणे होती.
सोपी तसा स्वाभिमानी
व्यक्ती होता. जर तो शहरातील आपल्या ओळखीकडे राहायला गेला असता तर तिथे त्याला
आपल्या इच्छेविरुद्ध काही कामे करावी लागली असती. ओळखीतील लोकांनी त्याला
राहण्यासाठी पैसे मागितले नसते तरी या न त्या प्रकारे त्याच्याकडून राहायचा मोबदला त्यांनी वसूल केला असता, जसे कि त्यांनी सोपिला आंघोळ करायला सांगितली असती, किंवा काय करतोस? कुठे राहतोस? आता काय करायचं ठरवल? अशा अनेक
प्रश्नांची उत्तरे मागितली असती किंवा त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल विचारणा
सुद्धा केली असती.
अशा गोष्टी करण्यासाठी
त्याचे स्वाभिमानी हृद्य त्याला परवानगी देत नव्हते. त्याकारणे तुरुंगात जाणे
त्याला सोपे वाटायचे. तुरुंगात राहण्याचे काही नियम जरी असले तरी ते नियम सभ्य
व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळा-ढवळ करत नाही हे सोपी पूर्ण जाणून होता.
त्याचा तुरुंगात जाण्याचा
निर्णय पक्का झाला आणि त्वरेने तो आपल्या कामाला लागला.
तुरुंगात जाण्याचे अनेक सोपे मार्ग त्याला ठावूक होते. त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला आणि आनंद देणारा
मार्ग म्हणजे एखाद्या महाग आणि चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन भरपेट खायचे. खाऊन
झाल्यावर बिलाचे पैसे चुकते करायला पैसेच नाहीत म्हणून सांगायचे. तेंव्हा
पोलिसांना बोलावण्यात येईल आणि त्याला पकडून नेतील. हे सगळे अगदी शांततेच्या मार्गाने होणार याची त्याला खात्री होती. पोलिसांनी अटक केल्यावर
त्याने कलेल्या गुन्ह्यासाठी त्याला न्यायाधीशांसमोर उभे केल्या जाईल. आणि बाकीचे
सोपस्कार न्यायाधीश महोदय नंतर स्वतः पार पाडतील.
असा निश्चय करून तो
ब्रोडवे आणि फिप्थ अवेन्यू नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावरील
मेडिसन चौकातील बाकड्यावरून उठला. विस्तीर्ण पसरलेल्या चौकाला पार करून
उत्तरेकडील ब्रोडवे रस्त्यावरून तो चालू लागला. थोड्यावेळातच एका मोठ्या रोषणाई केलेल्या
रेस्टॉरंट समोर तो उभा होता.
सोपीला विश्वास होता कि कमरेपर्यंत तो बर्यापैकी सभ्य माणूस वाटत होता कारण चेहरा स्वच्छ धुतलेला होता. चढवलेला कोटहि बऱ्यापैकी धुतलेला होता.
रेस्टॉरंटच्या आतील टेबलावर पोचेपर्यंत त्याला कोणी हटकले नाही म्हणजे झाले! आणि एकदा
जेवणाच्या टेबलावर तो बसला म्हणजे त्याचे काम फत्ते झाले कारण टेबलाच्यावर त्याचा
शरीराचा जो भाग दिसले तो व्यवस्थित होता. मग तो सांगेल ते जेवण वेटर त्याला
आणून देईल याची त्याला खात्री होती.
आपण काय काय खावे यावर तो विचार करायला लागला. रेस्टॉरंट च्या
मेनुतील झाडून पुसून सगळे पदार्थ त्याच्या नजरेसमोरून सरकत होते. जेवणाची किंमत खूप काही जास्त नव्हती आणि त्यालाही रेस्टॉरंटच्या लोकांनी बिलाची रक्कम न दिल्यावर खूप चिडू नये
असेच वाटत होते कारण पुढील तीन महिन्याच्या सुट्यांची सुरुवात उत्कृष्ट जेवणाने
करावी आणि आपण सुखाने आपल्या हिवाळ्यातील घरी जावे अशी आणि फक्त इतकीच त्याची साधीशी इच्छा होती.... त्यासाठीच हा प्रपंच.
परंतु जसा त्याने आपला पाय रेस्टॉरंटच्या दारातून आत टाकला तेंव्हाच मुख्य
वेटरचे लक्ष त्याच्या फाटलेल्या जोड्याकडे आणि उसवलेल्या प्यांट कडे गेले. क्षणाचाही
विलंब न करता सोपिला तेथून बाहेर हाकलण्यात आले.
सोपी परत ब्रोडवे रस्त्यावर चालू लागला. हा साधा आणि सरळ उपाय निष्फळ
ठरला होता. एवढ्या सहजतेणे आणि सुखाने हवे ते मिळणार नाही असे त्याला वाटले. दुसरा कुठला तरी पर्यायी मार्ग शोधावा
लागेल याची जाणीव झाली.
पुढे सिक्स्थ अवेन्यू चौकात पोचल्यावर त्याला कोपर्यातील एक दुकान
दिसले. दुकानासमोरील दर्शनी भिंतीवर एक भलीमोठी काचेची खिडकी होती जी जगमगत्या दिव्यांनी लखलखत
होती. सोपीने एक दगड घेतला आणि त्या खिडकीच्या दिशेने भिरकावला. काच फुटल्याचा
आवाज झाला. लोकांची गर्दी झाली. धावत येणाऱ्या लोकांमध्ये एक पोलीससुद्धा होता.
सोपी निश्चल उभा होता आणि पोलिसाकडे बघून हसत होता.
“दगड मारणारा माणूस कुठे आहे?” पोलिसाकडून विचारणा झाली.
“तुम्हाला हा दगड मीच मारला असे वाटत नाही का?” सोपी उत्तरला. सोपी
खूपच खुशीत दिसत होता. त्याला जे पाहिजे होते ते स्वतःहून तिथे चालत आले होते आणि
आता त्यालाच विचारत होते.
परंतु पोलिसाने सोपिकडे अजिबात लक्ष दिले नाही. पोलिसाच्या मतानुसार
जो व्यक्ती दगड मारेल तो उगाच कशाला त्याठिकाणी थांबेल. दगड मारणारे जितक्या लवकर
होईल तितक्या लवकर पळ काढतील. पोलिसाला एक माणूस रस्त्याच्या पलीकडे धावताना दिसला
आणि पोलीस त्याला पकडायला म्हणून धावत निघून गेला. आणि सोपी, खजील मनाने व हळू
पावलांनी चालायला लागला. त्याला दोनदा अपयश आले होते.
रस्त्याच्या पुढच्या बाजूला आणखी एक रेस्टॉरंट त्याला लागले. हे
रेस्टॉरंट ब्रोडवे एवढे श्रीमंत नव्हते. आपल्या फाटक्या कपड्यांनी आणि जोड्यांनी
तो बिनदिक्कत इथे जावू शकत होता. जेवायला येणारे लोकही साधारण वाटत होते आणि
जेवणहि स्वस्त होते. सोपी आत गेला. त्याने जेवण मागवले. भरपेट जेवल्यावर पैसे
चुकते करतेवेळी तो म्हणाला,
"पैसे! अहो माझे आणि तुम्ही जो शब्द म्हणताय 'पैसे' त्याचे खूप दिवासंपासुंचे वैर आहे."
वेटरकडे बघत तो पुढे बोलला,
“तुम्ही लवकर पोलिसांना बोलवा आणि मला त्यांच्या हवाली करा, उगाच
माझ्यासारख्या सभ्य माणसाला ताटकळत ठेवू नका.” सोपीने आज्ञा दिली.
“तुमच्यासाठी आम्ही पोलिसाना बोलावण्याचा त्रास घेणार नाही.”
तिथला वेटर सोपिकडे खवचट बघत उत्तरला.
त्याने दुसर्या एका वेटरला बोलावले आणि म्हटले, " तुमच्यासारख्यांचा आम्ही खास पाहुणचार करतो!"
दोन्ही वेटरनि मिळून, सोपिच्या डाव्या कानाखाली आवाज काढले आणि त्याला
बाहेर रस्त्यावर फेकून दिले. रस्त्यावर पडलेला सोपी हळूहळू, शांतपणे उभा झाला.
आपले कपड्यांवरची धूळ झटकली. तुरुंगात जाणे तर आता त्याला दिवास्वप्न वाटायला
लागले होते... तुरुंग अजूनही फार लांब होता... त्याचा तो अवतार बघून जवळच उभा
असलेला पोलीसवाला हसतो आणि निघून जातो.
जवळपास अर्धा मैल चालत गेल्यावर सोपीने आणखी एक प्रयत्न
करायचा विचार केला. यावेळी आपला प्रयत्न यशस्वी होईल याची त्याला खात्रीच होती.
तिथे एका दुकानाच्या खिडकीजवळ सुंदर,सभ्य दिसणारी स्त्री उभी होती. अर्थातच इतक्या
सभ्य स्त्रीशी कुण्या अनोळखी पुरुषाने आगाऊ बोलल्यावर ती स्त्री रागावेल. तिची छेड काढत आहे असे समजून नक्कीच ती पोलिसांची
मदत मागेल. असे झाल्याबरोबरच पोलिसाचा तो उबदार तळहात सोपिच्या मनगटाला पकडेल ज्या हव्याहव्याश्या स्पर्शासाठी सोपि एवढा आटापिटा करत आहे आणि एकदाचा तो आनंदि होईल. मग लवकरच सोपी बेटावरील सुट्यांच्या दिवसांसाठी
रवाना होईल.
तो तिच्या जवळ जातो. नजरेच्या कोपऱ्यातून पोलीस आपल्याला बघतोय
याची खात्री करतो. ती तरुण स्त्री दोन-चार पावले मागे सरकते. सोपी तिच्या आणखी जवळ
जातो आणि अगदी तिला खेटून उभा राहतो. सोपी तिची छेड काढण्यासाठी तिला म्हणतो, “गुड
इव्हिनिंग बेडेलीया! माझ्यासोबत खेळायला माझ्याघरी येतेस का?”
त्याच्या या हरकतीकडे पोलीस
बघतच असतो. त्या स्त्रीने पोलिसाला फक्त इशारा करायची देर आणि सोपीचे
बेटावरील सुट्यांचे तिकीट पक्के...सोपिला तर आताच थंडीच्या दिवसात तुरुंगातील उब
जाणवत होती...पण
ती स्त्री सरळ सोपिकडे चेहरा करत, त्याचा हात नाजूकपणे आपल्या हातात
घेत बोलली, “अरे माईक नक्कीच येईल तुझ्याकडे पण माझ्यासाठी खाण्यापिण्याची सोय
करशील तरच...आता इथे नको पण लवकरच भेटू तुझ्या घरी कारण आता तो पोलीसवाला आपल्याकडे बघतोय.”
तिने त्याचा पकडलेला हात तसाच हातात ठेवला आणि ते दोघेही पोल्संच्या जवळून निघून
गेले. सोपिला आता काळजी वाटायला लागली. तुरुंगात जायचा त्याचा मनसुबा पूर्ण होईल
का नाही याबद्दल तोही आता साशंक व्हायला लागला.
पुढच्या चौकात तिच्या हातातून आपली सुटका करून सोपी धूम पळत निघाला.
थोडे अंतर धावत गेल्यावर धाप लागलेला सोपी थांबला. तो जिथे थांबला
होता तो रस्त्याचा भाग नाट्यगृहांमुळे गजबजलेला होता. तसेही शहराच्या या भागात
रस्त्यावर वेगळीच चमक असायची आणि प्रफुल्लीत चेहेर्यांचे लोक भेटायचे. त्या
हिवाळ्यातील रम्य सायंकाळी चेहऱ्यावर प्रसन्न स्मित ठेवून, उंची वस्त्रे घालून
श्रीमंत बायका-मानसाची ये-जा सुरु होती.
मात्र सोपिला वेगळ्याच प्रकारची धास्ती होती ती म्हणजे त्याला कुठलाच
पोलीस आज अटक करणार नाही याच भीतीने तो अस्वस्थ झाला. त्याला काहीतरी करणे जरुरी
होते म्हणून तो एका नाट्यगृहाच्या बाहेर जिथे पोलीस उभा होता त्याच ठिकाणी मुद्दाम
गेला. आपण काहीतरी विचित्र आणि अनपेक्षित
केल्याशिवाय आपला मनसुबा पूर्ण होणार नाही याची त्याला आता जाणीव झाली होती.
अचानकच सोपी नरड्याच्या शिरा होतील तेवढ्या ताणून ओरडायला लागला,
तो भेसूर गायला लागला, नाचायला लागला... जणू तो अट्टल बेवडा आहे आणि या श्रीमंत आणि सभ्य लोकांना त्रास देतोय.
आणि पोलिसाने...सोपिकडे निखालस दुर्लक्ष केले आणि आपल्या बाजूला
उभ्या असलेल्या व्यक्तीला तो पोलीस म्हणाला,
“हा त्याच कॉलेजमधील मुलगा आहे जे आज सामना
जिंकले... त्यामुळे आमच्या वरीष्ठाकडूनच आम्हाला आदेश आहेत कि आजच्या दिवशी या मुलांकडे
दुर्लक्ष करावे... कारण ते फक्त ओरडतील परंतु कुणाला इजा करणार नाहीत.”
सोपी ओरडायच थांबला. आज कोणताच पोलीस त्याला
अटक करणार नाही का? आता तर बेटावरील तुरुंग त्याला स्वर्गाइतकाच अप्राप्य वाटायला
लागला. त्याने अंगावर चढवलेला कोट ठीक केला त्यासरशी त्याला हवेतील वाढता गारवा
जाणवला. ‘
नंतर सोपिचे लक्ष दुकानात वर्तमानपत्र
घेणाऱ्या एका माणसाकडे गेले. तो माणूस उभा होता आणि त्याचे लक्ष पूर्ण
वर्तमानपत्रांकडे होते. बाजूलाच त्या
माणसाने छत्री ठेवली होती. सोपी सरळ दुकानात गेला. ती छत्री
उचलली आणि अगदी बिनधास्तपणे हळू पावले टाकत तो चालू लागला. छत्रीवाला माणूस लगेचच
त्याच्या पाठी धावत आला आणि सोपिला म्हणाला,
“हि माझी छत्री आहे.”
त्यावर सोपी बोलला, “अच्छा!! हि तुमची छत्री आहे तर
मग मी चोरली, जा पोलिसांना बोलवा. तो तिकडे एक पोलीस
उभाच आहे. त्याला बोलवा आणि सांगा कि मी चोर आहे म्हणून.”
सोपिचे बोलणे एकूण तो माणूस हळू हळू चालायला लागला. सोपिनेही आपल्या
पायांची गती आणखी कमी केली. सोपिला त्यावेळी आतून वाटत होते कि त्याचा हा
प्रयत्नसुद्धा निष्फळ ठरेल. पोलीस दोघांकडेही शंकेच्या नजरेने बघत होता.
“मी--” छत्रीवर हक्क सांगणारा माणूस चाचरत बोलायला लागला, “—कस आहे!
अंSSS तुम्हाला तर माहीतच आहे कि
आजकाल...असुद्या.. जर हि तुमची छत्री असेल तर तुम्ही घ्या.. त्याच काय आज सकाळीच
मला हि एका रेस्टॉरंट च्या बाहेर सापडली.. जावू द्या तुमचीच आहे अस म्हणताय
तुंम्ही तर तुमचीच असेल न!!! बरय.. येतो.”
“हो!हो! हि माझीच आहे” रागाने फुरफुरत, नाकपुड्या फुगवत सोपी ओरडला.
तो माणूस पटकन तिथून निसटला. पोलीस एका वृद्ध बाईला रस्ता
ओलांडण्यासाठी मदत करत होता आणि सोपी असहाय होऊन पुढे चालायला लागला. निराश होऊन
त्याने फेकता येईल तेवढ्या दूर त्या छत्रीला भिरकावले. तो प्रत्येकवेळी असफल होत
होता. पोलीस जणू त्याला आज राजा समजत होती जसा कि त्याच्या हातून कुठली चूक घडतच
नाहीय.
सोपी शहराच्या पूर्वेकडील एका सुनसान सडकेवरून चालत होता. इथून
त्याने त्याच्या घरी म्हणजे मेडिसन चौकातील बागेच्या बाकाकडे जाणाऱ्या मार्गाकडे
वळण घेतले. तो चालू लागला पण...
रस्त्याच्या एका शांत कोपर्यावर सोपी अचानक थांबला. त्याला थांबावं
वाटल. ते एक खूप खूप जुने चर्च होते. चर्चच्या एका खिडकीच्या रंगीत काचेतून मंद
प्रकाश पडत होता. त्याच खिडकीतून सुमधुर संगीताची नाजूक लय सोपिच्या कानावर पडली
आणि तो मंत्रमुग्ध झाला. ती एक अतिरम्य वेळ होती. आकाशात चंद्र तरुण होता. सोपी
सायंकाळच्या पक्षांची उंच आकाशातील गाणी एकू शकत होता... एव्हढी शांतता.... क्वचितच येणाऱ्या
जाणार्यांच्या आवाज व्हायचा... पण तीथे
अतीव शांत आणि प्रसन्न वाटायला लागले होते.
चर्च मधून सोपिला खूप दिवसापासून ठाऊक असलेल्या प्रार्थनेच्या
सुरावटी ऐकायला आल्या. त्याला आपल्या जुन्या दिवसाची आठवण झाली.. ते मंतरलेले दिवस
जेंव्हा त्याच्या आयुष्यात आई चे प्रेम, प्रेमाचा नाजुकपणा...मित्रांची सोबत, स्वप्नाची साथ आणि स्वच्छ विचार व स्वच्छ कपडे
होते ... त्याला आठवले ते सगळे सुंदर दिवस ...
सोपीचे हृद्य अशाच कुठल्यातरी अनुभवाची वट बघत होते. तो योग्यवेळी या
चर्च जवळ पोचला होता. तिथे त्याला वेगळीच अनुभूती होत होती आणि त्याचे अंतकरण त्या
शांत जाणीवेने बदलून जात होते. पहिल्यांदा आपल्या भरकटलेल्या आयुष्याबाबत तो गंभीर
झाला.. आतापर्यंत वाया घालवलेले मूल्यवान दिवस, फालतू इच्छा, मेलेल्या आशा आणि
मनाची कोमेजून गेलेली अवस्था त्याला प्रकर्षाने जाणवत होती.
आणि चर्चच्या या एकट्या शांत कोपऱ्यात सोपीने ठरवले कि आजपासून हे
लाचार जगणे सोडायचे... परिस्थितीशी लढायचे व या चिखलात, निराशेत गुरफटलेल्या
आयुष्याला बदलून नव्याने जगायला सुरुवात करायची.
तो अजूनही तरुण असल्याने त्याच्याकडे आयुष्य सुंदर करण्याची संधी
होती. आपले अधुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागायचा त्याने
निश्चय केला. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याला नोकरी द्यायचे वचन दिले
होते. आता त्या व्यक्तीला शोधून ती नोकरी करायची असे सोपीने ठरवले. तो भविष्यात कुणीतरी
बनेल असा त्याला विश्वास वाटत होता. त्या शांत संगीताने आणि प्रार्थनेच्या सुरांनी
त्याला बदलून टाकले होते. तो आता—
तेव्हड्यात त्याच्या खांद्यावर एक हात येवून आदळला. मोठ्या जबड्याचा
न्यू योर्क पोलीस त्याच्याकडे बघत म्हणाला,
“ असल्या भाल्त्यावेळी तू इथे काय करतो आहेस?”
“काहीच नाही” सोपी उत्तरला.
“तुझ्या या काहीच नाहीवर मी विश्वास ठेवेल असे तुला वाटतय का?” पोलीस
म्हणाला.
नव्या उर्जेने आणि अति-उत्साहाने सोपी त्या पोलीसाशी वाद घालायला लागला.
पोलिसांशी वाद घालणे कधीही, कुणालाही परवडत नाही.
“माझ्या सोबत चल.” पोलीस त्याला पकडून घेऊन गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच न्यायाधीशांनी सोपिला त्याच्या शुल्लक
गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावली,
“तीन महिन्यासाठी तुला बेटावरील तुरुंगात ठेवण्यात
येईल”