रविवार, १४ मे, २०१७

बटरफ्लाय... आणि १९८३ ...




वर्ष:१९८३ स्थळ: लॉर्डस क्रिकेटचे मैदान  

लॉर्डस चे मैदान..... सामना सुरु होता.... प्रतिक आपल्या आसनावरून विवियन रिचर्डस कडे बघत होता.. विवियन क्षेत्र-रक्षण करतांना त्याला दिसत होता... विवयन रिचर्डस आपल्या स्वभावाला साजेसा मनमौजी आणि बिंनधास्त वाटत होता... खरतर प्रतीकला याच बिनधास्तपणाची काळजी वाटत होती...! विवियनने या क्षणाला तरी थोड गंभीर व्हाव... निदान फलंदाजीला यायच्या आधी प्रतीकने दिलेला चिटोरा तरी बघावा बस..!! त्या चीटोऱ्यावर त्याची आणि डॉक्टरांची मोहिमेची यशस्विता अवलंबून होती... पण जर का तो चिटोरा विवियन ने बघितला नाही तर..!!!??? प्रतिक चिंताक्रांत होवून सामना बघत होता...प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं लॉर्डस चे मैदान... भारताची फलंदाजी.......आणि..

वर्ष: २०१८  स्थळ:भारतीय विज्ञान केंद्र 

 डॉक्टर चहा घ्यायला कॅन्टीनमध्ये आले. आपल्या नेहमीच्या खुर्चीवर बसले. तिथे प्रयोगशाळेतील इतर सहकारी होते परंतु सगळे दूरदर्शनवरती भारताचा क्रिकेटचा सामना बघण्यात मश्गुल होते. डॉक्टरांना क्रिकेट अजिबात आवडत नव्हते. त्यांच्यामते क्रिकेटमुळे भारतातील अनेक लोक आपला वेळ आणि शक्ती खर्च करतात. सामना सुरु नसला तर इतरवेळी क्रिकेटच्या गोष्टी, खेळाडू आणि त्यांची लफडी असल्या फालतू गोष्टीत रमतात. त्यातल्या त्यात डॉक्टरांना तो इंग्रजांचा खेळ म्हणून त्याबद्दल तिटकाराच....त्यापेक्षा हॉकी खूप सुंदर खेळ अस त्यांना वाटायचं.. ते हॉकीच्या आकंठ प्रेमात होते.. कर्नल ध्यानचंद त्यांचे दैवत..परंतु भारताचा राष्ट्रीय खेळ असल्यावरही हॉकी उपेक्षित राहिला याची खंत त्यांना वाटायची पण त्यासाठी ते काही करुही शकत नव्हते.. हॉकीसाठी त्यांचा जीव तुटायचा..उधम सिंग,लेस्ली क्लोडीअस,धनराज पिल्ले, बलबीर सिंग सिनिअर यांचे कित्येक किस्से त्यांच्या जीवनाच्या आनंदाचे एक कारण होते.. धनराज पिल्लेचा खेळ बघायला त्यांना खुप आवडे. तेंडूलकर एवजी पिल्ले हा भारताचा स्पोर्ट आयकॉन व्हावा अस त्यांना वाटे.... त्यांची खूप इच्छा होती कि आपल्या जिवंतपणी भारताने एकदा तरी हॉकीचा विश्वचषक जिंकावा जेणेकरून भारतातील लोक परत हॉकी बघायला सुरुवात करतील आणि हॉकीला चांगले दिवस येतील... जसे १९८३ चा क्रिकेट-विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात फक्त  क्रिकेट आणि क्रिकेटचाच बोलबाला झाला आणि आज क्रिकेटने अक्षरशा लोकानां वेड लावलंय...
ते आपल्याच तंद्रीत असताना तिथे  त्यांचा विद्यार्थी प्रतिक पोचला. त्यांच्या शेजारी बसत प्रतीकने चहा मागवला व डॉक्टरांशी बोलायला लागला,

 “सर, कसला विचार करताय?’

“क्रिकेट!! हा खेळ वाटोळ करेल आपल्या देशाच. त्यात ते स्पोट फिक्सिंग, म्याच फिक्सिंग... सारी नैतीकताच घालवलिय... भांडवलशाही खेळ आहे...पूर्वी पाच दिवस, मग एक दिवस आत ते २०-२० ... वर्षभर फक्त क्रिकेट, क्रिकेट क्रिकेटच... अरे बाकीचेही खेळ आहेत...  ज्यात कस लागते.. जास्त शारीरिक तंदुरस्ती लागते... !!!”
त्यांना मधेच थांबवत प्रतिक म्हणाला, “जाऊ द्या हो सर, आपल्या काळजी केल्यामुळे काही होणार आहे का?”
“हं....!!! होईल...!! नक्की होईल..! माझ्या डोक्यात एक कल्पना आलीय... सायंकाळी निवांत बोलूयात... तू ये माझ्या बंगल्यावर.. आणि आज कार्यालयातील कामे तूच सांभाळ.. कुणीही आल तरी मला फोन करू नकोस... चल येतो मी... पण तू सायंकाळी न चुकता ये.. आपल्याला हे क्रिकेटच भूत उतरवावंच लागेल.”
डॉक्टर खूपच गडबडीत निघून गेले... नेहमी सारखे.. पण आज थोडी वेगळीच झाक होती त्याच्या डोळ्यात असे प्रतीकला वाटले. संध्याकाळी भेटून नेमक डॉक्टरांच्या मनात काय सुरु आहे ते कळेल म्हणून तोही चहाचे पैसे देवून निघून गेला.....

वर्ष:१९८३ स्थळ: लॉर्डस क्रिकेटचे मैदान

प्रतिक विवियन कडे टक लावून बघत होता. जेनेकरुन त्याला तो इशारा करू शकेल कि तुझ्या खिशातील चिटोरा नक्की बघ... परंतु भारताची फलंदाजी संपली तरी विवियनची नजर त्याला पकडता आली नाही. शेवटी भारताने ५५ व्या षटकात सर्वबाद १८३ धावा काढल्या आणि सगळे खेळाडू पव्हेलीयनकडे जायला निघाले. नेमका तेंव्हाच विवियनला प्रतिक दिसला. प्रतीकने त्याला चिटोरा वाच असा इशारा केला. विवियन खिशात हात घालून चिटोरा बघायला लागला आणि एकाएक जागीच थांबला.....
विवियनने  तिथल्याच एका सुरक्षा कर्मचाऱ्याला बोलावले व प्रतिककडे बोट दाखवत  काहीतरी सांगितले. विवियन पुढे निघून गेला आणि सुरक्षा कर्मचारी प्रतिककडे आला. प्रतीकला विवियनने ड्रेसिंग रूम मध्ये भेटायला बोलावले असे सांगितले. प्रतिकच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. दुसर्यांदा तो ड्रेसिंगरूकडे जात होता...

प्रतिक पव्हेलीयन जवळ पोहचला. त्याचीच वाट बघत थांबलेला विवियन त्याचे बखोटे पकडून त्याला आपल्या खोलीत जवळ जवळ ओढतच घेवून गेला. दार बंद करुन त्याला विचारले,

“सामना सुरु व्हायच्या आधी तू विनवणी करून दिलेला चिटोरा मी आता बघितला. कोण आहेस तू? आणि हि काय  भानगड आहे? या चीटोऱ्यावरील लिहिलेल्या  गोष्टी  तुला आधीच कशा ठावूक? .. भारतीय दिसतोस म्हणजे जादू टोना, भविष्य, काळे  जादू तुला येतच असेल?” वगैरे वगैरे प्रश्नांची सरबत्ती...
त्याला शांतपणे प्रतिक उत्तर  देत म्हणाला,

‘विव, आधी शांत हो आणि माझ काय म्हणन आहे ते ऐकून घे.” विवियन शांत झाला. प्रतिक बोलायला लागला,

“हा जो चिटोरा मी तुला सामना सुरु व्हायच्या आधी दिला होता. तो कागद एक कम्प्युटरच्या माध्यमातून काढलेली प्रिंट आहे.”

“प्रिंट? म्हणजे कसं?”

“या सगळ्या गोष्टी १९८३ मध्ये लोकांना कळणार नाहीत पण तरी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. भविष्यातील २०१७ साली मानवाने विज्ञानात खूप प्रगती केली आहे. आणि मी त्या प्रगत काळातून प्रवास करून आजच्या दिवशी इथे फक्त तुला भेटायला आलो आहे.”

“म्हणजे तू काळाचा प्रवास करून आला आहेस”

“हो. एच.जी.वेल्स ने आपल्या कादंबरीत सांगितल्या प्रमाणे २०१७ तील मानव टाईम ट्रावेल करू शकतो.”
विवियन आश्चर्याने त्याचे म्हणणे ऐकत होता, 

“...परंतु त्याचा वापर बेकायदा ठरवल्यामुळे आणि सोबतच खर्चिक असल्यामुळे फक्त अति-महत्वाच्या संशोधनासाठीच शाशनाकडून असल्या प्रवासाची परवानगी दिल्या जाते... पण ते जावू दे, महत्वाच हे कि, आता मी तुला भेटायला आलोय खरा परंतु मी शासनाची परवानगी काढलेली नाही कारण... “

“पण तु भूतकाळात कशासाठी आला आहेस?”

“तुला भेटायला.”

“...म्हणजे?!”, विवियन दचकुनच म्हणाला.

“हा चिटोरा बघ. १९८३ चा हा विश्वचषक भारत जिंकणार आहे. तुला आधीच दिलेलं भारताच्या फलांदाजीचे स्कोर कार्ड..
विवियन याच गोष्टीमुळे तर अचंबित झाला होता. सामना सुरु व्हायच्या आधी प्रतीकने विवियनची भेट घेतली आणि त्याची इच्छा नसताना खूप विनवणी करून हा चिटोरा त्याला दिला होता. परंतु सामना सुरु होण्याच्या गडबडीत त्याने तो तसाच आपल्या खिशात कोंबला होता. आता बघतो तर काय त्यातील प्रत्येक गोष्ट तंतोतंत खरी होती.

“विव,हे मी तुला आधीच दिल असल्याने तुला विश्वास तर बसलाच असेल कि मी जे बोलतो ते सत्य आहे. आणि आता हे बघ वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची आकडेवारी जी मी २०१७ मधून आणली आहे... तू ३३ धावांवर बाद होणार आहेस... आणि पूर्ण वेस्ट इंडीज संघ १४० धावांवर...

या सामन्यात तू ३३ धावांवर बाद होणार आहेस..आणि तू बाद झाला म्हणजे भारत विश्वचषक जिंकला....तुझा बळी या सामन्यात खूप मोलाचा ठरणार आहे..”

“.......!!!???” रिचर्डसची वाचाच बंद झाली.

“आता तुझ्या फायद्याची गोष्ट ऐक...मला तू हा सामना जिंकावा अस वाटत... म्हणूनच मी भूतकाळात येवून तुला भेटतोय. मला तेवढा तुझ्या बाद होण्याचा क्षण बदलावायचा आहे... तुला फक्त मदनलाल च्या १४ व्या षटकातील—चेंडूवर स्वताला बाद होण्यापासून वाचवायचं आहे... कारण मदनलालच्या गोलंदाजीवर तुझा झेल उडेल आणि कपिल देव त्याला झेलेल हे ठरल आहे.. पण जर का तिथे तू बचावलास तर तू एकहाती सामना वेस्ट इंडीजला जिंकून देशील.....”

विव रिचर्ड सगळ ऐकून अचंबित झाला. त्याला आपण विज्ञान कथेतील एखादे पात्र असल्या सारखेच वाटले किंवा स्वप्नात असल्यासारखे....  त्याच्या हातातील भारताच्या फलंदाजीची आकडेवारी तंतोतंत खरी होती... आणि करेबियन फलंदाजीचीही आकडेवारी खूप काही सांगत होती.. त्यातील फलंदाजाची उतरंड आधीच ठरवल्यासारखी होती.. विवियनला आठवले कि त्यांनी कालच्या बैठकीत नेमका हाच फलंदाजी क्रम ठरवला होता आणि तो क्रम वेस्ट इंडीज संघ वगळता इतरांना माहिती असण्याची शक्यात नव्हतीच... म्हणजे प्रतीकच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासारख खूप काही होत.
तरी विवियन साशंक होता, “ पण तू भारतीय असून हा सामना भारताने जिंकू नये अस तुला का वाटत...?
“सांगतो, तेही सांगतो.......” आणि प्रतिक विवियनला सांगायला लागला...

वर्ष:२०१८ स्थळ: डॉक्टरांच्या बंगल्यावर   

ठरल्यावेळी प्रतिक डॉक्टरांच्या बंगल्यावर पोहचला. त्याचीच वाट बघत असलेले डॉक्टर तो येताच त्याला घेवून आपल्या अभ्यासिकेत गेले. आतुन दार बंद केले. आणि अगदी लहान बाळासारखे उत्साहित होवून बोलायला लागले.

“प्रतिक, तू कधी काळ-प्रवास केलाय?”

“नाही सर, का?”

“मी केलाय एकदा, पण तेंव्हा मी तरुण होतो. असला प्रवास खडतर असतो. या प्रवासात तुमच्या शरीराची चांगलीच झीज होते. काही दिवसांनी ती भरून निघते परंतु प्रवास करयच्या आधी तुमच आरोग्य उत्तम असल तर कधीही चांगलच.. नाहीतर हा प्रवास जीवघेणा होवू शकतो.”

“सर, हे मला माहिती आहे पण आज हा विषय माझ्यासोबत बोलताय त्याच कारण...?”

“कारण ... कारण म्हणजे तू तरुण आहेस आणि तुला चांगल आरोग्य मिळालंय... त्यामुळे तू हा प्रवास करू शकतोस... मी करू शकत नाही.” नेमक डॉक्टरांच्या मनात काय चाललय याचा थांग प्रतीकला लागत नव्हता. तो निमुटपणे ऐकत उभा होता. डॉक्टर पुढे बोलू लागले,

“प्रतिक, आज कॅन्टीनमध्ये आपल बोलन झाल तेंव्हा पासुन माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. ती वरकरणी असंभव वाटत असली तरी ती प्रत्यक्षात आणणे तितकेसे कठीण जाणार नाही.”

“कुठली कल्पना,सर?”

“बघ, बटरफ्लाय इफेक्ट  तुला ठावूक आहे...”

“हो... पण त्याच काय?”

“या थेअरीनुसार, भौतिक जगात घडणारी लहानातील लहान घटना, हालचाल हि महत्वाचि असते म्हणजे ती छोटीशी घटना जगातील भौतिक गोष्टीवर परिणाम पाडू शकते... आणि मग त्या छोट्याश्या घटनेमुळे बदलांची एक शृंखला निर्माण होते पुढे हीच शृंखला, छोटे-छोटे बदल भौतिक जगाच रूप पालटतात. उदाहरणार्थ, समजा, एक मुलगा आहे. त्याला नोकरीच्या मुलाखतीला जायचं आहे. तो रस्त्याने निघालाय आणि मधेच त्याच्या बुटाची लेस सुटली. आता ती लेस बांधण्यासाठी त्याला वीस सेकंद वेळ लागला अस समजू. ती कृती करण्यासाठी लागलेले वीस सेकंद त्याच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे ठरू शकतात. म्हणजे बघ तो लेस बांधून पुढे जातो .. लेस बांधल्यामुळे जो वेळ गेला त्यामुळे त्याला पुढे ट्रफिक सिग्नल वर थांबाव लागल. तो सिग्नल पार करून जातो तर त्याला रेल्वे स्टेशन साठी जाणारे वाहन उशिरा मिळते आणि कसाबसा स्टेशनला पोहचतो तर रेल्वे अवघ्या काही क्षण आधी निघून गेली असते. तो आता मुलाखतीला वेळेवर पोहचू शकत नाही. त्यामुळे त्याला नोकरी मिळत नाही. ती न मिळाल्यामुळे त्याला दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जाव लागत. तिथे त्याला नवीन लोक मिळतात...वगैरे वगैरे.....एकंदरीत काय तर त्या वीस सेकांन्दातील त्या छोट्याश्या कृतीमुळे त्याच्या जीवनाचा प्रवाह बदलला. आता असा विचार केला कि समजा ती बुटाची लेस सुटली नसती तर....”

““तर... तर  कदाचित त्या मुलाच्या आयुष्यात अनेक गोष्टी वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या. जस कि तो वेळेवर सिग्नल पार करून गेला आणि त्यामुळे त्याला रेल्वे स्टेशनसाठी वाहन मिळाले.. तो वेळेवर रेल्वेमध्ये चढू शकला आणि मुलाखतीच्या वेळी हजर झाला. त्याला ती नोकरी मिळाली आणि तो त्याच शहरात स्थायिक झाला.... ”

“बरोबर, कदाचित तिथून पुढे त्याच्या आयुष्यात वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या... जर का आपण थोड मागे गेलो आणि ती लेस सुटण्याची वेळ गाठली आणि तिला सुटू दिले नाही तर....? जगत असतांना अशा खूप गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या असतात कि आपण फक्त त्या एका क्षणाला जबाबदार धरत असतो. खुपदा असा विचार करतो कि तो एक क्षण मी बदलू शकलो तर... एका क्षणाच एवढ महत्व असते.!!!!”

“सर हे खूप अफाट आहे...”

“हं!!! मग या गोष्टीवर मी दुपारपासून विचार केला आणि आपण दोघे असा प्रयोग करायचा हे ठरवलं... म्हणजे तू सोबत आहेसच अस ग्राह्य धरलय मी... त्यासाठीच दुपारी घरी येवून संपूर्ण प्लान आखलाय.”

“आणि हा प्रयोग यशस्वी झालेला मला बघायचा आहे सर! मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे.”

“ऐक तर मग, आजपासून बरोबर ३ महिन्यांनी म्हणजे २५ जून २०१८ ला भारताला  १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून ३५ वर्ष पूर्ण होतील. आपल्याला हीच वेळ साधायची आहे. विज्ञान भवनातील टाईम मशीनचा उपयोग करून आपण ३५ वर्ष मागे सहज जावू शकतो. परंतु ती मशीन वापरायची असेल तर शाशानाला सर्व कारणे आणि डीटेल्स द्यावी लागतील. आपण मशीन कशासाठी वापरणार आहे हे कळल्यावर शाशन आपल्याला मशीन वापरण्याची परवानगी देणार नाहीच म्हणून आपल्याला ती चोरून वापरावी लागणार आहे....”

“पण आपल्याला ती नेमकी कशासाठी वापरायची आहे?”

“अरे हो ते सांगायचं राहिलच.... भारताला या क्रिकेटने वेड लावलय. मला हे बदलायचं आहे. भारतात क्रिकेटचा प्रसार का झाला? यावर जेंव्हा मी विचार केला तेंव्हा लक्षात आल कि १९८३ चा विश्वचषक भारताने जिंकला आणि त्यानंतर भारतात क्रिकेट झपाट्याने वाढले. समजा भारत तो विश्वचषक जिंकला नसता तर... तर आज जिकडे-तिकडे  हॉकीसारखा खेळ खेळल्या गेला असता. मला क्रिकेट पासुन सुटका हवीय. मला हॉकी एक महान खेळ झालेला बघायचं आहे. त्यासाठी भारताला १९८३ चा विश्वचषकात हारावे लागेल.”

“पण ते कस करायचं...”

“जस कि आपण मघाशी बोललो कि एक छोटीशी घटना सुद्धा खूप मोठे बदल घडवू शकते आपल्यालाही तेच करायचं. भारताला विश्वचषक जिंकता आला कारण त्यादिवशी वेस्ट इंडीज चा ख्यातनाम फलंदाज रिचर्डस लवकर बाद झाला. त्याचा कपिल देवने घेतलेला झेल खूप महत्वाचा होता. आता जर का तो क्षण आपण बदलला तर. म्हणजे तू भूतकाळात जावून तशी तजवीज केली कि रिचर्डसला तेवढा चेंडू बचावात्मक खेळायला लावला तर तो झेलबाद होणार नाही आणि एकहाती सामना वेस्ट इंडिजला जिंकुन देईल.”

“पण सर हे त्याला कस सांगायचं?”

“त्याची काळजी करू नकोस. तुझी आणि त्याची भेट कशी होईल याची व्यवस्था आपल्याला लावता येईल.”

वर्ष:१९८३ वेस्ट इंडीजची फलंदाजी सुरु व्हायच्या आधी

“...... आणि अशाप्रकारे मी ३५ वर्ष भूतकाळात येवून तुझ्यापुढे उभा आहे. नशीब २०१७ सारखी सुरक्षा व्यवस्था १९८३ मध्ये नाहीय.. असती तर तुला एवढ्या सहज भेटता आल नसते.”

प्रतीकने विवियनला सारा वृतांत सांगितला. विवियन ने आपल्या  हातातील चीटोऱ्यावर नजर टाकली. त्याच्या नावापुढे २८ चेंडूत ३३ धावा लिहिलेल्या त्याला दिसल्या आणि सगळ्यात खाली भारत ४३ धावांनी विजयी असे लिहिलेले दिसले. त्याने एकदा प्रतिकच्या चेहऱ्याकडे बघितले आणि मंदसे स्मित देत प्रतिकची रजा घेतली.

प्रतिक सामना बघायला आपल्या जाग्यावर येवून बसला. तिकडे विवियन फलंदाजीसाठी तयार व्हायला निघून गेला.
विवियन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता. तो अधून मधून हातातील कागदावर बघत होता आणि तेवढ्यात वेस्ट इंडिजचा पहिला गडी ५ धावांवर बाद झाला.. ग्रीनीज... त्याने बारा चेंडूत फक्त एक धाव काढली होती. विवियनने तेंव्हाच आपल्या हातातील कागदाकडे बघितले आणि.... त्याला आता सगळे कळून चुकले. त्याने दुरूनच प्रतिकला अंगठा दाखवला. त्याचा अंगठा बघून प्रतीकही समाधानी झाला....

वर्ष:  २६ जून २०१८
प्रतिक झोपेतुन उठला. कितीतरी वर्षाची झोप घेवून आल्यासारखे त्याला वाटत होते. तो कामावर जायला निघाला. डॉक्टरांचा त्याला लवकर कामावर ये असा संदेश आला होताच. त्याने लवकरच तयारी केली. आपल्या चारचाकीत बसला. तेवढ्यात त्याच्या बुटाची लेस सुटलेली दिसली.. ती परत बांधून झाली आणि गाडी सुरु केली. लेस बांधण्यात वेळ गेल्यामुळे पुढल्या चौकात सिग्नलवर त्याला गाडी थांबवावी लागली. तो गाडीच्या काचेतून बघत होता, आपल्या उजवीकडे बघितले तर तिथे त्याला धनराज पिल्ले याचे मोठे पोस्टर लागलेले दिसले. डावीकडे वानखेडे हॉकी स्टेडीयम सजवल्या जात होते. आज भारत आणि पाकिस्तानचा हॉकी सामना होता. त्याला कळले कि डॉक्टर आज कामाला दांडी मारून हॉकी सामना बघायला जातील. या हॉकीमुळे साऱ्या देशाच वाटोळ होईल एक दिवस असेही त्याला वाटले. तिकीट घेण्यासाठी मैदानाबाहेर लांबलचक रांग दिसत होती त्यामुळे पुढे कदाचित ट्रफिक जाम झालाही असेल अस त्याला वाटल. तेवढ्यात सिग्नल सुटला... आज सिग्नलमुळे कामावर पोहचायला त्याला वीस सेकंद उशीर होणार होता...




रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

मनी प्लांट भाग:१ (कथा)


मी आळसावालो  होतो. शेरलोक्स होल्म्सच्या घराच्या बाबतीत हे नेहमीचच . जर तुम्ही काही करत नसाल तर तुम्हाला येथे हमखास आळस आल्याशिवाय राहत नाही  म्हणूनच कदाचित शेरलोक्स सतत काहीतरी करत असतो. आताही तो कुठल्यातरी त्यानेच शोधलेल्या वात्रट आणि त्याच्याच नुसार गुणकारी असलेल्या यंत्रासोबत कसलेतरी निष्फळ चाळे करत होता. मला एक कळत नाही या माणसाला एवढा वेळ मिळतो कसा? मी आपल्या विचारांच्या धुंदीत होतो. बेकर्स स्ट्रीट वरील या शेरलोक्सच्या घरच्या खिडकीतून बाहेर मला एव्हढ्यात  शहरात दिसणारे  नेहमीचे दृश्य दिसत होते. ‘वृक्षारोपण’ असल्या गोंडस नावाने चालणारा आणिसरकारी खर्च करून, पैसेखाऊ राजकारण्यासाठी हमखास राखीव कुरण म्हणून ओळखल्या जाणारा प्रकार सुरु होता. तीन सरकारी कर्मचारी त्या इवल्याश्या रोपट्याला खूपच नजाकतीने पकडून त्याचे रोपण करत होते. तेवढ्यात स्टडी रूम मधील फोन खणाणला. शेरलोक्स यंत्राच्या गुंतावाळ्यात असल्याने नाईलाजाने मलाच फोन घ्यावा लागला. तिकडून स्कॉटलंडयार्ड पोलिसचे इन्स्पेक्टर लीस्तार्द बोलत होते.
“मि. होल्म्स् आहेत?”
“हो आहेत,... पण ते अतिशय महत्वाच्या कामात व्यस्त असल्याने तुम्ही मला निरोप सांगू शकता, मी त्यांना आपला निरोप त्वरित कळवू शकतो.” मी शेरलॉक कडे बघून डोळा मिचकावला.
“त्यांना सांगा सर आयझक यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. त्यांची इथे नितांत गरज आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांना इकडे निघून यायला सांगा.” मी त्याला हो म्हणून फोन ठेवला तोच शेरलॉक प्रश्नांकित नजरेने माझ्याकडे बघत होता. माझ्या चेहऱ्यावरील फरक त्याच्या तीक्ष्ण नजरेने अचूक टिपला असेलच याची मला खात्री होती.
मी जेंव्हा त्याला आत्महत्येची वार्ता दिली तेंव्हा तो गूढ हसत म्हणाला,
“मला असल काही होईल याची कल्पना होतीच”.
 मी त्याच्या बोलण्यामुळे भांबावलो. माझी जिज्ञासा चाळवली गेली. मी त्याला म्हणालो,
“तू भविष्यवेत्ता झालास कि काय? मान्य सर आयझक एक प्रसिद्ध आणि समाजशील राजकारणी आहे त्यांच्या जीवनातील बहुतेक गोष्टी सार्वजनिक होतात . पण त्यांची बायको आत्महत्या करेल हे तुला आधीच कसे ठावूक?”
“वाटसन, काही गोष्टींचे भाकीत करण्यासाठी भविष्यवेत्ता होण्याची गरज नाही. तुम्ही थोडे चौकस असाल आणि विचार करू शकत असाल तर तुम्ही शंभर टक्के खरे ठरणारे अंदाज वर्तवू शकता…”
मी त्याचे तत्वज्ञान ऐकण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हतो.मूळ मुद्द्याला धरून त्याला प्रश्न विचारला:
“ते जावू दे, तू सांग कि तुला कसे कळले की सर आयझकची  बायको आत्महत्या करेल म्हणून?”
“अगदी त्यांची बायको आत्महत्या करेल असे काही नव्हते, पण सर आयझकच्या  बाबतीत कुठली तरी घटना घडेल आणि ती खूप विचित्र असेल म्हणजे लोकांना धक्कादायक वगैरे...”
“हो पण तुला असे का वाटले?”
“मागच्या महिन्यातले काही वर्तमान पत्र चाळशील आणि मी जसा विचार करतो तसा तुही करशील तर तुलाहि कळेल!”
मी वर्तमान पत्रातील आयझक यांच्या बाबतीतील बातम्यांची कात्रणे भर-भर काढायला लागलो. त्यातील तीन कात्रणे दखल घेण्याजोगे होती. पहिली बातमी मार्च महिन्यातील अकरा  तारखेची,

संसदेतील सर आयझक यांच्या विज्ञान विरोधी भाषणाने राष्ट्रीय विज्ञान संशोधन केंद्राला मिळणाऱ्या अनुदानावर तात्पुरती स्थगीती: सर आयझक यांचा विज्ञान विरोध आज पुन्हा संसदेत दिसून आला... आपल्या दीड तासांच्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी विज्ञान संशोधनावर होणाऱ्या अवास्तव खर्चाला कात्री लावण्याची मागणी रेटून धरली... देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना आणि मुलभूत सेवा व  सुविधेसाठी निधी अपूर्ण पडत असताना देशाच्या होवू घातलेल्या अर्थ संकल्पात विज्ञान केंद्राला संमत झालेला निधी हा अवाढव्य असून निरोपयोगी संशोधनावर खर्च होणारा आहे... फुटकळ विषयावरील संशोधनावर एवढा खर्च करण्यापेक्षा तो निधी आवश्यक सोयी सुविधांसाठी उपयोगात आणावा असे प्रतिपादन त्यांनी केले... त्यांच्या पक्षाने त्यांच्या मागणीला पाठींबा दिला... त्यांच्या या बिनतोड तर्कापुढे सरकारला नमते घ्यावे लागले... विज्ञान अनुदानावर सरकारने तात्पुरती स्थगिती आणली...’

 दुसरी बातमी मार्च महिन्यातील अठरा तारखेची,

            “सर आयझक यांचा विज्ञान विरोध मावळला: या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर आयझक यांच्या विज्ञान विरोध कळीचा मुद्दा होऊन बसला होता... परंतु सरकार आणि विरोधी पक्षातील झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला असून... सर आयझक यांनी आपला विरोध मागे घेतला...  विज्ञान केंद्राला मिळणाऱ्या अनुदानाला आपला पाठींबा जाहीर केला...’

तिसरी बातमी दोन दिवसा आधीची म्हणजे बारा एप्रिल ची होती,
राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याच्या अध्यक्षांनी घेतली विरोधी पक्षनेते सर आयझक यांची भेट: सर आयझक आणि रिचर्ड निकोल यांची गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. कॉलेजपासूनचे मित्र असलेले रिचर्ड निकोल आणि आयझक यांची मैत्री विख्यात आहे. येत्या निवडणूकीचा विचार करता या दोघातील मैत्री आणि वरचे वर होनाऱ्या भेटीगाठी महत्वाच्या समजल्या जातात.”

“ शेरलोक्स, या बातम्यांच्या तुकड्यातून मला तर काहीच उलगडा होत नाही. कुठलीच बातमी नोंद घ्यावी एवढी महत्वाची अर्थातच मिसेस आयझक यांच्या आत्म्हत्तेसंबंधी वाटत नाही.”
“ वाटसन, तुला पहिल्या आणि दुसऱ्या बातम्यामधील विरोधाभास दिसत नाही का?”
“हो, पण या दोन बातम्यांचा आणि मिसेस आयझक च्या आत्महत्येचा काय संबंध?”
“तोच तर आपल्याला शोधायचा आहे. सगळ्या घटना एकापाठोपाठ घडल्यात आणि त्याही एकाच व्यक्तीच्या आयुष्यात म्हणजे त्यात नेमका कुठेतरी एक दुवा असणार...ती कळी आपल्याला सापडली कि आत्महत्येचे खरे कारण कळेल...”
                              ---
काहिवेळातच आम्ही घटनास्थळी पोहचलो. लीस्तार्द आमची वाट बघत होता. त्याने आम्हाला मिसेस आयझकच्या मृतदेहाजवळ नेले आणि तो तिथली परिस्थिती सांगू लागला“शेर्लोकस, आज सकाळी मिसेस आय्झाक आपल्या बेडरूमचे दार उघडत नव्हत्या म्हणून नोकराने सर आय्झाक यांना टेलीफोन करून आपल्या ऑफिसमधून बोलावून घेतले. सर आय्झाक काल रात्रभर ऑफिसलाच मुक्कामी होते आणि ते खरोखरच तिथे होते. मी शहानिशा केली आहे. त्यानंतर सर आय्झाक्नी आपल्या जवळील किल्ली ने मिसेस च्या बेडरूमचे लॉक उघडले बघतो तर काय मिसेस मरून पडलेल्या. आणि त्यांच्या हातात एक पत्र होते.” लीस्तार्दने ते पत्र शेरलोक्स ला दीले. त्या पत्रातील मजकूर तो वाचू लागला. “मी स्वखुशीने माझ्या जीवनाला संपवत आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जब्बाबदार नाही.” पत्र वाचुन झाल्यावर शेरलोक्स ने मिसेस आयझक च्या हस्ताक्षराची शहनिशा केली. ते मिसेस आयझक चेच हस्ताक्षर होते याची खात्री पटली. शेरलोक्स ने लीस्तार्डला विचारले घटनास्थळावरील मिसेस च्या मृत शरीराव्यतिरिक आणखी काही पुरावा सापडला का? लीस्तार्द म्हणाला कि मिसेसचे मृत शरीर सोडले तर कुठल्याही वस्तूला हात लावण्यात आला नाही. ती खोली जशीच्या तसीच आहे. मग शेर्लोक्स आपल्या चौकस नजरेने सगळीकडे निरीक्षण करत होता... तेवढ्यात त्याला दरातील फटीमध्ये मातीचे छोटेशे ढेकूळ दिसले. त्याने ते अलगद काळजीपूर्वक उचलले. आपल्या बोटाच्या चिमटीत पकडून त्या मातीचा रंग तो बघत होता. त्याचा वास घेत होता. त्या ढेकळाला जणू तो प्रश्न करत होता कि रहस्य तुझ्यात तर दडलेलं नसेल?
            त्याने सहज मिसेसच्या बेडरूममध्ये नजर मारली. त्याला उजव्या कोपऱ्यात  खिडकीजवळ काहीतरी आढळले. तो तीथे गेला. आपल्या खिशातील त्याचा आवडता स्पायग्लास काढून तो खिडकीखालील जागा न्याहाळू लागला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याने स्पाय ग्लास माझ्याकडे दिला. मला तिथे मातीचे बरीकशे कण दिसले. मला त्याचा अर्थ कळला नाही पण मला खात्री होती कि माझ्या विचित्र आणि वेडपट मित्राला महाभारत का घडले याच्या खणा खुणा सापडल्या..त्याचा अर्थ फक्त तोच लावू शकतो. शेर्लोक्सने लीस्तार्द कडे मृत शरीराच्या पंचनाम्यावळी काढलेल्या फोटोग्राफ्स ची मागणी केली. लीस्तार्द्ने आपल्या खिशातील पाकीट त्याच्या हाती दिले. शेर्लोक्स पाकिटातील फोटो बघत होता. एक फोटो बघताना त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमधील बदल मला जाणवला. त्या बदलाचा अर्थ मी त्याचा जवळचा मित्र असल्याने मला कळला . फोटो बघून झाल्यानंतर लीस्तार्द चा निरोप घेताना तो शांतपणे फक्त एवढेच म्हणाला कि,
“ इन्स्पेक्टर लीस्तार्द, उद्या सायंकाळपर्यंत आपली भेट होणार नाही, आणि जेंव्हा होईल तेंव्हा तुम्हाला एक धाडसी काम कराव लागेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. उद्या भेटू.”
तिथून बाहेर जात असताना तो म्हनला “आजचा दिवस आपल्याला दमवणारा असेल असे वाटते. चल, आपल्याला मिसेस  आयझकच्या  वडिलांकडे जाव लागेल. ”
“ मिसेस आयझक च्या वडिलांकडे!... पण ते का? तिने तर आत्महत्या आयझक यांच्या घरी केली!”
“ हो पण कधी कधी वर्तमान भूतकाळात गेल्यावरच जास्त चांगला कळतो.”
                        ----
मी आणि शेरलोक्स मिसेस आयझकच्या वडिलांकडे बसलो होतो. ते आम्हाला मिसेस आयझक बद्दल सांगत होते कि ती खरतर खूपच मनमिळावू आणि सहनशील स्त्री होती. ती एक उच्च नैतीक मूल्यांना महत्त्व देत असे व त्या मूल्यांशी प्रामाणिक होती. जीवन जगण्याच्या तिच्या आपल्या काही संकल्पना होत्या. आदर्शवाद आणि सच्चे देशप्रेम या गोष्टी तिच्या आत्मा होत्या. त्यासाठी ती वाट्टेल ते करू शकत होती.
जेंव्हा शेरलोक्सने मिस्टर आणि मिसेस आयझकच्या वैवाहिक जीवनाबद्दल त्यांना विचारले तेंव्हा त्यांचा चेहरा थोडा फिका पडला आणि ते म्हणाले “खरतर आमच्यासारख्या घरंदाज कुटुंबातील गोष्टीची वाच्यता मी कुठे करायला नको पण जे घडल त्याचा विचार करता मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटतय कि माझ्या मुलीचे आणि सर आयझकचे काही तात्त्विक वाद होते. दोघांचेही विचार टोकाचे त्यामुळे दोघांमध्ये कधी मतैक्य व्हायचे नाही. सर आयझक एक संधिसाधू माणूस म्हणून नावाजलेले आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या हिताचे काय एवढाच त्यांचा विचार असतो. उलट माझी मुलगी आदर्शवादी तिला आपल्या नवऱ्याचा संधिसाधुपणा अजिबात आवडत नसे. हि एक गोष्टच त्यांच्या नात्यातील दुखती नस होती. पण या सगळ्यांचा माझ्या मुलीच्या आत्महत्येशी काही संबध असेल असे मला वाटत नाही.”
“संबंध आहे किंवा नाही हे कळण्यासाठी तुम्ही दिलेली माहिती मात्र फार उपयोगाची पडेल हे नक्की.” शेरलोक्सने त्यांचे धन्यवाद मानले आणि आम्ही तिथून निघालो.
मिसेस आयझक बाबतीत बहुपयोगी माहिती आमच्या हाती आली होती असे शेरलोक्सला वाटत होते. आम्ही आता सरळ सर आयझकच्या घरी जाणार होतो. शेरलोक्सची काम करण्याची तऱ्हाच वेगळी आहे. आधी जिथे घटना घडली तिथे न जाता हा भलतीकडेच आपले डोके लावतो. परंतु सुरुवातीला त्याची काम करण्याची पद्धत कितीही अतार्किक वाटत असली तरी शेवटी तोच बरोबर असतो. त्याचा सरळ साधा तर्क आहे कि चार लोक जो विचार करतात आणि त्या विचारातून मार्ग निघत नसेल तर पाचव्याने केलेला विचार कितीही मुर्खासारखा वाटत असला तरी तो बरोबरच असतो. या वाक्यात नेमका त्याला कुठला विचार सांगायचा आहे तो मूर्ख शेर्लोक्सच जाणे.
                        ----
दुसरया दिवसी मी सकाळपासून शेर्लोक्स्च्या घरी एकटाच होतो. आता संध्याकाळ होत आली होती. तो भल्या पहाटे, मी झोपेतच असताना बाहेर निघून गेला. रात्री सुद्धा तो उशिरापर्यंत जागा होता. त्याच्या त्या विचित्र ओबड-धोबड वाटणाऱ्या माशिनशी चाळा करीत... मी सकाळी उठलो तर माझ्यासाठी टी टेबल वर एक चिट्ठी होती... त्याने नोरोप लिहून ठेवला किसायंकाळी ठीक ६ वाजता सर आयझक च्या घरी पोहोच. मला कळले कि याला सर्व प्रकार समजला आहे. त्या चिट्ठीत पुढे लिहिलेलेला मजकूर तर अनपेक्षित होता. त्याने लिहिले “ तुला हे कळल्यावर हसू येईल कि तू ज्या मशीनला नेहमी शिव्या घालायचास तेच मशीन आपल्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. माझी मागील सहा महिन्याची मेहनत माझ्या कामात आली... कशी ते माहिती करून घ्यायचे असेल तर सांगितल्याप्रमाणे वेळेवर पोच.” मला कुठलीतरी रहस्यकथा वाचल्यासारखे वाटयला लागले. मी अजूनही माझ्या तर्काशी झगडत होतो तर शेर्लोक्स निष्कर्शापर्यंत पोचला होता.
      मशीन... जी मला आतापर्यंत वायफळ वाटत होती ती एकदम शेर्लोक्स च्या सृजनात्मक उपलब्धी वाटायला लागली. मी उत्सुकतेने तिच्या जवळ गेलो. त्या माशिनला न्याहाळू  लागलो. तिच्यात काय दडलाय ते बघत होतो... अचानक माझा पाय एका छोट्याश्या रोपट्याला लागला. माझ्या मित्राचे हे नेहमीचेच ..सगळे घर असेच वस्तूंनी पसरलेले असते. कुठलीही वस्तू आपल्या योग्य जागेवर नसते. आता हे रोपटं इथे काय करतंय म्हणून मी त्याला उचलले व ते दुसरीकडे ठेवण्यासाठी निघालो तेवढ्यात ... माशिनवरील हिरवा दिवा लुकलुकताना मला दिसला. मी रोपटे पोर्चमध्ये आणून ठेवले व त्वरेने माशिनिकडे परत गेलो. तर तोपर्यंत हिरवा दिवा बंद झाला. हा काय प्रकार मला कळत नव्हते. मला थोडी घेरी आल्यासारखे सुद्धा वाटले. रोपट्याला थोडीशी ठोकर लागल्याने घेरी येऊ शकते... कि या मशीनची हि काही करामत आहे.. पण मला आपल्याच विचारावर हसू आले. मी परत माशिनमध्ये गुंतून गेलो. ती एक साधीशीच मशीन होती. तिच्या आत एक चुंबक होते. त्यावर वर्तुळाकार चकती बसवली होती. तिला वीज पूरवठा करण्यासाठी एक बटन सुद्धा होते. ते बटन  सुरूच असल्याने मघाशी हिरवा दिवा लागला असेल असे मला वाटले. शेवटी मला त्यातील काही कळत नव्हते म्हणून कंटाळून त्या मशिनचा नाद मी सोडून दिला.. उत्सुकतेने ६ वाजण्याची वाट बघण्याशिवाय मी काही करूही शकत नव्तो.
                              ----
उर्वरित पुढील भागात....

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

'उपर जाते जा, नीचे आते जा!"



आजोबांच्या गोष्टी......

तशा काही फार दीर्घ आणि तत्त्वज्ञान नाहीय त्यांच्या गोष्टीत... अगदी साध्या-सुध्या आणि मनोरंजक आहेत... त्यांचा हा खजिना मी विसरत चाललो होतो पण आता इथे काही आठवणार्या आणि काही न आठवणार्या गोष्टी सुद्धा पोस्टणार आहे... त्या गोष्टींचे अनेक वर्जन असू शकतात... तुम्हालाही आठवत असतील तर तुम्ही त्या पोस्ट ला मला tag करा....आज पहिली गोष्ट सांगतोय....(आबा वऱ्हाडीत गोष्ट सांगायचे...म्हणून थोडी वऱ्हाडी बोली वापरतोय...)

'उपर जाते जा, नीचे आते जा!"

पोट्ट्या... तुले एक गोष्ट सांगतो  आईक...

एका गावात एक कास्तकार होता . पयले बरा शिरमंत होता पण तिगस्ता त्याच्या भावांन त्याची जिमीन हडपली अन त्याले मजुरीले लावल... दोन-दोन बायका त्याले आन पाच-सहा लेकरयीच लेंढार... मजुरी करून असा कितीक कमवे ...? बायका -पोराहीचे पोट बी भरत नोता..... पोरायचे शिक्शान तर दूरच रायल...

त्याले वाटे जगूच नही....जीव द्याव... मग येका राती गेला न तो आखारातल्या हिरीवर(विहिरीवर) जीव द्याले... हिरीच्या काठावर रायला उभा.... म्हणे आता उडी मारतो हिरीत अन देतो जीव.... तेवढ्यात हिरीतून आवज आला....

त्या  हिरीत येका भूताच बिर्हाड होत... तो भूत त्या हिरीतल्या पाण्याच्या अंदर  येक मोठ पेव करून आपल्या बायको अन पोरासंग रायत जाय...

त्या भूताले पाण्यातून दिसल न कि कोणीतरी जीव द्याले आल आणि आता उडी टाकते... तेवढ्यात भूतान आवाज लगावला....

"थांब रे बावा... काय झाल तुले ... काऊन मरत राजा... तुई अडचण त सांग मले!१"

कास्तकार घबरावला.... त्यान भेत-भेतच सांगितल भूताले कि , 'मायाकडे आता जमीन नाही, मले बरोबर मजुरी भेटत नाही...लेकरा -पोरायले खाऊ घालाचे वांदे होऊन रायले बावा! म्हणून त जीव द्याले आलो...."

भूत त्याची कायनी आयकून लयच दया करत होता...भूतान त्याले म्हणलं , "हे पाय दादा... तू काई जीव देऊ नको... मी तुयासाठी एक काम करू शकतो...पण त्या आंदी मले एक वचन दे...!"

कास्तकार म्हणे "सांगा ब्वा ! काय म्हणन आहे तुम्ह"
भूतान म्हटल मंग त्याले, " पहिली त गोष्ट तू कोणाले सांगू नको कि मी तुयासाठी  काम करतो... आन दुसरी गोष्ट म्हणजे तू म्हणशील ते काम मी करायले तयार आहो पण मले रोज काम सांगत जाय एकाही दिवसाचा खाडा चालणार नाही... ज्या दिवशी तुया मले काम सांगितल नाही त्या दिवशी मी तुया अन तुया लेकरा-बायकोचा जीव घेऊन घेईल.... कबुल अशीन त बोल"

कास्तकार लयच हरकला त्यान भूताच्या अटी कबुल केल्या....मंग काय  विचारता काय झाल.....

रोज भूत रामपायरी कास्ताकाराच्या दारात उभा काम करायले तयार....
कास्तकारण त्याले कोणतहि काम सांगितल  कि भूत  नीरा मिनटातच काम करून चाल्ला जाय....

पाटलाच्या धा एकर वावरातली पर्हाटी येच्याले सांगितली त भूत सकौन गेला अन दुपारी पुरी पर्हाटी येचून आला... पाटलाने कास्तकारले मजुरी देली... मंग त्यावर्षी कास्त्काराने भुताच्या जीवावर वावरातले काम उधळयान घ्याले सुरुवात केली...

रोज काही न काही काम भूताले तो सांगत जाय... आणि भूत काम करून निघून जाय... मजुरीचा सगळा पैसा कास्त्कारले भेटे... तो लय शिरमंत झाला... एका वर्षातच त्यान १० एकर जिमीन विकत घेतली... आता त्याले सुखाचे दिवस भोगायले भेटून रायले होते...

त्याचे पोर शाळेत जात...अभ्यास करत...बायकोच्या अंगावर सोन आल...नवीन घर बांधल....सगळ यवस्थित सुरु होत... पण त्याच्या जिवाले येग्ळाच घोर लागला...

भूताले रोज काम द्या लागे...ज्या दिवशी नाही देल त्या दिवशी भूत त्याले अन त्याच्या घारले मारून टाकणार होता... आता एखांद्यान रोज-रोज कामही कुठून आणावं?????

मोठ्या विवंचनेत होता कास्तकार.....पण  भूत  तर रोज पायटी  त्याच्या उरावर हजर असे.....काम सांग  म्हणे?

मंग कास्त्कारण एका जाणकार म्हतार्याले पकडल... अन त्याले सगळी हकीकत सांगितली.....जाणकार म्हातारा म्हणे मी सांगतो तस कर.....
पहिले तर  बैलगाडीन बाजारातून खंडीभर मवरी (मोहरी) ईकत घे अन येता-येता गावाच्या आंदी जे नदी लागते तिच्यात रेती आहे त्या रेतीत ते मवरी सांडून दे...पसरून टाक...अन  त्याले म्हणा आन येचून?????

कास्तकारन तसचं केलं.... पायटी भूत आला अन त्याले मवरी येच्याले पाठवल.... पण सायचा संध्याकैच भूत हाजीर ...म्हणे, "मालक काम झाल...उद्या येतो सकाऊन...काम तयार ठिवा!!"

कास्तकार डबल जाणकार म्ह्तार्याले भेटायले जाते....म्हतारा त्याले नवीन कलाकारी सांगते कि तुया वावरातल्या हिरीत टन भर मीठ टाक.... रातभरात ते ईरुन जाईन... मंग त्याले ते मीठ काढायले सांग....

पण दोन दिवसातच भूत मीठ पाण्यातून काढून आणते...अन कास्त्कारच्या उरावर  हजर ... म्हणे काम सांग....

भूताले लय येगयेगळ्या परकारचे काम सांगातल्या जातात... पण सगळे काम तो भर-भर करते..... त्याले त आकाशातले तारे मोजायले लावते पण तीन राती जागरण करून एवढे मोठे तारे भूत मोजून काढते.... अजून काय काय करायले लावते पण भूत त जुमानतच नाही न... मंग

कास्त्काराची  उडते घाबरगुंडी... आता काय कराव... गावातल्या शाळेतल्या मास्तरले भेटायाले जाते... त्यालेबी सारी हकीकत सांगते.....

मास्तर थोडस डोक लाऊन कास्त्काराच्या कानात सांगते.....

दुसऱ्या दिवशी भूत पायटी आल्या बरोबर कास्तकार त्याले काम सांगते... कि  हिमालयात जाऊन ततच सगळ्यात मोठ अन उंच झाड तोडून आन पण झाड सरकतीर पायजे... सरळसोट...

संध्याकाई भूत झाड घेऊन हजर.... हे अभायाले टेकिन येवढ उंच झाड आणते तो!

मंग त्याचा छाट काढ्याले सांगते....

मंग त्याच्यावरून रंदा मारून चोपड करायले सांगते....

मंग  म्हणते कि भूता आता या झाडाच्या खोडाले एवढ तेल लाव कि हे चोपड झाल पाहिजे...

भूत त्याले हजार पीप तेल लाऊन चोपड करते....

मंग त्याले त्या खोडाले गावाच्या येशिवर घेऊन जाय आणि तती रोऊन टाक... सरळ सोट.... उंच च्या उंच...

भूत हे काम बातच करते......

आता भूताले कास्तकार शेवटच म्हणते.... कि तुले मी आजपासून एकच काम देतो तेच करत जाय.....कोणत?

या खोडावर रोज वर चढत जाय अन खाली उतरत जाय....चढत जाय अन उतरत जाय...."उपर जाते जा...नीचे आते जा"

भूताले आता रोज एकच काम...

भूत लय दिवस हे करते.... शेवटी भूतही थकून जाते... खंगून जाते..... भुताची बायको कास्त्कारले विनंती करते कि माया नवर्याले सोडून द्या...
कास्त्कारले मंग दया येते अन तो भूताले सोडून देते...
सोडून देल्यावर भूताले विचारते...."कारे बाबू...पायजे का काम! पायजे अशीन तर ये....उपर जाते जा...नीचे आते जा!"

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

एक मराठा समाजातील तरुण म्हणून...

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्थिती मला तितकीशी माहित नाही. पण विदर्भातील त्यातल्या त्यात अकोला,अमरावती,बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील मराठा समाजात मी वावरत असल्याने त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे जे काही आकलन मला झाले आहे त्यातून काही गोष्टी प्रकर्षाने मला जाणवल्या त्या संक्षिप्त इथे मांडाव्या वाटतात....

एक मराठा तरुण म्हणून मराठा समाजा समोरील भविष्य काय आहे?

विदर्भातील बहुतेक मराठा समाज हा कुठल्या तरी फ़ैइल,पुरा किंवा नगरात राहतो उदा. द्यायचे झाले तर अकोट फ़ैइल, कमेटी फ़ैइल, सती फ़ैइल, हमाल पुरा आणि कॉपी राईट मिळवलेले शिवाजी नगर...ई. (मी इथे बहुतेक म्हणतोय) त्यामुळे तसे बघितले तर तो बर्यापैकी एकमेकांच्या संपर्कात असलेला आणि संघटन करून राहिलेला समाज आहे. मग आधीच संघटीत समाजाला प्रचंड मोर्चा काढून आपले संघटन शक्ती दाखवण्याची वेळ का आली?

वरील प्रश्नाचे उत्तर कळण्यासाठी आतापर्यंत काय स्थिती होती हे बघणे गरजेचे होते. मी काही समाज शास्त्रज्ञ नाही का कुठला शास्त्रीय अभ्यास करून निष्कर्ष मांडणारा नाही. या समाजातील एक शिक्षित तरुण म्हणून माझी काही निरीक्षण सांगतोय...

तर या भागातील बहुतेक मराठा तरुण हा अशिक्षित किंवा अर्धशिक्षित होता. आजही आमच्या आधीची पिढी जर बघितली तर मोजके सोडल्यास सगळे अंगमेहनितीचे काम करणारे दिसतात. हमाल म्हणून, कुली म्हणून किंवा एकाद्या किराणा दुकानात काम करणारे म्हणून. विदर्भातील मराठा या लोकांवर हि स्थिती का आली तर त्यांनी मराठवाड्यातून जेंव्हा स्थलांतर(त्याची अनेक कारणे आहेत) केले तेंव्हा आपली शेती आणि घरदार सोडून इकडे आले. इकडे अंग मेहेनत केल्या शिवाय पर्याय नव्हता. खाणारे खूप असल्याने घरातील बायका-मुले सुद्धा कामाला जायची. मागच्या दोन पिढ्यांनी कसे बसे इथे दिवस काढले. अस जगत असतानाही त्यांना परत आपल्या मुळ गावी जावेसे वाटले नाही कारण तिथली परिस्थिती त्यापेक्षाही भयंकर होती.

इथे स्थाईक झाल्यावर काहींनी शेती विकत घेतली आणि काहींनी व्यवसाय निवडला. तरीही शिक्षणाच्या बाबतीत आम्ही मराठे मागास राहिलो. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून दूरच होतो. आमच्या आजच्या पिढीच्या आधीच्या पिढीला शिक्षणाचे महत्व पटायला लागले आणि त्यांनी आपल्या मुला बाळांना शाळेत घालायला सुरुवात केली. आता कुठे शिक्षित मराठा तरून दिसायला लागला. हा तरुण जेंव्हा ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आला तेंव्हा त्याला स्वतावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव व्हायला लागली. त्याची आर्थिक स्थिती ठीक नसतानाही शिक्षणाचा भला मोठा खर्च सहन करावा लागला. पुढे उच्च शिक्षणासाठी खूप अडचणी जाणवायला लागल्या. त्यातून तरुणांमध्ये आरक्षणाची मागणी जोर धरायला लागली कारण त्यांना आर्थिक मागासलेपण पावलोपावली दिसत आले.

आजही जर प्रामाणिक सर्वेक्षण केले तर पंचाहत्तर टक्के मराठा बांधव आर्थिक दृष्ट्या मागासले आहेत. थोडक्या सधन मराठा समुहाचा विचार न करता, तथ्य लक्षात घेतली तर खरोखरच आरक्षणाची किती गरज आहे हे जाणवेल. सध्यस्थितीत जो मोर्चाने जोर धरलाय त्याचा विचार करता मराठी तरुणांनी आरक्षनाच्या मागणीला उचलून धरायला पाहिजे.  

कोपर्डी घटनेच्या आरोपींना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ती होईलच त्यात कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अटरॉसिटी कायदा रद्द करणे हि गोष्ट मला थोडी अशक्य वाटते म्हणून त्यात शक्ती खर्च न करता (आणि त्या कायद्याचा सामाजिक संदर्भातील उपयोगिता लक्षात घेता) त्या कायद्यात योग्य त्या बदलाची मागणी करून आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आलेल्या संधीचा उपयोग घेणेही तेवढेच गरजेचे आहे. कुणाला ठाऊक कि परत एवढा जनसमुदाय एकत्र येईल? मराठा बांधव भावनिक आहेत आणि त्यांच्या याच सद्गुणामुळे  आज ते एवढ्या मोठ्या संख्येने एक झालेत. आज त्यांना त्यांची मुले सुरक्षित वाटत नाहीत म्हणून ते पेटून उठलेत. हि आग शांत होण्या आधी हिचा योग्य वापर केल्या गेला पाहिजे आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी त्यांनी आरक्षणाची मागणी पूर्ण होई पर्यंत असेच एक राहायला हवे.


आज खेड्यापाड्यातील मराठा तरुण शहरात होणार्या मोर्चात हिरहिरीने सहभागी होताना दिसत आहे कारण खेड्यात राहताना, शेती करताना आर्थिक अडचणी कशा जीवघेण्या ठरत आहेत हे आपण सगळे जाणतोच म्हणूनच खेड्यातील तरुण सुद्धा शेतीकडे तोंड फिरवायला लागलेत. आपल्या शेतीवर अतोनात प्रेम करणारा मराठा तरुण, लग्न ठरवते वेळी नोकरी नसली तरी चालेल पण मुलाकडे शेती आहे म्हटले तरी मुलगी द्यायला तयार असतात, एवढे शेतीचे महत्व ज्यांना वाटते तेच शेतीला दुय्यम समजत आहेत आणि नोकरी-व्यवसायाकडे वळत आहेत. याचा अर्थ याच नाही तर या आधीच्या सरकारांकडून शेतीकडे पार दुर्लक्ष झाले आहे. म्हणून मराठा शेतकऱ्याला शांत आणि संयमी ठेवायचे असेल तर शेती धोरणात आमुलाग्र बदल करावा लागणार आहे. जेणे करून त्यांची आर्थिक स्थिती चांगली होईल आणि हा असंतोष नष्ट होईल. शेतीचा विकास अपेक्षित प्रमाणात झाला असता तर कदाचित मराठा समाज जो बहुंशी शेतीवर जगतो तो एवढा असंतुष्ट वाटला नसता. मध्यम वर्ग म्हणावे किमान एवढी जरी मला शेतीतून आवक मिळायला लागली तर मी आजही नोकरीच्या फंदात न पडता शेतीत गुंतलो असतो परंतु माझ्या बापाचे हाल बघितल्यावर मला त्या शेतीचा तिटकारा यायला लागला. मला इथे काही माझ्या आर्थिक परिस्थितीचे भांडवल करून सहानुभूती मिळवायची नाहीय.. माझे म्हणणे सहज आणि सरळ आहे कि आम्हा मराठा तरुणांसामोरील समस्या मोर्च्यातील बांधवांनी समजायला हव्यात आणि त्यानुसार आपल्या मोर्च्याला योग्य ते स्वरूप द्यायला हवे...   

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

पोलीस आणि प्रार्थना : ओ हेनरी यांची अनुवादित कथा



मूळ लेखक: ओ हेनरी 
मराठी अनुवाद: ज्ञानेश्वर गटकर 


सोपी अस्वस्थ होता. तसाच उदास मनाने तो  मेडिसन चौकातील त्याच्या जागेवरून उठला. वातावरणातील बदल स्पष्टपणे सुचवत होते कि हिवाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. 

पक्षी दक्षिण दिशेला उडून जात आहेत,आपल्या नवर्याकडून हिवाळ्यात घालण्यासाठी  नवीन, सुंदर, उबदार आणि तेवढाच महागडा कोट  मिळावा म्हणून बायका लाडात येत आहेत आणि  आपल्या जागेवरून सोपी उठत आहे हि हिवाळा येण्याचे  संकेतच आहेत हे समजदार व्यक्तीला सांगायची गरज नाही.

एक मलूल झालेलं पान सोपिच्या पायाशी येउन पडले. हिवाळा लवकरच सुरु होणार हे सांगणारा हा एक विशेष संदेश होता. तोच नाही तर त्याच्यासारखे अनेक लोक जे मेडिसन चौकात राहतात, ते या अपशकुनाबरोबरच हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी छत शोधायच्या तयारीला लागत.

त्या गळणार्या पानांबरोबरच सोपिला कळून चुकले  कि आता येणाऱ्या हिवाळ्यातील थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी हालचाल करण्याची वेळ आली आहे. या वास्तवाची जाणीव झाल्याबरोबरच तो कामाला लागतो आणि आपल्या जागेवरून उठतो.

हिवाळ्यातील दिवस कसे घालवायचे याबद्ल सोपीच्या खूप जास्त अपेक्षा नव्हत्या. श्रीमंत लोकांसारखे कुठल्या तरी दूर देशीच्या समुद्र प्रवासाला जायचे  किंवा दक्षिणे कडील उबदार वातावरणात जायचे किंवा नेपल्स या टुमदार बेटांवर हिवाळा घालवायचा असला काही तो विचार करत नव्हता. तर ब्लेकवेल या बेटावरील तुरुंगात हिवाळ्यातील तीन महिने व्यतीत करावे हीच त्याची अगदी साधारण इच्छा होती. तीन महिने पुरेसे अन्न, पांघरायला कापड आणि डोक्यावर छत एवढे जरी मिळाले तरी टोचणारी थंड हवा आणि विनाकारण त्रास देणारे पोलीस यांच्यापासून त्याची सुटका होणार होती. सध्याच्या घडीला तुरुंग हाच त्याच्यासाठी उत्कृष्ठ पर्याय होता... ही त्याची छोटीशी इच्छा.

अनेक वर्षापासून ब्लेकवेल तुरुंग  सोपिचे हिवाळ्यातील घर होते. न्यू यॉर्क मधील सधन लोक आपल्या हिवाळी  सुट्या घालवण्यासाठी फ्लोरिडा किंवा भूमध्य समुद्रावरील सागर किनार्यावर  जायचे. त्याचप्रमाणे सोपीने सुद्धा आपल्या सुट्टीसाठी तुरुंग असलेल्या बेटाची निवड केली होती.

आणि  आता सुट्टीच्या दिवसांच्या तयारीला लागायची  वेळ आली होती. तीन मोठमोठाली वर्तमानपत्रे जी चौकातील बगीच्यात झोपताना तो पांघरून किंवा अंथरून म्हणून वापरायचा आता तीसुद्धा थंडीपासून सोपिला वाचवण्यास असमर्थ होती, म्हणून तो बेटावरील तुरुंगाचा विचार गांभीर्याने करायला लागला.

याचा अर्थ असा नव्हता कि न्यू योर्क शहरात सोपिला अन्न आणि निवारा देणाऱ्या ओळखीतील लोकांची वानवा होती. त्याच्या ओळखीतील लोकांकडे आळीपाळीने जाऊन तो आपल्या गरजा भागवू शकला असता परंतु त्याला ब्लकवेलचा तुरुंग  इतर पर्यायांपेक्षा जास्त सोयीस्कर वाटायचा. त्याला असे वाटण्याची काही कारणे होती.

सोपी तसा स्वाभिमानी व्यक्ती होता. जर तो शहरातील आपल्या ओळखीकडे राहायला गेला असता तर तिथे त्याला आपल्या इच्छेविरुद्ध काही कामे करावी लागली असती. ओळखीतील लोकांनी त्याला राहण्यासाठी पैसे मागितले नसते तरी या न त्या प्रकारे त्याच्याकडून राहायचा मोबदला त्यांनी वसूल केला असता, जसे कि त्यांनी सोपिला आंघोळ करायला सांगितली असती, किंवा काय करतोस? कुठे राहतोस? आता काय करायचं ठरवल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली असती किंवा त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल विचारणा सुद्धा केली असती.

अशा गोष्टी करण्यासाठी त्याचे स्वाभिमानी हृद्य त्याला परवानगी देत नव्हते. त्याकारणे तुरुंगात जाणे त्याला सोपे वाटायचे. तुरुंगात राहण्याचे काही नियम जरी असले तरी ते नियम सभ्य व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळा-ढवळ करत नाही हे सोपी पूर्ण जाणून होता.

त्याचा तुरुंगात जाण्याचा निर्णय पक्का झाला आणि त्वरेने तो आपल्या कामाला लागला.

तुरुंगात जाण्याचे अनेक सोपे मार्ग त्याला ठावूक होते. त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला आणि आनंद देणारा मार्ग म्हणजे एखाद्या महाग आणि चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन भरपेट खायचे. खाऊन झाल्यावर बिलाचे पैसे चुकते करायला पैसेच नाहीत म्हणून सांगायचे. तेंव्हा पोलिसांना बोलावण्यात येईल आणि त्याला पकडून नेतील. हे सगळे अगदी शांततेच्या मार्गाने होणार याची त्याला खात्री होती. पोलिसांनी अटक केल्यावर त्याने कलेल्या गुन्ह्यासाठी त्याला न्यायाधीशांसमोर उभे केल्या जाईल. आणि बाकीचे सोपस्कार न्यायाधीश महोदय नंतर स्वतः पार पाडतील.

असा निश्चय करून तो  ब्रोडवे आणि फिप्थ अवेन्यू नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावरील  मेडिसन चौकातील बाकड्यावरून उठला. विस्तीर्ण पसरलेल्या चौकाला पार करून उत्तरेकडील ब्रोडवे रस्त्यावरून तो चालू लागला. थोड्यावेळातच  एका मोठ्या रोषणाई केलेल्या रेस्टॉरंट समोर तो उभा होता.

सोपीला विश्वास होता कि कमरेपर्यंत तो बर्यापैकी सभ्य माणूस वाटत होता कारण चेहरा स्वच्छ धुतलेला होता. चढवलेला कोटहि बऱ्यापैकी धुतलेला होता. रेस्टॉरंटच्या आतील टेबलावर पोचेपर्यंत त्याला कोणी हटकले नाही म्हणजे झाले! आणि  एकदा जेवणाच्या टेबलावर तो बसला म्हणजे त्याचे काम फत्ते झाले कारण टेबलाच्यावर त्याचा शरीराचा जो भाग दिसले तो व्यवस्थित होता. मग तो सांगेल ते जेवण वेटर त्याला आणून देईल याची त्याला खात्री होती.

आपण काय काय खावे यावर तो विचार करायला लागला. रेस्टॉरंट च्या मेनुतील झाडून पुसून सगळे पदार्थ त्याच्या नजरेसमोरून सरकत होते. जेवणाची किंमत खूप काही जास्त नव्हती आणि त्यालाही रेस्टॉरंटच्या लोकांनी बिलाची रक्कम  न दिल्यावर  खूप चिडू नये असेच वाटत होते कारण  पुढील तीन महिन्याच्या सुट्यांची सुरुवात उत्कृष्ट जेवणाने करावी आणि आपण  सुखाने आपल्या हिवाळ्यातील घरी जावे अशी आणि फक्त इतकीच त्याची साधीशी इच्छा होती.... त्यासाठीच हा प्रपंच.

परंतु जसा त्याने आपला  पाय रेस्टॉरंटच्या दारातून आत टाकला तेंव्हाच मुख्य वेटरचे लक्ष त्याच्या फाटलेल्या जोड्याकडे  आणि उसवलेल्या प्यांट कडे गेले. क्षणाचाही विलंब न करता सोपिला तेथून बाहेर हाकलण्यात आले.

सोपी परत ब्रोडवे रस्त्यावर चालू लागला. हा साधा आणि सरळ उपाय निष्फळ ठरला होता. एवढ्या सहजतेणे आणि सुखाने हवे ते  मिळणार नाही असे त्याला वाटले. दुसरा कुठला तरी पर्यायी मार्ग शोधावा लागेल याची जाणीव झाली.

पुढे सिक्स्थ अवेन्यू चौकात पोचल्यावर त्याला कोपर्यातील एक दुकान दिसले. दुकानासमोरील दर्शनी भिंतीवर एक भलीमोठी काचेची खिडकी होती जी जगमगत्या दिव्यांनी लखलखत होती. सोपीने एक दगड घेतला आणि त्या खिडकीच्या दिशेने भिरकावला. काच फुटल्याचा आवाज झाला. लोकांची गर्दी झाली. धावत येणाऱ्या लोकांमध्ये एक पोलीससुद्धा होता. सोपी निश्चल उभा होता आणि पोलिसाकडे बघून हसत होता.

“दगड मारणारा माणूस कुठे आहे?” पोलिसाकडून विचारणा झाली.

“तुम्हाला हा दगड मीच मारला असे वाटत नाही का?” सोपी उत्तरला. सोपी खूपच खुशीत दिसत होता. त्याला जे पाहिजे होते ते स्वतःहून तिथे चालत आले होते आणि आता त्यालाच विचारत होते.

परंतु पोलिसाने सोपिकडे अजिबात लक्ष दिले नाही. पोलिसाच्या मतानुसार जो व्यक्ती दगड मारेल तो उगाच कशाला त्याठिकाणी थांबेल. दगड मारणारे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पळ काढतील. पोलिसाला एक माणूस रस्त्याच्या पलीकडे धावताना दिसला आणि पोलीस त्याला पकडायला म्हणून धावत निघून गेला. आणि सोपी, खजील मनाने व हळू पावलांनी चालायला लागला. त्याला दोनदा अपयश आले होते.

रस्त्याच्या पुढच्या बाजूला आणखी एक रेस्टॉरंट त्याला लागले. हे रेस्टॉरंट ब्रोडवे एवढे श्रीमंत नव्हते. आपल्या फाटक्या कपड्यांनी आणि जोड्यांनी तो बिनदिक्कत इथे जावू शकत होता. जेवायला येणारे लोकही साधारण वाटत होते आणि जेवणहि स्वस्त होते. सोपी आत गेला. त्याने जेवण मागवले. भरपेट जेवल्यावर पैसे चुकते करतेवेळी तो म्हणाला,

 "पैसे! अहो माझे आणि तुम्ही जो शब्द म्हणताय 'पैसे' त्याचे  खूप दिवासंपासुंचे वैर आहे."

वेटरकडे बघत तो पुढे बोलला, 

“तुम्ही लवकर पोलिसांना बोलवा आणि मला त्यांच्या हवाली करा, उगाच माझ्यासारख्या सभ्य माणसाला ताटकळत ठेवू नका.” सोपीने आज्ञा दिली.

“तुमच्यासाठी आम्ही पोलिसाना बोलावण्याचा त्रास घेणार नाही.” तिथला वेटर सोपिकडे खवचट बघत उत्तरला. 

त्याने दुसर्या एका वेटरला बोलावले आणि म्हटले, " तुमच्यासारख्यांचा आम्ही खास पाहुणचार करतो!"

दोन्ही वेटरनि  मिळून, सोपिच्या डाव्या कानाखाली आवाज काढले आणि त्याला बाहेर रस्त्यावर फेकून दिले. रस्त्यावर पडलेला सोपी हळूहळू, शांतपणे उभा झाला. आपले कपड्यांवरची धूळ झटकली. तुरुंगात जाणे तर आता त्याला दिवास्वप्न वाटायला लागले होते... तुरुंग अजूनही फार लांब होता... त्याचा तो अवतार बघून जवळच उभा असलेला पोलीसवाला हसतो आणि निघून जातो.

जवळपास अर्धा मैल  चालत  गेल्यावर सोपीने आणखी एक प्रयत्न करायचा विचार केला. यावेळी आपला प्रयत्न यशस्वी होईल याची त्याला खात्रीच होती. तिथे एका दुकानाच्या खिडकीजवळ सुंदर,सभ्य दिसणारी स्त्री उभी होती. अर्थातच इतक्या सभ्य स्त्रीशी कुण्या अनोळखी पुरुषाने आगाऊ बोलल्यावर ती स्त्री रागावेल. तिची छेड काढत आहे असे समजून नक्कीच ती पोलिसांची मदत मागेल. असे झाल्याबरोबरच पोलिसाचा तो उबदार तळहात सोपिच्या मनगटाला पकडेल ज्या  हव्याहव्याश्या स्पर्शासाठी  सोपि एवढा आटापिटा करत आहे आणि एकदाचा तो आनंदि होईल. मग लवकरच सोपी बेटावरील सुट्यांच्या दिवसांसाठी रवाना होईल.

तो तिच्या जवळ जातो. नजरेच्या कोपऱ्यातून पोलीस आपल्याला बघतोय याची खात्री करतो. ती तरुण स्त्री दोन-चार पावले मागे सरकते. सोपी तिच्या आणखी जवळ जातो आणि अगदी तिला खेटून उभा राहतो. सोपी तिची छेड काढण्यासाठी तिला म्हणतो, “गुड इव्हिनिंग बेडेलीया! माझ्यासोबत खेळायला माझ्याघरी येतेस का?”

त्याच्या या हरकतीकडे पोलीस  बघतच असतो. त्या स्त्रीने पोलिसाला फक्त इशारा करायची देर आणि सोपीचे बेटावरील सुट्यांचे तिकीट पक्के...सोपिला तर आताच थंडीच्या दिवसात तुरुंगातील उब जाणवत होती...पण

ती स्त्री सरळ सोपिकडे चेहरा करत, त्याचा हात नाजूकपणे आपल्या हातात घेत बोलली, “अरे माईक नक्कीच येईल तुझ्याकडे पण माझ्यासाठी खाण्यापिण्याची सोय करशील तरच...आता इथे नको पण लवकरच भेटू  तुझ्या घरी  कारण आता तो पोलीसवाला आपल्याकडे बघतोय.”

तिने त्याचा पकडलेला हात तसाच हातात ठेवला आणि  ते दोघेही पोल्संच्या जवळून निघून गेले. सोपिला आता काळजी वाटायला लागली. तुरुंगात जायचा त्याचा मनसुबा पूर्ण होईल का नाही याबद्दल तोही आता साशंक व्हायला लागला.

पुढच्या चौकात तिच्या हातातून आपली सुटका करून सोपी धूम पळत निघाला.

थोडे अंतर धावत गेल्यावर धाप लागलेला सोपी थांबला. तो जिथे थांबला होता तो रस्त्याचा भाग नाट्यगृहांमुळे गजबजलेला होता. तसेही शहराच्या या भागात रस्त्यावर वेगळीच चमक असायची आणि प्रफुल्लीत चेहेर्यांचे लोक भेटायचे. त्या हिवाळ्यातील रम्य सायंकाळी चेहऱ्यावर प्रसन्न स्मित ठेवून, उंची वस्त्रे घालून श्रीमंत बायका-मानसाची ये-जा सुरु होती.

मात्र सोपिला वेगळ्याच प्रकारची धास्ती होती ती म्हणजे त्याला कुठलाच पोलीस आज अटक करणार नाही याच भीतीने तो अस्वस्थ झाला. त्याला काहीतरी करणे जरुरी होते म्हणून तो एका नाट्यगृहाच्या बाहेर जिथे पोलीस उभा होता त्याच ठिकाणी मुद्दाम गेला. आपण  काहीतरी विचित्र आणि अनपेक्षित केल्याशिवाय आपला मनसुबा पूर्ण होणार नाही याची त्याला आता जाणीव झाली होती.

अचानकच सोपी नरड्याच्या शिरा होतील तेवढ्या ताणून ओरडायला लागला, तो  भेसूर गायला  लागला, नाचायला   लागला... जणू तो  अट्टल बेवडा आहे  आणि या श्रीमंत आणि सभ्य लोकांना त्रास देतोय.

आणि पोलिसाने...सोपिकडे निखालस दुर्लक्ष केले आणि आपल्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला तो पोलीस म्हणाला,
 “हा त्याच कॉलेजमधील मुलगा आहे जे आज सामना जिंकले... त्यामुळे आमच्या वरीष्ठाकडूनच आम्हाला आदेश आहेत कि आजच्या दिवशी या मुलांकडे दुर्लक्ष करावे... कारण ते फक्त ओरडतील परंतु कुणाला इजा करणार नाहीत.”
सोपी ओरडायच थांबला. आज कोणताच पोलीस त्याला अटक करणार नाही का? आता तर बेटावरील तुरुंग त्याला स्वर्गाइतकाच अप्राप्य वाटायला लागला. त्याने अंगावर चढवलेला कोट ठीक केला त्यासरशी त्याला हवेतील वाढता गारवा जाणवला. ‘

नंतर सोपिचे लक्ष दुकानात वर्तमानपत्र घेणाऱ्या एका माणसाकडे गेले. तो माणूस उभा होता आणि त्याचे लक्ष पूर्ण वर्तमानपत्रांकडे होते. बाजूलाच त्या  माणसाने छत्री  ठेवली होती. सोपी सरळ दुकानात गेला. ती छत्री उचलली आणि अगदी बिनधास्तपणे हळू पावले टाकत तो चालू लागला. छत्रीवाला माणूस लगेचच त्याच्या पाठी धावत आला आणि सोपिला म्हणाला,
“हि माझी छत्री आहे.”
त्यावर सोपी बोलला, “अच्छा!! हि तुमची छत्री आहे  तर  मग  मी  चोरली, जा पोलिसांना बोलवा. तो तिकडे एक पोलीस उभाच आहे. त्याला बोलवा आणि सांगा कि मी चोर आहे म्हणून.”

सोपिचे बोलणे एकूण तो माणूस हळू हळू चालायला लागला. सोपिनेही आपल्या पायांची गती आणखी कमी केली. सोपिला त्यावेळी आतून वाटत होते कि त्याचा हा प्रयत्नसुद्धा निष्फळ ठरेल. पोलीस दोघांकडेही शंकेच्या नजरेने बघत होता.

“मी--” छत्रीवर हक्क सांगणारा माणूस चाचरत बोलायला लागला, “—कस आहे! अंSSS तुम्हाला तर माहीतच आहे  कि आजकाल...असुद्या.. जर हि तुमची छत्री असेल तर तुम्ही घ्या.. त्याच काय आज सकाळीच मला हि एका रेस्टॉरंट च्या बाहेर सापडली.. जावू द्या तुमचीच आहे अस म्हणताय तुंम्ही तर तुमचीच असेल न!!! बरय.. येतो.”

“हो!हो! हि माझीच आहे” रागाने फुरफुरत, नाकपुड्या फुगवत सोपी ओरडला.

तो माणूस पटकन तिथून निसटला. पोलीस एका वृद्ध बाईला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत होता आणि सोपी असहाय होऊन पुढे चालायला लागला. निराश होऊन त्याने फेकता येईल तेवढ्या दूर त्या छत्रीला भिरकावले. तो प्रत्येकवेळी असफल होत होता. पोलीस जणू त्याला आज राजा समजत होती जसा कि त्याच्या हातून कुठली चूक घडतच नाहीय.

सोपी शहराच्या पूर्वेकडील एका सुनसान सडकेवरून चालत होता. इथून त्याने त्याच्या घरी म्हणजे मेडिसन चौकातील बागेच्या बाकाकडे जाणाऱ्या मार्गाकडे वळण घेतले. तो चालू लागला पण...

रस्त्याच्या एका शांत कोपर्यावर सोपी अचानक थांबला. त्याला थांबावं वाटल. ते एक खूप खूप जुने चर्च होते. चर्चच्या एका खिडकीच्या रंगीत काचेतून मंद प्रकाश पडत होता. त्याच खिडकीतून सुमधुर संगीताची नाजूक लय सोपिच्या कानावर पडली आणि तो मंत्रमुग्ध झाला. ती एक अतिरम्य वेळ होती. आकाशात चंद्र तरुण होता. सोपी सायंकाळच्या पक्षांची उंच आकाशातील गाणी एकू शकत होता... एव्हढी शांतता.... क्वचितच येणाऱ्या जाणार्यांच्या आवाज व्हायचा...  पण तीथे अतीव शांत आणि प्रसन्न वाटायला लागले होते.

चर्च मधून सोपिला खूप दिवसापासून ठाऊक असलेल्या प्रार्थनेच्या सुरावटी ऐकायला आल्या. त्याला आपल्या जुन्या दिवसाची आठवण झाली.. ते मंतरलेले दिवस जेंव्हा त्याच्या आयुष्यात आई चे प्रेम, प्रेमाचा नाजुकपणा...मित्रांची सोबत,  स्वप्नाची साथ आणि स्वच्छ विचार व स्वच्छ कपडे होते ... त्याला आठवले ते सगळे सुंदर दिवस ...

सोपीचे हृद्य अशाच कुठल्यातरी अनुभवाची वट बघत होते. तो योग्यवेळी या चर्च जवळ पोचला होता. तिथे त्याला वेगळीच अनुभूती होत होती आणि त्याचे अंतकरण त्या शांत जाणीवेने बदलून जात होते. पहिल्यांदा आपल्या भरकटलेल्या आयुष्याबाबत तो गंभीर झाला.. आतापर्यंत वाया घालवलेले मूल्यवान दिवस, फालतू इच्छा, मेलेल्या आशा आणि मनाची कोमेजून गेलेली अवस्था त्याला प्रकर्षाने जाणवत होती.

आणि चर्चच्या या एकट्या शांत कोपऱ्यात सोपीने ठरवले कि आजपासून हे लाचार जगणे सोडायचे... परिस्थितीशी लढायचे व या चिखलात, निराशेत गुरफटलेल्या आयुष्याला बदलून नव्याने जगायला सुरुवात करायची.

तो अजूनही तरुण असल्याने त्याच्याकडे आयुष्य सुंदर करण्याची संधी होती. आपले अधुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागायचा त्याने निश्चय केला. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याला नोकरी द्यायचे वचन दिले होते. आता त्या व्यक्तीला  शोधून ती नोकरी करायची असे सोपीने ठरवले. तो भविष्यात कुणीतरी बनेल असा त्याला विश्वास वाटत होता. त्या शांत संगीताने आणि प्रार्थनेच्या सुरांनी त्याला बदलून टाकले होते. तो आता—

तेव्हड्यात त्याच्या खांद्यावर एक हात येवून आदळला. मोठ्या जबड्याचा न्यू योर्क पोलीस त्याच्याकडे बघत म्हणाला,
“ असल्या भाल्त्यावेळी तू इथे काय करतो  आहेस?”
“काहीच नाही” सोपी उत्तरला.
“तुझ्या या काहीच नाहीवर मी विश्वास ठेवेल असे तुला वाटतय का?” पोलीस म्हणाला.

नव्या उर्जेने आणि अति-उत्साहाने सोपी त्या पोलीसाशी वाद घालायला लागला. पोलिसांशी वाद घालणे कधीही, कुणालाही परवडत नाही.

“माझ्या सोबत चल.” पोलीस त्याला पकडून घेऊन गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच न्यायाधीशांनी सोपिला त्याच्या शुल्लक गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावली, 

“तीन महिन्यासाठी तुला बेटावरील तुरुंगात ठेवण्यात येईल”























अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...